सुधाची पहिली रात्र
दीपक हा श्रीमंत सावकाराचा एकुलता एक मुलगा होता. म्हणून त्याचे लग्न मोठ्या थाटामाटात साजरा करण्याचा त्यांनी ठरवलं होतं. त्यानुसार लग्नाची वरात काढण्यात आली. घोड्यावर दीपक बसलेला, त्याच्या समोर खूप मोठा बँड वाजत होता. त्याचे सर्व मित्रमंडळी खूप जोमात आणि बेहोश होऊन ( कारण ते सर्वच दारू प्यालेली होती ) नाचत होती. गावात यापूर्वी अशी कोणाची वरात निघाली नव्हती. लग्नाची वेळ संपून गेली तरी मित्रांचे नाचगणे काही थांबत नव्हते. सारीच मित्रमंडळी बेहोश झाली होती त्यामुळे त्यांना कशाचेही भान राहिले नव्हते. असे तसे करता करता चार पाच उशिराने दीपक आणि सुधाचा लग्नसोहळा संपन्न झाला. लग्नाचे जेवण म्हणून सावकारांनी लाडू, जिलेबी, शिरापुरी, गुलाबजामून अश्या गोड पदार्थासह वरणभात आणि मसालेदार भाजी देखील केली होती. न भूतो न भविष्यति असा विवाहसोहळा पार पडला. सुधाचे आई-वडील आणि त्याचे नातलग हा सोहळा पाहून धन्य झाले. किती श्रीमंतीचे घर मिळाले म्हणून प्रत्येकजण तिची प्रशंसा करीत होते. सुधा देखील खूप आनंदी होती. लग्नानंतरच्या सर्व पूजा, अर्चा, विधी संपन्न झाले.
लग्नानंतर सुधाची पहिली रात्र होती. आज तिच्या मनात वेगवेगळे विचार घुटमळत होते. मनातल्या मनात ती आनंदी होत होती. आजची पहिली रात्र कशी असेल ? याचा विचार करत ती आपल्या खोलीत बसली होती. दीपक सकाळी जेवण करून बाहेर पडला होता. सायंकाळ होत आली तरी त्याचा पत्ता नव्हता. रात्रीचे आठ वाजून गेले होते. सर्वांनी आपापले जेवण उरकून घेतले तरी दीपकचा पत्ता नव्हता. सुधा दाराकडे डोळे लावून बसली होती. दीपक आल्यानंतर जेवण करता येईल या विचारात ती तशीच बसून राहिली. वाट पाहत पाहत तिला डोळा कधी लागला हेच कळाले नाही. मध्यरात्री बारा वाजून गेल्यावर दारावर आवाज ऐकू आला म्हणून ती दचकून जागी झाली. दारात दीपक होता. लुडकत लुडकत चालत होता. त्याचा स्वतःचा तोल त्याला सांभाळता येत नव्हता. सुधा लगेच जागेवरून उठली आणि दीपकला आधार देत आपल्या खोलीत आणली. दीपक खूप प्याला होता. त्याला त्यावेळी कशाचेही भान नव्हते. जेवण करणार का ? सुधाने दीपकला विचारले पण तो काहीच बोलत नव्हता. नुसते काहीतरी इशारे करत होता. त्याला मुळी भानच नव्हते. आज पहिली रात्र आहे हे मात्र त्याला नक्की लक्षात होते म्हणून तो सुधाला आपल्याजवळ ओढू लागला. सुधा त्याच्या या क्रियेला विरोध करीत होती. मात्र नशेत धुंद असलेला दीपक तिच्यावर हावी झाला. आपली भूक शांत करून तो झोपी गेला. पहिल्या रात्रीविषयी सुधाने काय काय स्वप्न पाहिले होते ? काय काय विचार केले होते ? कोणते मनसुबे तिने रचले होते ? सारे काही मातीत मिसळले. एका मिनिटांत तिची पहिली रात्र संपली होती. ती तशीच जळून राहिलेल्या लाकडाचा जसा धूर निघतो तश्या अवस्थेत ती झोपी गेली.
कोंबडा आरवला. सकाळ झाली. घरातल्या लोकांना हे काही कळू नये या अविर्भावात सुधा सकाळी लवकर उठली. बाहेरची सर्व कामे करून डोक्यावरून अंघोळ केली. देवपूजा करतांना तेंव्हा दीपकला जाग आली ते ही आरतीच्या घंटीच्या आवाजाने. रात्री दारू जरा जास्त झाली होती. लग्नाची पार्टी दिली होती मित्रांना. लग्नात मित्रमंडळी खूप नाचले होते म्हणून आभार प्रदर्शनासाठी पार्टीचे आयोजन केले होते. रात्री एक एक मित्र जोडल्या जात होते त्यामुळे सर्व मित्रांची विनंती पूर्ण करता करता त्याला जरा जास्तच झाले होते. पार्टी संपायला रात्रीचे बारा वाजले. दीपकची पहिली रात्र होती म्हणून बाराच्या अगोदर तो तिथून सुटला अन्यथा ही मंडळी रात्रभर पीत बसले तरी कोणी यांची वाट पाहत नाहीत. अशी मित्रमंडळी जमा झाली होती. सुधाला पहिल्या रात्री जो अनुभव आला ते प्रत्येक रात्री येऊ लागला. तिची प्रत्येक रात्र पहिली रात्र ठरू लागली. दीपक बेहोश बेधुंद अवस्थेत घरी यायचा. तिच्यावर जोर जबरदस्ती करायचा. तिने कधी नकार दिला तर एक-दोनदा मार देखील दिला होता. दीपकचे वागणे तिला सहन होत नव्हते. घरात खुप श्रीमंती आहे पण मनाला समाधान नसेल तर ही श्रीमंती काय कामाची ? सासू-सासरे यांना दीपक विषयी काही बोलले तर ते काहीच ऐकून घेत नव्हते. लाडात वाढलेलं लेकरू आहे, तूच त्याच्यात काही सुधारणा करशील म्हणून तुझ्यासोबत लग्न लावून दिलंय असे ते अधूनमधून बोलत. मी बळीचा बकरा बनले की काय असे कधी कधी सुधाला वाटायचे. लग्न होऊन सहा महिन्यांचा काळ उलटला असेल सुधाला दिवस गेल्याची बातमी सासरच्या आणि माहेरच्या लोकांना कळाले. सर्वाना खूप आनंद झाला. सासूने तर फर्मान सोडले सुनबाई, मुलगाच जन्मायला हवा. सासरे देखील तसेच बोलू लागले. सुधा मात्र विचार करू लागली मुलगा होणे किंवा मुलगी होणे हे आपल्या हातात थोडेच आहे ? ते तर ईश्वराच्या हातात आहे. ती याच विचारात गाढ झोपी गेली.
क्रमशः
- नासा येवतीकर