जैसे ज्याचे कर्म - 6 Nagesh S Shewalkar द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

जैसे ज्याचे कर्म - 6

जैसे ज्याचे कर्म! (भाग ६)
आगलावे यांनी महत्त्वाच्या कामासाठी फोन केला असेल हे ओळखून डॉ. गुंडे यांनी समोर बसलेल्या पेशंटला आणि नर्सला बाहेर बसायला सांगून म्हणाले,
"बोला आगलावे साहेब, बोला. आज कशी काय आठवण झाली?"
"काय करता गुंडेसाहेब, कामच तसे महत्त्वाचे आहे म्हणूनच तुमची आठवण आली..."
"बोला ना बोला. फोनवर तुमचे नाव पाहिले आणि सर्वांना बाहेर बसायला सांगितले. सध्या मी एकटाच आहे. सांगा. कुणाचे अबॉर्शन..."
"दुसरे काय असणार? पण फोनवर नाही बोलता येणार. तातडीने भेटायला येऊ शकाल का?"
"तातडीने? अहो, पण..."
"गुंडे, तुम्हाला भेटायला बोलावतोय ती तुमची दिवसभराची फिसही चुकवतो..."
"तसे नाही. ठीक आहे. पोहचतो लगेच. कुठे भेटूया..."
"आपल्या नेहमीच्या हॉटेलमध्ये या."
"ठीक आहे..." असे म्हणत डॉक्टरांनी नर्सला बोलवून सर्व अपॉइंटमेंट रद्द करायला सांगून ते तातडीने त्या हॉटेलकडे निघाले...
काही मिनिटातच ते त्या हॉटेलमध्ये पोहोचले. कार वाहनतळावर लावून ते आत जात असताना एक तरुण जोडपे बाहेर येत होते. ते त्यांच्या मस्तीत दंग असल्यामुळे त्यांचे गुंडे यांच्याकडे लक्ष नव्हते पण त्या दोघांना पाहून डॉक्टरांना आश्चर्याचा धक्का बसला कारण त्यावेळी ते ज्या आगलावे यांना भेटायला पोहोचले होते त्याच आगलावे यांची ती मुलगी होती तर पुढचा धक्का अजून मोठा होता कारण तो मुलगा दुसरा तिसरा कुणी नसून जिवलावे यांचा मुलगा होता. आगलावे- जिवलावे हे कट्टर विरोधक तर आताचे दृश्य म्हणजे त्यांची मुले प्रेमाचे रंग उधळत होते. काय योगायोग असतो ना? गुंडे आत शिरले. चौकशी कक्षात त्यांनी आगलावे आले का याची चौकशी करताना विचारले,
"आत्ता जी मुलगी इथून गेलीय ती आगलावेंचीच मुलगी होती ना?"
"डॉक्टर साहेब, आपण बरोबर ओळखलेत आणि आता तुम्ही तिच्या वडिलांना म्हणजे आगलावेंना भेटताय तर त्यांना मुलीबद्दल सांगू नका. सिक्रेट आहे ते."
"नाही सांगणार. तो मुलगा तिच्यासोबत होता तो जिवेलावे यांचा होता ना?" गुंडेंनी विचारताच त्या मुलीने केवळ होकारार्थी मान हलवली आणि ते लिफ्टकडे निघाल्याचे पाहून ती पुटपुटली,
'कसे सांगावे या डॉक्टरांना की, त्यांची मुलगी पण जिवलावे यांच्या मुलासोबत इथे नेहमीच येते ते. जाऊ देत. आपल्याला काय करायचे?'
तिकडे अजय गुंडे खोलीत आलेले पाहताच आगलावेंनी उठून त्यांचे स्वागत करीत म्हणाले,
"या. या. डॉक्टर साहेब, या. तुमचीच वाट पाहात होतो. बसा."
"काय मग आगलावे साहेब, कुणी आणि कुठे आग लावली आहे? म्हणजे कुणाचा गर्भपात करायचा आहे. किती वर्षे वय आहे मुलीचं? किती महिन्यांचा गर्भ आहे?"
"व्वा! डॉक्टर, व्वा! पटलं. तुम्ही तर एकदम मुद्द्यालाच हात घातलात. असे आहे बघा... मला शंका आहे म्हणजे माझ्या पत्नीला अशी दाट शंका आहे की, आमची मुलगी वाईट संगतीत अडकली असावी आणि ती काही तरी... स्पष्ट सांगतो, बायकोला असे वाटते की, तिला दिवस गेले असावेत. त्यातून तुम्ही तिची पर्यायाने आमची सुटका करावी..."
"आगलावेजी, समजलो तुम्हाला काय म्हणायचे ते! तुम्ही सतत देशभर भ्रमण करीत असता एखाद्या चांगल्या शहरातील डॉक्टरांना दाखवून निर्णय घ्या. म्हणजे एकतर बोभाटाही होणार नाही."
"डॉक्टर, खरे आहे तुमचे पण आम्ही जिथे जाऊ तिथे पत्रकार, वाहिनीवाले महत्त्वाचे म्हणजे आमचे विरोधक आमचा पिच्छा सोडत नाहीत..."
"मग तिथे काय कमी आहेत का? हे सारे इथे तर दसपटीने अधिक आहेत."
"ते आहेत पण आपले घरगुती संबंध सर्वांना ठाऊक आहेत. आपले कुटुंबीय आपल्या अपरोक्ष एकमेकांच्या घरी जातात. जशा आपल्या बायका एकमेकींच्या मैत्रिणी आहेत तशाच आपल्या मुलीही चांगल्या मैत्रिणी आहेत त्यामुळे तुम्ही हे काम केले तर कुणाला कानोकान खबरही लागणार नाही."
"ठीक आहे. घेऊन या. आधी घरीच बसूया. मनसोक्त गप्पा मारताना टाइमपास करुया. मी तुमच्या मुलीशी बोलतो आणि नंतर तपासणी करून गरज वाटली तर शस्त्रक्रिया करून सुटका करु. एक दोन दिवसात कधीही या..."
"एक- दोन दिवस? नेक काम को देरी क्यों? आज सायंकाळी उशिरा येतो." आगलावे गडबडीने म्हणाले. चहापाणी होताच आगलावे यांचा निरोप घेऊन डॉ. अजय गुंडे घरी परतले...
त्याच रात्री दहा वाजत असताना डॉ. गुंडे शेवटचा पेशंट तपासत असताना आगलावे यांचे सहकुटुंब आगमन झाले असून ते वरच्या मजल्यावरील डॉक्टरांच्या निवासस्थानी जाऊन बसले असल्याचा निरोप गणपतने दिला. डॉक्टरांनी सारी कामे तातडीने आटोपली आणि ते घरी आले. त्यावेळी सारे जण गप्पा मारत होते. डॉ. गुंडे तिथे पोहोचताच दोघांच्याही बायका डॉक्टरांच्या पत्नीच्या खोलीत गेल्या तर दोन्ही मुली वेगळ्या खोलीत गेल्या. इकडच्या तिकडच्या गप्पा होताच आगलावेंनी विचारले,
"डॉक्टर, आमच्या बायकोची शंका खरी ठरली. पोट्टी पोटुशी आहे. आता तुम्हीच आम्हाला यातून बाहेर काढू शकता. वाटेल तेवढी फी घ्या पण..."
"आगलावे साहेब, असे म्हणू नका. प्रश्न फिसचा नाही. मुलीला हे समजले आहे का?"
"होय. दोन दिवस झाले ती सारखी ओकतेय तेव्हा तिच्या आईने खोलात जाऊन तिला बोलते केले तेव्हा खरे काय ते समजले..."
"तिला इथे कशासाठी आणले आहे ते समजले का?"
"हो. अगोदर तयार नव्हती पण तिच्या आईने समजावून सांगितल्यावर तयार झाली..."
"पण हे झाले कसे? म्हणजे..."
"तो हलकट जिवलावे! त्याच्या पोट्ट्याने डाव साधला. त्याला तरी काय म्हणावे? आपलीच पोरगी... बरे, ते जाऊ द्या..."
"ठीक आहे. आपण खाली जाऊया..." असे म्हणत डॉक्टरांनी घंटी वाजवली. काही क्षणातच गणपत हजर झाला. डॉक्टरांनी त्याला बरेच काही समजावून सांगितले. गणपत जाताच आगलावेंनी शंका व्यक्त केली त्यावर गुंडे म्हणाले,
"काळजी करू नका. अत्यंत विश्वासू माणूस आहे. जिवावर बेतले तरी विश्वासघात करणार नाही."
काही क्षणात डॉ. गुंडे आगलावे आणि त्यांच्या मुलीला घेऊन खाली दवाखान्यात पोहोचले. आवश्यक त्या तपासण्या करून काही वेळातच गर्भपाताची शस्त्रक्रिया केली आणि गणपतला बोलावून पुढील सारी व्यवस्था करण्याचे सांगितले तसा गणपत म्हणाला,
"डॉक्टर साहेब, हे काम सकाळी उजाडण्यापूर्वी केले तर? नाही. नाही. मला कंटाळा आला नाही पण हे साहेब आपल्या घरी असताना किंवा साहेब इथून बाहेर पडतात न पडतात तोच मी बाहेर पडलो तर कुणाला वेगळीच शंका यायची..." गणपत बोलत असताना डॉक्टरांनी आगलावेंकडे बघितले. त्यांनी 'मान गए।' अशा अर्थाने मान हलवली.
रात्री बऱ्याच उशिरा आगलावे कुटुंबासह घरी परतले आणि डॉ. गुंडे शयनगृहात पोहोचताच बायकोने विचारले, "केली का मोकळी?"
"काय करणार? दुपारपासून पिच्छाच सोडत नव्हते."
"काय पण आजकालची पोरं झाली आहेत ना? अजून शिक्षण चालू आहे पण ही पोरे भलतेच धडे गिरवत आहेत..."
"हो ना. मला तर खूप भीती वाटते."
"ती कशापायी? त्यांच्या तशा वागण्यापायी आपल्या घरात पैशाचा महापूर येतोय..."
"ते सोड ग. पण आज जी वेळ आगलावेंवर आलीय तीच वेळ आपल्यावरही येऊ शकते..."
"म्हणजे? काय म्हणायचे तुम्हाला?"
"ते तू ओळखलेस. मला आपल्या छायाची भीती वाटते ग. तिचेही वागणे दिवसेंदिवस भलतेच मोकळे होत चालले आहे..."
"चूप बसा. काही तरी बरळू नका. कुठे त्या आगलाव्याची पोरगी आणि कुठे आपली छाया. तिला आपल्या छायाच्या पायाच्या नखाची तरी सर येईल का? झोपमोडही झाली त्या पोरीमुळे आणि नको त्या विचारांची पाल डोक्यात शिरु देऊ नका. मला सकाळी लवकर उठवू नका. सकाळी तुम्हालाही कोणती शस्त्रक्रिया नसेल तर उठू नका..." असे बजावत सौ. गुंडे तत्क्षणी झोपेच्या अधीन झाल्या परंतु डॉ. अजय गुंडे यांचा डोळ्याला डोळा लागत नव्हता. सारखा एकच विचार त्यांच्या डोक्यात थैमान घालत होता. आगलावेंच्या मुलीची आणि छायाची मैत्री आहे. तिच्या नादी लागून छायाने तर काही वेडेवाकडे पाऊल उचलले नसेल ना? मागच्या काही महिन्यांपासून छायाचे वागणेही बदल्यासारखे वाटते आहे. मला जे समजतेय ते आई म्हणून छायाच्या आईला का कळू नये? मला जी शंका येतेय ती हिला का येऊ नये? अर्थात त्यासाठी हिचे घरात आणि छायाकडे लक्ष असायला हवे. जिथे माझी आणि माझ्या बायकोची दोन दोन दिवस भेट होत नाही तिथे छायाची आणि तिची कधी भेट होत असेल? गणपतची बायको रखमाच छायाचे सारे काही बघते. अनेक वर्षांपासून हे नवराबायको इथे मन लावून पडेल ते काम करतात. पण तरीही छायाकडे तिच्या आईचे लक्ष असायलाच हवे. ठीक आहे. अजूनही वेळ गेली नाही मी हिला खडसावून सांगतो. हिचे सारे बाहेरची कामे बंद करून फक्त छायाकडे लक्ष ठेवायला सांगतो...' असे मनालाच बजावत डॉ. गुंडे झोपेची आराधना करु लागले...
००००