सविता निघून गेल्यानंतर अनिल पाच मिनिटे बेडवर शांत बसून स्वतःशीच पुटपुटत होता
“बर झाली गेली कटकट, सुटलो एकदाचा, आता नाक घासत जरी आली ना तरी दारात पाय पण नई ठेवू देणार, अन येऊद्या त्या तिच्या आईला मला काय विचारायला दाखवतोच तिला बरोबर, म्हातारिणीच फुगवलंय हिला म्हणून एवढी भुकतीय”
अनिल ताडकन उठून उभा राहिला, पॅन्टच्या खिश्यात हात घालून पैसे काढून मोजले, पैसे परत खिशात ठेवून पॅन्ट घातली, शर्ट अंगावर चढवून शर्टचे बटन लावत लावतच घरा बाहेर पडला आणि मागे पुढे न बघता तडक वाईन शॉपला जाऊन स्वारी थांबली आणि क्षण भर पण वाया न घालवता खिश्यातुन दोनशे रुपय काढत काउंटर वर उभ्या असलेल्या पोराला बोलला
“एक आय बी क्वाटर दे रे”
“काय गोरे साहेब आज दुपारी दुपारीच?
काउंटर वरचं पोरग बिचार बॉटल देत सहजच बोललं, तर अनिलराव त्या गरिबांवर पण तापले
“का तुला काय त्रास हे का, का दुपारी पिण्यावर सरकारनी बंदी घातलीय, डोन्ट ड्रिंक अँड ड्राईव्ह सारखं डोन्ट ड्रिंक इन दुपारी असं काय आलाय का? काम कर ना आपलं उगाच गावभरच्या पंचायती कशाला पाहिजेल रे तुला”
तेवढ्यात पाठी मागून कॅशियर ओरडला “ओ गोरे जाऊद्या सोडा ना, अय बंट्या तू तुहं काम करना कायला उगाच कस्टमरशी काय बी बरमळतोय”
अनिल ने बॉटल खिश्यात ठेवत बाजूच्या पान टपरीवर जाऊन एक शंभर ची नोट देत
“पाच वाले वाटाणे दे रे”
“छुट्टा दो भाई पाच रुपय्ये के लिये सौ का छुट्टा किधर से लावू”
पान टपरीवरचा भय्याने तोंडातल पान चावत चावत अनिलच्या हातात शंभरची नोट परत दिली.
“एवढा धंदा करता हे अन सुट्टा नई ठेवता है, देव ते पैसे इकडं”
अनिल चा राग भेटेल त्याच्या वर निघत होता. अनिल शंभर ची नोट घेऊन पुन्हा वाईन शॉप वर गेला आणि सुट्टे मागण्या ऐवजी बोलला
“एक काम कर एक पिल्लू पन दे आय बी च”
ह्या वेळेस काऊंटर वरच्या पोराने एक शब्द सुध्दा न बोलता नाईंटी एम एल चा पेग आणि उरलेले पैसे अनिल समोर ठेवले, अनिलने बॉटल दुसऱ्या खिश्यात टाकली, पान वाल्याला पाच रुपये दिले, वाटाणे घेतले आणि सरळ घराची वाट धरली.
दाराजवळ पोचतोय तर दार उघडेच होते, अनिल आत शिरला आणि जरा घमेंडीच्या स्वरात जरा मोठा आवाज करून बोलला,
“आलीस ना उलट्या पायानी परत”
‘थुडुम्ब’ किचन मधून भांड आदळण्याचा आवाज आला, अनिल काही बोलेल त्या आधी आतून जोरात म्याऊ आवाज करत मांजर घरा बाहेर पळाली, अनिल भानावर आला आणि त्याच्या लक्षात आले कि लगबगीने जाण्याच्या नादात त्याने दाराला कडी किंवा कुलूप लावलेच नव्हते.
अनिल ग्लास आणि पाणी आणण्या साठी किचन मध्ये गेला तर किचन भर दूध सांडलेले होते जणू काही त्याच्या कुटुंबाचं पातेलं पालथं होऊन संसाराचं दूध हळूहळू सिंक मधून वाहून चाललं होत.
एखाद्या कसायाने गुरकने कोंबडीची मान पिरगळावी तसे अनिलने बाटलीचे झाकण उघडले, दारू स्टील च्या ग्लासात ओतली, मागो माग लगेच पाणी ओतून ग्लास पूर्ण भरला आणि क्षणाचाही विलंब न करता ग्लास तोंडाला लावून एकदातच तो रिकामा करून खाली आपटला, चार वाटणे तोंडात टाकून एक मोठा ढेकर देत एक लांब श्वास सोडला.
“माजच जिरवतो आता हिचा बरोबर, ओळखत नाही अजून ही मला, अनिल गोरे म्हणतात मला अनिल गोरे मोठ्या मोठ्या गाड्या बोटावर नीट करतो तर ही नकट्टी मेंडकुळी काय चीज आहे”
अनिल ने बायकोचे गुण गात दुसरा पेग भरला आणि दोन, तीन, चार असे करत आणलेली पूर्ण दारू स्वतःशीच तोंडाला येईल ते बरमळत फस्त केली आणि तसाच उपाशी पोटी पलंगावर आडवा झाला.
संध्याकाळी उठल्यावर अनिल परत पिला आणि पुन्हा तसाच उपाशी झोपला, दुसऱ्यादिवशी सकाळी पोटात आग पडली, दारू आणि उपासमारीने पोटाची पिळवणूक झाली होती, पूर्ण दिवस नशेत आणि झोपेत गेला होता, ना त्याने सविताला फोन केला ना तिचा फोन आला.