वृद्धाश्रमातलं प्रेम - 5 Shubham Patil द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

वृद्धाश्रमातलं प्रेम - 5

भाग – ५

“आपण दोघं मिळून शोधूयात का?” तिने मला असं विचारलं तेव्हा मी जास्तच घाबरलो. तिथं आमच्या गावाचा एक मुलगा शेवटच्या वर्षाला होता. त्याने जर पाहिल्याच दिवशी मला मुलीसोबत पाहिलं असतं तर मला घरात काय गावातसुद्धा घेतलं नसतं. मी त्या आपत्तीचं चिंतन करत होतो आणि पहिलाच दिवस असल्याने उशिरा जाणंसुद्धा योग्य नव्हतं. मी द्विधा मनःस्थितीत होतो. मला असं बघून तीच म्हणाली, चला, लवकर वर्ग शोधूयात नाहीतर पाहिल्याच दिवशी बॅड इंप्रेशन पडेल.

मी तिच्या मागोमाग जाऊ लागलो. ती बिनधास्तपणे रस्त्यात दिसणार्‍या कुणालाही वर्ग विचारू लागली. मागे वळून मला म्हणाली, “चला लवकर. कुठे हरवलात?”

आम्ही आता सोबतच चालू लागलो. मला ते कासंतरीच वाटत होतं. एका वर्गासामोर ती मला घेऊन आली आणि म्हणाली, “हाच आपला वर्ग.”

आमचं नशीब चांगलं म्हणून लेक्चर सुरू झालं नव्हतं. मी मुलांमध्ये जागा मिळेल त्या बाकावर जाऊन बसलो आणि तीसुद्धा मुलींमध्ये बसली कुठंतरी. इतक्यात सर आले आणि लेक्चर सुरू झालं. शेवटी हजेरी घेताना आम्हाला एकमेकांचं नाव समजलं, तीच नाव होतं सुधा साठे आणि विशेष म्हणजे माझी हजेरी झाल्यावर मी सहज मागे वळून पहिलं तर ती आधीपासूनच माझ्याकडे पाहत होती आणि स्मितहास्य वगैरे करत होती. मी चोरून इकडेतिकडे बघितलं. आम्हाला कुणीही बघत नव्हतं.

एवढं बोलून महाजन काका थांबले. पुढे ऐकण्याची उत्सुकता सर्वांच्या चेहर्‍यावर ओसंडून वाहत होती.

“मग पुढे काय झालं महाजन? आज वेळ मिळालाय तर सांगून टाक सगळं. तुझा भार हलका होईल आणि आमची करमणूक होईल. काय बर्वे बरोबर ना.” जोशी हसतच म्हणाले.

“अगदी बरोबर.” बर्वेंनी जोशींना दुजोरा दिला.

“अशी मजा नका घेऊ त्याची. तो सांगणार नाही पुढचं.” अण्णा म्हणाले.

या वाक्यावर सर्वजण मनसोक्त हसू लागले. महाजन आधी लटक्या रागाने त्यांच्याकडे पाहू लागले. पण जसजसा हसण्याच्या आवाज वाढू लागला तसा त्यांचा खोटा राग स्मितहास्यात बदलला. कितीतरी दिवसांनी ते असे हसत होते. महाजन काकांचा चेहरा आता खुलला होतं. काल दिसणारी काळजीची करडी छटा जाऊन त्या जागी प्रसन्नता येणार होती. त्यांनी पुढे सांगायला सुरुवात केली,

त्या दिवशी कॉलेज संपल्यावर खरं तर मला सुधाला धन्यवाद द्यायचे होते. पण कॉलेज संपल्यावर ती कुठे गायब झाली काय माहीत? माझं मन थोडं खट्टू झालं. दुसर्‍या दिवशी मी कालसारखा लवकर आलो आणि सुधाने दाखवलेल्या वर्गात जाऊन बसलो. अजून कुणीच आलं नव्हतं. मी खिडकीतून बाहेरची गंमत बघू लागलो. बाहेर रस्त्यावर वाहनांची मुंग्यांसारखी रांग लागली होती. इतक्यात एक मंद सुगंध येऊ लागला. पण मी इतक्या गाड्या पहिल्यांदाच बघत असल्याने त्या सुगंधाकडे दुर्लक्ष केलं. हळूहळू तो सुगंध आता तीव्र प्रमाणात येऊ लागला होता. त्यामुळे मी जरा मान फिरवली आणि बघतो तर काय सुधा साठे कालच्याच वेशात येऊन माझ्याजवळ उभी राहिली होती. ती काल जशी दिसत होती तशीच आजही दिसत होती. यत्किंचितही फरक पडला नव्हता. तिला असं अचानक इतक्या जवळ बघून माझी भांबेरी उडाली. मला गोंधळलेला बघून ती थोडी हसली आणि म्हणाली, “आज का लवकर आलात अरुण महाजन? आज तर वर्ग माहिती होता ना?”

“तुम्हाला धन्यवाद द्यायचे होते. त्यासाठीच.” माझ्या तोंडातून अचानक असे शब्द बाहेर पडले.

“मला धन्यवाद, ते बरं कशासाठी?” तिने विचारलं.

“काल तुम्ही मला खूप मदत केली. नाहीतर मला वर्ग सापडलाच नसता. अर्ध्या तासापासून शोधत होतो हो मी.” मला बोलताना आता आत्मविश्वास जाणवत होता.

“त्यात काय एवढं. मला कुठं माहिती होता वर्ग?” ती सहजपणे बोलून गेली.

पुण्यात हळूहळू मन रमत होते. नाही म्हटलं तरी अधूनमधून गावाची थोडी आठवण येत होती. पण शहरतल्या झगमगाटाकडे बघितलं की ती तात्पुरती नाहीशी व्हायची.

त्या दिवशी रविवार होता. कॉलेजमधली पहिलीच सुट्टी. मला काही पुस्तकं घ्यायची होती. मी सायकलवर अप्पा बळवंत चौकात शोधकार्य सुरू केलं. नवीन पुस्तकांच्या किमती दिवसा तारे दाखवत होत्या. जुनी पुस्तकं त्यामनाने स्वस्त होती, पण नंतर तिसुद्धा कुणी घेतली नसती. काय करावं हे सुचत नव्हतं. रस्त्याच्या एका बाजूला उभं राहून मी गाड्यांची गर्दी बघत होतो. तितक्यात मला सायकलवर एक मुलगी जाताना दिसली. अंगाढंगावरुन ती सुधाच असावी असं मला वाटलं. पण सुधा असली तरी काय होणार होतं? तिला पुस्तकांचं विचारवं असं मला वाटलं पण असं भर रस्त्यात हाक कशी मारणार? मुलगा असता तर गोष्ट वेगळी होती. शिवाय इतक्या मोठयाने मुलीला आरोळी मारली असती तर रस्त्यावरची सगळी जनता अचंबित होऊन माझ्याकडे बघत राहिली असती. इतकं सगळं होऊनसुद्धा ती सुधा नसती तर किती पोपट झाला असता माझा. त्यामुळे तो विचार मी सोडून दिला. दगडूशेठ गणपतीजवळ सायकल लावली होती. ती घेतली आणि निघालो.

दगडूशेठला वळसा घालून निघालो, तिथं पोलिस स्टेशन होतं. मी सरळ केसरी वाड्याकडे जाणार्‍या रस्त्याला लागलो तर पुढच्या चौकात सुधा दिसली. तिच्या हातात जेवणाचा डबा होता. ह्या सुधाने आज साडी घातली होती. आज डोक्यात फूल नव्हते. म्हणजे मघाशी बघितलेली मुलगी सुधा नव्हती याची खात्री झाली. माझा पोपट होऊ न दिल्याबद्दल मी देवाचे मनोमन आभार मानले. मी नेहमीप्रमाणे मला शांत बघून तीनेच सुरुवात केली, “आज इकडे कुणीकडे?”

“पुस्तकं घ्यायला आलो होतो.” मी अडखळत बोललो

“पण ती तर काही दिसत नाहीत तुमच्याजवळ.” तिने माझी रिकामी पिशवी पाहून विचारले.

“मी घेणार होतो, पण भरपूर महाग आहेत. त्यामुळे काय करावं ते नेमकं सुचत नाही.” मी सरळ सांगून टाकलं.

“तुम्ही कुठल्या संस्थानाचे राजकुमार आहात?” तिचं असं वाक्य ऐकुन मी पार उडालोच. मी नेहमीपेक्षा जास्त गोंधळलेला बघून ती हसायला लागली आणि म्हणाली, “म्हणजे मला असं म्हणायचं होतं की कॉलेजमध्ये लायब्ररी असताना तुम्ही पुस्तकं विकत का घेताय? लायब्ररी आपल्यासाठीच आहे. आपण तिचा पुर्णपणे लाभ घ्यायला हवा. नवीन पुस्तकं घ्यायला गेलो तर कर्ज काढावं लागेल.”

“माफ करा. मला खरंच माहिती नव्हतं. मला उद्या सांगाल का प्लीज?” मी विनवणीच्या सुरात म्हणालो.

“हो सांगेल ना, नक्की सांगेल. आता मला निघायला हवं. बाबांना डबा द्यायचा आहे.” असं म्हणून ती निघालीसुद्धा. मी तिच्या पाठमोर्‍या आकृतीकडे बघतच राहिलो. त्या दिवशी मला दोन गोष्टींचं खूप वाईट वाटलं, एक म्हणजे आपल्याला काहीच माहिती नाही आणि दुसरं म्हणजे सुधा मला किती बावळट आणि मूर्ख समजत असेल. पण एका गोष्टीने मला खूप वेळ विचार करायला लावला, ती मला मजेत का असेना राजकुमार म्हणाली होती. मी आरशात पहिले आणि जोरजोरात हसू लागलो. दिवसभर सुधाविषयीच्या विचाराने रविवार कसा गेला ते कळलंच नाही.

सोमवारी कॉलेजला गेलो. सुधाची वाट बघितली. ती काही आली नव्हती. माझं पुस्तकं घेण्याचं काम एक दिवस लांबलं. दुसर्‍या दिवशी ती आली होती. जेवणाच्या सुटीत मी कॅन्टिन मध्ये बसलो होतो. कुणाशी अशी विशेष ओळख झाली नव्हती. त्यामुळे एकटाच होतो. मी विचारांच्या तंद्रीत असताना सुधा माझ्याजवळ आली आणि थेट माझ्या समोरच बसत म्हणली, “काय झालं का जेवण?”

“अं, हो झालं ना. तुमचं?” सुधा आल्यावर जसा गोंधळायचो तसाच गोंधळत बोललो.

“हो, झालं ना. काल मला थोडं बरं वाटत नव्हतं. त्यामुळे मी काल येऊ शकली नाही. माफ करा, माझ्यामुळे तुमचा कालचा अभ्यास बुडला असेल.” सुधाने काल न येण्याचं कारण देत खेद वगैरे व्यक्त केला.

“छे, मी अजून सुरुवात नाही केली अभ्यासाला. आतातर कुठे मन रामयला लागलं पुण्यात.” मी खरं ते सांगितलं.

†††