आजारांचं फॅशन - 13 Prashant Kedare द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

आजारांचं फॅशन - 13

"बसा गोरे साहेब बसा"

निखिल बहिरेने अनिल साठी बाजूने खुर्ची ओढत बोलला.

" नई नई तुम्ही चालू द्या, मी नई घेणार, बाळ्याला भेटतो अन जातो मी"

"अरे एक पेग मार अन जा भेटून त्याला, त्याला किती वाईट वाटल तू नई पिला तर"

घोरणे पप्या शेंगदाण्याचे दाणे तोंडात टाकत बोलला

"त्याला काही नई वाईट बिट वाटत, तू राहूदे"

अनिल ने खुर्चीवर बसत उत्तर दिले

"अरे आता बसलायस तर घे एक पेग, काय नई कळत घरी एक पेग नि'

शार्दूल ग्लास भरत भरत बोलला.

आता मैफिल रंगलेली होती, सगळे मित्र जमा झालेले होते, बाजूला डि जे वर गाणे वाजत होते आणि महत्वाचं म्हणजे समोर ग्लास पण भरलेला होता, नाही बोलावं तरी कस, अनिलने गालातल्या गालात हसत ग्लास उचलला आणि तोंडाला लावला.

एक दोन तीन चार पाच सहा ग्लासांवर ग्लास भरत गेले, गप्पांची आणि हास्य मस्करीची मैफिल रंगात आली, कुणी हलायला लागलं, कुणी डुलायला लागलं, शार्दूल नाचायला लागला आणि सगळ्यांना नाचायला खेचायला लागला, हळद एकदम रंगात आली, अनिल आणि सगळे मित्र नाचत होते, मजा करत होते रात्रीचे साडे अकरा वाजले होते, अनिलचा फोन तासाभरात १५ ते १६ वेळा वाजून झाला होता, पण गाण्याच्या आवाजामुळे आणि दारूच्या गुंगी मुळे त्याला त्याच काही भानच नव्हतं.

शेवटी बारा साडे बाराच्या दरम्यान पोलिसांनी येऊन डि जे बंद केला आणि सगळे जण आप आपल्या घरी गेले.

अनिलने हालत डुलत दार वाजवले, सविताने दार उघडले, अनिलचे शर्ट घामाने भिजलेले, डोळे आणि तोंड लाल भडक, लढकडते पाय, त्याचा हा अवतार बघून तिच्या डोक्यात गॅसचा सिलेंडर फुटल्यासारखा भडका झाला, अनिल आत शिरला, सविताने दार लावले आणि कपाळावर हात मारत बोलली.

"लाज वाटत नई अशा अवतारात घरात यायला, शरम काय विकून खाल्ली काय, निर्लज्ज माणूस"

"ये थोबाड सांभाळून बोल, निर्लज्ज कोणाला बोलतीस, तुझ्या बापाच्या पैशाची पिलोय का, साला नेहमी नेहमी इचे नाटक ऐकून घ्या, नई पटत ना तर सोडून दे मला, जा निघून"

एवढे बोलून अनिल बेड वर आडवा झाला.

"काय बोलले सोडून जा, हा मला पण कंटाळा आलाय ह्या नेहमीच्या कटकटीचा, कोणाला राहायचा शोक आलाय, सकाळ झाली की तोंड पण नई दाखवणार याला, अन माझ्या लेकरांना पण नई ठेवणार अशा येड्या अन बेवड्या जवळ."

बडबड करून सविता आज खाली जमिनीवरच झोपली

सकाळ झाली सविताने आज गॅस देखील पेटवला नव्हता, अंघोळ करून तिने आपले आणि मुलांचे कपडे एका बॅग मध्ये भरले होते, अनिल बेड वर शांत बसून ते सगळं बघत होता.

अनिलला समजून घेणे आता सविताच्या सहनशक्तीच्या आणि कल्पनेच्या पलीकडचे झाले होते, तिच्या मनातल्या अनिल बद्दलच्या प्रेमाची, आत्मयतेची आणि आपुलकीची जागा आता रागाने, द्वेषाने आणि मनस्तापाने घेतली होती, ती एक क्षण देखील त्या घरात आणि अनिल जवळ थांबायला तयार नव्हती, किंबहुना तिच्या मनाची आणि मेंदूची जणू दोरीच कुणी कापली होती, मेंदू मनातल्या प्रेमाला समजायला तयार नव्हता आणि मन मेंदूच्या समजूतदारीला नाकारत होत.

तिने पलंगावर भरून ठेवलेल्या बॅगेला खांद्यावर टांगली, मुलीला कडेवर उचलले आणि मुलाचा हात खेचत ओरडली,

“चला रे गाभरानो, ह्या चक्रम माणसाचं तोंड पण नई बघायचंय, येडं कुठलं”

“ये येडा कोणाला म्हणली, तुझी आई येडी, तुझा बाप येडा, निघ माझ्या घरातून परत तुझं थोबाड वर करत येऊ नको इकडं”

अनिल सविताच्या अंगावर धावून जात ओरडला,

“आडलंय माझं खेटार”

सविता जोरात दरवाजा आपटून घराबाहेर पडता पडता पुटपुटली,

ती तीन वर्षाची लहानशी पोरगी केविलवाणं तोंड करून रडत होती,

मुलगा मला पप्पा कड राहायचंय, मला पप्पा कड राहायचंय.. डोळ्यातून वाहणारे अश्रू पुसत आणि नाकातून येणार पाणी जोर जोरात वर ओढत एकसारखा आईला सागंत होता.

पण दोघांचीही मानसिक स्थिती अश्या काही स्तराला पोहचली होती की त्या निष्पाप जीवांच्या आकांतेकडे बघण्याचे किंवा त्यांचे डोळे पुसून, काळजा जवळ त्यांना घट्ट मिठी मारून रडू नका रे, बोलण्याचे भान देखील उरले नव्हते.