वृद्धाश्रमातलं प्रेम - 10 - अंतिम भाग Shubham Patil द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

वृद्धाश्रमातलं प्रेम - 10 - अंतिम भाग

भाग – १०

महाजन काका आणि सुधाकाकू आता खुलले होते. त्यांनी मस्त आणि आनंदी आयुष्य जगायला सुरुवात केली होती. सुधाकाकू केसांत रोज एक फूल मळायच्या आणि महाजन काका त्यांची स्तुती करायचे. त्या दोघांना असं आनंदात बघून बर्वेकाका, जोशी आदि मंडळींच्या चेहर्‍यावर समाधानाची एक झलक दिसू लागली होती. आयुष्याच्या उतारवयात का होईना त्यांच्या मित्राला त्यांचं प्रेम मिळालं होतं. महाजन काका आता खुलले होते. त्यांच्या वागण्याबोलण्यात एक वेगळाच उत्साह जाणवत होता. सुधाकाकूंचं काही वेगळं नव्हतं. त्यासुद्धा झालं-गेलं ते विसरून छान जगत होत्या. रोज सकाळी नाश्त्याच्या वेळी, जेवताना, सायंकाळी प्रार्थनेच्या वेळी, किचनमध्ये मदतीला या ठिकाणी दोघं भेटत असत. त्यांच्यात नेहमी सकारात्मक संवाद व्हायचे. झालेल्या जुन्या गोष्टी विसरायच्या असं त्यांच्यात ठरलं होतं. त्यांचं असं वागणं बघून जोशी, बर्वे यांच्या पत्नी हसून टोमणे मारत महाजन-कदमांचं उदाहरण द्यायच्या. सायंकाळी प्रार्थनेनंतर महाजन काका मित्रांसोबत गप्पा मारायला क्वचितच जात. ते थेट किचनमध्ये मदतीला जात. तिथे सुधा काकूंसोबत गप्पा करताना मदत करत. मग काही वेळाने जोशी वगैरे मंडळी यायची. महाजन काकांना बघून उगाचच मजा घ्यायचे. म्हणायचे, “महाजन, पाय मोकळे करायला नाही आलात राव तुम्ही. आम्ही केव्हापासून वाट बघतोय तुमची. हा बर्वे तुम्हाला खोलीतसुद्धा शोधून आला, तिथेही नव्हतात. मग इथे आलो. म्हणजे तुम्हाला खूप भूक लागली म्हणून लवकर आलात की अजून काही?”

हे असं बोलणं ऐकून महाजन गालातल्या गालात हसायचे आणि म्हणायचे, “तुम्हाला सोयिस्कर वाटेल ते कारण निवडा. माझी काही हरकत नाही.” अशा पद्धतीने मजेत दिवस चालले होते. महाजन काका आणि सुधा काकूंना आयुष्यात जेवढा आनंद मिळाला नव्हता तेवढा आता मिळत होता. मागे रेग्युलर चेक-अप साठी निवर्‍यात डॉक्टर आले होते. महिनाभराने सर्वांची तपासणी करण्यासाठी स्वेच्छेने डॉक्टर येत असत. या महिन्याच्या तपासणीत महाजन काकांची शुगर खूप जास्त कंट्रोलमध्ये अढळली. डॉक्टर आश्चर्यचकित झाले. त्यांनी कारण विचारलं तेव्हा त्यांना कसं सांगावं या गोड प्रश्नात महाजनकाका पडले. तेव्हा मॅनेजरने समजावून सांगितलं. डॉक्टरांनी अभिनंदन केलं तेव्हा मात्र महाजन काका गालात हसत होते. हे असे दिवस जगत असताना कुठले रोग आणि काय?

कोजागिरी पौर्णिमेनिमित्त रात्री कार्यक्रम होता. रात्री साडेबारा पर्यन्त गोड दूध चंद्र प्रकाशात ठेऊन मग प्राशन करायचे होते. तोपर्यंत जागरण व्हावं म्हणून पिठोरी चंद्र किरणांत सर्वजण शेकोटी भोवती बसले होते. मनोरंजन म्हणून गाण्यांच्या भेंड्या खेळण्याचा आग्रहाने उचल खाल्ली होती. सर्वांच्या मागणीला मॅनेजरने आढेवेढे न घेता होकार दिला आणि गाण्यांच्या भेंड्या सुरू झाल्या. महिला आणि पुरुष असे दोन गट पाडले होते. दोन्ही गट एकमेकांवर प्रत्युत्तरादाखल सुरेल गाण्यांची मुक्तकंठाने उधळण करत होते. दुग्धपान करायला थोडाच वेळ बाकी होता आणि दोघं गटांच्या सारख्याच भेंड्या होत्या. तेव्हा महिला आणि पुरुष यांच्यातून एकाने एक गाणं म्हणायचं, त्यात ज्याचं गाणं चांगलं असेल तो गट जिंकेल असं एकमताने ठरलं. फक्त आपलं मत हे खरं असावं असं आग्रह होता. म्हणजे तशी भावनिक साद घालून मॅनेजरने मंडळींकडून वदवून घेतलं होतं. पुरुष वर्गातून महाजन काका गाणं म्हणणार होते, त्यांनी सुरुवात केली,

शब्दावाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले.....

प्रथम तुला पाहियले आणिक घडू नये ते घडले.....

इतकं म्हणताच टाळ्यांचा कडकडाट सुरू झाला. महाजनांचा गळा गोड होता. टाळ्यांचा आवाज संपल्यावर पुढचं कडवं म्हणायला सुरुवात करणार तोच महिलांमधून त्याच तोडीचा सुरेल आवाज कानावर आला. सर्वांनी चमकून तिकडे पहिलं. सुधाकाकू गात होत्या,

अर्थ नवा गीतास मिळाला.....

छंद अवा अन ताल निराळा.....

त्या दिवशी का प्रथमच माझे सुर सांग अवघडले?.....

या कडव्यावर आधीपेक्षा जास्त टाळ्यांचा आवाज झाला. महाजन काका आणि सुधाकाकू एकमेकांकडे बघत स्मितहास्य करत होते. त्या दोघांनी सोबतच शेवटचं कडवं म्हणत जुगलबंदीची सांगता केली. एकाच वेळी सारखे शब्द दोन गळ्यांतून बाहेर पडू लागले,

आठवते पुनवेच्या रात्री.....

लक्ष दीप विरघळले गात्री.....

मिठीत तुझीया या विश्वाचे रहस्य मज उलगडले....

प्रचंड टाळ्यांच्या कडकडाटात सर्वांनी दोघांचे तोंडभरून कौतुक केले.

दिवाळी तोंडावर आली होती. नेहमीप्रमाणे या वर्षीसुद्धा दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी होणार होती. या वृद्धाश्रमाचं एक वैशिष्ट्य होतं, सर्व सण वगैरे अगदी उत्साहात आणि आनंदात साजरे होत. या निमित्ताने सर्वांच्या चेहर्‍यावर थोडाफार आनंद दिसायचा. गोड-धोड जेवण बनवताना सर्वांचा भलमोठा अनुभव कामात यायचा. ते पदार्थ तयार करताना सर्वांचा हातभार लागायचा. त्यामुळे बनणारे पदार्थ हे चवसंपन्न असायचे. त्यांच्यात अनुभवांचा गोडवा आणि मायेचा कुरकुरीतपणा असायचा. त्या दिवशी सायंकाळी प्रार्थनेला मॅनेजर उपस्थित होते. त्यांनी दिवाळी विषयी औपचारिक घोषणा केली. ते म्हणाले, “नमस्कार, दरवर्षप्रमाणे यावर्षी देखील आपल्याला नेहमीसारखी धडाक्यात दिवाळी साजरी करायची आहे. तत्पूर्वी, फराळ करायला लवकरच सुरुवात करावी लागेल. सर्व पदार्थ एकदम चविष्ट झाले पाहिजेत. चकल्या तळताना येणारा खमंग वास दूरवर पसरला पाहिजे. आपण उद्यापासूनच सुरुवात करूया. रोज शक्य होईल तेवढं करुयात.”

दिवाळीची जय्यत तयारी सुरू झाली. लाडू वळायला हात अपुरे पडू लागले. विविध खाद्यपदार्थांच्या वासाने परिसर भरून गेला. मॅनेजर दुरूनच गंमत बघून ऑफिसमध्ये बसायचा. त्यांच्या चेहर्‍यावरील लगबग, चिकित्सा, आनंद बघून त्याचं जीवन सार्थकी लागल्यासारखं वाटायचं. कुणाचा आनंद कशात तर कुणाचा कशात. शोधला पाहिजे फक्त. गोवत्स द्वादशी ते भाऊबीजेपर्यंत सर्व सण अगदी यथासांग साजरे झाले.

सध्या बर्वे, जोशी वगैरे मंडळी त्यांच्या बायकांसोबत मॅनेजर सोबत चर्चेत जास्त वेळ घालवू लागली होती. महाजन काका सुधा काकूंसोबत जास्त वेळ घालवत असल्याने आधी त्यांच्या लक्षात नाही आलं. नंतर त्यांना तसं जाणवलं. त्यांनी जोशी काकांना तसं विचारलं. त्यांनी काहीतरी सांगून वेळ मारून नेली. पण महाजन काका आणि सुधाककूंच्या नकळत एक गोड कट शिजत होता. त्याची अंमलबजावणी तुळशी विवाहाच्या दिवशी होणार होती. सर्व तयारी गुप्तपणे सुरू होती.

त्या दिवशी सायंकाळी मॅनेजर परत एकदा बोलायला उभा राहिला. “भारतीय संस्कृतीतल्या अनेकविध उत्सवांपैकी एक, पण महत्वाचा उत्सव आपण येत्या काही दिवसांत साजरा करणार आहोत. ‘तुळशी विवाह.’ या वर्षी जोरात साजरा करुयात. जोशींना मंगलाष्टकं येतात. अण्णा वरपक्षाचे मामा म्हणून उभे राहतील. बर्वे वधूपक्षाचे मामा असतील. बाकी बरीच मंडळी विविध कामांसाठी उपोगत येतील. सर्वांच्या लक्षात राहील असा लग्नसोहाळा करू.”

तुळशी विवाह जवळ येत होता. कामांची धांदल उडाली होती. एके दिवशी महाजन काका सुधाककूंना म्हणाले, “समजा त्या दिवशी तुझ्या बाबांचं असं झालं नसतं तर पुढे काय झालं असतं?”

“मी त्या दिवशी तुझ्याशी लग्न करेल असं सांगणार होते. पण ठरलं होतं, प्राध्यापक झाल्यावर. आपण दोघं प्राध्यापक झाल्यावर मग लग्न केलं असतं आणि तू आमच्या घरीच राहिला असतास. घरजवई म्हणून.” सुधाकाकू महाजन काकांच्या डोळ्यांत बघत म्हणाल्या.

शेवटी तुळशी विवाहाचा दिवस उजाडला. वरपक्षीय मंडळींनी महाजन काकांना सकाळी हळदीसाठी म्हणून तयार केलं. महाजन काकांना समजत नव्हतं नेमकं काय सुरू आहे ते. सुधा काकूंची काही वेगळी परिस्थिती नव्हती. नंतर सर्व प्रकार त्यांच्या लक्षात आला. तुळशी विवाहाचं निमित्त करून महाजन काका आणि सुधाकाकूंना विवाहबंघनात अडकवण्याचा घाट घातला गेला होता. पटांगणात दोघांना हळद लावण्यात आली. दिवसभर कार्यक्रमांची रेलचेल सुरू होती. सर्व सोपस्कार यथाविधी पार पडत होते. गोरज मुहूर्तावर लग्न होतं. सर्व मंडळी म्हातारी होती पण उत्साह मात्र तरुणांचा होता. त्यांना बघून महाजन काका आणि सुधाकाकूंच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांचं स्वप्न अशा प्रकारे आयुष्याच्या शेवटी का होईना पूर्ण होणार होतं. मुहूर्तवेळ झाली, जोशींनी सुरुवात केली, स्वस्ति श्री गणनायकम गजमुखम.....

प्रत्येक श्लोकानंतर वधू-वर एकमेकांकडे बघून हसत होते. त्यांच्यावर अक्षतांचा वर्षाव होत होता. दोन्ही पक्षांच्या मामांनी अंतरपाट धरून ठेवला होता पण सर्वांचीच ऊंची सारखी असल्यामुळे वधू-वर एकमेकांना पाहू शकत होते.

जोशींच्या मुखमांडलातून शेवटचा श्लोक बाहेर पडला,

तदेव लग्नं सुदीनं तदैव ताराबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव

लक्ष्मीपते तेऽन्घ्रियुगं स्मरामि.....!!!

अंतरपाट बाजूला झाले. वधु-वरांनी एकमेकांकडे लज्जायुक्त कटाक्ष टाकला. एकमेकांना माळा घालण्यात आल्या. इकडे अक्षतांचा वर्षाव सुरूच होता. दोघांच्या डोळ्यांतून नकळतच आनंदाश्रू सुरू झाले होते.....

†††