जोडी तुझी माझी - भाग 1 Pradnya Narkhede द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

जोडी तुझी माझी - भाग 1

ती रस्त्यावर रडत रडतच पळत होती, तिला फार मोठा धक्का बसला होता खर तर. पळून दमल्यानंतर ती कुठेतरी एका बाकड्यावर बसली पण डोळ्यातलं पाणी मात्र थांबतच नव्हतं. तिचा विश्वासच बसत नव्हता की ज्या मुलाबरोबर आपण लग्न करायला निघालो तो आपल्याला एवढा मोठा धोका देत आहे. रडून रडून डोळे लाल झाले होते आणि सुजले सुध्दा होते. आज जे बघितलं आणि ऐकलं तेच सारखं सारखं तिच्या डोळ्यापुढे फिरत होतं.

ती गौरवी, दिसायला गोरीपान, देखणी, सुंदर टपोरी डोळे, लांब केस, साधी राहणी, तरीही आकर्षक. गौरवी खुप समजदार, समंजस, भोळी थोडी हळवी तरीही खंबीर अशी होती. नोकरी ही करायची कुणालाही एक नजरेत पसंत पडेल अशीच होती ती.

तो, विवेक तिचा होणारा नवरा. विवेक ही चांगल्या मल्टिनॅशनल कंपनी मध्ये जॉब करत होता, दिसायला हॅन्डसम होता.

आज विवेक तिला त्याच्या मित्राच्या पार्टीमध्ये दुसऱ्या शहरात घेऊन आला होता. साक्षगंध झालेलं होतं आणि साक्षगंध ते लग्न हा सुवर्ण काळ ते जगत होते. अरेंज मॅरेज होणार होतं त्यांचं.

तो तिला फिरायला न्यायचा, पार्टी वगैरे सगळीकडे तिला घेऊन जायचा आणि आता लग्न होणारच आहे म्हणून घरच्यांनीही कधी विरोध केला नाही. त्यानी तिला खूप स्वप्न दाखवली होती आणि ती ही खूप आनंदात त्याच्यासोबत ते सगळे क्षण जगायची पण आज अचानक तिच्यासमोर जे सत्य आलं त्यामुळे ती मात्र कोलमडूनच पडली, तिला स्वतःला सावरायला जमतच नव्हतं, जवळपास संपूर्ण रात्र तिने बकड्यावरच रडून रडून काढली होती. सकाळी सकाळी बाकड्यावरच ती झोपी गेली.

जेव्हा उठली तेव्हा बरीच सकाळ झाली होती आणि आजू बाजूचे येणारे जाणारे सगळे तिच्याकडे बघत होते. ती उठली वेळ बघितली सकाळचे 9 वाजले होते. आता काय करावं तिला काहीच सुचत नव्हतं आणि काल रात्रीच्या प्रसंगाचं चित्र परत तिच्या डोळ्यासमोर तरळलं. लगेच डोळे पुन्हा भरून आलेत आणि वाहू लागले. पण लगेच स्वतःला सावरत ती तिथून उठली आणि काहीतरी मनाशी ठरवून रस्त्यानी चालत निघाली. डोक्यात भयंकर राग आणि मनात असंख्य प्रश्न घेऊन ती विवेकला जाब विचारायला निघाली होती. चालता चालता तिच्या लक्षात आलं की काल रात्री आपण दुःखाच्या भरात किती दूरवर पळत आलोय ते. कालपासून तिनी काहीही खाल्लेलं नसल्यामुळे तिला आता गळल्यासारखं वाटत होतं , पाय जड झाले होते आणि डोकंही गरगरत होतं. तरीही ती चालतच होती कारण मनातले प्रश्न शांत बसू देत नव्हते. डोक्यातला राग आवरता येत नव्हता. ती तशीच चालू लागली आणि तशीच थकून ती परत त्या स्थळी पोचली जिथे काल पार्टी होती, पार्टी बरीच उशिरा पर्यंत चालणार असल्यामुळे बाहेर गावावरून येणाऱ्यांची रात्री राहण्याची सोय तिथल्याच हॉटेलवर केली होती. ती त्या हॉटेलला पोचली. रिसेप्शन वरून त्याच आणि स्वतःच नाव सांगून त्याच्या खोलीच्या किल्ल्या मिळवल्यात आणि तडक त्याच्या रूम मध्ये गेली. तिला वाटलं की विवेक एकटाच असेल खोलीत आणि उठला असेल आता.

पण खोली उघडून आत जाऊन तिनी जे बघितलं ते पाहून तीच ना तोंडातून शब्द बाहेर आला ना जाब विचारण्याचा धैर्य झालं. परत तोंड हाताने गच्च दाबून रडतच हुंदके देते ती बाहेर पडली. आणि खाली येऊन सोफ्यावर बसली. अजूनही ती रडतच होती. काय करावे? कुठे जावं? काहीच तिला सुचत नव्हतं. विचार करून करून तीच डोकं बंद पडायला आलं. कालपासून काही न खाल्ल्यामुळे आणि रात्रभर रडल्या मुळे तिला भोवळ आली आणि ती तिथेच बेशुद्ध पडली.

तिच्या शेजारून जाणाऱ्या स्टाफ च तिच्याकडे लक्ष गेलं त्यानी तिला बरेच आवाज दिलेत, हलवूनही बघितलं पण काहीच प्रतिसाद ना मिळाल्यामुळे त्याने तडक रिसेप्शन वरून विवेकच्या खोलीत फोन केला. आताच खोली नंबर सांगून चावी नेल्यामुळे त्याला त्याचा खोली नंबर माहिती होता. 2-3 वेळा फोन लावूनही उचलला नाही म्हणून मग तो सरळ खोलीकडे वळला. जोरजोरात दार वाजवून आवाज देत होता. इकडे झोप मोड झाल्यामुळे विवेक भयंकर चिढला दार उघडतच म्हणाला, " का इतक्या सकाळी एवढ्या जोरात दरवाजा वाजवतोय, उघडत नाही म्हंटल्यावर निघून जायचं ना,"
स्टाफ - सॉरी सर पण त्या तुमच्यासोबत आल्या होत्या त्या खाली बेशुद्ध पडल्या आहेत. म्हणून मी तुम्हाला बोलवायला आलो.
तेव्हा थोडं भानावर आला आणि त्याला गौरवीची आठवण झाली, तो लगेच शर्ट चढवून स्टाफ सोबतच खाली गेला. तिथे गौरवीला बघितलं आणि स्टाफच्या मदतीने तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला.

आता त्यालाही जरा टेन्शन आलं होतं की नेमकं काय झालं असावं आणि ही इथे कशी? हीचा चेहरा असा उतरलेला आहे पूर्ण आणि डोळे सुद्धा सुजलेले दिसत आहेत, काल रात्री हिची चौकशी करायला विसरूनच गेलो मी. हिला काही कळलं तर नसेल ना. आणि घाईघाईतच तो एक फोन करतो.
विवेक - " तुला काल जे काम सांगितलं होतं ते तू केलं होतस ना?"
तिकडून - " माफ किजीए सर लेकींन वो मॅडम मुझे दिखेही नाही बादमें मैने उन्हेे बोहोत ढुंढा लेकीं वो मुझे नही मिले."
विवेक - " काय म्हणजे ती तुला भेटलीच नाही तर ती होती कुठे रात्रभर, आणि तू मला तस सांगितलं का नाहीस मग, अशीच काम करतात का तुमच्या प्रोफेशन मध्ये"

विवेक आता फार घाबरला होता आणि फोन वरच्या माणसावर चिढला देखील होता.

तिकडून- " मै आप के पास आया था आप कुछ बीझी थे तो मैने आपके साथ वाली मॅडम को बताया , उनहोणे मुझे कहा के तुम जावो मै बता दुंगी"

विवेक- " अरे ती बेशुद्ध झाली आहे आणि ते ही आता, सकाळी. मी तिला हॉस्पिटलमध्ये आणलय."

तिकडून - " लेकीन मैने तो उन्हे बेहोष किया ही नही"

तेवढ्यात तिला चेक करून डॉक्टर बाहेर आलेत.
विवेक (फोनवर) - " ठीक आहे मी ठेवतो"

आणि डॉक्टरांकडे जाऊन विचारू लागला.
" डॉक्टर काय झालंय तिला काही काळजी करण्यासारखं तर नाही ना?"
डॉक्टर - " काळजी करण्यासारखं म्हणाल तर तिनी कशाचा तरी खूप ताण घेतलाय अचानक मोठा धक्का बसलाय तिला आणि कालपासून काही खाल्लेले पण नाही आहे तिने. म्हणून तिला भोवळ आली. 1-2 तासात ठीक होऊन जाईल. एक चिठ्ठी हातात देत या गोळ्या घेऊन या. आणि त्यांना ताण देऊ नका."
विवेक - " ठीक आहे"
डॉक्टर निघून जातात आणि तो ही मेडिकल मध्ये औषधी आणायला जातो.

तिला नेमकं काय झालंय, कशाचा ताण घेतला असेल, तिला काही कळलं तर नसेल ना. आणि जर काही माहिती झालंच तर काय समजवायचं असा सगळा विचार करतच तो औषधी घेतो आणि परत हॉस्पिटलमध्ये येतो.


क्रमशः...