कथा फिटलेल्या पैशांची लता द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

कथा फिटलेल्या पैशांची

एके दिवशी ती अचानक पणे माझ्या घरी आली.ताई मला तुमच्या घरी कामावर ठेवा अशी विनंती ती मला करू लागली."अगं पण माझ्याकडे सध्या बाई आहे कामाला, तिला असं अचानक मी कसं काढू ?"तिला कारण तरी काय सांगू मी?"
"ते काही नाही, मी तुमचं काही ऐकणार नाही, मला तुम्ही कामावर ठेवा म्हणजे ठेवा." तिने ठणकावून सांगितले.
मी कितीही डोके फोड केली तरी ती माझं काहीही ऐकायला तयार नव्हती. सारखं "मला कामावर ठेवा, मला कामावर ठेवा" म्हणून तगादा लावतं बसली होती. कितीही समजावलं तरी तिच्या डोक्यात जात नव्हते. शेवटी मी तिला "आधी शांत बस नि नाश्ता पाणी कर. नंतर काय ते बोलू" असे सांगितले.
ही अचानकपणे इथे कशी काय आली? हे मात्र मला काही समजत नव्हते. मी तिला विचारले तसे ती म्हणाली "तुम्ही माझ्या मुलीच्या लग्नात दिलेले पैसे मला परत करायचे आहेत. तेव्हा तुम्ही माझ्या निकडीलाला देवासारख्या धावून आलात. ते ऋण काही मी फेडू शकणार नाही पण पैसे मात्र मला परत करायचे आहेत. त्याला तुम्ही नाही म्हणू नका आणि मी तुमचं ऐकणारही नाही. तुम्ही जर कामावर ठेवायला नकार दिला तर कुठेतरी काम करून मी तुमचे पैसे फेडणार."असं ती मला पोटतिडकीने सांगू लागली.
"अग, त्याची काही गरज नाही. तेवढेचं पुण्य मिळालं बघ मला. राहु दे तुझ्याकडे."मी तिला विनंती केली.
" अहो ताई हा झाला तुमचा मोठेपणा पण तुमचे पैसे परत केल्याशिवाय मला काही शांती मिळणार नाही. तेव्हा पैसे कसे फेडू? तेवढं मला सांगा. ती हट्टालाच पेटली. ऐकायलाच तयार होईना. तेव्हा "दोन दिवसांनी तिचा महिना संपतो मग मी तुला बोलवेल" असं मी तिला सांगितले.
अग,पण इकडे राहतेस कुठे? त्या घराचं काय केलंस?
नवरा आणि मुलगा हेही तुझ्या सोबतच आहेत का?असे विचारल्यावर "ते सांगते नंतर पण दोन दिवसांनी परत येईल"असं म्हणून निघून गेली.
जवळजवळ चार -पाच वर्षानंतर आमची भेट होत होती. सुरुवाती सुरुवातीला एक दोन वेळा फोनवर बोलणे झाले पण नंतर मात्र पूर्ण संपर्क तुटला होता आणि ती थोडी विस्मरणात ही गेली होती.पैसे तर तिला परत न करण्याच्या बोलीवरच दिले होते. तरीही ती आज अचानक ते पैशांचे कर्ज फेडण्यासाठी माझ्या घरी काम करायला आली होती.
दोन तीन दिवसानंतर ती परत आली ते काम करण्याच्या तयारीनेचं. मिही माझ्या आताच्या बाईला सगळं सांगून कामावर न येण्याचे सांगितले होते. त्यामुळे तिने कामाला सुरुवात केली आणि अर्धे पैसे कामातून कापून घ्यायचे असे ठरले.
सुनिता, मुंबईत आल्यापासून गेली दहा-पंधरा वर्षे माझ्याकडे कामाला होती.खूप कष्टाळू, स्वाभिमानी, प्रामाणिक, मेहनती आणि स्वच्छ काम करणारी. कितीही विनंती केली तरी तिने कधीचं काही खाल्ले नाही."मला दुसऱ्या कामाला उशीर होतो"असं तिचं उत्तर असायचं. मग मी तिला घरी काही खायचं वेगळं केलं असेल तर तिच्यासोबत बांधून द्यायची. माझ्या हातचा चहा मात्र तिला खूप आवडायचा. मी घरी असल्यावर तिला आवर्जून चहा बनवून द्यायची. काम करण्याच्या नादात कधी कधी दिवस दिवस ती जेवायची नाही. काम करणं आणि स्वच्छ काम करणं हेचं तिचं उद्दिष्ट असायचं. तिला एक मुलगा आणि एक मुलगी. त्यांच्या शिक्षणासाठी खूप झटली. मी नाही पण माझ्या मुलांनी तरी शिकावं असं तिला मनापासून वाटायचं पण दोन्ही मुलं दहावीच्या पूढं शिकली नाहीत.मुलगा हुशार होता पण त्यांनेही दहावीनंतर शिक्षण सोडून दिले आणि छोटी मोठी कामे करू लागला. मुलांनी खूप शिकावं हे तिचं स्वप्न काही पूर्ण झालं नाही.नवरा ही मिळतील तशी कामे करायचा.मुलगी शिकत नाही म्हटल्यावर तिने मुलीचं लग्न करायचं ठरवलं. त्यावेळी तिला मदत म्हणून मी काही पैसे दिले होते.तिने स्वतःच्या कष्टावर थोडी बचत करून व कर्ज काढून चाळीत एक छोटं घरही घेतलं होतं.
पुढे माझी बदली झाली आणि आमचा संपर्क तुटला. त्यामूळे ती माझे पैसे परत करू शकली नाही आणि म्हणून ती आज अचानक इथं आली होती.सुरवातीला एक दोन वेळा फोनवर बोलणे झाल्यामुळे तिला माझा अॅड्रेस माहिती होता.आता ती दररोज कामावर येऊ लागली होती.मुलगी सासरी व मुलगा व नवरा गावी असतात एवढेच तिने मला सांगितले होते. इथे ती कुठल्यातरी पाहुण्याकडे राहत होती. "तुमचे पैसे फिटले की मी माझ्या गावाला परत जाईल" असं ती मला सांगायची.कारण कोरोनामुळे त्या तिघांचीही कामं गेली होती
दोन-तीन महिने झाले असतील.एक दिवस दुपारी अचानकपणे सुनिताचा नवरा माझ्या घरी आला.मी आणि मिस्टर दुपारचा चहा घेत बसलो होतो.मला वाटलं इथे आला म्हणून सुनितानेच भेटायला पाठवले असेलं त्याला. मी त्यालाही चहा दिला.सुनिता इथे काम करते हे त्यांना माहीत असावं असं मला वाटत होतं.म्हणून मी ही जास्त काही बोलले नाही. थोड्यावेळानंतर त्याने आपल्या खिशातून पैसे काढले व माझ्याकडे देतं मला म्हणाला"हे घ्या ताई,तुमचे पैसे.तुम्ही तेव्हा आम्हाला खूप मदत केलीत.तिला तुमच्या घरी काम करायला फार आवडयचं.शेवटपर्यंत ती तुमचे पैसे फेडण्यासाठी धडपडत होती पण ते तिला काही जमले नाही.तुमच्या त्या कर्जातचं गेली बिचारी."
" म्हणजे? मी बुचकळ्यात पडले होते.सुनिता तर माझ्या घरी कामाला येत होती आणि हा काहीतरी वेगळेच सांगत होता.
"अहो,ही तीन चार महिन्यांपूर्वी घडलेली घटना.ती जंगलात लाकूड फाटा आणायला गेली. पण दोन दिवस झाले तरी परत आली नाही म्हणून तिला शोधायला आम्ही पूर्ण जंगल पिंजून काढलं.ती काही सापडली नाही पण एका झुडपात अडकलेली फाटलेली तिची साडी मात्र सापडली.कदाचित चित्त्याची शिकार झाली असावी."
माझ्या पायाखालची जमीन सरकायला लागली. गेल्या तीन महिन्यांपासून तर सुनीता माझ्या घरी कामाला येत होती.मग ती मेली कशी असनारं. आम्ही दोघं एकमेकांकडे पाहू लागलो. तसा सुनिताचा नवरा म्हणाला"नशिबाचे भोग दुसरं काय?पण हे तुमचे पैसे परत केले नाही तर तिच्या आत्म्याला शांती मिळणार नाही. तेव्हा तुम्ही नका म्हणू नका. पैसे ठेवून घ्या."
'अरे पण सुनिता तर; मी हे बोलत असतानाच मिस्टरांनी डोळ्यांनीच मला नको बोलूस असे खुणावले.मी शांत बसले. सुनिताचा नवरा पुढे बोलू लागला."कोरोनामुळे लाॅकडाऊन झाले आणि आमच्या तिघांचीही कामं सुटली. गावाकडे काम मिळेना. रिकामं डोकं सैतानाचे घर असं म्हणतात. मला दारू प्यायची खूप सवय लागली. मी दिवस-रात्र दारूमध्ये असायचो. ती मला खुप समजवायची. मिळतील तेथे कामं करायची. काटकसर करून तुम्हाला देण्यासाठी पैसे वेगळे ठेवायची पण मी मात्र दारूला पैसे पुरले नाही की तिला मारून तिच्याकडून ते पैसे काढून घ्यायचो. मी तिला खूप त्रास देत होतो हे मला कळतं होतं. पण दारूचा अमल असला की माझं मलाच भान राहायचं नाही.ती गेली आणि त्या धक्क्याने माझी दारू ही सुटली. मी ठरवलं पडेल ती कामे करायची पण तिला ऋणातून मुक्त करायचं आणि आज तुमचे पैसे घेऊन आलो आहे. नका म्हणू नका तिच्या आत्म्याला शांती मिळू दे.उपकार होतील तुमचे." तो रडत रडत सांगत होता आणि मी सुन्नपणे सगळं काही ऐकून घेतं होते. तो पुढे म्हणाला"माणूस आपल्या पासून दूर गेल्यावरचं त्याचं खरं महत्व कळतं. किती धडपडायची संसारासाठी आणि आम्ही मात्र तिला त्रास द्यायचो. जाऊ दे झालं ते झालं.आता पश्चाताप करून काय फायदा."तो काही वेळ शांत बसला.हॉलमध्ये भयाण शांतता पसरली होती. कुणीही काहीही बोलत नव्हते.काही वेळाने तो उठला आणि "येतो" म्हणून निघून गेला. मी मात्र तशीच उभी होते मंत्रमुग्ध होऊन. माझ्या मेंदुत मुंग्या यायला लागल्या. सुनिता जर मेली असेल तर माझ्या घरी येते ती कोण आहे? गेली तीन महिने ती माझ्याकडे काम करतेय. पैसे फिटल्यावर गावी जाईन अशी ही म्हणत होती. म्हणजे माझ्या घरी येते ती सुनिता पैसे फेडण्यासाठी........ पुढे मला विचार करवेना. अंगावर सरसरून काटा उभा राहिला. बापरे एवढे दिवस! आता काय करायचे.ती तर आपल्याला काहिही त्रास देत नाही. छान पहिल्यासारखीच गप्पा मारते, दिलं ते खाते माझ्या हातचा चाहाही आवडीने पिते. मग????????????या मगसाठी माझ्याकडे काही उत्तर नव्हते."आपण उद्या तिलाच काय ते विचारू" असे म्हणून मिस्टरांनी माझे सांत्वन केले. आता आम्हाला उद्यापर्यंत तिची वाट पाहायची होती. पण तिला घरात कसं घ्यायचं हाही एक प्रश्न होताच पण"ती आपल्याला काहीही त्रास देत नाही मग आपण घाबरायचं कशाला"असं मिस्टरांनी सांगितले.एवढे दिवस कितीतरी वेळा मी तिच्या जीवावर माझ्या मुलांना सोडून नौकरीला,बाहेर गेले होते. त्याची मला आत्ता भीती वाटत होती.काय करावं काही सुचत नव्हतं. मुलांनी ते सगळं हसण्यावारी नेलं तिचा नवरा खोटं बोलत असावा असं मला मुलं सांगत होती. पण तो खोटं का बोलत असावा? सुनिता इकडेच आहे आणि आपल्या घरी कामाला येते हे त्याला माहीत नसावं का? की त्याच्या दृष्टीने ती खरंच मेली असावी ?याचे उत्तर मला सापडत नव्हते आणि खरं बोलत असेल तर?ती रात्र अशीच तळमळत गेली.
सकाळी सुनिता घरी आली तेव्हा आम्ही सगळेजण तिच्याकडे संशयाने पाहू लागलो.भुताविषयी ऐकलेले किंवा टीव्हीवर पाहिलेले सगळे पडताळे तिच्यावर अजमावून पाहू लागलो. तिचे पाय उलटे आहेत का ?नाही.तिचे डोळे मोठे मोठे आहेत का? नाही.भुताची कुठलीच लक्षणे तिच्यात दिसत नव्हती. आम्ही सगळे तिला विचित्रपणे न्याहाळत होतो हे ती पाहत होती. शेवटी तिच म्हणाली "काय चाललंय तुमचं? असं काय बघताय माझ्याकडे?"
"काही नाही ."म्हणून आम्ही शांत बसलो पण आम्हाला शांत बसवेना शेवटी मिस्टरांनी तिला सांगितले"काल तुझा नवरा आला होता घरी, पैसे देऊन गेलाय आमच्याकडे."
"काय म्हणाला ?मी मेलेय असं सांगितलं असेल ना?"
"हो,पण असं का? म्हणजे????
"मी भूत आहे असं म्हणायचंय का तुम्हाला?ती जोर जोराने हसू लागली.म्हणूनच तुम्ही सगळेजन असे विचित्रपणे बघताय माझ्याकडे?ताई तुम्ही कधीपासून विश्वास ठेवताय या सगळ्यांवर?
"अग,पण हे सगळं काय आहे?" मी पुरती गोंधळले होते.
"अहो ताई, इकडे लाॅकडाऊनमुळे सगळं बद झालं म्हणून आम्ही गावी गेलो पण आम्हाला तिथेही कामं मिळेनाशी झाली. शहरातून आलोय म्हणून आम्हाला कोणीही काम देत नव्हते. कितीही सांगितलं तरी सगळे संशयाने पाहायचे.सुरुवातीला गावच्या लोकांनी तर आम्हाला गावातच घ्यायला नकार दिला होता. पण गावात आमचेही घर आहे आणि आम्ही आमच्या घरात राहणारच असं म्हणून आम्ही आमच्या घरात राहायला गेलो. पण वाळीत टाकल्यासारखी आमची स्थिती झाली होती. कोणीही आमच्याशी संबंध ठेवायला तयार होत नव्हते.काम मिळत नाही या तनावाखाली हा माझा नवरा दारू पिऊ लागला होता.त्याला कितीतरी वेळा समजावलं पण तो ऐकायला तयार होईना. जास्तच दारू प्यायला लागला. पुढे मला छोटी छोटी शेतातली कामं मिळायला लागली. घरातली कामं करायला मात्र कोणी घरात घेत नव्हते.मला तुमचे पैसे परत करायचे असल्याने मी थोडे थोडे पैसे बाजूला ठेवत होते पण माझा नवरा मात्र ते पैसेही माझ्याकडून हिसकाऊन घ्यायला लागला.नाही दिले तर जीवे मारण्याची धमकी देऊ लागला.मी या सगळ्याला कंटाळले होते. यावर काहितरी उपाय केला पाहिजे असे बरेचं दिवस मनात चालले होते पण काय करावे ते सुचेत नव्हते.एके दिवसी अचानक एक आयडिया सुचली आणि फोन करू इथे राहतं असलेल्या पाहुण्यांशी संपर्क साधला आणि माझी राहण्याची काही दिवसांची व्यवस्था होते का? हे विचारले. त्यांनीही "हो" म्हणून सांगितले मी इकडे आहे हे नवर्याला समजले असते तर त्याने इकडे येऊनही मला त्रास दिला असता. म्हणून मी एक शक्कल लढवली जंगलात फाटे जमा करायला जाते म्हणून गेले आणि इकडे निघून आले. येताना अंगावरचे जुनी साडी एका झुडपाला फाडून लटकवली त्यामुळे नवऱ्याला मी मेली असा गैरसमज झाला व त्यामुळे मला सुखाने राहता आले.पाहून्यांनाही "मी इकडे आहे असं कुणाला समज देऊ नका "असं सांगून ठेवलं. त्यामूळे त्याला माझी कुठलीही बातमी लागली नाही. मला मात्र त्यांची सगळी माहिती मिळायची. काही दिवस दुसरीकडे कामं केली पण पैसा काही पुरायचा नाही म्हणून तुमच्याकडेच काम करायचे असे मी ठरवले आणि मी तुम्हाला भेटायला आले. आता तुमचे पैसे फिटले की परत जाईन तेव्हा नवऱ्याला सगळं सांगेन.भूतं बितं कुठे राहतील वो ताई ?इथं माणसांनाच जमीन पुरत नाही तर.
आम्ही सगळे तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागलो.तिने सांगितलेली जीवनगाथा ऐकून मन भरून आले. मी तिला म्हणाले"बस झालं.फिटले माझे पैसे जा आता घरी आणि सुखाने रहा.बिचारा नवरा कावराबावरा झालाय बघ तुझ्या शिवाय.तिही सुरेख हासली.
नंतर आम्ही तिच्या नव-याला बोलावून सुखद धक्का दिला.त्याला सगळी हकीकत सांगितली.पुढे दारू पिऊन तिला त्रास न देण्याचं वचन घेतले. त्यालाही अचानक मिळालेल्या सरप्राईजमुळे कस रियाक्ट होऊ हे कळतं नव्हते. तो आणि त्याचा मुलगा आनंदाने वेडे झाले होते.
"एवढा मोठा धक्का बसल्यावर मला परत बायकोला गमवायचे नाही.मी तिला आता कुठलाही त्रास देणार नाही." असे त्याने कबूल केले .
काही दिवसांनंतर तिघांनाही आहेर करून त्यांच्यां घरी पाठवले आणि पैशाची कथा संपली.

लता भुसारे ठोंबरे