माझे एक फेसबुक मित्र आहेत. त्यांना एक सवय आहे. ते प्रत्येक पोस्टवर विरुद्ध कमेंट टाकतात. म्हणजे तुम्ही कितीही सकारात्मक पोस्ट करा, त्यांची विरुद्ध कमेंट ठरलेलीच. आणि आपण त्यांना काही बोलायला गेलो की त्यांची उत्तरादाखल फक्त एक स्मायली येते. काल मेसेंजर मध्येही असेच झाले. मी कितीही चांगला विचार मांडला की ते मुद्दाम त्याला विरोध करत होते. बरे हा विरोध फक्त तेवढ्या मुद्द्यापुरता असेल तर समजू शकतो, पण त्यांचे वार व्यक्तिगत होते. एकदा, दोनदा, तीनदा झाल्यावर शेवटी माझेही डोके सटकले. विचार केला आता या माणसाला चार शिव्या द्यायच्या आणि ब्लॉक मारायचा. नकारात्मक लोक मित्र यादीत नसलेले बरे. त्यानुसार एक खरमरीत उत्तर लिहिले आणि ते प्रत्येक पोस्टवर कसे नकारात्मक व्यक्त होतात हे संदर्भासहित दाखवून देण्यासाठी जुन्या फेसबुक पोस्ट चाळू लागलो. त्याच वेळी आईचा फोटो समोर आला आणि त्यासोबतच तिच्या काही आठवणीही ताज्या झाल्या. कॉलेजला असताना मीही काहीसा असाच तर वागत होतो आणि मग तो प्रसंग आठवला.
मी कॉलेजमध्ये असताना मला वाचनाची भयंकर आवड होती. विशेषतः कादंबऱ्या. त्यावेळी वाचत असलेल्या कादंबरीच्या एका पात्राच्या तोंडी एक वाक्य वाचले होते. ‘समोरची व्यक्ती कशी आहे ते जाणून घ्यायचे असेल तर त्याला चिडवून द्या, रागाच्या भरात माणसाचे खरे चेहरे समोर येतात.’ अर्थात आता कादंबरीचे आणि लेखकाचे नांव आठवत नाही, पण ते वाक्य मनावर कोरले गेले आणि मीही माझ्या मित्रांशी तसाच वागू लागलो. स्वतः शांत राहून इतरांना चिडविण्यात मला वेगळीच मजा वाटू लागली. समोरची व्यक्ती जितकी चिडत होती, मी आनंदी व्हायचो. हळूहळू तोच माझा स्वभाव बनू लागला. जी गोष्ट आधी बाहेर करत होतो, तीच घरीही होऊ लागली. भावा बहिणीशीही माझे असेच वागणे चालू झाले. हे मी इतके बेमालूमपणे करत होतो की ते चिडायचे आणि मी चेहऱ्यावर अगदी निर्विकार भाव आणून ‘मी काहीच केले नाही’ या अविर्भावात वावरायचो. काही दिवसांनी माझे वागणे आईच्याही लक्षात आले आणि तिने मला त्याबद्दल शिक्षाही केली. पण माझ्यात सुधारणा नव्हती. शेवटी तिने याचा तिच्या पद्धतीने उपाय करायचे ठरवले.
एक दिवस दुपारी जेवण उरकले आणि मी कादंबरी हाती घेतली. तेवढ्यात आई माझ्या खोलीत आली.
“काय रे? काय वाचतोय?”
“काही नाही गं, कादंबरी वाचतोय.” मी अनवधानाने बोलून गेलो.
“अरे त्यापेक्षा अभ्यास केलास तर चार मार्क जास्त मिळतील.” आईने तिथेच बसत म्हटले.
“बोर होतं अभ्यास करताना. तसेही परीक्षेला वेळ आहे. आणि आता वाचलेले त्यावेळी लक्षात रहात नाही माझ्या.” मी वेळ मारून नेली. एरवी तिने यावरही चार शब्द ऐकवले असते. पण आज तिचा मूड चांगला असावा.
“काय आहे कथा?” तिने अगदी जनरल प्रश्न विचारतो तसे विचारले.
“नेहमीचीच... कौटुंबिक कथा आहे.”
“ओह... पण त्यातील एखादे पात्र असेल ना, तुला आवडलेले? त्याबद्दल सांग काही.” तिने म्हटले.
“हो... आहे ना... एक पात्र आहे, जे कायम फिलॉंसॉफी झाडत असते.” मी सांगितले.
“म्हणजे नेमके काय रे?”
“अगं म्हणजे जीवनात कसे वागावे याचे ज्ञान देत असते.” मी संगितले.
“एखादे उदाहरण...”
“म्हणजे बघ... ते पात्र म्हणते ‘माणसाची परीक्षा त्याच्या पडत्या काळात होते.’”
“होय... बरोबर... खरंय त्याचं... अजून काही?”
“अजून म्हणजे... हं... ‘माणसाचे खरे स्वभाव तो चिडल्यावरच समोर येतात.’” मी म्हटले.
“नाही पटत मला.” हे बोलताना तिने चेहऱ्यावर कोणतेही भाव येऊ दिले नव्हते.
“का?”
“तू आधी सांग तुला हे का पटते, मग मी सांगते मला का नाही पटत ते...” आईने परत चेंडू माझ्याकडे टोलवला.
“ओके... म्हणजे बघ हं... प्रत्येक माणूस चेहऱ्यावर एक मुखवटा धारण करून वावरत असतो.”
“हेही वाक्य त्या पुस्तकातलेच का?” तिने माझे बोलणे अर्ध्यावर तोडत काहीसे हसत विचारले. आणि माझ्या चेहऱ्यावरही स्मित आले.
“हो... पण मध्ये बोलू नको... लिंक तुटते माझी.” मी काहीसे चिडून म्हटले.
“हं... सांग...”
“तर... प्रत्येक माणूस चेहऱ्यावर एक मुखवटा धारण करून वावरत असतो. जोपर्यंत तो शांत असतो तोपर्यंत त्याचा मुखवटा अबाधित राहतो, पण एकदा का त्याला राग आला, की त्याचा तो मुखवटा गळून पडतो आणि त्याचा खरा स्वभाव लोकांसमोर येतो.” मी एका दमात बोलून टाकले.
“तू काय हे वाक्य पाठ केले आहेस?” तिने परत हसत विचारले.
“मुद्दाम पाठ केले नाही, पण मला पटले त्यामुळे ते लक्षात राहिले.” मी म्हटले.
“ओह... म्हणून आजकाल तू तृप्ती, मकरंद यांना चिडवून देत असतोस का?” तिने प्रश्न केला आणि माझ्या लक्षात आले... आई माझ्या कादंबरी वाचण्याबद्दल आज का काहीच बोलली नाही. आजचा तिचा उद्देश माझ्या स्वभावावर भाष्य करण्याचा आहे. म्हणजे इतका वेळ तिनेही मुखवटाच धारण केला होता की.
“अं... नाही गं... मी काही नाही करत...” मी म्हटले पण त्यात फारसा दम नव्हताच.
“मिलिंद... मी तुझ्यापेक्षा २३ पावसाळे जास्त बघितले आहेत आणि आपलं पोरगं कसं आहे हे मी चांगले ओळखून आहे.” तिने म्हटले.
“अगं पण मी फक्त समोरच्या व्यक्तीचा खरा स्वभाव बाहेर आणण्याचा प्रयत्न करतोय.”
“का? त्याने काय होईल?” तिने विचारले.
“मला समजेल ना कोण कसा आहे ते.”
“आणि मग?”
“मग मी त्याप्रमाणे त्याच्याशी वागेन...” मी सांगितले आणि तिने थोडा पॉज घेतला.
“मला एक सांग... समजा तुझी काहीही चूक नसताना तुला कुणी चिडायला भाग पाडले तर तू काय करशील?” तिने विचारले आणि मी सावध झालो.
“अं...”
“सांग ना...”
“मी शांत बसेन.” मी म्हटले पण माझा चेहरा मात्र वेगळेच काही सांगत होता.
“पण एरवी अशा वेळेस तर तू शांत बसलेला मला नाही कधी दिसला.” तिने म्हटले आणि माझ्या चेहऱ्यावर हसू आले.
“म्हणजे तुही कुणी चिडवले तर चिडतोस... बरोबर ना?” तिने विचारले आणि मी होकारार्थी मान डोलावली.
“मग मला असे सांग, तू चिडलेला असताना तुला कुणी अनोळखी व्यक्तीने बघितले आणि सगळ्यांना सांगू लागला की या मुलाचा स्वभाव विचित्र आहे तर ते खरे असेल का?” तिने विचारले आणि मी शांत बसलो.
“एक गोष्ट कायम लक्षात ठेव. प्रत्येक माणसात सात्विक गुण असतात तसेच तामसी गुणही असतात. तुम्ही तुमच्या वागण्याने त्याच्यातील कोणत्या गुणाला आमंत्रण देतात त्यानुसार ते गुण प्रकट होतात. महाभारताचे उदाहरण घे. त्यात कृष्ण हा जसा पांडवांचा नातेवाईक होता तसाच शिशुपालाचाही नातेवाईक होता. पण पांडवांनी कृष्णामधील सात्विक गुणाला पाचारण केले आणि कृष्णाने कायम त्यांचे रक्षण केले, तर शिशुपालाने कृष्णामधील तामस गुणाला पाचारण केले आणि स्वतःचा नाश करून घेतला. मग त्यावेळेस कृष्णाचा स्वभाव चिडखोर होता असे म्हणायचे का? कृष्ण तर तोच होता. पण दोन वेगवेगळ्या व्यक्तींच्या समोर त्याची दोन परस्पर विरुद्ध रूपे साकार झाली. कारण त्या व्यक्तींनी त्याच्या ज्या गुणाला आमंत्रण दिले, ते रूप त्यांच्यासमोर हजर झाले. तू जर इतरांना चिडवत राहिलास तर तुझ्यासमोर येणारे रूप हे चिडखोरच असेल. भलेही तो त्या व्यक्तीचा स्वभाव नसला तरीही. त्यामुळे रागात माणसाचा खरा स्वभाव समोर येतो हे तितकेच खोटे आहे जितके कुणी चिडवल्यावर तू शांत बसतो असे म्हणने.” तिने म्हटले आणि मी निरुत्तर झालो.
“ओह... म्हणजे असे सांग ना... मी कुणाचा मुखवटा फाडायचा प्रयत्न करायचा नाही ते...” मी हसत म्हटले.
“माणसाची प्रत्येक भावना हा एक प्रकारचा मुखवटाच असतो. तू मकरंदवर चिडला म्हणून तृप्तीला मारत नाहीस. जरी दोघेही समोर असले तरी. कारण तुझा चिडलेला मुखवटा मकरंदसाठी आहे.. तृप्तीसाठी नाही.” आईने सांगितले आणि ते मला पटलेही.
“हं... म्हणजे पुस्तकातील वाक्ये पुस्तकातच चांगली दिसतात तर...” मी हसत म्हटले आणि आईच्या चेहऱ्यावरही स्मित झळकले.
“पण समजा, कुणी माझ्या बाबतीत असे करत असेल तर?” काहीसे आठवून मी विचारले.
“मग त्याच्यापासून शक्य तेवढे लांब रहा. पण मैत्री तोडू नकोस.” आईने सांगितले.
“का? अशा मित्रांचा उपयोग काय? जर ते आपल्याला कायम चिडविण्याचा प्रयत्न करत असतील तर?”
“म्हणूनच सांगितले... त्यांच्यापासून लांब रहा तसेच सावध रहा. आणि मैत्री यासाठी तोडू नकोस कारण जोपर्यंत त्यांचा मैत्रीचा मुखवटा अबाधित आहे, तुझा त्रास कमी आहे. एकदा का तो फाटला, आणि ते त्यांना समजले, की ते उघड उघड शत्रुत्व पत्करतात जे माणसासाठी जास्त त्रासदायक ठरते. लक्षात ठेव... मित्राचा शत्रू बनला तर तो जास्त घातक असतो. त्यामुळे लोकांचे मुखवटे जितके त्यांच्या चेहऱ्यावर राहतील, तितका तुला त्रास कमी असेल.”
त्यावेळी आईने सांगितलेली गोष्ट माझ्या मनावर चांगलीच ठसली. आतापर्यंतच्या जीवनात मला या गोष्टीचा खरंच खूप फायदा झाला आहे. हा विचार चालूच होता की परत मेसेज आल्याचा टोन वाजला. मी परत मेसेंजरवर गेलो.
“काय रे... बोलायला काही सुचत नाहीये का? की चिडलाय माझ्यावर?” माझ्या त्या मित्रांचा मेसेज होता आणि त्यापुढे स्मायली होती.
“अरे सर... मी का म्हणून चिडू तुमच्यावर... पण खूप झोप आली आहे... उद्या बोलू... बाय...” मी मेसेज केला आणि मेसेंजर बंद केले. आता यानंतर त्यांनी कितीही मेजेस केले तरी मी ते उघडणारच नाही. म्हणजे त्यांचे मेसेज वाचणेही नको, आणि आपल्यातील तामस गुण वाढणेही नको...
-- मिलिंद जोशी, नाशिक...