आणि भाषण फिसकटले.......................
लता भुसारे ठोंबरे
पंधरा आँगस्ट,हा आपल्या भारताचा स्वातंत्र दिन आमच्या शाळेतं उत्साहात साजरा होणार होता.तसे आम्ही तो दरवर्षीही उत्साहातचं साजरा करतो पण यावर्षी तो मात्र माझ्यासाठी निरुत्साही होता कारण यावर्षी बाईने मला जबरदस्तीचं भाषणातं भाग घ्यायला भाग पाडले होते.तसं पंधरा दिवसापूर्वी त्यांनीचं मला भाषणही लिहूण दिलं होतं. मला ते फक्त पाठ करून पंधरा आँगस्टला बोलून दाखवायचं होते पण पाठांतर किंवा काही लक्षात ठेवणं मनलं की माझी लई जादा बोबं असते.मला कितीही घोकलं किंवा काही लक्षातं ठेवायला सांगितलं की ते काहीचं पाठ होतं नाही आणि लक्षातही राहतं नाही.
मागच्या वर्षी मला गावातल्या एका दादानं लक्षीमणा च्या पोरीला एक चिठ्ठी द्यायला सांगितली होती.त्यासोबतचं मला खायला एक चाँकलेटबी दिलं होतं.आमच्या गावात दोन तीन लक्षीमण नावाची माणंस होती त्यामूळं अर्ध्या रस्त्यात गेल्यावर मी चिठ्ठी कोणत्या लक्षीमणाच्या पोरीला द्यायची तेचं इसरलो.आता माग परत जाऊन इचारायचं म्हणजे त्या दादानं मला धरून लई मारंल असतं.म्हणून मी जरा माझंच डोकं चालवलं आणि तिथून जवळ घर असलेल्या लक्षीमणाच्याचं घरी ती चिठ्ठी नेऊन त्याच्या बायको जवळ दिली कारण त्याला काही पोरगी बिरगी नव्हती पण मी चिठ्ठी लक्षीमणाच्या घरी पोहचती केली होती.मी काही त्या दादाला धोका बिका दिला नव्हता.मी आपला खालेल्या चाँकलेटला जागलो होतो.पण तरिही दोन दिवसानंतर त्या दादानं मला गाठलं आणि मार मार मारलं. का?ते मला आणखिही समजल नाही.नंतर मला कोणितरी सांगितलं की दादानं मला मारलं त्यापेक्षा जास्त प्रमाणात त्या लक्षीमनानं दादाला मारला होता.काय माहीत त्यांच्यातं काशावरून भांडण झाले ते?
भाषण दिल्याच्या दुस-या दिवसापासून मी माझं तन,मन,धन (माझ्याजवळ नसलेलं)कारण तनानं मी फार हडकूळा आहे.वा-याची झुळूक जरी जवळून गेली तरी ती पानाला तिथेचं सोडते आणि मला एक-दोन कोस सोबतं घेऊन जाते.मग मला तिथून उडतं जाऊन परत येतांना चालतं यावं लागतं.मन,ते कधीचं जाग्यावर नसतं.कधी वाण्याच्या दुकानात खाऊ खात बसतं तर कधी आइसक्रिमवर चोरून डल्ला मारतं कारण धन माझ्यासारख्या पामराकडं कुठूण असनार.
तर बाईनी भाषण दिले तेव्हापासून मी सर्व अभ्यास सोडून भाषण पाठ करन्यासाठी त्याच्यामागे हात धुवून लागलो होतो पण ते मात्र काही केल्या मला पाठ होतं नव्हतं.
शाळा भरुन प्रार्थना झाली की बाई दररोज आमचं भाषण म्हणून घ्यायच्या.त्या घा-या डोळ्याच्या मनीन आणि त्या चौथीतल्या बोक्यानं तर पहील्याचं दिवशी भाषण बोलून दाखवलेही होते.इतरांचीही भाषणं पुढे चार पाच दिवसात पाठ झाली होती पण माझं भाषण काही केल्या पाठ होत नव्हतं."आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष,गुरूजनवर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींनो........याच्या पुढे काही माझी गाडी सरकत नव्हती.कितीही घोकले तरी भाषण काही माझ्या डोक्यात घुसतं नव्हते.
ज्या मुलांची भाषणं पाठ झाली नाही.त्यांची भाषणं बाई परत परत म्हणवून घ्यायच्या.जवळ जवळ सगळ्या शाळेतील मुलांची भाषणं पाठ झाली होती पण मी मात्र निरेचा दगड कोरडा तो कोरडाचं राहीलो होतो.माझ्या भाषण पाठ न होण्यानं बाईसुध्दा इतक्या वैतागल्या की ऐके दिवशी त्यांनी मला धोप धोप धोपाटले,दुसरे दिवशी बदड बदड बदडले,तिसरे दिवशी कोंबडा बनवले.पण भाषण काही पाठ होईना.ते आपले शांतपणे वहीत पहुडले होते.अधून मधून माझ्याकडे पाहूण हसतं होते.
आता स्वतंत्र्यदिन दोन दिवसावर आला होता.आमची शाळा त्या उत्सवात आणि उत्साहात नाहून निघाली होती. सगळी शाळा जनू पंधरा आँगस्टमय झाली होती.मला मात्र कधी नव्हे ते इंग्रज आपला देश सोडून का गेले ?याचा राग यायला लागला होता.माझ्या बिच्या-या मनाला उगाचं वाटतं होते की आज जर इंग्रज ईथेचं राहीले असते तर हा पंधरा आँगस्टचा सणचं साजरा करावा लागला नसता आणि सहाजिकचं मला भाषणही! माझे बिनडोक डोके गरगरायला लागले.काय करावे?काही समजेना.तेवढ्यातं माझा एक मित्र क्रुष्णासारखा माझ्या मदतीला धावून आला.महाभारतातला क्रुष्ण नव्हता का?द्रोपदी वस्त्र हरणाच्या वेळी द्रोपदीच्या मदतीला धावून आला होता.अगदी तसा(म्हणजे बाईनी काही माझ वस्त्रहरण वगैरे केले नव्हते)पण तो जो काय भाषण करन्याचा घोळ घालून ठेवला होता ना.त्यासाठी तो मला मदतीला धाऊन आला होता.तो मला म्हणाला न घाबरता बाईंकडे जा आणि त्यांना ठणकावून सांग की मी काही भाषण-बिषण करनार नाही.मला ते पाठ होतं नाही."भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे."असही काही बाही तो म्हणाला होता.पण बाईंकडे जायचं कोणी (म्हणजे मांजराच्या गळ्यातं घंटा बांधायची कोणी? हा काही त्याचा अर्थ नाही) कारण अफजलखानाने उचललेल्या विड्याप्रमाणेचं बाईनीही माझ्या भाषणाचा विडा उचलला होता.मग" मी भाषण करनार नाही."हे माझे बोलं ऐकूण बाईंनी मला कपडे धुतात तसं धोपट धोपट धोपटलं असतं.म्हणून बाईंकडे जाण्याचा बेत मी माझ हित पाहाता कँन्सल केला कारण बाई दुरून जरी दिसल्या तरी त्या मला दहा तोंडी रावनासारख्या वाटायच्या आणि दहा तोफेंच्या तोंडाला बांधल्यासारखी माझी स्थिती व्हायची.बाईंना भेटन्याचा बेत फेल झाला म्हणून गप्प बसून राहाना-यातला मी नव्हतो.मी दुसरा बेत आखला."मिशन माझी आई"हा बेत आखल्यावर "एवढे दिवस मी हा बेत का आखला नाही?"याचा मला पश्चाताप व्हायला लागला होता कारण हा लईच जालीम ईलाज मला सुचला होता.यात मी माझ्या आईला बाई माझ्यावरचं कशा डूक धरुन राहतात, मलाचं सारखी सारखी काम कशी करायला लावतात.आता मला एकट्यालाचं आवघड भाषण देऊन त्या मला जीव जावोस्तोर कशा मारतं आहेत?त्यामूळे माझ्या अभ्यासावर किती व कसा परिनाम होतं आहे."हे सगळं डोळ्यातं झंडूबाम घालून रडुन रडून सांगितलं.तरी मध्येंच एकदा आईने मला विचारलं"झंडू बामचा वास कुठूण यायला लागलाय की"तेव्हा मी तिला दुस-याच विषयाकडं वळवत उद्या सकाळी माझ्यासोबत शाळेतं येण्याचं वचन घेतलं.
बिचारी आई लेकराचे एवढे हाल पाहूण काकुळतीला आली आणि "ती बाई तुला कशी त्रास देते बघतेचं आता".असं म्हणून युध्दाच्या तयारीला लागली मी मात्र आता आपल्याला काही भाषण-बिषण पाठ करावं लागणार नाही.म्हणून चादर डोक्यावर घेऊन सकाळपर्यंत्न तानून दिली.
सकाळी लवकर उठून मी कधी नाही एवढा पटकन तयार होऊन "आज शाळेत लई मजा येणार आहे. तेव्हा घरी राहू नका"अस दोन चार मित्रांना सांगूण आलो.त्यांनी पूढ नऊ दहा जनांना सांगितलं.
शाळेची वेळ झाली तसं मी आणि आई शाळेत बाईनां भेटायला निघालो."आज बाईचं काही खरं नाही.मला मारतात काय?भोगा आता कर्माची फळ".माझ्या पोटातं या इचारानं लई गुदगुल्या होऊ लागल्या.किती रोकलं तरी मला काही हसू रोकता येतं नव्हतं कारण माझी आई बाईंना चांगलाचं जाब इचारनार होती त्यांच्यासंग भांडणारबी होती.तेबी सगळ्या पोरांसमोरं.आम्ही वर्गापूढ गेलो तेव्हा बाई मुलांना काहितरी शिकवत होत्या.तेवढ्यात मी आणि आई,त्यांना दारासमोर उभे असलेले दिसलो.तसे बाई वर्गातून बाहेर आल्या व"काय रे उशीर?भाषण पाठ केलेस ना?जा तुझ्या जाग्यावर बस ." असं म्हणून त्यांनी मला वर्गात हकललं.आता भाषण कशाला पाठ करायचं या आनंदात मी बेंचवर जाऊन बसलो व त्यांच्या कडे पाहू लागलो.
बाईनी माझ्या आईवर काय जादू केली काय माहीत कारण सुरवातीला तावातावानं बोलनारी माझी आई नंतर नंतर बाईंचीचं हात जोडून माफी मागतांना दिसत होती. त्या काय बोलतात हे मला कळतंही नव्हतं आणि जागेवरून उठताही येतं नव्हतं.मी हे पाहूण लई बुचकाळ्यात पडलो होतो.कारण "करायला गेलो म्हसोबा आणि झाला मारोती" असं हे सगळं पाहता वाटतं होतं.तेवढ्यातं आईनंच मला तिच्याकडे बोलावून घेतले.जवळ गेलो तसं तिनं माझ्या पाठीतं एक जोराचा धपाटा मारला आणि मला म्हणाली" बाईनंइरूध्द मला भडकवतो होय रं.बघतेचं आता तुझं भाषण कसं पाठ होत नाही ते आणि बाई आता तुमी नका काळजी करू मी घेते दोन दिसातं भासन पाठ करून याच्याकडून.कसं पाठ करतं नाही तेचं बघते मी".बापरे म्हणजे मी खोदलेल्या खड्यातं मीचं पडलो होतो."आगितून फुफाट्यातं "असा प्रकार झाला होता.आता घरी आई आणि शाळेतं बाई दोघी मिळून माझं भाषण पाठ करून घेणार होत्या. "इकडं विहीर तिकडं आड"याचा अर्थ मला लहान वयातचं कळला होता आणि मी लढवलेली एकही क्षक्कल उपयोगी पडली नव्हती.
दोन दिवस लोटले आणि तो दिवस उगवला ज्याची मी आतुरतेने मुळीचं वाट पाहतं नव्हतो.मी आज सकाळी सकाळी उठून उतरंडीच्या मागे लपून बसलो होतो.पण कसं काय की आईने मला शोधून काढले आणि हाताला पकडून शाळेतं घेऊन आली.माझा नाईलाज झाला.जसं एखादा महत्वाचा माणूस आला नाही तर कार्यक्रमचं होतं नाही तसं बहुतेक यावर्षी माझं भाषण झाल्याशिवाय पंधरा आँगस्ट पूर्ण होणार नव्हता बहुतेक.प्रभात फेरी,झेंडा वंदन आणि इतर कार्यक्रम जोरदार झाले आणि आता ....................भाषणं
एक...दोन...तीन.....अशी काही मुलं झाली.सगळ्यांची भाषणं लई भारी झाली होती आणि बाईने माझं नाव पुकारले.बाईने पुकारलेले नाव ऐकताचं मी इतका घाबरलो की माझ्या पायापासून ते डोक्यापर्यंत्न मुग्यांच मुग्या झाल्या.जनू वारुळातल्या सगळ्या मुंग्या माझ्याचं अंगावर चढल्या असाव्यातं. तसाचं मी जाग्यावरून उठलो आणि माईकसमोर जाऊन उभा राहिलो.समोर पाहीले तर सगळं ग्राउंड माणसांनी गच्चं भरलं होतं.त्या सगळ्यात कहर म्हणजे माझी आई मोठ मोठाले डोळे करून खाऊ की गिळू या अविर्भावात माझ्या पुढे उभी होती.ती मला जगदंबा वाटली. माझ्या मागे बाई उभ्या होत्या त्यांनी माझी पाठ हळूचं थोपटली आणि" तू करशील छान भाषण" असं कानातं सांगितलं.मला थोडा धीर आला.तसेचं मला बाईने नाही सुचलं तर पाहूण वाचन्यासाठी भाषण खिशात ठेवायला परवानगीही दिली होती आणि आईने घरून येतांना भिती वाटू नये म्हणून हनुमान स्तोत्र लिहून माझ्या खिशात ठेवली होती.म्हणजे माझ्या एका खिशात भाषण आणि दुस-या खिशात हनुमान स्तोत्र
मी भाषणाला सुरूवात केली"आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष,गुरूजनवर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या मित्र- मैत्रीनीनो ........... याच्या पुढे आजही मला काहीचं आठवतं नव्हतं.सगळे मुलं,गावकरी माझ्यावर हसत आहेत असं वाटायला लागले.हाता पायाच्या मुंग्या परत आल्या.तोंडाला कोरड पडली.एकही अक्षर तोंडा बाहेर पडत नव्हते.मागून बाई"खिशातून भाषण काढ,भाषण काढ."म्हणून ओरडत होत्या पण ते काही माझ्यापर्यंत्न पोहचंत नव्हते.मी तिथेचं मठ्ठासारखा उभा होतो आणि अचानक माझे मलाचं खिशात ठेवलेले भाषण आठवले मी ते काढले आणि वाचायला सुरवात केली
"भिमरुपी महारूद्र।वज्र हनूमान मारूती।।
......................पाताल देवताहंता..............
अचानकपणे मला मागनं कोणीतरी गदागदा हलवतयं असं वाटलं.मी वळून पाहिलं तर बाई"अरे मूर्खा हनुमान स्तोत्र काय म्हणतोस भाषण वाचं," भाषणअसं काही तरी बडबडतं होत्या.समोरचे सगळेजन आता खरंच हसत होते.म्हणजे मी आतापर्यंत्न भाषण नाही तर हनुमान स्तोत्र वाचत होतो.आता मात्र मला एक क्षणही तिथे उभे राहवतं नव्हते.मी अंगातलं सर्व अवसान एकवटून जो पळत सुटलो.तो घरी पोहचेपरयंत्न थांबलोचं नाही.