परवड भाग ९ Pralhad K Dudhal द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

परवड भाग ९

भाग ९

सुटला सुटला म्हणता म्हणता अरविंदाच्या आयुष्यात हा एक नवा गुंता सुरू झाला होता.पुन्हा नवा पेच समोर उभा ठाकला होता.जणू संकटामागून संकटे त्याचा पाठलाग करत होती......
तो रात्रंदिवस आपल्या आयुष्याबद्दल विचार करत होता....
या नियतीच्या मनात नक्की काय आहे?

मी जीवनात कधी कुणाचे वाईट करणे सोडाच; पण कधी कुणाचे वाईट व्हावे असा विचारही केलेला नाही, असे असताना माझ्याच मागे अशी संकटे का?” आता त्याचे वय पंचावन्नवय वर्षे झाले होते.अगदी मोजकी काही वर्षे सोडली तर कायमच दुर्दैवाचे दशावतार त्याच्या वाट्याला आले होते! मनाची अस्वस्थता त्याला चैन पडू देत नव्हती!
ऑफिसातून बाहेर पडल्यावर आज त्याने पांडूरंगाचे मंदिर गाठले.विठ्ठलासमोर साष्टांग नमस्कार घालून त्याने देवाला साकडे घातले.

हे विठ्ठला,या भक्ताची अजून किती परीक्षा पाहशील? या गुंत्यातून मला योग्य मार्ग दाखव.

मंदिरात स्पीकरवर मंद आवाजात भजन वाजत होते..
खेळ मांडीयेला वाळवंटीकाठी, नाssचती वैष्णव भाई रे...
मन शांत होईपर्यंत तो मंदिरात तसाच बसून राहिला.अंधार पडायला लागल्यावर तो आपल्या घरी आला.
दरवाजात वसंताला बसलेला बघून त्याला खूपच वाईट वाटलं.
बिचारा वसंता,या सगळ्यात त्याचा काहीही दोष नसताना तो भरडला जातोय, आपण त्याच्यासाठी काहीच करू शकलो नाही!" या विचाराने अरविंदाची अस्वस्थता अजूनच वाढली.त्याने जवळ जाऊन वसंताला जवळ घेतलं. गुणवंता कृतघ्नपणे आपली जबाबदारी झटकून घराबाहेर पडला याचा त्याला प्रचंड राग आला होता;पण शांत बसावे लागत होते. वसंताच्या पाठीवर हात फिरवत तो त्याला कुरवाळू लागला....
वसंता बाळा, सगळ जग जरी तुझ्या विरोधात गेलं तरी माझ्या जिवात जीव असेपर्यंत मी तुझी काळजी घेईन!”....
गुणवंता आणि शालू घर सोडून गेले म्हणून दैनंदिन व्यवहार थांबून चालणार नव्हते. वसंताचं वेळच्या वेळी सगळ करून नेहमीप्रमाणे ऑफिसलाही जाणं आवश्यक होत.अरविंदाने परत घराची सूत्रे स्वत:कडे घेतली.रूटीन आयुष्य पुन्हा सुरू झाले.
वसंताची आंघोळ,कपडे,त्याच्यासाठी भाजी भाकरी करायची, त्याची व्यवस्थ्या लावून कामाला जायचं, संध्याकाळी घरी आलं की भराभर आवरून वसंताला हात धरून बाहेर फिरवून आणायचं.अरविंदांचा दिवस कसा जायचा ते समजायचंच नाही!
दिवस जात होते.अरविंदा घरातली आणि ऑफिसची कामे करून पार थकून जायचा. आजकाल या धावपळीमुळे तब्बेतीकडेही दुर्लक्ष व्हायचं. कधी कधी ऑफिसच्या कामाकडेही दुर्लक्ष व्हायचं. आतापर्यंत नोकरीत कधी साहेबाची फायरिंग न मिळालेल्या अरविंदाला हल्ली साहेब नको एवढे झापायला लागले. अरविंदाला या सर्व गोष्टींचा खूप त्रास होत होता, पण मुकाट सहन करण्याशिवाय कोणताही पर्याय नव्हता. तसे त्याच्या ऑफिसमधले सहकारी चांगले होते. त्याला बऱ्याचदा त्यांची मदत मिळायची.त्याची परिस्थिती व अगतिकता सर्वाना माहीत झालेली होती.बरेचदा त्याचे ऑफिसातले सहकारी त्याच्यावर एकापाठोपाठ येत असलेल्या आलेल्या दुर्दैवी संकटांवर चर्चा करून त्याला मानसिक आधार द्यायचा प्रयत्न करायचे.सगळ्यांना अरविंदाबद्दल सहानुभूती होती; पण शेवटी प्रत्येकाला स्वत:ची लढाई स्वत:च लढावी लागते....
अरविंदाचे अगदी जवळचे म्हणता येतील असे फार कमी मित्र होते, देशमाने हे त्यांच्यापैकी एक होते. आत्तापर्यंत अरविंदाच्या जीवनात ज्या घडामोडी झाल्या त्याचे देशमाने एक साक्षीदार होते. कित्येकदा देशमाने अरविंदाच्या पाठी भक्कमपणे उभे राहिले होते.
गुणवंता आपल्या बायकोला घेऊन कायमसाठी घर सोडून गेला हे दुसऱ्या दिवशी अरविंदाने देशमानेना सांगितले होते. त्यांनाही गुणवंताचे वागणे बरोबर वाटले नाही: पण त्यांनी अरविंदाला समजावले .....
गुणवंताचं एकंदरीत आयुष्य बघितलं तर तो इतके दिवस नीट वागला हेच आश्चर्य आहे;तेव्हां जे घडलंय त्याचा स्वीकार कर.झालेल्या गोष्टी त्रासदायक असल्या तरी त्यावर विचार करण्यात हशील नाही!त्यांच्या सहानभुतीच्या चार शब्दांनी अरविंदाला थोडं बर वाटलं होत. आपल्या या दुर्दैवी मित्राला अजून कशी मदत होईल यावर देशमाने विचार करत राहिले...
एक दिवस देशमाने ऑफिसात आले आणि अरविंदाला तुझ्याशी थोडं बोलायचं होत,आपण चहाला जाऊ या.असं म्हणत आग्रहाने त्याला बाहेर घेऊन गेले.
हॉटेलात दोघेजण समोरासमोर बसले. चहा घेता घेता देशमानेनी सरळ मुद्यालाच हात घातला अरविंदा,घर आणि ऑफिसची कामे करताना तुझी होणारी दमछाक मी जवळून बघतो आहे.यावर तू काहीतरी मार्ग काढायला हवा असं मला मनापासून वाटत! मला असं वाटत की एखादा माणूस तू पूर्णवेळ घरकामाला ठेवावा! थोडाफार खर्च होईल;पण तुझी ओढाताण नक्कीच कमी होईल!!देशामानेचा प्रस्ताव खरच विचार करण्यासारखा होता!
पुढे देशमाने मस्करीत बोलले
एखादी बाईच ठेव की घरी!आणि ते हसायला लागले.अरविंदालाही हसू आलं.
अरविंदाचा बदलता मूड पाहून देशमानेना अजूनच त्याची खेचायची हुक्की आली...
नाहीतर, अरविंदा तू अजून एक गोष्ट करू शकतोस....दुसर लग्नच करून टाक ना! सगळेच प्रश्न मिटतील तुमचे!असे म्हणून देशमाने खो खो हसत सुटले. अरविंदाही मनापासून त्या हसण्यात सामील झाला......

( क्रमश:)

© प्रल्हाद दुधाळ पुणे 9423012020