*चेहऱ्यावर हसु आणि डोळ्यात पाणी आहे*
आम्ही एकाच कॉलनीत राहतो. मी तिच्यापेक्षा तीन वर्षाने मोठा आहे. मी जेव्हा जेव्हा तिच्या घरासमोरुन जात असतो, तेव्हा तेव्हा ती माझ्याकडे बघत असते. मला वाटतं तिचं माझ्यावर प्रेम आहे. ती दिसायला सुंदर आणि स्वभावाने तर खुपच चांगली आहे, मला ही ती खुपच आवडते पण, सर्वात मोठी अडचण काय आहे माहीती आहे का?. ती माझ्या बेस्ट फ्रेंडची सखी बहीण आहे. पण मी तिला खुप आवडतो, जेव्हा मी माझी आंघोळ वगैरे आवरुन बाहेर येतो, तोपर्यंत ती मला पाहण्यासाठी दारात उभी असते. जोपर्यंत मी बाहेर येत नाही आणि मला एकदा बघत नाही तोपर्यंत ती कॉलेजला जात नाही. तिथेच उभी असते. कॉलेजला जातावेळी पुन्हा पुन्हा वळून मागे पाहत असते मग मी संध्याकाळी निवांत जेव्हा बालकनीत येतो तेव्हा ती बाहेर उभी राहुन माझी वाटचं बघत असते की, कधी मी एकदा येईन आणि तिच्याकडे माझी एक नजर वळवून पाहिन. मी तिच्याकडे पाहिल्यावर मग ती दुसरीकडे बघत असल्याचं नाटक करायची. "गेली ६ महिने मी तिला टाळत आलोय तिच्याकडे न बघणं, तिच्यापासून लांबलांब पळणं माझं चालूच होतं. कारण मी ठरवलं होतं की "काही झालं तरी मित्राच्या बहिणीशी मी कसं काय प्रेम करु, मी मित्राला कसं काय धोका देऊ शकतो? नाही नाही हे कधीच होऊ शकत नाही.”
माझे सिद्धांत मला याची अजिबात परवानगी देत नव्हते म्हणूनचं मी तिला अशा प्रकारे टाळाटाळ करत होतो. पण तरीही ती न डगमगता माझ्यावर अशीच प्रेम करत होती माझ्याकडे सतत पाहायची आमच्या घरी येण्याची सतत बहाणे शोधायची, आमच्या घरच्यांची आणि त्यांच्या घरच्यांची चांगली ओळख होती ना म्हणुन तिच्या याच प्रेमासमोर माझे सिद्धांत विरघळले गेले, हळूहळू खुपच प्रेम करु लागलो होतो मी ही तिच्यावर. मग मी तिच्या त्या घायाळ करणाऱ्या नजरेत इतका बुडालो कि मी ही तिच्याकडे सारखासारखा बघू लागलो, आणि तिला कसं ही करुन प्रपोझ करायचं ठरवलं, मी एक चिट्ठी लिहून पुस्तकातल्या एका पानात घडी घालून ते पुस्तक (थोडं घाबरतच) तिच्याकडे एका लहान मुलगीद्वारे पाठवुन दिलं पण ते तसंच परत आलं. ती लहान मुलगी म्हणाली की ती दीदी म्हणाली हे पुस्तक तिचं नाही. मी ते पुस्तक परत घेतलं कदाचित तिला कळलं नसावं कि यात मी तिच्यासाठी चिठ्ठी ठेवलयं. ते मग यानंतर अशीच दोन वर्षे गेली मी त्यानंतर फेस टु फेस तिला प्रपोझ करायचं ठरवलं, पण मी खरोखरच या आधी कोणत्याही मुलीशी कधीच बोललो नव्हतो, मग मला हे जमेल कसं कारण माझ्यात फारच कमी कॉन्फीडंट होता, त्यामुळे मी सोबत प्रेमपत्रही लिहून घेतलं, आणि ते खिशात ठेवलं जर मी तिला बघितल्यावर जर काहीच बोलु शकलो नाही तर किमान हे पत्र तर तिच्या हातात देईन, ठरल्याप्रमाणे मी तिच्या घरात कोणीही नसताना गेलो.
माझ्या मित्राचं एक गाण्याचं कॅसेट माझ्याकडे होतं ते देण्याचा बहाणा करुन मी तिच्या घरात गेलो ती एकटीच होती, मला पाहून ती थोडी दचकलीच, मी तिला हे कॅसेट दिलं, आणि म्हणालो हे सुशीलला(तिचा भाऊ, माझा मित्र) कॅसेट द्यायला आलोय ते तिनं घेतलं. मी थोडावेळ तिच्याकडे तसंच पाहत राहीलो, माझं शरीर थरथरत होतं भीतीने, तिने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाली "तुला काही बोलायचंय,”
"नाही, नाही मला काय बोलायचं असेल" असं मी म्हणालो आणि तिथुन लगबगीने निघालो. खुपच घाबरलो होतो मी.. खुप काही सांगायचं होतं, शब्द ओठापर्यंत येत होते पण बाहेरच पडले नाहीत. मी आरशासमोर उभा राहीलो, मी माझ्या आत्तापर्यंतच्या घेतलेल्या निर्णयांचा आढावा घेण्याचं ठरवलं, सर्व गोष्टींचा सर्व बाजूनी विचार करण्याचं मी ठरवलं, तिला प्रपोझ केल्यावर तिने जरी माझं प्रेम स्विकारलं तर, आमचं भविष्य काय असेल? काय तिचा भाऊ म्हणजेच माझा मित्र मला तिचा नवरा म्हणून स्वीकारेल, तर उत्तर येत होतं नाही.. तो मला स्वीकारणार नाही. उलट तो मला धोकेबाज म्हणेल, मी तिच्या मनाचा ही विचार केला मी तिला नाही म्हटलं तर काय होईल..? तिला दुःख नक्कीच होईल पण ते तात्पुरतं असेल, पण नंतर ती मला कदाचित विसरेल आणि तिचं लग्न झाल्यावर तिच्या घरी ती नक्कीच सुखी राहील. तीन तासांनी मी एका निर्णयावर येऊन पोहोचलो, मी तिला विसरण्याचा निर्णय घेतला, मला या निर्णयाने खुप रडू आले, मी गपचुप बाथरुममध्ये जाऊन रडु लागलो, तोंडावर रुमाल धरुन हूंदके देऊन रडत होतो. काही दिवसांनी तिचं लग्न झालं. नवरा मुलाची खुपच मोठी शेती, गडगंज पगाराची नोकरी होती त्याला मनात एक समाधान होतं आणि एक दुःख ही, डोळ्यातील आसवांप्रमाणे मनातील आठवणी पुसता आल्या असत्या तर किती बरं झालं असतं नाही. आज ती तिच्या संसारात सुखी आहे आणि तिच्या सुखात मी ही.
शेवटी मैत्री जिंकली आणि प्रेम हारलं.
सुखी राहावं तिने, जिथे असेल ती,
ही एकच इच्छा माझ्या मनी आहे,
ती माझ्यापासुन दुर जाताना आज चेहऱ्यावर हसु आणि डोळ्यात पाणी आहे.