सावर रे.... - 1 Amita Mangesh द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

सावर रे.... - 1

सावल्या फुलांच्या, पावले ही फुलांची,
वाट हळवी वेचताना सावर रे ए मना

सावर रे सावर रे,
सावर रे, एकदा सावर रे ।।

सावल्या क्षणांचे, भरून आल्या घनांचे
थेंब ओले झेलताना सावर रे ए मना सावर रे सावर रे

सावर रे एकदा सावर रे ।।

         गाणे गुण गुणत ती किचन मध्ये काम करत होती. नाजूकशी, सुंदर, चंचल, मृगनयनी. आवाजात गोडवा आणि चेहऱ्यावर आनंद. रोजच अशीच छान दिसायची पण आज तिच्या चेहऱ्यावर अलौकीक तेज दिसत होतं. आज जरा जास्तच खुश दिसत होती. तिची आई किचन बाहेरून तिला गुंनगूनताना पहात होती. आपल्या मुलीच्या चेहऱ्यावरील आनंदाने ती मनोमनी सुखावली होती.

आई..."हम्म आज कोणी तरी खूपच खुशीत दिसतंय हं"

आईला अचानक पाहून ती दचकली आणि आई काय म्हणाली यावर हलकेच तिच्या गालावर गुलाबाची फुले उमलली…."काय ग….आई तू पण ना."

आई... "अरे माझं बाळ लाजलं…"
ती हळूच तीच्या आईच्या कुशीत सामावली.

आई..."तू मला अशीच आवडतेस ग बाळा सतत हसत रहा, खुश रहा."

आईचे डोळे पाणावलेले पाहून ती म्हणाली,
"काय झाले, तू का रडतेय आई?"

आई..."मी नाही रडत बाळा आता थोड्याच दिवसात तू सासरी जाशील ना मग मला अस रोज तुझं गोड गोड बोलणं तुझं गाणं म्हणणं अस कुशीत शिरण नाही भेटणार ना."

ती..."मग का पाठवतेस मला तुझ्या पासून दूर? मी नाही जाणार, इथेच राहीन तुझ्या जवळ."

आईला तिच्या मनातलं माहीत होतं म्हणून मुद्दामहून तिला चिडवण्या साठी त्या म्हणाल्या...."अच्छा तर मग मी सांगू का माईंना तसं."

ती ....."अग नको नको मी तर.... "
    मधेच आपण काय बोललो म्हणून हळूच दातात जीभ चावत खाली मान घालून तिने सरळ तिच्या रुम मध्ये पळ काढला.

आई तिला अस पाहून अजूनच हसू लागली.

        ती तिच्या रुम मध्ये येऊन तिच्या फोन मधील फोटो कडे पाहून गोड लाजत म्हणाली,
"       किती वाट पहायला लावशील रे, ये ना लवकर. आज येशील ना तेंव्हा तुला छान सरप्राईज मिळेल. तुला न पहाता एकेक क्षण कसा जगले मलाच माहीत. खूप वाट पाहिली तुझी आता आलास ना की तुला दूर कुठेही जाऊ देणार नाही. माझ्या जवळ ठेवेन. कायम. कारण आता तू माझा होणार आहेस. फक्त माझाच यश."
        
        यश तिचा बालपणीचा मित्र, तीचं प्रेम, तीच सर्वस्व. तारुण्यात पहिलं पाऊल टाकलं तेंव्हा पासून फक्त त्याच्या वर प्रेम केलं तिने. आई वडील मोठा भाऊ नितीन आणि यश हेच तिचं जग.

        ती म्हणजे जाई….अगदी जाईच्या फुला सारखी नाजूक आणि सुंदर. स्वभावाने खूप शांत समंजस मुलगी, साधी पण सुंदर, नाजूक आकर्षक, पण तितकीच हळवी. पाणीदार काळेभोर डोळे, पहाताना कुणालाही त्यात बुडून जावेसे वाटेल असे, बोलके मात्र ती थोडीशी लाजाळू. न बोलता समजून घेणारी आणि कधीही कुणाला दुखवण्याचा विचारही न करणारी, मध्यमवर्गीय घराण्यातील एक राजकुमारीच होती ती. तळतावरच्या फोडा प्रमाणे तिला तिच्या आई वडिलांनी आणि भावाने सांभाळले होते. तिला कसल्याही गोष्टीची कमी नाही पडू दिली. परंतु त्याच सोबत बहुमूल्य संस्काराची शिकवण द्यायला ही ते कमी नव्हते पडले.
        
       बहुगुण संपन्न अशी जाई कोणाचेही मन जिंकून घेई. तिचा मनमिळाऊ आणि शांत स्वभाव पाहून माई म्हणजेच यश च्या आईने तिला मनोमनी आपली सून मानले होते. त्याना सगळे प्रेमाने माई म्हणत. यश पण कधी कधी लाडात त्याना माई म्हणायचा.
       
         नितीन आणि यश दोघेही एकाच शाळेत एकाच वर्गात शिकत होते. एकाच एरियात रहात असल्याने त्यांचे एकमेकांच्या घरी येणे जाणे तसे रोजचेच होते. जाई तशी थोडी अबोली होती मात्र यश ने तिला बोलत केलं होतं. तो प्रत्येक वेळी तिला प्रोत्साहन देत रहायचा, अभ्यासात मदत करायचा आणि खूप काळजी पण घ्यायचा. जाई मनोमनी त्याच्यावर प्रेम करत होती आणि त्याच्या डोळ्यात ही तिला तिच्या बद्दल प्रेम दिसत होते. घरच्यांनाही त्यांच्या एकमेकांच्या बद्दलची काळजी आणि ओढीची कल्पना होती.      मुलांच्या मैत्री मुले दोन्ही परिवार एकत्र आले होते, आणि आता हे मैत्री संबंध यश आणि जाईच्या लग्नाने नात्यात बदलावे अशी सगळ्यांची इच्छा होती.
     
        यश एम बी ए करायला परदेशी गेला होता. तिकडेच त्याला एक छान जॉब मिळाला तो सलग चार वर्षाने भारतात परत येणार होता. तो आल्यावर त्याच्या समोर दोन्ही परिवार त्याच्या आणि जाईच्या लग्नाचा प्रस्ताव मांडणार होते हेच होतं त्याच सरप्राईज. नितीन ही एका कंपनीत चांगल्या हुद्यावर काम करत होता. तर जाईच्या कॉलेज ला अजून एक वर्ष बाकी होत. त्या नंतर तिने फॅशन डीझायनर चा कोर्स करायचा ठरवला होता पण यश सोबत लग्न झाल्यावर. पहिली प्रयोरिटी नेहमीच यश असायचा. मनोमनी किती तरी वेला जाईने तुच्या आणि यश च्या भावी आयुष्याची स्वप्ने पहिली होती.
        
        संध्याकाळ झाली जाई सुंदर फिक्या आकाशी रंगाचा फ्लोरल ड्रेस घालून तयार झाली. तिला वेगळा असा काही मेकअप करायची आवश्यकता नव्हती. ती साधी च खूप सुंदर दिसायची आणि आज तर तिच्या चेहऱ्यावर लाजेची लाली पसरली होती म्हणून ती अधिकच सुंदर दिसत होती. आज यश च्या येण्याच्या खुशीत तिला आणि तिच्या फॅमिलीला यश च्या घरी जेवणाचे आमंत्रण होते. जाई च्या घरा पासून काही अंतरावर यश चे घर होते. दोन्ही परिवार खूप आनंदात होते. जाई आणि तिची आई आल्या आल्या किचन मध्ये माईंना मदत करायला गेल्या. दोन्ही परिवार नेहमी एकमेकांच्या घरी येत जात असत. त्यामुळे पाहुणे पाहुणचार न पाळता अगदी एकाच फॅमिली सारखे मिळून मिसळून रहात असतत्. यश ची बहीण सारिका पण मध्ये मध्ये लुडबुड करत होती. मधूनच तीच जाईला चिडवणे पण चालूच होते. जाई पण ते एन्जॉय करत होती. आजचा बेत सगळा यशच्या आवडीचा होता. सगळी कामे उरकून आता यश कधी येतोय त्याच्याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले होते.
     
        नितीन यश ला घ्यायला एअरपोर्ट वर जाणार होता. तर सरीकाने पण मुद्धाम त्याच्या सोबत जाण्याचा हट्ट केला.

सारिका…"नितीन दा, मी पण येणार दादाला घ्यायला तुझ्या सोबत."

नितीन… "तू कशाला येतेय आता बघ खूप अंधार झालाय मी लगेच जाऊन येतो तू थांब घरीच."

सारिका … "नाही मी पण येणार तुझ्या सोबत,"
हळूच त्याच्या जवळ जात त्याला म्हणते…."तुला कळत कसं नाही रे,"
"अरे मी आले तरचं जाई ला पण सोबत येता येईल ना."

      मग नितीन ला कळत हिच्या डोक्यात काय आहे ते

नितीन.. "बरं चल पण मग जाई ला पण घे सोबत ती एकटी तरी काय करेल इथे थांबून."

     नितीन असं म्हणतात जाईच्या चेहऱ्यावर सुंदर अशी स्माईल आली आणि सगळ्यांनी हे नोटीस केलं. सगळेच खुश झाले. नितीन, जाई आणि सारिका एअरपोर्ट कडे निघून गेले.
      
        इकडे सगळे यशाच्या येण्याची वाट पहात होते. माईंचे डोळे दारावर खिळले होते. शेवटी एक आईच ती राहून राहून दारामागून काही आवाज येतोय का याचा कानोसा घेत होती. तितक्यात बाहेरून गाडीचा आवाज आला तसे सगळेच उत्सुक होऊन दाराकडे पाहू लागले. माई तर धावतच दार उघडायला गेल्या. माईंनी दार उघडताच जाई लगेच आत आली सगळ्यांपासून नजर चोरत सरळ किचन मध्ये गेली. सारिका नितीन समोर उभे होते दोघांचे चेहरे पडले होते. माईंच्या काळजात चर्रर्र झाले त्या काही बोलणार तर नितीन आणि सारिका लगेच बाजूला झाले. माईंनी भरल्या डोळ्यांनी समोर पाहिले तर त्यांच्या तोंडातून एकच शब्द निघाला, "यश".......

क्रमश.......


रेट करा आणि टिप्पणी द्या

Usha Wagh

Usha Wagh 8 महिना पूर्वी

Amita Mangesh

Amita Mangesh मातृभारती सत्यापित 8 महिना पूर्वी

छान

Manju

Manju 8 महिना पूर्वी

Payal Karlekar

Payal Karlekar 8 महिना पूर्वी