काशी - 4 Shobhana N. Karanth द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

काशी - 4

प्रकरण ४

 सर नानांशी गप्पा मारून आजीलाही भेटून आपल्या रूमवर आले. मन फ्रेश करण्यासाठी सरांनी वाचायला पेपर हातात घेतला. सर पेपर चाळत होते परंतु मन दुसऱ्याच विचाराकडे धावत होते. ज्या काशीसाठी मी स्वतःला अविवाहित ठेवले. तिला सुख मिळावे म्हणून तिचा जागो जागी शोध घेत राहिलो. तिच्या नावाने  असा काशी आश्रम स्थापन केला कि त्यामध्ये काशी आणि ज्ञानू सारखे निराश्रित मुलं व वृद्ध यांना आसरा मिळू शकेल. आज कित्येक गरिबीच्या कारणाने लहान मुलं शिक्षण सोडून पैसे कमाईच्या पाठी आहेत. जे वय शाळा शिकून आपले भवितव्य बनवायचे आहे त्या वयात दारूच्या गुत्यावर दारू बनविण्याचे काम करत आहेत. कोणी समुद्र किनारी मासळी वेगळी करून ती सोलायचे काम करत आहेत. कोणी ढाब्यावर नोकराचे काम करत आहेत. तर कोणी हमाल बनून आपल्या शरीरापेक्षा जड ओझी उचलण्यास मजबूर आहेत. ही बालमजुरी म्हणजे कोवळ्या वयाची पिळवणूक आहे. त्यातून गरिबीने गांजलेल्या मुलींना कामाचे आमिष दाखवून त्यांना मुबईला आणून त्यांची विक्री केली जात आहे. हीच मुले म्हणजे देशाचे उद्याचे नागरिक---तेच जर या गुंडगिरीच्या बेड्यात अडकून त्यांचे जीवन उध्वस्त झाले तर या देशाचे काय होणार--- " या विचाराने सर अस्वस्थ होत होते.

  रात्रभर व्यवस्थित झोप न लागल्याने सरांना सकाळी उठायला थोडासा उशीरच झाला होता. घड्याळात पाहीले तर पहाटेचे सहा वाजले होते. त्यांनी फ्रेश होऊन लगेच मॉर्निंग वोक साठी आश्रमाच्या वाटेकडे पाय वळविले.

 तेवढ्यात गाडीचा ड्राइव्हर राजू समोर आला. " सर, आज गाडी काढायची आहे कां---" राजू म्हणाला.

 " आज आजीची तब्येत ठीक असेल तर आपण दुपारी जेऊन निघूया. मी तुला कळवतोच---" असे म्हणून सर वोकिंगला निघून गेले. चालता चालता सर एका शेवंतीच्या झाडाजवळ थांबले. झाड अगदी शेवंतीच्या फुलांनी बहरलेले होते. ती फुले बघून त्यांना काशीची आठवण झाली. काशीला फुलांची खूप आवड होती. सरांनी लगेच खाली पडलेली शेवंतीची फुले वेचून आपल्या ओंजळीत ठेवली आणि त्याचा दीर्घ वास घेऊ लागले. तेव्हा त्यांना  एक लहानपणीचा प्रसंग आठवला. एक दिवस शेवंतीच्या फुलाच्या गजऱ्यासाठी काशीने आपल्या मायकडे हट्ट धरला. परंतु माय कुठून गजरा देणार---? तेव्हा रडत रडत काशी माझ्या माय जवळ आली आणि म्हणाली " माय मला गजरा हवा आहे. माझी माय देत नाही---" तेव्हा लगेच माझ्या मायने कनवटीला लावलेले पाच रुपये काढून माझ्याकडे दिले आणि म्हणाली " ज्ञानू बाजारात जा आणि काशीसाठी एक गजरा घेऊन ये---"मी पाच रुपये घेतले आणि त्या पैशाच्या लिंबू गोळ्या घेऊन खाऊन टाकल्या. आता मला मायचा मार मिळेल म्हणून मी घरी न जाता सरळ गोट्या खेळायला गेलो. तोपर्यंत काशी रडून रडून झोपून गेली होती---" या गोड आठवणीने सरांच्या गालावर एक मधुर हास्य फुलले.

  तेवढ्यात आश्रमाच्या नर्सने सरांना आवाज दिला " सर, आज वोकिंगला उशिरा---? आणि ही फ़ुलं कोणासाठी घेऊन चाललात---? आजपर्यंत अशी फुले घेऊन जाताना तुम्हाला कधी बघितले नाही---"  असे म्हणून नर्स हसत हसत गुडमॉर्निंग बोलून निघून गेली. 

 सर ओजळीतली फुले एका चौथऱ्यावर ठेवून वॊकिंग करत होते. परंतु त्यांचे मन काशी विषयी बरेच काही जाणून घेण्यासाठी उतावीळ होते. खरोखरच ही माझी काशी आहे कां---? तिला मी माझी ओळख देऊ कां---? ओळख दिली तर ती आनंदित होऊन तिची तब्येत बरी होईल कि ज्ञानूमध्ये अडकलेला प्राण सोडून माझ्यापासून दूर निघून जाईल---? आजपर्यंत मी ज्या काशीची प्रतीक्षा करत होतो ती काशी आज माझ्याजवळ आली आहे. तिला मी अशी जाऊ देणार नाही. तिला मी चांगली ट्रीटमेंट देईन, तिची सेवा करीन. ती माझ्यासाठी मंजुळा नाही तर ती माझी बालपणाची मैत्रीण काशी आहे. आजच्या सत्तरीच्या वयात ती माझी अर्धांगिनी म्हणून माझी सोबतीण आहे.अशी मी तिला जाऊ देणार नाही---मी माझ्या प्रेमाच्या ओलाव्यात या कुस्करून गेलेल्या काशीला पुन्हा फुलवून जीवन दान देईन---" 

 " सर---सर, तुमचा नाश्ताचा टाइम झाला आहे---" राजुचा आवाज ऐकून सर भानावर आले आणि दचकून म्हणाले " हो---हो मी येतोच, तू हो पुढे---"

   सर शेवंतीची फुले घेऊन वृद्धांच्या विभागाकडे गेले. आजीच्या बेडजवळ आले तर आजी शांत झोपलेली होती. हे बघून नर्सला हाक  मारून विचारले " आजीने चहा घेतला कां---"

 " हो---हो, नाश्ता करून चहा सुद्धा झाला. त्यांच्या गोळ्या घ्यायच्या बाकी आहेत. लगेच सरांनी आपल्या ओंजळीतली शेवंतीची फुले आजीच्या टेबलवर ठेवली. शेवंतीच्या वासाने आजी लगेच जागी होऊन इकडे तिकडे बघू लागली. तिची नजर फुलांवर पडताच गालातल्या गालात हसत सरांकडे बघू लागली.

 " आजी तू हसलीस कां---? 

 " आर, ही फ़ुलं काशीची तसेच मंजुळाची आठवण करून देतात.जेव्हा काशी होते तेव्हा ही फुले माळायला मिळत नव्हती आणि मंजुळा म्हणून होते तेव्हा ही फुले माळल्याशिवाय एकही दिवस जात नव्हता---तुला कसं माहित ही फ़ुलं मला आवडतात---? " 

 " आजी, फ़ुलं बघितली कि प्रसन्न वाटते. म्हणून तुझ्यासाठी मुद्दाम आणली आहेत---" असे म्हणून सर आजीच्या बाजूला बसून पाठीवरून हात फिरवू लागले. " आरं एवढी माया नगं लाउस---माया ही लय वाईट असते. माया ही दुष्ट हाय. आता माझंच बघ ना---ज्ञानूवर मी किती प्रेम करते---त्याच्यासाठी हा वेडा जीव अडकून पडला हाय---चालायला येत नाय कि बसता येत नाय, हा खोकलाही लय हैराण करतो तरी बी हा जीव जात नाय---"

 " नाही असं बोलायचं नाही---आपली इच्छा शक्ती मजबूत असेल तर सर्व काही मनासारखं होते---हिम्मत सोडायची नाही. तुझी इच्छा आहे न तर जरूर एक दिवस ज्ञानू तुला बघायला येईल--- " सर आजीला समजून सांगत होते.

 तेवढ्यात नर्सने येऊन आजीला गोळ्या दिल्या. " आजी आता तुम्ही लवकरच बऱ्या होणार आणि तुमच्या ज्ञानूलाही लवकरच भेटणार---" असे म्हणून आजीचे समाधान करून नर्स निघून गेली.

 " चल, आता मी सुद्धा निघतो.दुपारी जेऊन गाडी घेऊन बाहेर जायचे आहे. तुझ्या सारखे असे कित्येक आजी-आजोबा रस्त्यावर निराधार बसलेले आढळतात. तर कुठे बालमजदुर  तर कुठे अनाथ मुलं भीक मागताना नजरेस पडतात. त्यांना मी आपल्या आश्रम मध्ये घेऊन येतो आणि त्यांची पर्वरीश करून त्यांना शिक्षण देऊन स्वावलंबी बनवतो---" सर म्हणाले. 

    " लई भारी काम करतोस रं---देव तुला सुखी ठेवो---" आजी धाप लागत बोलत होती. " मी निघतो, तब्येतीची काळजी घे---नीट औषध घे आणि लवकर बरी हो---" असे म्हणून सर आपल्या रूमवर निघून गेले.