Soundary books and stories free download online pdf in Marathi

सौंदर्य

डिसेंबर २०१४ मध्ये ज्यावेळी आईला नाशिकरोडच्या जयराम हॉस्पिटलमध्ये भरती केले होते त्यावेळी मलाही हॉस्पिटल ड्यूटी लागली होती. एका बेडवर आई झोपलेली असायची, दुसऱ्या बेडवर मी बसून असायचो. कधी आईसोबत गप्पा तर कधी वाचन यात वेळ जायचा. पण रात्रीच्या वेळी आई झोपल्यावर मात्र काय करायचे हा मोठा प्रश्न होता. मग मनात विचार आला की आपण आपल्याला येणारे अनुभव कागदावर लिहून काढले तर? वेळही जाईल आणि आपल्याला कितपत लिहिता येते हेही समजेल. म्हणून मग घरून काही कोरे कागद घेऊन गेलो आणि ठरवले. आज जे काही अनुभव आपल्याला हॉस्पिटलमध्ये येतील ते लिहून काढायचे. आणि त्याने खरंच वेळ कसा जाऊ लागला ते समजलेही नाही.

आज घर आवरताना तेच काही कागद सापडले. त्यातच त्यावेळी मी लिहिलेला एक लेख हाती लागला. अरे हो... या लेखाबद्दल अजून एक आठवण आहे. हा लेख लिहिता लिहिताच मला झोप आली होती. मी बसल्या बसल्याच झोपलो होतो. एक सिस्टर आईला बघण्यासाठी राउंडला आल्या, त्यावेळी त्यांनी तो कागद बघितला. मी काय लिहितोय या उत्सुकतेपोटी त्यांनी तो वाचून बघितला आणि परत आहे तसा ठेवून मला नीट झोपायला सांगितले. दुसऱ्या दिवशी मी अगदी लवकर उठलो होतो. आईला काही हवे नको ते बघण्यासाठी. त्याचवेळी सिस्टरही सलाईन चालू करण्यासाठी आल्या आणि त्यांनी मला विचारले.

‘तुम्ही लेखक आहात का?’

‘नाही, मी वेब डेव्हलपर आहे.’

‘ओह... पण लवकरच तुम्ही लेखक बनू शकता.’ त्या म्हणाल्या.

‘कशावरून?’ मी काहीसे गोंधळून विचारले.

‘सॉरी... पण तुम्ही काल लिहिलेला लेख मी वाचला. आणि तो मला आवडलाही. खूप छान लिहिता तुम्ही.’ त्यांनी म्हटले.

‘ओह... धन्यवाद... रात्री वेळ जावा म्हणून उगाच मी आपले काहीतरी खरडतो.’ मी म्हटले आणि त्यावर त्यांनी फक्त स्मित दिले आणि बाहेर गेल्या. खरे तर त्रयस्थ व्यक्तीकडून माझ्या लिखाणाची दखल घेतली जाण्याची ती पहिलीच वेळ. तोच लेख मी इथे पोस्ट करतोय. अर्थात त्यात मला काही व्याकरणाच्या चुका आढळल्या त्या मात्र मी काढण्याचा प्रयत्न केला आहे.

**********************

काही दिवसांपूर्वी आईला दवाखान्यात भरती करावे लागले. खरं तर आजार कितीही लहान असला तरी दवाखाना मोठा असेल तर आजारही मोठा वाटू लागतो हे मला त्यावेळीच समजले. ते म्हणतात ना... बाकी काहीही मागे लागले तरी चालेल, दवाखाना मागे लागू नये... कारण दवाखाना मागे लागला की त्यासोबत शाररीक, मानसिक आणि आर्थिक समस्या घरातील सगळ्याच व्यक्तींच्या मागे लागतात. याला माझे कुटुंबही अपवाद नाही. एकतर दवाखान्याचा खर्च, औषधांचा खर्च, दवाखान्यात थांबावे लागत असल्यामुळे कामधंदा बंद, त्यामुळे पैशाची आवक बंद, मग खर्चासाठी पैशाची सोय एकतर कर्ज काढून करायची किंवा उधारी, उसनवारी करून. आणि त्याच वेळेस आपले मानसिक स्वास्थ्य आपोआप बिघडण्यास सुरुवात होते.

गेल्या २/३ दिवसांपासून माझ्याही मनात नको ते विचार येऊ लागले आहेत. खरंच हे जीवन किती क्षणभंगुर आहे. ज्या शरीराला आपण आपले हक्काचे समजतो ते तरी आपले आहे का? एखादी साथ येते आणि आपल्याला आपले शरीर सोडावे लागते, एखादा अपघात घडतो आणि आपल्या शरीराचा एखादा अवयव कायमचा निकामी होतो. नंतरचे संपूर्ण जीवन आपल्याला इतरांची मदत घेत जगावे लागते. थोडक्यात काय तर मृत्युलोकातील जीवन हे दुःखाने, निराशेने आणि कुरुपतेने भरलेले आहे.

जितका विचार करत होतो तितकी फक्त नकारात्मकताच दिसत होती. हॉस्पिटल म्हटल्यावर आजूबाजूला तसेच वातावरण. कुणी अपघातात जखमी झालेले, तर कुणाला दुर्धर आजार. कुणाचा चेहरा त्रासलेला तर कुणाला चिंताग्रस्त. हे सगळे बघितल्यावर कुणालाही जीवनातील सौंदर्य नाहीसे झाल्यासारखेच वाटणार ना? मीही याला अपवाद नव्हतोच. अगदी भयानक विचार मनात येत होते. आणि ते नाही म्हटले तरी चेहऱ्यावर उमटत होते. त्यामुळे आईच्या चेहऱ्यावरही निराशा साफ दिसत होती.

आज शेजारच्या वार्डमधील पेशंटची चार / साडेचार वर्षांची नात आजीला भेटायला तिच्या आई वडिलांसोबत आली. आपसूकच त्या वार्डमधून बोलण्याचे आवाज ऐकू येऊ लागले. नुसते बसूनही बोर झालो होतो, म्हटले आपणही त्यांच्या गप्पा ऐकाव्यात म्हणून कान देऊन ऐकू लागलो. लहान मुलीचे काहीसे बोबडे बोल ऐकू येऊ लागले.

“पप्पा... आजीच्या नाकात नळ्या घातल्या तरी ती बघा कशी शांत झोपून राहिली आहे. नाहीतर तुम्ही... काल तुम्ही झोपेलेले असताना मी तुमच्या नाकात छोटासा दोरा घातला तर किती मोठ्ठ्याने रागावला होता तुम्ही?”

त्या लहान मुलीने निरागसपणे तिच्या वडिलांना प्रश्न केला आणि माझ्या डोळ्यासमोर तो संपूर्ण प्रसंग उभा राहिला. शेजारच्या वार्डमधून हसण्याचे आवाज आले तसे माझ्याही चेहऱ्यावर हसू उमटले. त्यानंतर माझ्यापुढील सगळ्या समस्या मी काही वेळासाठी विसरून गेलो आणि तिच्या निरागस प्रश्नांचा आनंद घेत होतो. मनात विचार आला... खरंच... लहान मुलांच्या निरागसतेमध्ये किती सौदर्य भरलेले आहे.

साडेआठच्या सुमारास मकरंद आला आणि मला फ्रेश होण्यासाठी सुट्टी मिळाली. बाहेर पडलो त्यावेळी ऊन पडलेले होते. हवेत गारठा मात्र कायम होता. एरवी अगदी नकोसे वाटणारे ऊन या थंडीत खूपच मस्त वाटत होते. क्या बात है... थंडीच्या दिवसात कोवळ्या उन्हातील अनुभूतीचे सौन्दर्य केवळ अप्रतिम.

घरी आल्यावर अंघोळीसाठी पाणी तापायला ठेवले. तोपर्यंत बातम्या बघाव्या म्हणून टीव्ही चालू केला. कोणत्या तरी उत्पादनाची जाहिरात चालू होती. एक अतिशय सुंदर अभिनेत्री ती वस्तू हातात घेऊन अगदी लडिवाळपणे ते वापरण्याबद्दल प्रेक्षकांना गळ घालत होती. माझे लक्ष उत्पादनापेक्षा त्या अभिनेत्रीच्या सुंदर चेहऱ्याकडेच होते. नेत्रसुख का काय म्हणतात ते हेच तर आहे ना? त्या मोहक हास्यातील सौंदर्याला तोडच नाही.

फ्रेश होऊन परत हॉस्पिटलला आलो. तेवढ्यात डॉक्टर राऊंडला आल्या. गेल्या काही दिवसांपासून बेडवर पडून कंटाळलेल्या आईने डॉक्टरांना विचारले.

“डॉक्टर... मी बरी होईल ना?” यावेळी आईचा स्वर एकदम त्रासलेला होता.

डॉक्टरांनी आईकडे बघून मंद स्मित केले.

“त्याची तुम्ही काळजीच करू नका. तुम्ही १००% ठणठणीत होणार, हवे तर मी तसे लिहून देते. फक्त तुम्ही दिलेली औषधे व्यवस्थितपणे घ्या म्हणजे झाले.” डॉक्टरांनी आईला दिलेले आश्वासन कितपत खरे हा भाग वेगळा, पण त्यांच्या आश्वासक शब्दातील सुंदरता केवळ अफलातून.

रात्री दीड वाजता आईचा आवाज आला. तिला बेडपॅन ( पॉट ) पाहिजे होते. मी रूममधून बाहेर आलो. हॉस्पिटलमधील मावशी त्यांच्या रूममध्ये चहा घेत होत्या. मी त्यांना ‘आईला बेडपॅन हवा आहे’ म्हणून सांगितले. त्यांनी हातातील चहाचा कप तसाच झाकून ठेवला आणि लगबगीने पॉट घेऊन आल्या. मी बाहेर थांबलो त्यावेळी मनात विचार आला. ‘हॉस्पिटल मधील मावशी / मामा यांच्या सेवाभावी वृत्तीमधील सौदर्यापेक्षा सुंदर इतर काय असेल?’

सकाळी उठलो त्याचवेळी सिस्टर आल्या. आई देखील उठली होती. पण तिचा अवतार बघवत नव्हता. केस खूपच रुक्ष बनले होते. त्यातून विस्कटले असल्यामुळे जास्तच खराब दिसत होते. सिस्टरने आईला गोळ्या दिल्या. सलाईन बघितले आणि मला विचारले.

“फणी किंवा कंगवा आहे का तुमच्याकडे?”

मी खिशातील छोटा कंगवा काढून त्यांच्याकडे दिला.

“असे करा... मेडिकल उघडले असेल. तिथून एक छोटी तेलाची बाटली घेऊन या.”

पाचच मिनिटात मी तेलाची बाटली आणून त्यांच्या हातात दिली. त्यांनी बाटलीतील थोडे तेल हातावर घेऊन आईच्या डोक्याला लावले, नंतर छोट्याशा कंगव्याने अगदी हळुवारपणे आईचे केस विंचरून वेणी घातली. आईच्या दिसण्यात एकदमच बदल झाला. खरे तर सिस्टर गोळ्या देऊन दुसऱ्या वार्डमध्ये गेल्या असत्या तरी त्यांना कुणी काही म्हटले नसते. पण त्यांनी तसे न करता अगदी घरातील व्यक्तीची सेवा करतो त्याप्रमाणे आईचे आवरून दिले. त्या सिस्टरच्या कामाप्रती असलेल्या निष्ठेतील सौन्दर्य केवळ वर्णनातीत.

दुपारी आई आराम करत होती. मीही तसा मोकळाच होतो. अजूनही आईला हॉस्पिटलला भरती केले आहे हे कुणाला सांगितले नव्हते. म्हणून मग मोबाईल घेतला आणि सगळ्या मित्रांना / नातेवाईकांना आईच्या आजाराबद्दल आणि तिला हॉस्पिटलमध्ये भरती केल्याबद्दल सांगितले. संध्याकाळच्या वेळी अनेक नातेवाईक येऊन भेटून गेले. काही तर अगदी वर्षानंतर भेटत होते. त्यांच्याशी बोलताना आईच्या चेहऱ्यावर उमटणारा आनंद खूप समाधान देत होता. नाते मैत्रीचे असो वा रक्ताचे, नात्यातील सौंदर्य आनंदी जीवन जगण्यासाठी पूरकच असते.

कालच्या आणि आजच्या परिस्थितीमध्ये काहीही फरक पडलेला नाही. ज्या समस्या काल होत्या, त्याच समस्या आजही आहेत. जे त्रासलेले, चिंताग्रस्त चेहरे काल आजूबाजूला होते, तेच चेहरे आजही आहेत. पण काल मला जीवन कुरूप वाटत होते, आज मला जीवन सुंदर वाटते आहे. उगाच का मंगेश पाडगावकर म्हणतात... ‘या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे...’

ठरलं तर मग... आता जीवनातील कुरूपता विसरून फक्त सौंदर्य तेवढेच बघायचे. एका दुःखापाई आपण जीवनात येणाऱ्या अनेक सुंदर क्षणांना घालवून बसतो. सौंदर्य बाहेर नाही तर आपल्या मनात आहे. ज्याला हे समजले त्याला कधीच त्याचे जीवन कुरूप वाटणार नाही.

-- जाग आलेला मिलिंद...

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED