Navdurga - 1 books and stories free download online pdf in Marathi

नवदुर्गा भाग १

नवदुर्गा भाग १

हिंदु धर्मात भगवती देवीची विशेष आराधना वर्षातून दोन वेळा केली जाते.

वासंतिक नवरात्रात चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध नवमीपर्यंत

व शारदीय नवरात्रात आश्विन शुद्ध नवमीपर्यंत देवीची उपासना केली जाते.

शारदीय नवरात्र अधिक प्रचलित आहे.

शारदीय नवरात्र हे शाक्तपंथीय मानले जाते.

शारदीय म्हणण्याचे कारण इतकेच की हे शरदऋतूच्या प्रारंभी येते.

पूर्वीच्या ऋषी-मुनींनी बल संवर्धनार्थ हेच शारदीय नवरात्र पसंत केले असावे असे वाटते.

भारतामध्ये सर्वत्र ह्या नवरात्रामध्ये प्रत्येकाच्या कुलाचाराप्रमाणे कमी-अधिक स्वरूपात पूजा-कृत्य केले जाते .

दुर्गोत्सव हा वर्षातून शरद ऋतू व वसंत ऋतूतही साजरा करण्याची प्रथा असल्याचे काही दिसून येते.

दुर्गा देवतेचे महात्म्य भविष्य पुराणात कथन केलेले आढळते.

नवरात्री उत्सव दुर्गापूजा, नवरात्रोत्सव आणि त्याचे व्रत हा सण नऊ दिवस आदिशक्तीची आराधना करण्याचा आहे.

पावसाळा बहुतेक संपलेला असतो.

शेतांतील पिके तयार होत आलेली असतात, काही तयार झालेली असतात

आणि शेतकरी खुशीत असतो.

नवरात्राच्या पहिल्या दिवशी घटस्थापना होते.

त्या दिवसापासून महाराष्ट्रात संध्याकाळी अंगणात भोंडला खेळला जातो.

एका पाटावर हत्ती काढून त्याची पूजा करतात.

पाटाभोवती फेर धरून स्त्रिया, आणि विशेषतः मुली, भोंडल्याची पारंपरिक गाणी म्हणतात.

घटामध्ये नंदादीप प्रज्वलित करून ब्रह्मांडातील आदिशक्ति-आदिमायेची मनोभावे पूजा करणे,

म्हणजेच घटस्थापना किंवा नवरात्रोत्सव.

घटरूपी ब्रह्मांडात मारक चैतन्यासहित अवतीर्ण झालेल्या तेजस्वी अशा आदिशक्तीचे अखंड तेवणाऱ्या नंदादीपाच्या माध्यमातून नऊ दिवस पूजन करणे,

म्हणजे नवरात्रोत्सव साजरा करणे.

व्रत- नवरात्र हे एक काम्य व्रत आहे.

पुष्कळ घराण्यात या व्रताला कुलाचाराचे स्वरूप असते.

आश्विन शुद्ध प्रतिपदेस या व्रताचा प्रारंभ होतो.

त्यासाठी घरात पवित्र जागी सोळा हातांचा मंडप उभारतात.

तिथे एक वेदी तयार करतात.

नंतर स्वस्तिवाचन पूर्वक त्या वेदीवर सिंहारूढ अष्टभुजा देवीची स्थापना करतात.

मूर्ती नसल्यास नवार्ण यंत्राची स्थापना करतात.

यंत्राशेजारी एक घट स्थापून त्याची व देवीची यथाविधी पूजा करतात.

व्रतधारी व्यक्तीने नऊ दिवस उपवास किंवा नक्त भोजन करून व्रतस्थ रहायचे असते.

आश्विन शुद्ध नवमी अखेर हे व्रत चालते.

या व्रतात नऊ दिवस सप्तशतीचा पाठ करतात.

अखंड दीप लावतात.

घटावर रोज एक किंवा चढत्या क्रमाने माळा बांधतात.

क्वचित होमहवन व बलिदानही करतात.

नऊ दिवस रोज कुमारीची पूजा करून तिला भोजन घालतात.

शेवटी स्थापित घट व देवी यांचे उत्थापन करतात.

देवीची नऊ रूपे सर्व देवांच्या ठिकाणी असलेल्या शक्तींचे दैवतीकरण होऊन

त्या शक्तीरूप मूर्तीला देवी असे नाव मिळाले

आणि शाक्त संप्रदायी लोकांनी तिला सर्वश्रेष्ठ देवता, आदिमाया किंवा जगदंबा म्हणून गौरवले.

देवीची उग्र व सौम्य अशी दोन रूपे पहायला मिळतात.

उमा, गौरी, पार्वती, जगदंबा , भवानी ही देवीच्या सौम्य रूपाची नावे असून

दुर्गा, काळी,चंडी,भैरवी, चामुंडा ही देवीची उग्र रूपे आहेत.

प्रथमं शैलपुत्रीति, द्वितीयं ब्रह्मचारिणी ।

तृतीयं चन्द्रघण्टेति, कूष्मांडीति चतुर्थकम् ।।

पंचमं स्कंदमातेति षष्ठं कात्यायनीतिच ।

सप्तमं कालरात्रिश्च महागौरीतिचाष्टमम् ।।

नवमं सिद्धिदां प्रोक्ता नवदुर्गाः प्रकीर्तिताः ।

१. शैलपुत्री, २. ब्रह्मचारिणी ३. चन्द्रघंटा ४. कूष्मांडी (किंवा कुष्मांडी) ५. स्कंदमाता ६. कात्यायनी ७. कालरात्री ८. महागौरी ९. सिद्धिदात्री अशी ही देवीची नऊ रूपे आहेत.

दुर्गादेवी तेजतत्त्वाच्या आधारे आपल्या नऊ प्रमुख शस्त्रांसहित ब्रह्मांडात विहार करते, असा समज आहे. आदिशक्तीचे हे दरदिवशी नव्या रूपासहित भ्रमण करणे, म्हणजेच दरदिवशी चढत्या क्रमाने सप्तपाताळांतून पृथ्वीवर येणार्‍या त्रासदायक लहरींचे समूळ उच्चाटन करणे, अशी समजूत आहे.

हे नऊ दिवस ब्रह्मांडात वाईट शक्तींनी प्रक्षेपित केलेल्या त्रासदायक लहरी, तसेच आदिशक्तीच्या मारक व चैतन्यमय लहरींचे युद्ध चालू असते.

या वेळी ब्रह्मांडातील वातावरण तप्त झालेले असते

व दुर्गादेवीच्या शस्त्रांतून तेजाची झळाळी अतिवेगाने सूक्ष्म शक्तींवर हल्ला करत असते, अशी कल्पना आहे. याचे प्रतीक म्हणून घट व त्यातील नंदादीप यांना प्रतीकात्मक रूपात पूजले जाते.

घटात दीपाच्या उष्णतेमुळे निर्माण झालेले वातावरण

हे ब्रह्मांडात नऊ दिवस अहोरात्र सुरू असलेल्या युद्धातून निर्माण झालेल्या तप्त वायुमंडलाशी साधर्म्य दर्शवते, तर दीप हा आदिशक्तीच्या शस्त्रास्त्रांतून निर्माण होणार्‍या तेजाचे प्रतीक म्हणून कार्य करतो.

नवदुर्गा, म्हणजे आई दुर्गेची नऊ रूपे ही नऊ आयुर्वेदिक औषधातून पण ओळखली जातात .
आई दुर्गेची ही नऊ रूपे जी जगाला सर्व रोगांपासून वाचवून जगाचे कल्याण करतात .
नवदुर्गाच्या नऊ औषधांचे स्वरूप सर्वप्रथम मार्कण्डेय चिकित्सा पद्धतिच्या रुपात दाखवले गेले
आणि चिकित्सा प्रणालीच्या या रहस्याला ब्राम्ह्देवांनी केलेल्या उपदेशात “दुर्गाकवच” म्हणून ओळखले जाते .

असे म्हणतात की या सर्व औषधी वनस्पती सर्व प्राणि‍मात्रांचे रोग नष्ट करणारी आणि त्यापासून त्यांना वाचवण्यासाठी एखाद्या कवचाचे काम करतात .
म्हणूनच यांना “दुर्गाकवच” म्हणतात .
या औषधि वनस्पतींचा उपयोग केला असता मनुष्य अकाल मृत्यु पासुन वाचतो .
तसेच त्यानंतर शंभर वर्षे सुद्धा जगू शकतो .
म्हणूनच या दिव्य गुण असणार्या नऊ औषधी वनस्पतींना सुद्धा नवदुर्गा म्हणून ओळखले जाते .

नवरात्रीच्या काळात घरात घटपूजन केल्याने वास्तूमध्येही दुर्गादेवीचे मारक चैतन्य कार्यरत होऊन
वास्तूमधील त्रासदायक लहरींचे निर्दालन करते, अशी या मागची धार्मिक श्रद्धा आहे.

मार्कंडेय पुराणातील देवी महात्म्यात सांगितले आहे-

“ शरद ऋतूतील वार्षिक महापूजेत देवीमाहात्म्य भक्तिपूर्वक ऐकल्यास
सर्व बंधनांपासून व्यक्ती मुक्त होते आणि धनधान्याने परिपूर्ण होते.

नवरात्र हा ऋतू परिवर्तनाचा काल असतो.

यामुळे आपल्या नवीन शक्ती,नवा उत्साह,उमेद निर्माण होत असते.

बृहत संहितेनुसार सूर्य तसेच इतर ग्रहांमध्ये होणा-या परिवर्तनाचा प्रभाव मनुष्याच्या आरोग्यावर आणि व्यवहारांवर होत असतो.

सृष्टीतील परिवर्तन हा शक्तीचाच खेळ आहे.

ब्रह्मचर्य, संयम, उपासना, यज्ञ केल्याने शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

स्मरणशक्ती चांगली होवून बौद्धिक विकास होतो.

म्हणून नवरात्र हा शारीरिक व आत्मिक शुद्धतेचा काल आहे असे मानले जाते.

कोल्हापूर येथे नवरात्रात अंबाबाईचा जोगवा मागितला जातो .

हा एक प्रकारचा देवीची उपासना करण्याचा प्रकार आहे.

देवीचा “कुलधर्म” म्हणूनही जोगवा मागितला जातो.

मंगळवारी, शुक्रवारी, पौर्णिमेला किंवा नवरात्रात जोगवा मागितला जातो.

परडीमध्ये देवी ठेवून किमान पाच घरी जाऊन मूठभर तांदूळ किंवा पीठ मागणे याला जोगवा मागणे असे म्हणतात.
हा मागितलेला जोगवा शिजवुन भोजन स्वरुपात खाल्ला जातो .

हे उपासक गळ्यात कवड्यांची माळ घालतात.

अहंकाराचे विसर्जन करावे असा यामागचा हेतू असावा .

एकनाथ महाराजांनी या जोगव्यावर एक भारुड रचले आहे.

ते असे- अनादी निर्गुण प्रगटली भवानी |

मोह महिषासुर मर्दना लागुनी ||

त्रिविध तापांची कराया झाडणी |

भक्तांलागुनी पावसी निर्वाणी |

आईचा जोगवा जोगवा मागेन |

द्वैत सारुनी माळ मी घालीन |

हाती बोधाचा झेंडा घेईन |

भेदरहित वारिसी जाईन|

नवविधा भक्तीच्या करीन नवरात्रा |

करुनी पीटी मागेन ज्ञानपुत्रा |

या भारुडात जोगवा मागण्याच्या विधीचे स्वरूप आणि तो मागण्यामागचे हेतू
अप्रत्यक्षपणे व्यक्त झाले आहेत.
नवरात्रीतल्या पाचव्या दिवसाला ललिता पंचमी (महालय),

आठव्या दिवसाला महाअष्टमी (दुर्गाष्टमी),

आणि नवव्या दिवसाला महानवमी म्हणतात.

ललिता पंचमी आश्विन शुद्ध पंचमीच्या दिवशी हे व्रत करतात.

हे काम्य व्रत असून स्त्री पुरुषांना हे करता येते.

ललिता देवी ही या व्रताची देवता आहे.

यात एखाद्या करंडकाचे झाकण तिचे प्रतीक म्हणून पूजेला घेतात.

दुर्गानवमी- आश्विन शुद्ध नवमीस हे नाव आहे.

शक्ती व संपत्ती यांच्या प्राप्तीसाठी हे व्रत करतात.

सकाळी आघाड्याच्या काडीने दंतधावन करतात.

केळीचे खांब व पुष्पमाला यांनी देवीसाठी मखर तयार करतात.

या पूजा विधानात पुष्पांजली अर्पण झाल्यावर गंधाक्षतायुक्त व साग्र असा ४८ दुर्वा ललितेला वाहतात. नैवेद्यासाठी लाडू, भोपळघारगे , वडे वगैरे पदार्थ करतात.

पूजेच्या समाप्तीला घारग्यांचे वाण देतात.

रात्री भजन कीर्तन जागरण,व कथाश्रवण करतात.

दुसऱ्या दिवशी देवीचे विसर्जन करतात.

क्रमशः

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED