Gaavaashyaa books and stories free download online pdf in Marathi

गांवआश्या

इतक्या मोठ्या आयुष्यात आपल्याला खूप माणसं भेटतात. कधी ते एका कॉलनीत राहतात म्हणून ओळखीचे होतात, कधी एकाच शाळेत / कॉलेजात असतात म्हणून ओळखीचे होतात तर कधी मित्रांचे मित्र असतात म्हणून ओळखीचे होतात. जसजसे वय वाढत जाते, नोकरी धंदा सुरु होतो तसतसे यातील बरेच जण काळाच्या ओघात कुठेतरी हरवतात. पण काही जण मात्र त्यातल्या त्यात स्पेशल बनतात आणि कायम स्वरूपी लक्षात राहतात. असे सगळे जण मित्रच असतील असे मात्र नाही हं. माझ्या अशाच एका मित्राबद्दल मी बोलणार आहे.

त्याचं नांव गांवआश्या. म्हणजे त्याच्या घरच्यांनी त्याचं नांव चांगलं ‘अशोक’ असं ठेवलं होतं, पण हा नेहमी गावातच उंडारक्या करत फिरायचा म्हणून सगळे गांव त्याला ‘गांवआश्या’ नावानं ओळखायचे. जर गावात जाऊन “अशोक कुठे राहतो?” हे विचारलं तर कुणाला सांगता यायचं नाही, पण गांवआश्या कुठे राहतो म्हटल्यावर कुणीही त्याचं घर दाखवायचं. माझ्या मित्रांनी ज्यावेळेस पहिल्यांदा मला हे सांगितलं त्यावेळेस माझा विश्वासच बसला नव्हता, म्हणून मी एकदा स्वतः खात्री करून घेतली होती. त्याचं शिक्षण जेमतेम सातवी / आठवी असेल. त्याच्या गावातले मुलं सांगतात की त्यानं शाळा अर्ध्यातच सोडली होती. बोलणं पूर्णपणे खेडवळ ढंगाचं. म्हणजे ते बोलण्यातील हेल, मोठा आवाज आणि जे मनात येईल ते बिनधास्त बोलून टाकणं. शरीरयष्टी म्हणाल तर अगदीच किरकोळ वाटावी अशी. रंग गव्हाळ, शहरात असता तर नक्कीच गोरा वाटला असता. त्याची आणि माझी ओळख झाली ती श्रीरामपूर बस स्टॅडवर, त्या नंतरही आमच्या बऱ्याचश्या भेटी तिथेच झालेल्या. उरलेल्या काही त्यांच्या गावात झालेल्या. पण त्या १५ / २० मिनिटाच्या भेटींमध्येही खूप मजा यायची. बरं या पठ्ठ्याला सगळी वाईट व्यसनं. कायम तोंडात तंबाखू किंवा गुटखा. बरे त्याबद्दल त्याला काही म्हटलं की त्याचं आपलं एकच म्हणणं... “अरे येड्याहो... देवानं आपल्याला सांगेले... जाय खाली आन समदी मजा करून यी..!!!” यावर आपण काय बोलणार?

माझे कॉलेज चालू असताना असाच एक दिवस बस स्टॅडवर भेटला. आता मी बस स्टॅडवर कशाला गेलो होतो हे विचारात बसू नका. असतात काही कामं... महत्वाचे... रोजरोज... माझ्या बरोबर बाकी मित्रही होतेच. लांबूनच त्याने आम्हाला पाहिले आणि तिथूनच ओरडला...

“च्यायला... म्या म्हनलचं... समदे हिडचं असतीन... तुमच्यायला... म्हताराम्हतारी समजून ऱ्हायली पोरगं कालीज्यात ग्येलं... पन त्यास्नी काय म्हाईत... पोरगं हिडं लायनी मारू ऱ्हायलं ते?” इतके बोलून गालातल्या गालात हसत तो आमच्या दिशेनं आला.

“xxxxxx, साल्या... आम्ही किमान कॉलेजला तरी गेलो... तुझं पाहाय ना... तू तर शाळेलाच दांड्या मारल्या...” दिलीप भडकलाच. कारण एकतर तिथे त्यांच्या गावचे इतर लोकंही होते.

“ह्या ह्या ह्या... चील्डा भो दिल्या...” हसतहसत आश्क्यानं टाळीसाठी हात पुढं केला. सूऱ्यानं लगेच त्याच्या हातावर टाळी दिली.

“अरे तू कसा काय आज इथं?” मी विचारलं.

“च्यायला..!!! म्हताऱ्यानं धाडलं ना खत आनायला... पन न्हाई मिळालं... आता उदयाला पुन्यांदा यावं लागंल.” काहीसा नाराजीचा सूर लावत त्यानं खिशात हात घातला. खिशातून तंबाखूची पुडी आणि चुन्याची डबी बाहेर काढली. एका हाताच्या तळव्यावर पुडीतली सगळी तंबाखू ओतून घेतली. रिकामी झालेली पुडी तिथेच खाली टाकली आणि डबीतील थोडा चुना बोटावर घेत तंबाखू मळायला सुरुवात केली. आमचं सगळ्यांचं लक्ष तिकडेच होतं. कारण यानंतर सलीम काय करणार हे आम्हाला अनुभवानं माहिती झालेलं होतं. तंबाखू मळून झाल्यावर बहुतेक लोकं त्यावर एक दोन थाप मारतात. का हे मात्र मला अजून माहिती झालेलं नाहीये. त्याने सुद्धा दोन थापा मारल्या आणि तो त्याची चिमुट करणार इतक्यात सलीमनं खालून त्याच्या हातावर मारलं. सगळी मळलेली तंबाखू खाली पडली आणि सगळ्यांनी दात काढायला सुरुवात केली.

“च्यायला... येड्या... आरं तंवढीच व्हती ना माह्याकडं... त्वां तीबी घालीवली. हड यार...” आश्क्या वैतागून बोलला.

“च्यायला... बापानं पैशे बी मोजून देयेले. कायतरी जुगाड करावां लागनं आता...” काहीसं स्वतःशीच पुटपुटत तो विचार करायला लागला.

“आश्क्या... एक आयडिया आहे... बघ तुला पटतं का !!!...” काहीशा मस्करीच्या सुरात दिलीप म्हणाला आणि विचारात गढलेला अशोक दिलीपकडे पाहू लागला. पण पुढंच काहीच दिलीप बोलत नाही असं पाहून तो वैतागला.

“ए... बेण्या... तोंड उचकट की...”

“साल्या... इथं तर नीट बोल ना...” दिलीप परत वैतागला.

“हां हां... बोल ना आता...”

“ती समोर पानटपरी आहे. त्याला उधारीवर पुडी माग ना. ५० पैशाची तर आहे... दिली तर तुझं काम झालं... काय?” तसा दिलीपच्या बोलण्यातील उपरोधिक भाव आश्क्यानं ओळखला असावा, पण त्यालाही ही आयडिया आवडली.

“लै भारी आयडिया रांव...” असं म्हणत आश्क्या चालू लागला. नंतर त्याचं टपरीवाल्याशी काय बोलणं झालं माहिती नाही, पण पाहतापाहता त्याने त्याच्या पँटची एक बाजू गुडघ्यापर्यंत वर घेतली. दुसरी बाजू गुडघ्याच्या थोडी खालपर्यंत वर केली. केस विस्कटले आणि एखादा रोगी भिकारी जसे हाताची बोटे आत मुडपून भिक मागतो तसा अभिनय करत मोठमोठ्याने “द्या ओ माय” ओरडत आश्क्या गर्दीत घुसला. आम्ही सगळे अवाक् होऊन तो काय करतोय हेच पहात होतो. ५ एक मिनिटात परत त्या टपरीवर गेला आणि त्या पानवाल्याकडून फुकटात एक तंबाखूची पुडी घेवून आमच्यात येऊन सामील झाला.

खरं तर लोकं आता आमच्याकडेचं पहात होते. याने अगदी काहीही झाले नाही अशा पद्धतीने खिशातून कंगवा काढून जवळच उभ्या असलेल्या बाईकच्या आरशात पहात भांग पडला. कपडे व्यवस्थित केले आणि दिलीप जवळ जात म्हणाला...

“पघ रे दिल्या... म्या फुकटात आनली न्हवं पुडी... ह्या ह्या ह्या...”

“आयला... तू तर डेंजर आहे यार... पण तो पानवाला काय म्हणाला होता तुला?” मी विचारले...

“अरे... म्या तिढं ग्येलो... त्याला म्हनलं... शेट... आपल्याला उधारीवर पुडी देश्यान का? त त्यो म्हनला... भिकाऱ्यासारखं या मानसात जाऊन दाखीवं. अन भिक मागून दाखीवं. तुला फुकटात पुडी दीन. मंग म्या म्हनलं... येवढचं? लगीच जातू... ग्येलो... आन पुडी घीवून आलो...”

“अरे पण त्यानं जर पुडी दिली नसती तर?” मी विचारले.

“आं... कशी नाय द्येनार? भाईर काढून लोळवलं नसतं का म्या?”

“तुझ्यायला... काई इज्जत बिज्जत नाही काय रे तुला?” याच्यामुळे आपलीही इज्जत जाईल या भीतीनं दिलीप म्हणाला...

“गप्ये... कायाची इज्जत? पैशे असले मंग समदी इज्जत. पैशे नाय तर काय नाय.” अगदी बेफिकीरीने आश्क्या बोलला.

त्यानंतर मध्यंतरीचे बरेच दिवस तो भेटला नाही. तसा तो खूप जवळचा मित्र नसल्याने आम्ही तरी कशाला त्याबद्दल चौकशी करतोय? पण जवळपास दीड महिन्यानंतर परत तो बस स्टँडवर भेटला. काहीसा लंगडत येत होता. आम्ही दिसताच तिथूनच ओरडला...

“तुमच्या मायला... आजूक डोळे शाबूत हाय व्हय? जवा बघावं तवां हिडचं लायनी मारत हुबे...” मग हसत हळूहळू आमच्या दिशेनं आला.

“कारे... काय झालं लंगडायला?” मी जराशी आस्थेनं चौकशी केली.

“म्हंजी? तुमाला कुनाला म्हाईत नाय व्हय?”

“नाही रे... काय झालं?” सलीमनं विचारलं...

“हैका आता... लैच म्होटा म्याटर झाला ना रावं...”

आणि नंतर त्याच्या गावातील इतर मित्रांकडे पहात म्हणाला...

“तुमच्या मायला... तुमी कुनी कामून नाई आले रे XXXXXXXX? १० दिस म्या बेडवर व्हतो हास्पिटलाच्या.” त्यांच्यावर काहीसं चिडून आश्क्यानं विचारलं.

“च्यायला तुझ्या... तू दर ४ महिन्यांनी हॉस्पिटलमध्ये असतो... कितीदा यायचं आम्ही?” दिलीप परत वैतागला.

“अरे पण तू हॉस्पिटलमध्ये कसा?” मी विचारलं.

“ह्या ह्या हया... त्योबी एक किस्सा हाये. ती पडेगांवची चारू न्हाई का... तुला दावली व्हती पघ...” खरं तर मला काही केल्या ती आठवेना... पण त्यानं जास्त पाल्हाळ लावू नये म्हणून उगाचच हो म्हणून टाकले.

“तिला म्या बोलून टाकलं... आपला तुह्यावर लै जीव हाये... मंग काय... तिनं घरी सांगितलं अन त्या गांवचे पोरं आले दोन जीबड्या भरून... म्या एकलाच गावलो त्यास्नी... मंग काय... लई धुतला मला कुत्रीच्या आयगत...” खरं तर त्याची सांगण्याची रीत पाहून काही केल्या हसू आवरत नव्हते, पण परत दोन शिव्या कुणी खाव्या म्हणून जितके होईल तितके हसू दाबून धरण्याचा माझा प्रयत्न चालू होता. पण ते साले आपले डोळे बोलतातच. तसा तो म्हणाला...

“मिल्या... कामून हासू ऱ्हायला? समद्यांना एकेक करून म्या त्याच हास्पिटलात धाडनार हाये. पघशीलचं तू...” शेवटी आपण काय बोलणार? शांत बसलो.

ज्या ज्या वेळेस तो भेटायचा त्या त्या वेळेस कधी कुठे मारामारी, कधी भांडणे, कधी याच्यामुळे कुणी हॉस्पिटल मध्ये तर कधी लोकांमुळे हा हॉस्पिटलमध्ये. एक दोन वेळेस तर मी भेटायलाही गेलो होतो त्याला. नंतर त्याचे लग्न झाले. कामधंदा न करता फक्त गांव कोळपत फिरणाऱ्या आश्क्याला कोणी पोरगी दिली हे आमच्यासाठीही कोडेच होते. पण तेंव्हापासून त्याच्या आणि आमच्या भेटी बऱ्याच कमी झाल्या. नंतर मीही श्रीरामपूर सोडले आणि भेटी पूर्णपणे बंद झाल्या. त्यावेळेस मोबाईल नव्हतेच, त्यामुळे एकमेकाच्या संपर्कात राहणे शक्यच नव्हते. अर्थात जरी असते तरी त्याच्याशी मैत्री ठेवून कुणी स्वतःची पत कमी करून घ्यावी?

१५ दिवसांपूर्वी श्रीरामपूरला जाणे झाले. या कालावधीत खूप बदल झाला आहे गांवात. मेनरोडवर डिव्हायडर आले आहेत. रस्त्याच्या बाजूने असणार्या इमारतीही पॉश झाल्या आहेत. एके काळी श्रीरामपूर मध्ये ‘वसंत’ नावाचे टॉकिज होते, हेही बऱ्याच जणांना आता माहिती नाहीये. अशाच गप्पा मारत माझ्या मित्राबरोबर मेनरोडवर फिरत होतो. आणि तेवढ्यात मागून बाईकचा हॉर्न ऐकू आला. आम्ही बाजूला झालो, पण हॉर्न वाजणे काही थांबले नाही. म्हणून मग मागे वळून पाहिले. चेहरा कुठेतरी पाहिल्या सारखा वाटत होता.

“च्यायला... मिल्या... हायेस कुडं?” रस्त्यातच गाडी स्टँडला लावत गाडीवाला आमच्या दिशेनं आला. मी मनात विचार केला ज्या अर्थी तो मला मिल्या म्हणतोय त्या अर्थी जुना मित्र असावा. पण नीट ओळख लागत नव्हती. पांढरे शुभ्र कपडे, कपाळाला गोपीचंदनाचा टिळा लावलेला, गळ्यात शर्टाच्या आत पण काहीसी दिसू शकेल अशी तुळशीची माळ, हातात सोन्याची अंगठी आणि केस जरासे विरळ झालेले अशा त्या माणसाने डायरेक्ट माझी गळाभेट घेतली. गळाभेट घेतली म्हणण्यापेक्षा गळ्यात पडला हे जास्त संयुक्तिक ठरेल.

“मी नाशिकला असतो हल्ली...” काहीशी दुरी बाळगत मी उत्तर दिले. कारण तो कोण हे मी अजूनही ओळखले नव्हते. तेव्हढ्यात प्रवीण म्हणाला.

“काय रे आश्क्या? आज काय काम काढलं?” प्रवीणने त्याचे नांव घेतलं आणि डोळ्यासमोर त्याचं ते पहिलं रूप आलं. त्यात आणि आजच्या त्याच्या रुपात खूपच फरक पडला होता.

“काई नाई रे... ते यावंच लागतं ना... वावरात भुईमूग लावेले. त्यावर किड पडू ऱ्हायली... मंग आलो त्याचं औशद न्यायला...” नंतर माझ्याकडे वळून म्हणाला...

“आयला... मिलिंद... लैच बदलला यार तू..!!!”

“हेहेहे... मी कसला बदललो... खरं तर तूच बदलला... अगदी पूर्णपणे... कपाळाला टिळा काय? गळ्यात तुळशीची माळ काय?” मी अभावितपणे बोलून गेलो...

“हा यार... बदलावं लागतं भो... आता माळकरी होएले म्या... समदं सोडून दिलं...” अगदी निर्विकारपणे अशोकनं सांगितलं.

“आयला... म्हणजे सगळे व्यसनं गायब?” मी आश्चर्यानं विचारलं.

“हा ना भो... आता दारू न्हाई, तंमाखू न्हाई, कंचे लफडे बी न्हाई... सकाळी उठलं का वावरात जायाचं... आसल ते काम करायचं... सांच्याला घरी यायचं... हातपाय धुतलं का मारुतीच्या देवळात जायचं... तिडून आलं का जेवायचं अन झोपायचं... कधीमधी बायकूनं सांगितलं का मंग तिला अन पोरीला घिऊन श्राम्पुरात यायचं. त्यास्नी बी बरं वाटतं.” अशोक सांगत होता.

“आयला... तू तर पूर्णच बदलला की... पण हे शहाणपण तुला सुचलं कसं?” त्याच्या एकेक गुगली मला आश्चर्यात टाकत होत्या.

“अरे... बापानं लगीन लावून दिलं पन म्या काय सुदारलो नाय. पन मंग मला पोरगी झाली. म्या जवां तिला पैल्यांदा हातात घेतली... लै भारी वाटलं. बायकुला म्हनलं... तू मला आज लई खुश केलंस... तुला काय पायजेन बोल... तुला सांगतो मिलिन... ती जे म्हनली ना... आयच्यान!!! टक्कुरं हाललं माह्यावालं... ती म्हनली...”

“काय मागू म्या... आता तुमी द्याल वो... पन...”

“पन काय ते बोल ना बाई...”

“आवं... तुमचं वागनं ह्ये असं... पोर मोठी झाल्यावर काय सांगन लोकास्नी? माहा बाप दारू पितो... माहा बाप तमाखू खातो... माहा बाप श्या देतो... माहा बाप भांनं करतो... माहा बाप कामधंदा काय बी करत नाई... मंग म्या बी तसंच करनार हाय... मंग?”

“तुला सांग्तो मिलिन... तवाचं ठरीवलं. समदं सोडून द्यायचं... अन मंग तिला म्हनलं... न्हाई... असं काय बी होनार न्हाई... घरला आलो अन मारुतीच्या मंदिरात जाऊन शप्पत घेतली. तवांपास्न कशाला बी हात लावला नाय म्या... माह्या पोरीला मागल्या मैन्यात चौदावं लागलं. लै हुशार हाये... शाळंत तिच्यावाला पैला नंबर येतं असतो. गांववाले म्हनतेत... पोरीच्या रुपानं लक्ष्मि आली माह्याकडं...” इतके बोलून त्याने थोडा पॉज घेतला. बहुतेक तो थोडा भूतकाळात गेला असावा असे मला उगाचच वाटले.

“च्यायला... म्या काय सांगत बसलो? तू बोल... तू कसाएस? पोरंबाळं?” त्याने परत सुरुवात केली. अगदी भरभरून बोलत होता तो, आणि मला त्याच्यात झालेला बदल प्रकर्षाने जाणवत होता.

“अरे पोरं कसे होणार? त्यासाठी लग्न व्हावं लागतं माणसाचं...” मी हसत म्हटले.

“म्हंजी? आजूक तसाच? आता कवर थांबनार? त्या तुह्या झिप्रीचं पोरगं बी गेलंय नव्वीला... ती न्हाई येनार आता नवऱ्याला सोडून... आता तुहं उरकून घी...” आश्क्या हसतहसत म्हणाला पण त्यातही जुनी खपली काढायला विसरला नाही. साला हे मित्र असेच असतात... मी फक्त ‘हेहेहे’ करण्याशिवाय काय बोलू शकणार होतो?

“आता असं कर... माह्याबरुबर चाल घरी... समदे भेटतीन तिडं... लई गप्पा हानू... रातच्याला माह्याकडं ऱ्हा... काय?” त्याने डायरेक्ट आमंत्रणच दिले.

“नाही यार... आज जरा नगरपालिकेत काम आहे... तिथल्या साहेबांचा वेळ घेतला आहे मी... आज नाही जमणार... पुढच्या वेळेस मात्र नक्की येईन..!!!” खरं तर त्याचं मन मोडवत नव्हतं पण त्याशिवाय इलाज नव्हता.

“हैका... ह्ये असंय तुमचं... तवां मैनाभर ऱ्हायला अस्ता... अन आता? आरं ती नसली म्हनून काय झालं? मोप पोरी पल्ड्यात अजुक... ह्या ह्या ह्या...” हसतहसत परत त्यानं टोमणा मारलाच.

“काय यार तू पण ना!!!” कसनुसं हसत मी म्हटलं...

“लाजला... लाजला... मिल्या... न्हाई... न्हाई बदल्ला तू... ह्या ह्या ह्या... चाल... जवा येळ भेटल तवां ये... म्या बी उल्शिक घाईते... पन यार लै भारी वाटलं पघ... चाल भेटू पुन्ना...” असं म्हणत बाईकला किक मारून तो नजरे समोरून दिसेनासाही झाला.

“यार प्रवीण... हा तर पूर्ण बदलला यार..!!!” मी त्याच्या जाणाऱ्या वाटेकडे पहात प्रवीणला म्हटलं.

“हो रे... आता तो गांवआश्या नाही राहिला. अशोकभाऊ झाला आहे. आणि तुला खोटं वाटंल, पण हा आता गांवचा उपसरपंच आहे... आहेस कुठं? पहां... लोकं कुठल्या कुठं गेलेत आणि आपण?” प्रवीण बोलला मात्र आणि मी चाट पडलो.

मिलिंद जोशी, नाशिक...

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED