Kalal Ekdach books and stories free download online pdf in Marathi

क...ळलं एक.....दाचं

क.......ळलं एक.........दाचं
सौ.लता भुसारे ठोबरे
मी शाळेतून रुमवर आलो तर महे दादा आगुदरंच रुमवर येऊन खुर्चीवर,एक पाय वर घेऊन आनी एक पाय खाली सोडून डोक्याला हात लावून बसले होते.जनू काही सर्व जगाचे ओझे त्यांच्यावरंच असावे असा त्यांचा चेहरा पडला होता.जसं काही ट्र्प तात्यानं फोन करून त्यांना जगावरील एखाद्या मोठ्या संकटावर उपाय मागितला होता आनी आजी बिचारी एका कोनंट्यात आवघडून उभी होती.ती मला राज ठाकरे समोर उभ्या असलेल्या एखाद्या भय्यासारखी वाटली.मला बघताचं दादा घाईघाईनं उठले आनी मला म्हणाले "ये माध्या ठेवं रं ते दप्तर आन् चल बिगिनं"
"कुटं जायचं?"
"तुला कशाला चौकशा,गोसायाच्या शेंडीची चौकशी कशाला करायची,चल मनलं चलायचं" दादा रागानं बोल्ले. तसी मही जीब टाळूला चिटकली.दादा समोर कोण बोलनार?आमचं दादा मनजे जमदाग्नीचा आवतार.राग आला तर एका घोटात गावची नदी पिऊन घेतील.
"शाळेचे कपडे तेवढे बदलतू"मी टाळूची जीब बळचं खाली ओढून दादाला इचारलं"
" काई बदलायचे नाई.तुला कोन बघतय तिथं?चल मनल चलायचं."
मव्हा नाईलाज झाला.तसं शाळच्या कपड्यावरंच मी दादाच्या माघं माघं आज्ञाताची यात्रा करायला निघालो ऐखाद्या मेलेल्या आत्म्याने यमामाघ निघावं तसं.मला वाटलं आता मला एखादी सावित्री पाईजे होती.मनजे तिनं मव्हा आत्मा यमरुपी दादाच्या तावडीतून सोडिवला असता.मनाचं काय? ते काय बि करू शकतं.त्याला कोनाचं बंधन!आता इथ तं आता तिथ असतं.दादाने आपल्या मोटरसायकलरुपी रेड्याला किक् मारली आनी मी मागे बसलो की खालीचं आहे हे न बघताचं भर्रर्रर्र शंभराच्या स्पिडनं दामटवली.मी बिचारा त्या गाडीच्या वा-यावरचं दादाच्या माघ उडतं उडतं निघालो.
काही अंतर गेल्यावर एकदम दादाच्या मनात काय आलं काय माईत?त्यांनी गच्चकन गाडी थांबवली.तसं मव्हं हवेत उडनार शरीर पटकन गाडीवर येऊन आपटलं.शरीरातून हडानी आवाज केला.पण मी त्यांचा आवाज मधल्या मधीचं दाबला.तोडांतून बाहेर आला असता तर दुसरी उरलेली हाडबी दादानं शहीद केली असती.शाहान्या योध्द्यासारखी मी माघार घेतली.शिवाजी महाराज ही असेचं करायचे.असं मी चौथीत वाचलं होतं.याला गनिमी कावा म्हणतात.
"त्या सीतीचं घर माहिती हाय का बे तुला?दादाने ईचारलेल्या प्रश्नाने मला दरदरून घाम फुटला.सीती मनजे मह्या वरगातली महिवाली अँटम होती.दादाला आमचं लव कळलं की काय?आता आपलं काई खरं नाई.तिच्या घरी नेउन तिच्यासमोर मारायचा पिल्यानत् नाई नव दादाचा. हिरोचा असा अपमान! काय करायचं?मला काईच सुचना
"कशाला पाहीजे तुमाला?दादाला कळालं बिळालं नाई ना. हा प्रश्न मला परेशान करायला लागला.
" चौकशा कशाला करतो रे,इचारलं तेवढं सांगत जा की! दादानं मह्याकडं रागानं बगितल्यासारखं मला वाटायला लागलं.मी मटकन खाली बसलो,महे सगळे कपडे घामानं ओले झाले आणि चड्डी दुस-या कारणानं ओली होती की काय असं वाटयला लागलं.
"अरं सांग की,असं एकदम गप्पगार झालास तो.मला सांगितलं भावड्यानं संगळं." दादा बोल्ले.
"हो,मी मान हलवूनच सांगितलं.तोडातून एकबी शब्द पडना.
या भावड्याला कोनं आगावपणा सांगितला होता काय माहीत?मोठा भाऊ मनून मनातलं जरा काय सांगितलं तर ,यानं दादापसूर गेला.मी बि सांगू का आता याच बी पिरेम हाय कुणावर तरी मनून?आपल्याला माईची शपत घालतोयं. अन् स्वता ............. मला भावड्याचा लई राग येऊ लागला.
भावड्या मव्हा मोठा भाऊ,एवढं दिवस तो बी आमच्यासंग रुमवरचं राहायचा .यावर्षी बारावी झाली आणि तो एकाच्या ओळखीन मुंबईला एका कंपनीत कामाला लागला होता.
"अरं बस की आता गाडीवर,की खातू एक थोबाडीत."या दादाच्या बोलन्यानं मी भानावर आलो.दादाच्या माग गपं गुमान बसून राहीलो.सीतीच्या घरी दादा मला मारतायत आनी सीती हासतेय.असं चित्र मला दिसू लागलं.आता सीतीच्या समोर दादा मारतील की काय?लई अपमान होईल मवा.गाडीऊन उडी मारू की काय?पर तंगडी बिंगडी मोडली तं दादा परत लई कुटतील मला.गाडीने परत १००चा स्पिड घेतला अन् माझ्या ईचारानंबी.
माग लई दिसापूर्वी एका दिवशी मी शाम्याकडं अभ्यासाला गेलू होतू तिथं अभ्यास करायचा सोडून आमी दोघं बी फ्रेंडी की ब्रेंडी नावाचा पिचर पाहतं बसलो.त्यातलं ते पोरगं शाळतं शिकत असताना वर्गातल्या की साळतल्या पोरीवरचं पिरेम करीतं होतं.मला लई भारी वाटलं.मगं मी बी ठरवलं आपण बी पिरेम करायचं.पण कोनावर करनारं?वर्गातली एकबी पोरगी भीक घालीना.मी बी इरेलाचं पेटलो आणि मला त्यातल्या त्यात सीती बरी वाटली.अन् सुरू झालं आमचं एका बाजूचं पिरेम!!!!!.त्याचं धुंदीत मी अन् मव्हा दोस्त तिच्या मागं मागं तिच्या घरापतूर गेलो होतो.तिन मातर आमाला कधीचं भाव दिला नाही.मी हे सगळं भावड्याला सांगितल होतं.अन् भावड्यानं दादाला.
"अरं माध्या,ती सीती तुह्याचं वर्गात हाय नव्हं.दादानंं गाडीवर बसल्या बसल्या दुसरा बाँम टाकला.मनजे दादानं
सगळी माहिती काढली वाटतं.आता आपलं काही खरं नाई.लई मार बसंल आपल्याला.काय करु ?मारू का उडी गाडीवरून?पन गाडीवरुन उडी मारली मनजेबी लई लागलं आपल्याला.मनजे दोनी बाजूला मारचं आहे तर. पर दादाचा कमी असलं गाडीपेक्षा.पन अँटमसमोर मार म्हणजे. त्यापेक्षा गाडीवरुन उडीच मारलेली बरी.मी मनातल्या मनात हनुमानाचं नाव घ्यायला सुरुवात केली.हनुमान उडत येऊन वाचवित असतो मन भगताला.असं मला एकदा पक्यानं सांगितलं होतं.मी पक्यासोबत एक-दोन शनिवार हनूमानाच्या मंदीरात गेलो होतो. तेवढ्या ओळखीवर मारूतीन वाचिवलं तर बरं होईल.पन दादाची गाडी तर लई जोरात धावत होती. काय माईत हनुमान इतका फास्ट उडलं का नाही?जाऊदे काईबी हो आता उडी मारायची मनजे मारायची.मी दादाच शर्ट सोडून उडी मारनार तेवढ्यात दादानं परत एकदा गच्चकन ब्रेक दाबून गाडी थांबवली.तसं मी ठरवलं आता भूईईईईईईईईईईईई पळायचं.पन तेवढ्यात दादा बोल्ले"सीती आपल्या पावन्यातलीचं नवं?भावड्या बोल्ला तसा.तिच्या घराविषयी तुला सगळं माहीत आहे.असं भावड्यानं मला सांगितल.मनून मनलं एकदा पाहूण तर घ्यावी पोरगी.पुढचं पुढं."
मनजे,दादाला हे सगळं मान्य आहे तर मी उगीचं उडी मारत होतू गाडीऊन.मी मनातल्या मनात मारुतीला हात जोडले.आता सीती आपली बायकू होईलं मनून आनंदान नाचायला लागलो.मह्या मनात लाडू फुटायला लागले.मनाला लईचं गुदगुल्या व्हायला लागल्या.मला दादा जवळ आहेत याचं भानच राहील नाही.मी एकदम हसायला लागलो, नाचायला लागलो.मह्या सगळ्या अंगात इज चमकू लागली. लईचं काईतरी होऊ लागलं.हे बगून दादा मह्यावर ओरडलं "काय करतोस बे?बाजारात राहील्या तुरी अन् भटभटनीला मारी तसी गत झाली तुही.चल बस गाडीवर गपगुमान,नाईतर खाशील एक.तसं मी माझं हे सगळ होनं आवरतं घेतलं.राग आला तर दादा परतायचे इथूनचं.कशाला आ बैल मुझे मार!
मला लई मनी सुचू लागल्या वरगात बाई इचारतात तवा कुटं जातात काय माईत?मी गुपगूमान दादाच्या माग दादाला धरून गाडीवर बसलो.
आम्ही सीतीच्या घरी गेलो तर तिथबी आम्ही येनार म्हणून माहीत झालं होतं.सीतीच्या बापानं आमचं स्वागत केलं.मी त्यांच्या पटकन पाया पडलो.आता सासरे होनार मनल्यावर इतक तं करावचं लागनार ना.दादानं मह्याकडं लई आश्चर्याने पाहीले.आतापर्यंत मी कधी त्याच्या पाया पडलो नव्हतो.पण ते काय महे सासरे थोडेचं होते.त्यानी आम्हाला खूर्चीवर बसायला सांगितलं.मला लई लाज वाटू लागली. साडी घातली नवती मनून नाईतर मी तोंडावर पदरच ओढला असता.मी सीतीला हळूचं वाकून पाहू लागलो पन ती काय मला दिसतं नव्हती.लाजून लपली असलं?पन तिची बहीण दिसली ऐकदाची. तिनं साडी घातली होती.सीतीची आई मात्र स्वंयपाकघरात काहीतरी करत होती.मी त्यांच्या पायाच पडलो नाही असं मह्या ध्यानात आलं तसं मी पटकन जाऊन त्यांच्या पाया पडलो.या अचानक झालेल्या हल्यानं त्या लई दचकल्या अन् त्याच्या हतातला सराटा मह्या डोक्यात पडला. लई लागलं,खोचचं पडली असलं पर सासूच्या पाया न पडून कसं चाललं?"अव पावन, लागलं की ओ,कशाला पाया पडताय?आमी पोरीकडचं"हे सासूचे शब्द एकून मला लई भारी वाटायला लागलं.लागलेलं सगळं मी इसरून गेलो.दादा मात्र मह्याकडं खाऊ की गिळू असं पाहू लागले."दादाला माईत नसावं का की सासु सास-याच्या पाया पडावं लागतं." घरी गेल्यावर सांगतो त्यांना.पण ह्या टायमाला मला दादाचा लई राग येत होता.कारण ते मला पोरगी पहायला घेऊन आले होते आनी मला शाळेच्याच कपड्यावर आनलं होतं.सीती आता नटुन थटून येईल,अन् मी आपला असाचं गबाळा.काय वाटलं तिला.मला लाजल्याऊन लाजल्यासारख झालं.
दादा आनी सीतीचे बाबा गप्पा मारन्यात दंग झाले होते.
मी मात्र सीती भाईर कवा येते मनून डोळे तिच्या वाटकडं लावून बसलो होतो.कवा,कवा तर"ऊठून मधी जाऊ की काय?"असं वाटतं होतं.पन मी स्वतला आवरलं होतं.असं वागन आता जावाई मनून शोभलं नसतं.मी बसल्या बसल्याचं दादाच लक्ष नाही असं पाहून घरातं वाकून पाहू लागलो.पन सीती काई दिसना.लई तगमग होऊ लागली पाण्यातून बाहेर काढलेल्या माशासारखी.दादाला त्याचं काहीचं नव्हतं.ते आपल्या गप्पात पार बुडून गेले होते.
लई टाईम वाट पाहिल्यावर सीती आनी तिची बहीन चहा पोहे घेउन बाहेर आल्या एकदाच्या.सीतीबी साळच्याचं कपड्यातं होती.तिच्या बहीनीनं तेवढी साडी घातली होती. मनजे दादानं मला मुद्दामचं साळचं कपडे बदलू दिले नसतील त्यांना दोघायला साळच्या कपड्यात बघायचं आसलं.मी लईचं बावरलो होतो.एकबी पोह्याचा घास मह्या तोंडात जात नव्हता.सगळे पोहे खालीचं सांडू लागले.काय करावं ते समजचंना?शेवटी पोहे खाणंच कँन्सल केलं.चहा बी घेतला नाई.तसाचं सीतीकड पाहतं बसून राहिलो.दादानं प्लेटातले सगळे पोहे संपवले मग सीतीला "मी साळतं कसा वागतो?अभ्यास बाभ्यास करतो की नाई?हे सगळं इचारलं. तिनं बी लई चांगलं चांगलं सांगितलं मह्याविषयी.आता बायकूचं तं नव-याला साभाळून घेतं असते.खरं मनजे दादानं प्रश्न इचारायला पाहीजे होते सीतीला.तुला स्वयपाक येतो का?गाण मनती का?ते सोडून मह्याविषयीचं इचारतं बसले.
मी तर लई मनजे लई मनजे लई खुश होतो.कारंजाचे घडच्या घडं फुटतं होते मह्या मनातं.हे असं सगळं इतक्यात होईल असं कवाचं वाटलं नव्हतं मला.मी भावड्याला शंभरदा तरी Thank you मनालो होतो मनातल्या मनातं.थोडा वेळ झाल्यावर आम्ही घरी निघालो.सीती आम्हाला बाहेर पर्यंत सोडायला आली होती तिच्या बाबासोबत.आम्ही दिसेस्तोओर टाटा करत होती आम्हाला.मला तिला सोडून घरी यावचं वाटतचं नव्हतं.पन आता काही दिवसच तिच्यापासून दुर राहवं लागनार होतं.एकदा लग्न झालं की आम्ही दोघं सगळीकडे सोबतचं असू.घरी सोबत,शाळतं सोबत,शाळत जाताना सोबत,येताना सोबत.मजाचं मजा.लई मनजे,लई मनजे,लई मनजे लई भारी वाटतं होत.मी आता नवरदेव होनार होतो,घोड्यावर बसनार होतो,आम्हाला मुंडावळ्या बांधल्या जानार होत्या.सगळे मित्र मैत्रिणी लग्नाला येनार होते.पण ज्या पोरींनी मला लव करायला नकार दिला त्यांना बोलवायचं नाही असं मी ठरवलं होतं.लग्नात आपन सासू सास-यांवर रूसायचं नाही.ते ताटाला जे वटकन लावतील ते मुकाट्यानं घ्यायचं.कपडे पन सीतीच्या आवडीचे.इथून पुढं सगळं सीती मनीन ते. दादाची गाडी गच्चकन थांबली तस मी मह्या इचारातून बाहेर आलो.ह्या इचारात असतांना आम्ही घरी कधी पहोचलो ते मला कळालंचं नाही.मी गाडीवरून पटकन उडी मारली व पळतं जाऊन आजीच्या पाया पडलो.ते पाहून दादा आजीला म्हणालं"आज हे मसनीचं पायाचं पडातयं सगळ्याच्या.तिथंबी असचं करतं होतं खुळ्यावानी.तशी आजी हसतं हसत मह्याकड पाहत मनाली."मग,कसी वाटली वैनी?"
"वैनी?कोणाची?मी बुचाकाळ्यात पडलो.तसं आजीनं मला इचारलं"आरं मंग कशाला गेला होतास बापासंग, भावड्याला बायकू पाहायलाचं नं,की नुसते पोहे खालास अन आलास?"
"बरी हाय बग पोरगी,ह्याच्या वर्गातल्या सीतीपेक्षा दोन तीन वर्षान मोठी.उरकू मंग भावड्याचं यंदा"दादा आजीला मनालं आनी मह्या डोक्यात आता खपकन उजेड पडला. मनजे आमी सीतीच्या बहीनीला बघायला गेलो होतो तर! आनी मी उगचं बेजार होतं होतो सकाळपासून मव्हा दिल लई खळळळळळळळळळकन तुटला.अन पाहिलेली सगळी सपनंबी.............
इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED