प्रकरण ६
दुसऱ्या दिवशी सर आणि राम व मनोज चंदू व लक्ष्मीला आणायला निघाले. चंदू व लक्ष्मी तयार होऊन नाक्यावर उभे राहून सरांची वाटच बघत उभे होते. त्यांच्या बरोबर त्यांचे बाजूला राहणारे वयस्कर चाचा सुद्धा उभे होते.
राजुने गाडी साईडला घेतली. सर गाडीबाहेर उतरताच त्यांच्या चाचाने सरांचे पाय धरले.
" अरेरे---हे काय करता---? "
" तुमचे लई उपकार हायेत साब---या मुलांचे माय-बाप देवाघरी गेले---मी तर त्यांच्या बाजूला राहतो.या मुलांना बघून लई जीव कासावीस व्हतो---मी किती दिवस या मुलांना बघणार---?मी आज आहे तर उद्या नाही. एकदा मी माझ्या डोळ्याने बघीन कि हि लेकरं सुरक्षित हायेत तवा माझे डोळे शांतीने मिटेल---"
" तुम्ही काही काळजी करू नका---ही तुमची लेकरं चांगली शिकून मोठी नामांकित होतील. तुम्ही आमच्या बरोबर अवश्य या आणि खात्री करून घ्या---" सर म्हणाले आणि मुलांना गाडीत बसवले.
दुसऱ्या दिवशी सरांनी आपला सर्व आश्रम दाखवला. आश्रमात पन्नास एक मुले होती. पन्नास एक वृद्ध होते. आश्रम समोर एक मोठा भव्य बगीचा होता. बगिच्यात मुलांसाठी झोपाळे होते, घसरगुंडी, व्यायाम करण्यासाठी उपयुक्त साधने होती, वृद्धांना बसण्यासाठी सिमेंटचे बेंच होते. फिरण्यासाठी फाऊंटन समोर गोल रस्ता होता. बगिच्याच्या बाजूला मोठी फळांची वाडी होती. वाडीत काही कामगार काम करत होते. वाडीत एक मोठी विहीर होती. सभोवती आंबा, नारळ, चिकू, पेरू, जांभूळ अशी झाडे होती. या फळाच्या उत्पन्नावर आश्रमचा बराचसा खर्च निघत होता. वृद्धांसाठी व्हीलचेअर उभ्या होत्या. शिवाय मुलांसाठी व वृद्धांसाठी एक छोटंसं वाचनालय होते. मुलांसाठी शाळा होती---हे सर्व बघून चाचा खुश झाले होते.
" सर, तुम्ही लय भारी काम करत हायसा---या आश्रमाचे नाव काय हाय---?"
" काशी आश्रम---" सर म्हणाले.
"ही काशी कोन हाय व्हय---" ?
चाचाने असा प्रश्न विचारताच राजू, मनोज, राम सरांकडे उत्सुकतेने बघू लागले. जे कोडं आजपर्यंत कोणाला उलगडलं नाही ते कोड्याचे उत्तर आपल्याला ऐकायला मिळणार या आशेने सर्वांनी अधीरतेने सरांकडे बघितले.
" सरांनी विषय थांबवून सगळ्यांना जेवायला चला म्हणून काकांना जेवायला घेऊन गेले.
जेवण करून चाचा आपल्या लेकरांना बोलावून त्यांना कुरवाळून सरांना म्हणाले " आता या लेकरांचे तुम्हीच माय-बाप---या लेकरांची काळजी घ्या---मी अधून मधून लेकरांना बघायला येईनच---असे म्हणून चाचाने सर्वांचा निरोप घेतला.
" सर, आता तुम्ही आराम करा---खूप थकले असाल---" मनोज म्हणाला.
" रुमवर जाण्याआधी मी आजीला आणि सर्व वृद्धांना बघून येतो---" असे म्हणून सर निघून गेले.
" ठीक आहे, तुम्ही जाऊन या, आम्ही या चंदू व लक्ष्मीला मुलांच्या विभागात सोडून येतो---" राम म्हणाला.
सर्व वृद्धांची चौकशी करून सर आजीकडे आले. आजी जेवून बसलेली होती. तेवढ्यात नर्स आली आणि म्हणाली " सर, आजी आता ठीक आहेत---परंतु दिवसभर तुमची आठवण काढत होती. सर कुठे गेले, सर कुठे गेले---? " म्हणून सारखी सारखी विचारात होती.
" आरं, लई एकटं एकटं वाटतं---जुन्या आठवणी गुमान बसू देत नाही, कोणाशी बोललं कि मन हलकं होतं---"
" अगं, तुझ्या आजूबाजूला तुझ्यासारखेच वृद्ध आहेत. त्याच्याशी बोलायचे नं--- ते सगळे बाहेर फिरायला जातात. बाहेर बसतात. गप्पा मारतात. मला चालायला येत नाही, कि बसायला सुद्धा होतं नाही---" आजी म्हणाली.
" बरं, चल मी थोड्यावेळ तुझ्याजवळ बसतो. मग तर तुझं मन हलकं होईल नं---? "
आरं, तू आम्हा सगळ्यांची एवढी सेवा करतोस. पण तुझी बायका-मुलं कुठं दिसत न्हाय ती---? कुठं हाय तुझी कारभारीण---? "
" आजी, मी लग्नच नाही केलं---"
" आरं, येडा हायेस कां तू---? लग्न करून संसार थाटायचा---तर असं काय तुझं वंगाळ जीवन---म्हातारपणी कोणी सोबतीला हवं कि न्हाय---? माझे हाल बघ---माझं आता कोणी हाय कां---? रस्त्यावर पडलेली होती आणि आता तू म्हणून मला आश्रमात आणून ठेवलीस---माझी सुद्धा इच्छा व्हती कि ज्ञानूशी लग्न करावं, संसार थाटावा---आपल्या मुलांना शिकवावं---परंतु ज्ञानूची आणि माझी ताटातूट झाल्यावर माझं काय झालं---? काशीची मी मंजुळा झाली---कोठीवर काशी विकली गेली. माझ्या ज्ञानूचे काय झाले असेल हे त्या देवालाच ठाव---त्याला तरी माझी आठवण येत असेल कां---" असे म्हणून आजी डोळे पुसू लागली.
" आजी, मी ज्ञानूला तुझ्या समोर आणले तर तू काय करशील---? "
" तर मी त्याच्या हाताने कपाळाला सिंदूर लावून घेऊन हे मंगळसूत्र बांधून घेईन---" असे म्हणून आजीने कनवटीला अडकवलेला ताईत काढून दाखवला. हे माझे मंगळसुत्र आहे. हे बांधूनच मी माझे डोळे बंद करीन---"
" किती गं तू आपल्या ज्ञानूवर प्रेम करतेस---? " असे म्हणून सरांनी आजीचा हात हातात घेतला आणि गळ्याशी आलेला हुंदका दाबून ठेवला. विषय बदलण्यासाठी ते आजीच्या बेडवरुन उठून उभे राहिले आणि म्हणाले, चल, आता मी जेवायला जातो---"