Where does mom do books and stories free download online pdf in Marathi

आई कुठे काय करते?

आई कुठे काय करते?
आई सगळं करते, पण दिसत नाही म्हणून प्रश्न पडतो. आई कुठे काय करते सध्या तरी ही मालिका चांगली चालली आहे.आमच्या अनेक मालिका पकडून ठेवता ठेवता, पाणी घालत राहतात.
काही मालिका चिमटाही घेत नाहीत आणि पकड ही घेत नाहीत.
आई कुठे काय करते मध्ये आईचे संस्कार कमी पडत आहेत कां? असा प्रश्न पडतो. काही गोष्टी केवळ स्वप्नरंजन म्हणून पाहण्याची सवय आता प्रेक्षकांना झालेली आहेच. अनेक प्रश्न मालिकेत पडतात, कुटुंबात सुद्धा अनेक प्रश्न पडतात, त्यांची उत्तरं नसतात, तरीही आपण त्यांची काळजी करतो.
आई कुठे काय करते मध्ये विवाह बाह्य संबंधाचा प्रश्न हाताळला आहे.
घटस्फोटा शिवाय लग्नाचा विचार करणं हे तार्किकतेला पटणारं नाही. माणसांवर हसत
प्रेम करणारी माणसं मना मध्ये इतकी भयानक चाली खेळंत असतील याचा अंदाज येत नाही. नारळाची आणि माणसाच्या मेंदूची कल्पनाच येत नाही आतून कसा असेल?
वरुन दिसायला चांगली दिसतात पण सडके पणाचा अंदाज वरून येत नाहीं.
अतिशय उत्तम अभिनय या मालिकेत सर्वच पात्रांनी केला आहे. अनेक स्त्रियांची जी घुसमट आहे ती योग्य प्रकारे या मालिकेत दाखवलीं आहे. एखाद्या कुटुंबात असं घडल्यावर काय करायचं हा प्रश्नच असतो,आणि आजकाल हे नवीन नाही, कुटुंब एक असले तरी प्रत्येकाचे नियोजन भावी आयुष्याच्या संदर्भात, भावी जोडीदारां संदर्भात ठरललेंले आहे, त्यात त्यांना अडथळा नको असतो, इथपर्यंत ठीक आहे. पण कोणतेच संस्कार न झालेली पिढी त्यांचच नाही तर कुटुंबाचे नुकसान करून घेत आहे.
उद्ध्वस्थ कुटुंबात अस्वस्थ माणसं राहत आहेत. स्वप्नरंजनात माणसे अनेक गोष्टी करतात, पण ते उघडकीला येत नाही. प्रत्येकाच्या मनात काय चालू आहे हे कळलें तर माणसे आत्महत्या करतील. बोलणारा माणूस आतून तुमच्या विरोधात विचार करत असतो, ते तुम्हाला कळत नाही. माणसांचे खोटं बोलणं इतकं सर्रास वाढले आहे की खोटं बोलां पण रेटून बोलां अशी सवय माणसांना लागली आहे.त्यामुळे समाजाचा तोल बिघडला आहे. समाधान हरवलं आहे.
शिवंण कितीही मजबूत असली, पण कपडा नाजूक असेल तर फाटणारच. जेंव्हा संस्कार सोपस्कार ठरतो तेव्हा तो काहींच कामाचा नसतो, तो मनात रुजायला हवां.
कोण कुठे काय करते हे अनेकांना माहीतंच नसतं. आपल्या आयुष्याच्या कर्तुत्वाचा पाया आईनेच घातलेला असतो,पण इतर गोष्टीच कौतुक होतं पायाचं नाही कारण, पाया दिसत नाही.
पायांच डळमळीत असेल तर इमारत टिकणार कशी? आई शेवटपर्यन्त न समजणारे पुस्तक आहे, पण तरीही वारंवार वाचावं असं वाटणारं.
वर्क फ्रॉम होम,वर्क फॉर फॉर होम हे दोन्ही कामं आई करते.घराची सूत्रे तिच्या हाती नसलीं तरी तिचीं गुणसूत्रेंच घरांला तारतात.
विवाहबाह्य संबंध पूर्वी उघड होतेंच,आता ते लपून छपून आहेत, त्यामुळे अनेक गुंतागुंती निर्माण झाल्या आहेत.आपलं माणूस केवळ आपलं नाही हे आज घरच्या सदस्यांना माहित झालं आहे. पत्नीला नवरा आपला नाही, मुलांना बाबा आपलें नाहीतअसं वाटायला लागल्यावर असुरक्षितता निर्माण होते.
जेव्हां आपलं कोणीच नाही अशी भावना निर्माण होते तेव्हा नैराश्य, डिप्रेशन येतं जे आजच्या पिढीचं वैशिष्ट झालं आहे.
कुटुंबात सावरणारा कुणीतरी लागतो. आज-काल सगळेच उद्ध्वस्थ होत असताना, अस्वस्थ असताना सावरणारे कुणीच राहीलं नाही आणि त्याच्यामुळे एक कौटुंबिक कलह सर्व कुटुंबात दिसून येतो.
मोठ्या माणसाचं वर्चस्व संपल्यामुळे कोणी कोणाला विचारत नाही. प्रत्येक जण स्वतःची इमारत स्वतः उभारण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे, कुणी कुणाला विचारत नाही. प्रत्येक जण स्वकर्तृत्वावर स्वतःची इमारत उभारण्याचा प्रयत्न करतो आहे. मी, माझं,माझा मोबाईल एवढेच विश्व राहिलं आहे. माणसें जवळ नसलीं तरी चालेल पण नेट असेल तर सगळं काही नीट चालतं. पूर्वी नेटाने संसार केला जायचा आता नेटानी संसार केला जात आहे.
कोण कुठे काय करतोय हेच कळत नाही आणि प्रत्येक जण कळू ही देत नाही. घरात पैशाची विभागणी आहे पण श्रमाची नाही.
ऑनलाईन आणि ऑफलाईन उपलब्ध असणारे एकच व्यक्ती म्हणजे आई .स्वप्नातही आईची जागा जेव्हा दुसरी बाई घेते आणि प्रश्न निर्माण करते तेव्हा सगळे प्रश्न सुरु होतात.
भावना आणि कर्तव्य ओला आणि सुका कचरा प्रमाणे वेगवेगळें करावे लागतात.
एक भावनाहीन पिढी निर्माण होत आहे त्याला आम्हीच जबाबदार आहोत नातेसंबंधाचे खत कुठे मिळत नसतं.
माणसांच्या जवळ गेलो तरच माणसं कळतात. जीवनात ही घडी अशीच राहू दे,कुणांलाच नकोय. समाधान नसल्यामुळे सगळें यशाच्या मागे पळत आहेत. माणसें नैराश्यात रहात आहेत.
अनेकांचे संसार सुरळीत चालतात कारण बाबा कुठे काय करतात हे अनेकांना माहीतंच नसतं.घरातला प्रत्येक जण कुठे काय करतोय हे एकमेकांना माहीत नसतं. सगळ्या गोष्टी घरातल्या सदस्यांना गप्प करतात, कारण संवाद नाही.हाताची घडी तोंडावर बोट शाळेत असतं पण आता घरांत सुरू झालं आहे मोबाईलमुळे.
काही लक्ष्मण रेषा ओलांडायच्याच नसतात. आम्ही नात्यांत लक्ष्मणरेषा केव्हांच ओलांडल्याआणि त्यामुळे परतीचा मार्ग अवघड झाला आहे. लक्ष्मण रेषा राहिल्या कुठे, वैधानिक इशारा आहे फक्त, तुम्हाला धोक्याची जाणीव करून देणारी. विष जीवाला घातक आहे हा फक्त इशारा द्यायचा व विषयाची दुकानं गल्लीबोळात उघडून ठेवायची.माल है क्या एवढंच जीवनाचे उद्दिष्ट झालं आहे, त्याच्यामुळे सर्व संसाराचा ताल बिघडला आहे.
जे मी केलं नाही त्याची कबुली देणार नाही.
पण आता जे केलं आहे त्याची कबुली न देणं अशी पिढी आली आहे. पूर्वी माणसं स्वतः बोलत होती आता त्यांचे वकील बोलतात.वडिलांच घर मुलांचं असतं पण मुलांचं घर वडीलाचं असतंच असं नाही,अशी आज परिस्थिती आहे.संबंध कोणी कोणाशी ठेवायचे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रांत झाला आहे. संबंधाच्या आड कोणी आलं तर माणसं संपवणं पर्यंत माणसाची पातळी गेली आहे. घरात आई असते म्हणजे संस्कार असतात. वडील असतात म्हणून शिस्त असते. कुटुंब असतं म्हणून सुख असतं. आई एक गीत आहे त्याला चाल लावण्याचं काम वडिलांचं आहे.
यशाला पायऱ्या असतात अपयशाला प्याराशुट ही नसतो. पेटून उठल्याशिवाय व्यक्त होता येत नाही. घरात जर संवाद नसेल तर व्यक्तिमत्वां मधिल सर्वस्व उमलंतच नाही.
अभ्यासक्रमातील विषयांची जेवढी माहिती नसते त्यापेक्षा विषयांच्या विषयीची माहिती मुलांना जास्तअसते.
विवाह बाह्यसबंध पाहंत व पचवंत मुलं मोठी होत आहेत.आईला कटूता न घेता सगळंच करावं लागत.
आई..
आई म्हणजे आई असते. तुमची आमची सेम असते. कारण ठेच लागल्यावर सगळ्यालाआईच आठवते. .
आई म्हणजे असे पुस्तक
जीवनाचा अर्थ कळायला
ज्यातले संदर्भच केवळ उपयुक्त.
आईचं अस्तित्व आपल्यात.
आपल अस्तित्व आईच्या आठवणीत.
आई म्हणजे जीवनाची साठवण.
असतांना पेक्षा नसतांना जास्त कळते ती आई.
आई नसली तरी आईची आठवण आपल्यातंच असतें.
डॉ. अनिल कुलकर्णी.

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED