भूत Milind Joshi द्वारा हास्य कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

भूत

काही दिवसांपूर्वी माझा एक मित्र देवाघरी गेला. म्हणजे मेला हो. अर्थात देवाघरी गेला असे म्हणता नाही येणार. कारण तो अजूनही इथेच राहिलेला आहे... भूत बनून... एक छानसं, साधं सरळ भूत... एकतर तो दिसायला चिकना होता त्यामुळे चिकनं भूत बनला. परवा रात्री मी नेहमीप्रमाणे माझं काम करत बसलो होतो. कॉम्प्युटरवर हो. तेवढ्यात तिथं प्रकट झाला. मी घाबरलोच. भूत कितीही चिकनं असलं तरी भीती वाटतेच ना? तसा मला म्हणाला...

“मिल्या... लेका घाबरतोस काय असा?”

खरंय म्हणा... आता भूत झाला असला तरी आपला मित्रचं आहे तो... त्याला काय घाबरायचं? मी हा विचार करत होतो तेवढ्यात पुढं म्हणाला...

“अरे बोल की... विचार काय करतो आहेस?”

“अबे... अजून तू इथंच का?” मी जरा घाबरतच विचारलं. मित्र असला म्हणून काय झालं... शेवटी भूतचं तो...

“हो रे... ते काय आहे ना, आपल्या बऱ्याच इच्छा अजूनही बाकी आहेत... तुला तर माहिती आहे यार... ती आपली छावी... तिच्यात जीव अडकलाय आपला...”

“ए... आपला काय आपला? आणि ती छावी तुझी होती... माझी नाही... आणि जीव तुझा अडकलाय... माझा नाही...” मी उखडलोचं. होना... साला अशा बाबतीत तरी किमान तुझं माझं असं वेगवेगळचं ठीक असतं.

“अरे हो रे... ते जाऊ दे... काय म्हणतोय तुझा कामधंदा? काही मदत लागली तर सांग हं... आता आपल्यात पण थोडीफार पावर आलीये.” त्याने आधी व्यवसायाबद्दल विचारणा करून लगेचच मदतीची पेशकशही केली. याला म्हणतात मित्र.

“धन्यवाद यार... पण अजून तरी मला तुझी गरज लागणार नाही... लागेल तेव्हा जरूर सांगेन...” मी जरी त्याच्याशी बोलत होतो तरी मनातून जाम टरकली होती. बहुतेक माझ्या चेहऱ्यावरून त्यानं ते ओळखलं असावं.

“च्यायला... साल्या... तू कधीपासून घाबरायला लागला भूतांना? अरे सध्या बरीचं भूतं आपले यार बनले आहेत. इकडे येताना मी त्यांना विचारलंही होतं... माझ्या बरोबर येता का म्हणून... काय वाटतं तुला? त्यांनी काय उत्तर दिलं असेल?” त्याने प्रश्न केला. तुम्हीच सांगा... आता हे मला काय माहित असणार? म्हणून तोंड वाकडे करत मी खांदे उडवले.

“अरे त्यांनी मला विचारलं... कुणाकडे जायचे आहे म्हणून... मग मी सांगितलं तुझं नांव... तुला खोटं वाटेल... अरे हादरलेच ते..! आणि म्हणाले.., दुसरीकडे कुठेही सांग पण त्याच्याकडे नको... साला नेहमी आमच्या मागे लागलेला असतो... ज्या गोष्टी करणे आम्ही मनातही आणू शकत नाही, त्या सगळ्या गोष्टी तो आमच्या नावाने खपवतो. लोकं देवाकडं प्रार्थना करतात भुतांपासून आमचं रक्षण करा म्हणून आणि आम्ही वेताळाकडं प्रार्थना करतो... मिलिंदपासून आमचं रक्षण करा म्हणून... ह्या ह्या ह्या... साला त्यांना जेव्हा सांगितलं ना, मिलिंद आपला मित्र आहे म्हणून, आपला वट एकदम वाढला यार..!!!” मी फक्त ऐकून घेत होतो. एकतर तो जिवंत असतानाही इतक्या पुड्या सोडायचा की विचारू नका. आता तर तो भूतच. म्हणजे तामसगुण वाढलाच असणार त्याचा. बरे आपण कितीही म्हटले तरी जो पर्यंत भूत दिसत नाही तो पर्यंत आपल्या सगळ्या गमजा असतात... भूत समोर आल्यावर मात्र भंबेरी उडते. माझंही तेच झालं होतं.

“यार मिल्या... तू इतका शांत कसा? साला मी तुझ्याशी गप्पा मारायला आलो अन तू मात्र गप्पंच..!!!” तो काहीसा हिरमुसला. त्याच्या चेहऱ्यावरील ते भाव पाहून माझ्याही मनातील भीती बरीच कमी झाली आणि मीही गप्पा मारायला सुरुवात केली.

“यार... आता तर तुला रान मोकळं झालं की... पाहिजे त्या वेळेस तू तुझ्या छावीला भेटायला जाऊ शकतोस... गेला होतास का कधी?” मी गप्पांना सुरुवात केली.

“हो यार... एकदा आलो जाऊन... पण ती गोष्ट सांगण्यासारखी नाहीये...”

“कारे? काय झालं?”

“अरे काही नाही रे... एकदा माझ्या मनात आलं, छावीला भेटून यावं.. म्हणून लगेच डोळे मिटले. म्हटलं आधी पाहू तरी, ती कुठे आहे ते? मिटलेल्या डोळ्यासमोर लगेच एक बाग दिसू लागली. बागेत एकंदरीच सामसूम होती. अंधार पडायला सुरुवात झाली होती. आणि एका बाजूला अगदी निर्जनस्थळी ती दिसली. तिच्या बरोबर कुणीतरी माणूस होता. म्हटलं बहुतेक तिचा नवरा असावा. साला माझ्या जिवंतपणी हिने माझ्यावर प्रेम केलं पण फक्त हॉटेलमध्ये खाण्यापुरतं अन गाडीतून फिरण्यापुरतं. कधी अंगाला हात लावू दिला नाही... आणि आज इथे ही नवऱ्याबरोबर बागेत आली आहे... तेही निर्जन ठिकाणी... माझा चांगलाच जळफळाट झाला. लगेचच मी ते ज्या बागेत बसले होते तिथे हजर झालो. म्हटलं पाहू... आज तिला आणि तिच्या नवऱ्याला चांगलं घाबरवून सोडू. तेवढ्यात त्यांचं बोलणं कानावर आलं. तो तिला म्हणाला... ‘ए..! अशी दूर काय बसलीस? जवळ ये बरं..!!!’ तिनं तरी जरा मर्यादा नको का पाळायला? माझ्या वेळेस पाळल्या तशा? पण ती लगेच जवळ सरकली. त्यानं मग तिचा हात त्याच्या हातात घेतला. आणि ती चक्क लाजली रे..! निर्लज्य कुठली... मग त्याने तिला आपल्या जवळ ओढले. मी हे सगळं पाहून भयंकर संतापलो... मनात म्हटलं आता यांना चांगलाच धडा शिकवू... पण एक प्रॉब्लेम होता. वेताळानं मला फक्त कुणाला एकाला दिसशील असं स्पष्ट सांगितलं होतं. त्यावेळेस मी तुझं नांव घेतलं होतं. म्हणजे त्यांना घाबरवायचं तर मला तात्पुरतं का होईना, पण शरीर धारण करावं लागणार होतं. मी मग वेताळाची प्रार्थना केली... तो बिचारा... खूप चांगला रे... त्याने लगेच त्याच्या शक्तीनं एक शरीर तयार करून दिलं आणि मला सांगितलं... घूस याच्यात..!!! मी चिडलेलोच होतो... घुसलो त्या शरीरात... आणि हजर झालो त्यांच्या पुढे... त्यांना भीती वाटावी म्हणून मग एक भुताचा मुखवटा स्वतःच्या शक्तीनं बनवला. आणि दोन्ही हात वर घेतले. बोटे वाकवली. त्या सिंघम चित्रपटासारखे रे... वाघाच्या पंजासारखी... आणि म्हटलं... भ्वॉ..!!!” हे सांगताना त्याचा चेहरा पाहून मला मजा वाटली. दोन तीन सेकंद तो थांबला आणि परत पुढील गोष्ट सांगायला त्याने सुरुवात केली.

“तिचा नवरा घाबरला... आहे तसाच मागं पडला... झोपलाच असं म्हटलं तरी चालेल..! पण ती महामाया.., भडकली की माझ्यावर.!! तिथंचं एक लाकूड पडलं होतं... तिनं ते उचललं आणि घातलं माझ्या टाळक्यात... मी एकदम खालीचं बसलो. डोळ्यापुढे काजवेच चमकले रे माझ्या... तेवढ्यात ती त्या माणसाला हात देत उठवत म्हणाली... अरे घाबरू नको... माझा नवरा असेल हा... त्याला सवय आहे अशी ‘भ्वॉ’ करायची... आईशप्पथ सांगतो... खूप वेदना झाल्या रे मला... मी जे तिथून धूम ठोकली, ते डायरेक्ट स्मशानात..!!!” त्याची ती सांगण्याची स्टाईल पाहून माझी हसून पुरेवाट झाली. तो मात्र माझ्याकडे अगदी केविलवाणे पहात होता.

“च्यायला !!! माझ्या वेदनेचं तुला काही नाही का? हसतोय काय निर्दयी माणसा?” तो काहीसा चिडला आणि मी हसू आवरले.

“अरे पण तू तर भूत आहेस ना? मग तुला कसं काय तिनं मारलं?”

“अरे कसं म्हणजे... वेताळानं मला शरीर दिलं होतं, पण त्या शरीराचे काही भोग भोगायचे राहिले आहेत हे नव्हतं सांगितलं...” त्यानं उत्तर दिलं.

“अरेरे... खरंच वाईट झालं...” मी हसू दाबत म्हटलं.

“बरं मला एक सांग... तुझे ते भूत मित्र... मला का घाबरतात?” शेवटी विषय बदलण्यासाठी मी प्रश्न केला.

“का घाबरतात म्हणजे? अरे तू माणूस आहेस... म्हणून...”

“आयला... भूतं माणसाला घाबरतात?” मी आश्चर्यानं विचारलं.

“हो तर... घाबरतातचं... कारण भूतं काय करू शकतात याचा अंदाज माणूस बांधू शकतो, आणि त्यांच्या पासून वाचण्यासाठी तो देवाचं नांव घेतो... मग भूतं तिकडे फिरकत देखील नाहीत. पण माणसाचं मात्र तसं नाही... माणूस तोंडाने देवाचे नांव घेतो आणि कृत्य राक्षसाचं करतो. बरे त्याला त्यापासून आडवायला कोणतेही मंत्र तंत्र उपयोगी पडत नाहीत. मग आता तूच सांग... देवाच्या नावाला घाबरणारे भूतं जास्त घातक, की देवाच्याच नावाचा पाहिजे तसा वापर करून भुतांपेक्षा अघोरी कृत्य करणारी माणसं जास्त घातक?”

त्याच्या या प्रश्नांवर मी तरी काय बोलणार? तुमच्याकडे तरी आहे का त्याच्या या प्रश्नाचे उत्तर?

मिलिंद जोशी, नाशिक...