अपराध कुणाचा, शिक्षा कुणाला? - 5 - अंतिम भाग Nagesh S Shewalkar द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

अपराध कुणाचा, शिक्षा कुणाला? - 5 - अंतिम भाग

(५) अपराध कुणाचा, शिक्षा कुणाला?
खोलीत गेल्यावर लताने पत्र काढले. हळू आवाजात वाचायला सुरुवात केली. कोणताही मायना न लिहिलेल्या पत्रात लिहिले होते...
'तुझे नाव घेण्याची माझी लायकी नाही आणि तो अधिकार मी गमावून बसलो आहे. तुझा कोणताही गुन्हा नसताना, अपराध नसताना आणि मी केलेल्या चुकांची तसेच माझ्या मौन वागण्याची शिक्षा तुला मिळते आहे हे मला माहिती आहे. एका अर्थाने मी तुझा खून केलाय ही बोचणी, ही अपराधाची भावना, जाणीव मला होते आहे. तू निर्दोष आहेस, तुला एड्ससारखा महाभयंकर रोग माझ्यापासूनच झालाय हे जसे मला माहिती आहे, तसेच ते माझ्या आईबाबांनाही ठाऊक आहे. तू विश्वास ठेव असे मी म्हणणार नाही, तसे सांगणार नाही पण मला लग्नापूर्वीच एड्स झालाय हे आम्हाला माहिती होते आणि लग्नानंतर तो माझ्या बायकोला होणार ही काळ्या दगडावरची रेघ असूनही आईबाबा ऐकले नाहीत. मला त्यांचे म्हणणे ऐकावे लागले आणि तुला त्या दलदलीत ढकलावे लागले. येणाऱ्या सुनेने एड्स घेऊनच घरात प्रवेश केला आणि तिच्यामुळेच मला एड्स झालाय हे समाजाला कळून नव्हे तसे जगजाहीर केले म्हणजे माझी आणि घराण्याचे बदनामी टळेल, आमच्याबद्दल समाजात आणि नातेवाईकांमध्ये सहानुभूती निर्माण व्हावी म्हणून त्यांनी तसा डाव खेळला. मी असा विचार केला की, कालांतराने त्या दोघांना समजावून सांगता येईल आणि तुझ्यासोबत उर्वरित जीवन काही प्रमाणात आनंदाने जगता येईल म्हणून मी शांत होतो. माझी मानसिक अवस्था तुझ्यापेक्षा वेगळी नव्हती. इच्छा असूनही, अनेकदा प्रयत्न करूनही मी तुझ्याशी संवाद साधू शकलो नाही. त्या दिवशी तुझे आईबाबा आलेले असताना आईबाबांनी तुझ्या चारित्र्यावर जो घाणेरडा आरोप केला त्यामुळे मी पुरता हादरून गेलो, उद्ध्वस्त झालो. काही दिवस तर मी आत्महत्या करावी असा विचार केला. दोन-तीन वेळा तसा प्रयत्नही केला. परंतु यशस्वी झालो नाही. पुन्हा वाटले आपल्या मौनामुळे आपण आपल्याच बायकोला बदनामीच्या महासागरात लोटले आहे. आता आपण आत्महत्या करावी तर ते पलायन ठरेल, तो एक गुन्हा ठरेल. माझी निष्पाप बायको जर तिने न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगते आहे तर आपणही पश्चातापाच्या आगीत होरपळत राहिलेले सारे जीवन जगावे. मला एड्स आहे हे समजल्यावरही मला जो धक्का बसला होता त्यापेक्षाही जबर धक्का बाबांनी तुझ्यावर केलेल्या आरोपांमुळे बसला. त्यानंतर त्या धक्क्यातून सावरायलाही वेळ मिळाला नाही कारण तुझ्या बाबांनी तुला सोबत नेले. त्यांचेही बरोबर आहे म्हणा समोर दिसणाऱ्या गचाळ दलदलीत ते स्वतःच्या मुलीला कशाला ठेवतील ना? नंतर अनेकदा तुला भेटण्याची, फोन करण्याची इच्छा अनावर झाली परंतु हिंमत झाली नाही. तुझ्याशी बोलण्याची, चर्चा करण्याची माझी लायकी नाही, अधिकार नाही हे जाणून मी शांत बसलो. तू खरेच अतिशय महान आहेस. केवळ माझ्यासाठी तू सारा छळ, मनस्ताप आणि खालच्या पातळीवर केलेले आरोप सहन केलेस हे मी जाणतो. तुझा माझ्यासमक्ष होत असलेला छळ एखाद्या तिऱ्हाईत व्यक्तीने पाहावा तसा मुक साक्षीदार बनून बघत होतो. खरे सांगू का, मी षंढ आहे... शारीरिक अर्थाने, मानसिक अर्थानेही, आणि कर्मानेही! तुझे नाव उच्चारायचीही माझी लायकी नाही. तुला भयंकर वनवास सोसावा लागतोय तोही माझ्यामुळे! तू सोबत होतीस, भलेही आपल्यात संवाद नसेल पण एक मानसिक आधार होता, एक आस होती की, कदाचित आपल्यातील संबंध सुधारतील पण तू निघून गेली आणि तीही आशा मावळली. आता दोन्ही घराण्यातील फाटलेले आकाश कुणी सांधू शकणार नाही...
जे मी तुला प्रत्यक्ष समोरासमोर सांगण्याची हिंमत झाली नाही ते सांगण्याचा प्रयत्न करतो. मला माहिती आहे, तुला एक प्रश्न कायम सतावत असणार तो म्हणजे मला एड्स झाला कसा? तू मला हा प्रश्न कधी विचारला नाहीस पण मी ते सांगून काही प्रमाणात मोकळा श्वास घेण्याचा प्रयत्न करतो. माझ्या शेजारी एक कुटुंब राहत होते. त्यांना माझ्यापेक्षा एक-दीड वर्षाने लहान मुलगी होती. तसे समवयस्क असल्यामुळे आम्ही लहानपणापासून आम्ही एकत्र राहत होतो, खेळत होतो. वय वाढत असताना शारीरिक आकर्षणही निर्माण झाले. मी अनेकदा तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला परंतु तिने कटाक्षाने, निर्धाराने नकार दिला. एकेदिवशी मी तिच्याशी लगट करीत असताना ती म्हणाली, 'हे बघ. तुला राखीचा अर्थ कळतो काय? लहानपणापासून मी तुला राखी बांधतेय त्यामुळे आपले नाते...' ते ऐकताना माझे डोळे खाडकन उघडले.
परंतु तिच्या नेहमीच्या सान्निध्याने मनात शिरलेले विचार स्वस्थ बसू देत नव्हते. तिच्याकडे पाहण्याची दृष्टी तिने केलेल्या कानउघाडणीनंतर बदलली पण... अशाच परिस्थितीत मी एका नातेवाईकडे लग्नासाठी गेलो. चार-पाच दिवसांच्या मुक्कामात एक पाहुणा भेटला. त्याचे वागणे थोडे वेगळे वाटत होते. तो मला शारीरिक लगट करताना नको तिथे स्पर्शही करू लागला. त्यामुळे हळूहळू माझ्या मनात त्याच्याबद्दल वेगळेच आकर्षण निर्माण होत गेले. शेवटी त्याने माझ्या अवस्थेचा फायदा उठवला. मला नको त्या अनैसर्गिक वाटेवर, चक्रव्यूहात नेले. दोनच दिवसात मी त्या संबंधाला चटावलो, आहारी गेलो. त्या लग्नाहून घरी परतलो परंतु लागलेली चटक स्वस्थ बसू देत नव्हती. ते म्हणतात ना, 'जहाँ चाह, वहाँ राह' याप्रमाणे मला तसे 'संबधी' भेटत गेले. या समाजात अनिष्ट प्रकाराला चटावलेले, त्या रस्त्यावर नेणारे अनेकजण भेटतात परंतु त्यापासून परावृत्त करणारे फार कमी भेटतात आणि तसा कुणी भेटला तरीही त्याचे बोल अप्रिय वाटतात, पटत नाहीत. तो आपला दुश्मन आहे असे वाटतो. प्रसंगी त्याचे बोलणे पटले तरीही आपण तिथून बाहेर पडू शकत नाहीत. कारण तेव्हा परिस्थिती हाताबाहेर गेलेली असते. हा चक्रव्यूहच असा असतो की, त्यात शिरणे सोपे असते परंतु बाहेर पडणे केवळ अशक्य असते. माझेही तसेच झाले. तशातच एड्सचे निदान झाले. मी पुरता हादरून गेलो. घराण्याची बदनामी होऊ नये म्हणून बाबांनी मग लग्नाचा घाट घातला. तुझ्याशी लग्न झाले. अनेकदा तुझ्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला पण हिंमत झाली नाही. मी लग्नानंतर त्या रस्त्यावर न जाण्याचा खूप प्रयत्न केला पण यश आले नाही किंबहुना मला त्या पाहुण्याने तसे करू दिले नाही कारण मी त्याच्याशी रत असतानाचे अनेक फोटो त्याने काढलेले होते. तो मला त्या फोटोच्या आधारे ब्लॅकमेल करीत होता. अनेक ठिकाणी त्या संबंधातून पाठवत होता. त्याने माझ्या शरीराचा बाजार मांडला होता. शरीर माझे, किंमत तो वसुल करीत होता. मला याही परिस्थितीत एका गोष्टीचे समाधान आहे की, त्याची वाईट नजर तुझ्यावर पडली नाही. माझ्या फोटोच्याआधारे त्याने तुला.... जाऊ देत.
संस्कार हे खरेच फार महत्त्वाचे असतात. तुझ्यावर जे संस्कार झाले त्यामुळेच तू लग्नानंतर सारे सहन केलेस. चकार शब्दही काढला नाहीस. तुला अजून एक धक्कादायक बाब सांगतो, ज्या नातेवाईकाने मला या दुष्टचक्रात सापडलो. त्या नातेवाईकाला या दलदलीत ज्याने ढकलले ते दुसरे तिसरे कुणी नसून माझे बाबा होते. होय, माझे बाबा होते. बाबांच्या दुष्कृत्याचा बदला त्याने माझ्यासोबत दुष्कर्म करुन घेतला. हे प्रकरण बाबांनाही समजले पण बाबा शांत राहिले आणि नंतर .. नंतर स्वतः बाबांनीच माझ्या शरीराचा व्यापार मांडला. मला माफ कर... मला माफ कर.
-अभय.
पत्र वाचून लताने त्याची घडी केली. लिफाफ्यात ठेवले. निःशब्द वातावरणात आशाने लताच्या पाठीवर थोपटले आणि ती जड पावलाने खोलीतून बाहेर पडली...
दुसरेदिवशी सायंकाळी आशा पुन्हा आली. लता, वामनराव आणि विमलाबाईसोबत बैठकीत बसली होती. आल्या आल्या ती म्हणाली,
"लता, पटकन तयार हो. डॉ. संदेशने आपल्याला बोलावले आहे."
"अग, पण कुठे?" लताने विचारले.
"तू चल तर..."
काही क्षणात लताला घेऊन आशा एका छोट्या परंतु छानशा हॉटेलमध्ये पोहोचली. कोपऱ्यात टेबल पाहून दोघी बसल्या. आशाला लता काही विचारण्याचा प्रयत्न करीत असताना एक कार हॉटेल समोर थांबली. त्यातून संदेशसोबत उतरलेल्या तरूणाला पाहताच तिच्या तळपायाची आग मस्तकात शिरली. तिने पटकन आशाकडे पाहिले. आशाने तिला हाताने 'थांब' असे खुणावले. तोवर संदेश आणि अभय... होय! संदेश अभयला घेऊन आला होता. जवळ येताच अभय चक्क लताच्या पायावर पडला. तसे संदेशने त्याला उठवताच तो म्हणाला,
"लता, मला माफ कर. मी खरेतर आत्महत्या करायच्या विचारात होतो पण मला एका मित्राने डॉ. संदेश यांच्याकडे नेले. मला यांनी तीन तास समजावून सांगितले. खरे तर माझीही तुझ्यासोबत उरलेले आयुष्य जगताना प्रायश्चित्त घेण्याची इच्छा होती पण तुझ्यासमोर येण्याची हिंमत होत नव्हती. संदेश यांच्या सांगण्यावरून मी ती हिंमत केली. लता, आपण दोघे अजूनही पतीपत्नी आहोत...."
"पण..." लता काही बोलण्याचा प्रयत्न करत असताना संदेश पटकन म्हणाला,
"लता, तो खरे बोलतोय, मनापासून बोलतोय. त्याने कालच त्या पाहुण्याविरुद्ध आणि स्वतःच्या बाबांविरुद्ध तक्रार केली आहे. तू जर तयार झाली तर तो पुन्हा तुझ्यासोबत राहायला आणि आमच्या संस्थेचे काम करायला तयार आहे..."
"त्याने त्याचे घरही सोडले आहे.." अनिता म्हणाली. तसे लताने आशाकडे पाहिले. आशाने तिचा हात हातात घेतला आणि डोळ्याने 'काही हरकत नाही' असे खुणावले. तशी लताने आरक्त झालेल्या चेहऱ्याने खाली मान घातली... ते मौन सुचक होते, बरेच काही सांगत होते...
@ नागेश सू. शेवाळकर
(९४२३१३९०७१)