परवड भाग १२ Pralhad K Dudhal द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

परवड भाग १२

भाग १२.

सुनंदा आपली जीवनकथा अरविंदाला सांगत होती......
माझ्या मालकाची डेड बॉडी समोर आली आणि मला भोवळच आली.आता पुढे काय? हा मोठा प्रश्न समोर आ वासून उभा होता. कंपनीतून काही पैसे मिळाले होते;पण सहा महिन्यातच ते संपले.आता स्वत: कमावल्याशिवाय पोटाला खायला मिळणार नव्हते. हातपाय गाळून उपयोग नव्हता.राहुलच्या भविष्याचा विचार करून कंबर कसली व् चार घरी मोलमजूरीची कामे धरली.मुलाचे शिक्षण चालू ठेवले.

आधीच्या घराचे भाड़े परवडत नव्हते त्यामुळे झोपडपट्टीत कमी भाड्याची खोली घेतली.परिस्थिती माणसाला घडवते असे म्हणतात ते खरे आहे!;पण एका तरुण विधवेकडे पहाण्याचा लोकांचा दृष्टीकोन काय असतो याचा समाजात वागताना घडोघडी अनुभव यायला लागला. कुंकवाच्या धन्याशिवाय जगत असलेली बाई म्हणजे समाजातल्या गिधाडांना सहज उपलब्ध असलेले सावज वाटते!

अशा गिधाडांच्या वाईट नजरांपासून वाचण्यासाठी मी चार ठिकाणी खोली बदलली; पण जेथे जाईलं तिथे अशी श्वापदे लचके तोडायला हजरच होती! वाईट नजरांपासून स्वत:ला वाचवायचे, एका तरुण विधवेसाठी तेवढे सोप्पे नव्हते! चरितार्थासाठी चार पैसे कमवता कमवता लोकांचे बरेवाईट अनुभवाचे गाठोडे चांगलेच वाढले होते!
कुणीतरी मग मला पुनार्विवाहाचा सल्ला दिला. मन मानत नव्हते;विचार करण्यात मधे बराच काळ लोटला होता.आता मला या जीवनाचा कंटाळा आला होता.विचार केला

किती दिवस असे विधवेचे जीवन जगायचे? पदरात एक मूल टाकून नवरा मधेच जग सोडून गेला यात माझा काय गुन्हा आहे?आता ना सासरचा आधार ना माहेरचा!, काय अर्थ आहे अशा जगण्याला? काही नाही, स्वत:च्या आणि मुलाच्या भविष्यासाठी आपण दुसरे लग्न करायचे! दोघांनाही आधाराची गरज आहे!
सुनंदाने मग त्या दृष्टीने पावले टाकायला सुरुवात केली.तिने थोड़ी चौकशी केली आणि आपले नाव वधूवरसूचक संस्थेत नोंदवले.मुलासहीत जो कोणी तिला स्वीकारेल त्याच्याशी ती लग्न करायला तयार होती.
संस्थेकडून अरविंदाचे स्थळ तिला सुचविण्यात आले,त्यां दोघांची गाठही घालून दिली.

दोघांच्या अटी एकामेकानी मान्य केल्या.सुनंदाने वसंताची काळजी घेण्याचे आनंदाने मान्य केले तर अरविंदानेही राहूलचा पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळ करण्याचे कबूल केले!
अरविंदा आणि सुनंदा एकमेकाशी लग्न करायला तयार झाले!
अरविंदा आणि सुनंदा जरी एकमेकांना मनापासून स्वीकारायला तयार झाले असले तरी दोघांच्या मुलांनाही विश्वासात घेणे आवश्यक होते.

राहूल तसा लहान होता;पण गद्यपंचविशीत असलेल्या वसंताला आपला बाप वयाच्या पंचावन्ननंतर लग्न करतोय, हे पचनी पडायला जड होऊ शकत होते.याशिवाय हे लग्न कधी आणि कसे करायचे यावरही विचार करणे आवश्यक होते.दोघांनाही लग्नाची घाई झालेली असली तरी वास्तवातील समोर असणाऱ्या संभाव्य अडचणीना टाळून पुढे जाणे दोघांनाही योग्य वाटत नव्हते.सर्व बाजूने विचार करण्यासाठी अजून काही दिवस दोघांनीही मागून घेतले....
आपल्या लग्नाच्या कल्पनेने अरविंदा खूपच उल्हासित झालेला होता.त्याला आता कधी एकदा या सुनंदाशी लग्न करून घरी घेउन येतो असे झाले होते!

सीतेचे आजारपण आणि नंतर झालेल्या अकाली मृत्युनंतर स्रीसुखाला पारखा झालेल्या अरविंदाला सुनंदाच्या सौंदर्याचा नाही म्हटल तरी मोह झाला होता! रंगाने तशी सावळी असली तरी सुनंदा दिसायला खूपच आकर्षक होती,ज्या सुखापासून नशिबाने त्या दोघाना वंचित ठेवले होते ते सुख दोघानाही नव्याने खुणावत होते!
अरविंदाने लगेच वसंताला त्याचे स्वत:चे लग्न कसे फायद्याचे आहे ते सांगितले.सर्वस्वी परावलंबी असलेल्या वसंताला आपल्या वडीलांनी घेतलेला निर्णय मान्य नसायचे तसेही काही कारण नव्हते. देशमाने व आणखी काही माणसांच्या उपस्थितीत रजिस्टर पध्दतीने दोघे त्यांच्या जीवनातला हा नवा भिडू,नवा डावखेळायला सिध्द झाले!

लग्न अत्यंत साधेपणात पार पडले आणि आपली झोपडी सोडून राहूलला आपल्या मुलाला घेऊन सुनंदा आपल्या दुसऱ्या पतीच्या-अरविंदाच्या घरी रहायला आली.
अरविदाच्या आयुष्यात आता सुखाचा आणि आनंदाचा वर्षाव होवू लागला होता.सुरूवातीला वसंता जरी आपल्या नव्या आईचे वागणे कसे असेल याबद्दल साशंक होता;तरी त्याची ही नवी आई त्याला पहिल्या दिवसापासूनच आवडली होती.तिने वसंताच्या बाबतीत अरविंदाला दिलेला शब्द ती कसोशीने पाळत होती. राहूलही आपल्या या नव्या अंध दादाच्या संगतीत रमू लागला.
त्याला हवी ती मदत करू लागला.पुन्हा एकदा अरविंदाचे घर सुखासमाधानाने हसूखिदळू लागले.अरविंदाच्या व सुनंदाच्या चेहऱ्यावर या पोक्त वयातल्या लग्नाचे वेगळेच तेज दिसायला लागले होते! दोघांचेही आयुष्य सुखाने भरून गेले होते.आधीच्या जीवनातल्या दु:खाचा आता लवलेशही उरला नव्हता! .....

(क्रमश:)

© प्रल्हाद दुधाळ पुणे 9423012020