वृद्धाश्रमातलं प्रेम - 9 Shubham Patil द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

वृद्धाश्रमातलं प्रेम - 9

भाग – ९

त्या दिवशी जेवणानंतर सर्वांनी मिळून महाजन काकांना समजावलं, “बघ, इतक्या वर्षानी तुझं प्रेम तुला परत मिळालंय. म्हणजे तुझ्या समोर आलंय. तुझं आपलं आणि हक्काचं असं कुणी राहिलेलं नाही. त्यांनासुद्धा कुणी नाही असं दिसतंय नाहीतर त्या वृद्धाश्रमात आल्या नसत्या. तू स्वतःहून बोल त्यांच्याशी. त्यांना चांगलं वाटेल. त्या इथं नवीन आहेत. मन रामायला वेळ लागेल. कर विचार.”

महाजन काकांनी विचार केला, मंडळी सांगत होती ते देखील खरंच होतं म्हणा. दोघांच्या आयुष्यात एकाकीपणा अगदी अमावास्येच्या काळ्याकुट्ट अंधारासारखा भरला होता. इतक्या वर्षांनी पहिलं प्रेम समोर येणं हे केवळ योगायोगाने झालं नव्हतं, ती नियतीची एक ठरवलेली गोष्ट होती. आयुष्याच्या शेवटी का असेना दोघांना एकत्र आणून शेवट गोड करण्याची ती दैवी योजना होती. महाजन काकांनी सुधाकाकूंशी आपणहून बोलण्याचं ठरवलं. जवळपास अर्धा तास ते विचार करत अस्वस्थपणे फेर्‍या मारत होते आणि बाकी काका मंडळी बाकावर बसून त्यांच्या उत्तराची वाट बघत होती. बराच विचार करून महाजन काका बाकासमोर आले आणि काहीशा निर्धाराने म्हणाले, “मी बोलतो. आताच बोलतो.”

किचनमध्ये मदतीसाठी जाण्याची वेळ झाली होती. आज कुणी न बोलवताच चौघंजण किचनकडे जाऊ लागले. इतरांच्या चालण्यात एक उत्साह होता. पण महाजन काका मात्र संमिश्र भावनांनी चालत होते. किचनमध्ये जाताच जोशीकाकू दिसल्या. महाजन काकांनी जोशींकडे एक कटाक्ष टाकला. जोशी समजले, त्यांनी जोशीकाकूंना काहितरी सांगितलं. जोशीकाका आले, त्यांनी महाजन काकांना सांगितलं, “तू बाहेर थांब. आम्ही करतो आज.”

जोशींच्या सांगण्यानुसार महाजन बाहेर थांबले. उगाचच हात मागे बांधून वरती आकाशाकडे बघत फेर्‍या मारू लागले. पाच दहा मिनिटांनातर एक स्त्री किचनमधून बाहेर आली आणि सरळ मंदिराकडे जाऊ लागली. महाजन काकांनी बघितलं, त्या सुधाकाकू होत्या. त्या महाजन काकांच्या पुढे निघून गेल्या होत्या. मनातलं सर्व बळ एकवटून महाजनकाका म्हणाले, “मी त्या दिवशी आलो होतो. नंतर तुम्ही घर सोडल्यावरसुद्धा आलो होतो. खूप शोधलं तुला. पण तू सापडलीच नाहीस.”

अचानक आलेल्या आवाजाने सुधाकाकू दचकल्या. त्यांनी मागे वळून बघितलं आणि क्षणभर स्तब्ध झाल्या. महाजन काकांना बघून त्यांचा विश्वासच बसत नव्हता. इतक्या वर्षनंतर आणि अशा जागेवर. त्या उद्गारल्या, “अरुण तू?”

“हो सुधा, मी अरुण महाजन.” महाजन काकांना आता बोलणं अवघड होत होतं. सुधा काकूंच्या डोळ्यांतून केव्हाच अश्रु सुरू झाले होते. महाजन काकांनी सुद्धा अश्रूंना वाट मोकळी करून दिली. ते दोघं एकमेकांच्या बाहुपाशात केव्हा विसावले ते त्यांनाच कळलं नाही. भावनांचा आवेग ओसरल्यावर आणि भानावर आल्यावर ते विलग झाले. मग काही वेळ असाच भयाण शांततेत गेला. यावेळी महाजन काकांनी पुढाकार घेत विचारलं, “कुठं होतीस तू इतके दिवस?”

“मी तुझ्या आठवणींत होते.” सुधाकाकू अश्रू पुसत म्हणल्या. मग परत काही वेळ शांतता पसरली. आपलं दुःख सांगण्ययसाठी बळ मिळावं म्हणून सुधाकाकू मनाने तयार होत होत्या. महाजनकाका सुद्धा गप्पच होते. मग मनाची तयारी झाल्यावर सुधाकाकू म्हणल्या,

आपला पेपर संपल्यावर मी घरी गेले तेव्हा घराला कुलूप होते. शेजारी विचारलं तेव्हा समजलं, मी जवळपास पळतच हॉस्पिटल गाठलं. तिथं पोहोचण्याआधीच बाबांनी जग सोडलं होतं. आम्हाला आमच्या जवळचं असं कुणीच नव्हतं. मग आम्ही लगेचच आजोळी राहायला जाण्याच्या निर्णय घेतला. इतक्या तडकाफडकी निर्णय घेतला गेला की काही विचार करायला वेळच मिळाला नाही. बाबांच दुःख आणि तू सोबत नसल्याचं दुःख अशी दोन रक्षसं माझ्या जिवावर उठली होती. अनेकदा आत्महत्या करण्याचा विचार मनात आला. पण आईकडे पाहून ते पाऊल मागे घ्यावं लागलं. पण आता या क्षणाला वाटतंय की बरं झालं मी मृत्युला कवटाळलं नाही, नाहीतर आजचा दिवस पहिला नसता.

आजोळी असलेल्या पोलिस स्टेशन मध्ये बाबांच्या जागी काम होण्यासाठी खूप प्रयत्न केले. आजोबांनी खूप ठिकाणी नाक घासल्यावर तिथं शिपायाची नोकरी लागली. प्राध्यापकाचं स्वप्न अपूर्ण राहिलं. त्या वेळी तुझी खूपच आठवण यायची. पण नाईलाज होता. मग लगेचच माझं लग्न लाऊन दिलं. मी नाही वगैरे म्हणण्याचा काही प्रश्नच नव्हता. मी आईला माझ्या सासरी घेऊन आली. माझा नवरा पुण्यातच एका खाजगी कंपनीत नोकरीला होता. हळूहळू बाबांचं दुःख आम्ही विसरत होतो. माझा नवरा स्वभावाने चांगला होता. त्याने खूप समजून घेतलं. मी माझी नोकरी सुरूच ठेवली होती. लग्नानंतर दुसर्‍या वर्षी आम्हाला मुलगा झाला. त्याचं नाव शंतनू ठेवलं. त्याला खेळवताना आईचा वेळ आनंदात जायचा. त्याच्या बोबड्या बोलांनी आम्हाला खूप आनंद व्हायचा. आता सर्व अरिष्ट टळली असं वाटत असतानाच शंतनूच्या बाबांचा अपघाती मृत्यू झाला. माझ्यावर आभाळ कोसळलं. माझ्या मनात परत आत्महत्येचे विचार येऊ लागले. त्यावेळी मी शंतनूकडे पाहिलं आणि सर्व दुःख गिळून टाकलं.

हळूहळू शंतनू मोठा झाला. त्याच्या बाबांसारखाच हुशार निघाला. त्याला इंजिनीअर बनवलं. शिक्षण पूर्ण होताच तो मोठ्या कंपनीत नोकरीला लागला तेव्हा मी माझी नोकरी सोडली. त्याच्या लग्नासाठी म्हणून स्थळं बघायला सुरुवात केली. त्याला एकही स्थळ पटत नव्हतं. शेवटी त्याला विश्वासात घेऊन विचारलं, तेव्हा समजलं त्याचं एका मुलीवर प्रेम आहे. माझं तुझ्याशी लग्न करण्याचं स्वप्न तुटलं म्हणून मी त्याच्यावर अन्याय करणार नव्हते. मी त्याला लगेच होकार दिला. यथावकाश सूनबाई घरात आल्या. आतापर्यंत भरपूर दुःख आली होती, त्यांना सहन करण्याची ताकद दिल्याबद्दल मी परमेश्वराचे आभार मानले. शंतनू आणि त्याची बायको रोज सकाळी कामावर जात ते सायंकाळीच परत येत. त्यामुळे घरातली सर्व कामं मीच करू लागली. पण आमच्या सूनबाईंच्या मनात काहीसं वेगळंच होतं. आधी चांगली वागणारी ती माझ्याशी मनाला वाटेल तसं वागू लागली. कामाच्या ताणामुळे ती चिडत असेल म्हणून मी काही बोलले नाही. शंतनूने सुद्धा दुर्लक्ष केलं. मग हळूहळू तोसुद्धा माझ्याशी नीट वागेनसा झाला. मी सहनच करत गेले. पण एके दिवशी माझा संयम सुटला आणि आमच्या तिघांत खूप भांडण झालं. काही दिवस असेच शांततेत गेले. पण मला काय माहीत ती वादळापूर्वीची शांतता होती.

एके दिवशी शंतनू माझ्याजवळ आला आणि आनंदात म्हणाला, “आई, मला फार मोठा प्रोजेक्ट मिळाला आहे. माझं स्वप्न होतं अशा प्रकारच्या प्रोजेक्टवर काम करण्याचं. पण एक अडचण आहे. प्रोजेक्टसाठी म्हैसूरला जावं लागणार आहे. कदाचीत अडीच वर्ष आणि त्यात अजून एक म्हणजे पुजाला सुद्धा म्हैसूरला नोकरी लागली आहे.”

तो सर्वच ठरवून आला होता. देवाने आतापर्यंत तारलं होतं आणि आताही तोच मार्ग दाखवणार होता. त्यामुळे सर्वकाही त्याच्या भरवशावर सोडून मी म्हणाले, “अभिनंदन तुझं आणि तिलाही सांग. ती तर काही बोलत नाही माझ्याशी. केव्हा जाणार आहात मग आता?”

“आठवडाभरत निघू. एक सांगू का?” त्याने थोडं घाबरं होत विचारलं.

“सांग. काय झालं?” मला अंदाज येत होता.

“तुझी हरकत नसेल तर तू अडीच वर्ष ‘निवारा ओल्ड केयर’ला राहशील का? म्हैसूरला तुला करमणार नाही. शिवाय भाषा आणि माणसं वेगळी.”

“हो, का नाही. चालेल मला.” काळजवर दगड ठेऊन मी बोलले. माझा अंदाज खरा ठरला होता. त्यांनी मला वृद्धाश्रमात हाकलण्याचं ठरवलं होतं.

मग आठवडाभर त्यांनी त्यांची आणि मी माझी तयारी केली आणि परवा मला निवार्‍यात सोडून गेले म्हैसूरला. एक वेळ अपंगत्व बरं, पण परवालंबत्व नको.

महाजनकाका सुधाकाकूंची गोष्ट ऐकताना सुन्न झाले होते. काय बोलावं हे त्यांनाही सुचत नव्हतं. मग काही वेळाने ते म्हणाले, “माझी गोष्ट जरा वेगळी आहे. माझी बायको सहा वर्षांपूर्वी वारली. मुलगा शिक्षणासाठी म्हणून परदेशात गेला तो कायमचाच. त्याच्या आईला ठेवायलासुद्धा आला नाही. त्यमुळे तो माझ्यासाठी मेलेलाच आहे. साधारणतः एक वर्ष झालं मला येऊन. परवा तू दिसलीस आणि आयुष्यात जगण्याची एक नवीन आशा पल्लवित झाली बघ.”

†††