मागील भागात,
माईंच्या काळजात चर्रर्र झाले त्या काही बोलणार तर नितीन आणि सारिका लगेच बाजूला झाले. माईंनी भरल्या डोळ्यांनी समोर पाहिले तर त्यांच्या तोंडातून एकच शब्द बाहेर पडला "यश…."
"यश...."म्हणत माईंनी त्याला दारातच मिठी मारली आणि त्यांचे डोळे आपोआप आपल्या मुलाच्या येण्याने आनंदून बेधुंद वाहू लागले.
यश ची अवस्था पण काहीशी तशीच होती. खूप मिस केलं होतं त्याने त्याच्या आईला. त्याचे ही डोळे पाणावले होते. मुलं कितीही मोठी झाली तरीही त्याना आईच्या कुशीत जे समाधान मिळतं ते कदाचित स्वर्गात पण नसावं. त्याने आईला मिठीत घेऊनच विचारले... "कशी आहेस तू आई?"
माई… "मी बरी आहे रे आता तू आलास ना मग तर आणखीच बरं वाटतंय."
त्यांचा बाजूने नितीन आणि सारिका आत आले तरीही माई तिथेच उभ्या होत्या म्हणून मग यश चे बाबा पुढे येऊन म्हणाले,..."अग आता त्याला आत घेणार आहेस की तिथेच ठेवणार दाराबाहेर?"
माई थोडं सावरत,...."अरे हो मी पण ना… ये बाळा आत ये"
यश पण भावुक झाला होता.आत येता येता तो मागे वळून म्हणाला,...."एलेना प्लिज कम इनसाईड."
त्याच्या बोलण्याने सगळ्यांनीच आश्चर्यकारक त्याच्या पाठी पाहिले तर एक सुंदर अशी मुलगी त्याच्या पाठून समोर आली. एखाद्या मॉडेल सारखी दिसत होती ती. तिने आत येताच आपले दोन्ही हात जोडून सगळ्यांना म्हणाली..… "नमस्कार."
सगळ्यांच्या चेहऱ्यावर आता ही कोण? यश सोबत कशी? असे अनेक प्रश्न दिसून येत होते.
दोघे आत आले कोणी काही विचारणार तर मधेच यश म्हणाला…. "आई ही तुझी सून. एलेना."
माई जोरात धक्का लागला सारख्या मागे सरकल्या पण सारीकाने त्याना आधार दिला आणि तूर्तास तरी तू शांतच रहा अस सांगितलं.
माई प्रमाणेच सगळेच शॉक मध्ये होते . जाईच्या आईला डोळ्यासमोर काळोख पसरल्या सारखा वाटत होता. त्याना त्यांची जाई समोर दिसू लागली. ती हसत हसत रडताना दिसत होती.
सगळ्यांनी तिची विचारपूस केली.एलेना त्याच्या बॉसची मुलगी. दोघे एकाच प्रोजेक्ट वर काम करता करता जवळ आले आणि एकमेकांच्या प्रेमात पडले होते.
अस काही होईल कोणीही कल्पना केली नव्हती. सगळ्यांना आपण खूप मोठा गुन्हा केल्या सारखं वाटत होतं. आता यश ला काय सांगायचे आणि जाईला कसं सामोरं जायचं अश्या विचारात गढून गेले. एका क्षणा साठी सगळं शांत झालं होतं
यश ला ही थोडं वेगळं वाटलं. सगळेच असे शांत बसल्याने तो गोंधळला आणि विचारू लागला…" काय झालं सगळ्यांना असे का गप्प बसलात?"
जाई किचन मधून पाणी घेऊन आली आणि ट्रे यश समोर धरत म्हणाली…. "तू अचानक एव्हढी गोड बातमी देऊन जे सरप्राईज केलंस ना त्याचा परिणाम आहे हा हे घे पाणी."
तिने दोघांना पाणी दिले आणि हसतमुखाने सगळ्यांना विचारले ...."तुम्हाला कोणाला पाणी हवंय का?" सगळे तिच्या हसऱ्या चेहऱ्याकडे पहात होते. पण तिच्या मनात कसले द्वंद्व चालू असेल याची कल्पना यश आणि एलेना सोडून सगळ्यांना होती.
नितीन पण तिच्या अश्या वागण्यावर खूप अचंबित होता. काही वेळा पूर्वीचा काळ त्याच्या नजरे खालून एखादया चलचित्रा सारखा सरकून गेला. जेंव्हा ते तिघे एअरपोर्ट वर यश ला घ्यायला गेले होते. जाताना वाटेत सारिका आणि नितीन ने जाई ला यश वरून खूप चिडवले होते. तिचे गाळ लाजेच्या रंगाने लालबुंद झाले होते. आपल्या बहिणीला खुश पाहून नितीन पण खूप सुखावला होता. त्याला यश वर विश्वास होता. त्याच्या बहिणीला जीवापाड जपेल तो याची खात्री होती. परंतु यश समोर येत असताना त्याच्या हातात एलिना चा हात पाहूनच नितीन च्या पायाखालची जमीन सरकली होती. सारिका पण स्थब्ध होऊन पहात होती. आणि जाईच्या काळजाचे तुकडे तुकडे होऊन गेले होते. ती फक्त पहात होती. समोरून येणाऱ्या यश च्या हातातील एलिनाच्या हाताकडे. आणि डोळे काठोकाठ बघून आले होते. यश जवळ येत असल्याचे पाहून नितीन ने जाई ला सतर्क केले. तिनेही लगेच डोळे पुसून छान अशी स्माईल चेहऱ्यावर खिळवली. त्या वेळी नितीन वेदनेने कळवळला होता. पण तरीही काहीच झाले नाही असा आव आणून तो शांत होता.
आता तीच सगळ्यांची परिस्थिती झाली होती म्हणून त्याने सगळ्यांना डोळ्यानेच शांत रहा असे दटावले. मग सगळेच नॉर्मल असल्या सारखे भासवत बळे बळे हसू लागले. यश सगळ्यांच्या पाया पडला. सगळ्यांनी त्याला आशीर्वाद दिले. त्याची विचारपूस केली. एलेना पण सगळं मन लावून पहात होती. तिला हे सगळं नवीन होतं. नितीन मध्येच म्हणाला... "यश तुम्ही दोघे थकला असाल प्रवासातून जा आधी फ्रेश होऊन या मग बोलत बसू."
यश पण हो म्हणून निघाला तर एलेना त्याच्या मागोमाग येताना पाहून तिला हळूच म्हणाला…. "एली प्लिज गो विथ सारिका." तीने त्याच्या कडे आश्चर्याने पाहिले पण तिला पुढे काही ही बोलून न देता सारिका ला तिला आत ने अस सांगितलं.
सारिका… "हो, प्लिज कम विथ मी एलेना, धिस वे.."
एलेना..."या आफ्टर यु डिअर."
तिने फक्त एकदा यश कडे नाराज होत पाहिलं आणि ती सारिका सोबत गेली.
यश त्याच्या रूम मध्ये गेल्यावर नितीन ने सगळ्यांना समजावले…. "हे बघा तुम्ही सगळे टेंशन घेऊ नका. सध्या जे काही आहे ते मान्य करण्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही सो जे होतंय तस होऊद्या. यश ला काहीच सांगू नका."
तो बोलत होता तोवर त्याची आई किचन मध्ये गेली आणि पहाते तर जाई जेवण वाढण्याची तयारी करत होती. ती शांत होती कसलेच भाव नव्हते तिच्या चेहऱ्यावर. तिच्या मनात काय चालू आहे हे कोणीही वाचू शकत नव्हते.
आईने तिला हाक मारली… "जाई"
जाई…." हम्म बोल ना आई, काय हवंय का तुला?"
आई…. "तू ठीक आहेस ना बाळा?"
जाई किंचित हसत..."अग मी ठीक आहे मला काय झालंय?"
आणि तिने आईकडे पाहून एक स्माईल दिली.
तिची ती स्माईल आईच्या काळजाला लागली आणि दोन थेंब तिच्या डोळ्यातून ओघळले.
जाई तिच्या जवळ आली आणि तिचे डोळे पुसत म्हणाली… "तू नको रडू ग, मी ठीक आहे आणि आता."
आई तिला म्हध्येच टोकत म्हणाली…. "अग पण …."पुढे काही तिला बोलताच येत नव्हतं.
जाई…. "आई, हे बघ चूक आपलीच आहे ना. आपण त्याला गृहीत धरून चाललो होतो. त्याच मत कोणी विचारलं होत का? मग आता त्याचा नकार आपल्याला मान्य नको का करायला. तसही तो त्याचा जागी बरोबर आहे. आपणच चुकीचा अर्थ काढला."
आई मनातच म्हणाली माझी नका एव्हढी पोर एवढी मोठी कधी झाली कळलंच नाही मला. किती हा समंजसपणा.
जाई नजर चोरत चोरत तिला म्हणाली… "आणि तसही मला तुला सोडून कुठेही जायचं नव्हतं. मग बरंच झालं ना."
आईने तिला मिठी मारली आणि कुशलतेने तिने डोळ्यातलं पाणी लपवून आईला हसून दाखवलं.
जाई… "आता तू गप्प बस नाहीतर बाबा मला ओरडतील का माझ्या बायकोला रडवलं म्हणून."
आई हळूच हसत… "तू ना नाटकी आहेस एकदम चल मी मदत करते तुला."
दोघी पंगत पडायची तयारी करत होत्या. तर हॉल मध्ये सगळे गूढ विचारात हरवले होते. नितीन फक्त बोलत होता.
नितीन…"बाबा, माई काका जे झालं ते एक स्वप्न होत जे अपूर्ण राहील आहे तेंव्हा त्याची चर्चा करण्यात काही अर्थ नाही. आपण मोठ्या मनाने यश च्या भावनांचा आदर केला पाहिजे. कोणाला कल्पना होती असं काही घडेल. पण जे आहे ते सत्य नाकारता येत नाही ना."
काका... "नितीन अरे तू बोलतोय ते खरं आहे पण…"
माई… "पण माझी जाई कशी राहील रे त्याच्या शिवाय? आपणच त्या पाखराला स्वप्न दाखवली होती."
यश चे बाबा…. "हो ना आणि आपणही किती स्वप्न पहिली होती." डोळ्यात पाणी आणत ते जाई च्या बाबांना दोन्ही हात जोडून म्हणतात…. "जयंता माफ कर रे मला, माझ्याच मुले आपल्या पोरीच्या आयुष्यात आता दुःख आले आहे ."आणि त्यांना मिठी मारून रडू लागतात. जाईचे बाबा त्यांची समजूत घालत म्हणतात…. "अरे रमेश असा काय करतोस तू? अरे काही गोष्टी आपल्या हातात नसतात रे. जे व्हायचं होत ते झालं त्याचा विचार करून आणि दुःख करून काही फायदा होणार आहे का? ह्या क्षणी जे समोर आहे त्याचा विचार कर."
तितक्यात यश मस्त फ्रेश होऊन हॉल मध्ये आला त्याची चाहूल लागताच सगळे सावरून बसले. यश ने माईंच्या पायाजवळ बसून तिच्या मांडीवर डोकं ठेवलं. ती पण त्याचा केसात हात फिरवत होती.
जरी मनात भावनांचे वादळ उठून सगळेच अस्थाव्यस्त पडले होते तरीही आपल्या मनाची कवडे बंद करून जे ते आपली दुःखे लपवण्याचा प्रयत्न करत होते. यश मात्र अनभिज्ञच होता. तो फक्त आईच्या प्रेमळ स्पर्शाला मनात साठवत होता. इतक्या दिवसांची ओढ त्याला माई पासून वेगळं होऊ देत नव्हती. तो त्याच्याच विश्वात सगळ्यांना आजवर त्याने परदेशात काय काय केले कसा राहिला हे सांगत होता. घरातील सगळे त्याच्या बोलण्यात आपण पण सामील आहोत हे भासवत होते. जेवणाची तयारी झाली तशी जाई आणि तिची आई सगळ्यांना जेवणासाठी बोलवू लागली. तितक्यात एलेना पण फ्रेश होऊन आली. तिने गुढग्याच्या थोडे खाली येईल असा फ्लोरल वनपीस घातला होता. तिच्यारहाणीमानाबद्दल सगळ्यांना कल्पना होती म्हणून कोणीही काहीच आक्षेप घेतला नव्हता पण त्याना नवीन असल्याने थोडे अवघडल्या सारखे झाले होते. यश ने काय समजायचे ते समजले. त्याला तीच असं शॉर्ट कपडे घालून आलेलं आवडलं नव्हतं. खरं तर त्याचाही तिला विरोध नव्हता पण इकडे त्याच्या मिडलक्लास फॅमिली मध्ये असे कपडे घालण्याची पद्धत नव्हती. म्हणून त्याने तिला आधीच जिन्स किंवा लॉंग ड्रेस घालायला सांगितले होते. जेणे करून घरच्यांना विचित्र वाटणार नाही. तो तिला काहीच बोलला नाही पण त्याला ते आवडले नव्हते.
जाईच्या आईने आवाज दिला ..." चला आता जेवायला आज काय गप्पांनी पोट भरणार आहेत का?"
यश..."नाही हो आई आलोच मला तर खूप भूक लागलीय."
सारिका..."हो पोटभर खाऊन घे आज सगळा तुझ्या आवडीचा बेत केलाय आईने."
यश..."अच्छा मग वाट कशाची पहायची चलो तूट पडो."
सारिका आणि जाई ने खाली पंगत बसण्यासाठी चटई अंथरली.
एलेना…" हे काय आहे, जेवण तर डायनिंग टेबल वर करतात ना?"
आता डायनिंग नव्हता अश्यातली बाब नाही पण आज दोन्ही फॅमिली एकत्र होत्या म्हणून ते भारतीय पध्दतीने पंगतीत जेवणार होते.
यश… "धिस इस द ट्रॅडिशनल स्टाईल एली. भारतात असेच खाली बसून जेवतात."
एलेना… "बट आय कान्ट...."
माई तिला मधेच थांबवत…. "तू इथे बस. म्हणून तिला खुर्ची आणून देतात. जाई आणि सारिका वाढण्याचे काम करतात तर बाकी सगळे पंगतीत जेवणाचा आस्वाद घेत असतात. एलेना एक बाजूला बसून जेवता जेवता सगळं पहात असते. जेवण उरकून सगळे हॉलमध्ये गप्पा मारत असतात तर जाई आणि सारिका किचन आवरत असतात.
यश चे बाबा..."अरे यश तू आलाच आहेस लग्न करून तर मला वाटते जवळच्या नाते वाईक बोलवून छोटेसे रिसेपशन ठेवू या का?"
यश थोडा हसत म्हणतो… "अहो बाबा अजून लग्न नाही केले मी."
सगळे आश्चर्यचकित होतात आणि त्याच्या कडे पहातात."
त्याचे बाबा अविश्वासाने म्हणतात..."काय?"
यश..."अहो बाबा तुमच्या शिवाय मी लग्न करेन का? मी तिला आपलं घर आणि तुम्हा सगळ्यांना पहाता भेटता येईल या हेतूने इथे आणलं आहे आणि राहील लग्नाचं तर आजून थोडा वेळ आहे. माझं काम तिकडच सगळं आवरून आता भारतात यायचं आहे. कायमचं. माझ्या माई जवळ."
सगळ्यांना आनंद होतो. फक्त एक व्यक्ती सोडून. ती म्हणजे एलेना. माई तर त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवून बोटे मोडतात.
मध्येच पाणी हवंय म्हणून यश किचन मध्ये येतो. जाईला काम करताना पाहून बोलतो… "अरे जाई… कशी आहेस?"
जाई एकदम त्याचा आवाज ऐकून थोडी दचकते, तिचे हृदय जोराने धडधड करू लागते. आता पर्यंत तिने स्वतःला त्याच्या पासून लांबच ठेवले होते. कदाचित त्याच्या समोर गेल्यावर तिच्या भावनांनी त्यांची कैद तोडून यश कडे धाव घेतील असे तिला वाटले. कसे बसे त्याच्या पासून नजर चोरत ती म्हणाली..."अं… मी ठीक आहे."
यश…. "अगं आल्या पासून पहातोय तू कामच करतेय मला भेटली पण नाही."
जाई… "नाही रे अस काही नाही ते तू आणि माईं बोलत होतात ना तेंव्हा म्हटलं हे काम आधी आवरून घ्यावं म्हणून…"
सारिका सगळं संभाषण ऐकत होती. तीला जाईची अवस्था माहीत होती. परिस्थिती सांभाळून घेत ती म्हणाली....." दादा तू का किचन मध्ये आलास…. काही हवंय का."
यश... "नको मी पाणी न्यायला आलो होतो. बरं तुम्ही दोघी या बाहेर तुमच्या साठी सरप्राईज आहे."
सारिका खुश होत... "काय खरच दादा? लगेच आले बघ हे आवरून . पाचच मिनिटं."
यश… "बरं, आणि जाई कडे पाहिलं तर ती त्याच्याकडे पाठ करून उभी होती. त्याला थोडं विचित्र वाटलं, ही जाई अशी का करते?असं मनातच बोलून तो बाहेर गेला. मात्र जाईला त्याच्या समोर स्वतःला सावरने कठीण होत होते."
रात्रीचे दहा वाजले होते.सगळे हॉल मध्ये बसले होते. जाई आणि तिची फॅमिली आता निरोप घेऊन जायला निघाले तोच यश ने त्याना थांबवून त्यांच्या साठी आणलेले गिफ्ट दिले त्याने न चुकता सगळ्या साठी काहींना काही आणलं होतं. मनात इच्छा नसतानाही जाईला ते गिफ्ट घ्यावं लागलं. तिने काहीही न बोलता तो बॉक्स घेतला. यश तिला गिफ्ट देताना मुद्धाम तिचा चेहरा वाचण्याचा प्रयत्न करत होता मात्र तिने शिताफीने निरंकार चेहरा ठेवून त्यालाच बुचकळ्यात टाकलं होतं आणि सगळ्यांनाचा निरोप घेऊन तिच्या घरी निघून गेली.
एलेना पहिल्यांदा भारतात आली होती. तिचे आई वडील महाराष्ट्रीयन असले तरी ते कायमचे परदेशी स्थायिक झाले होते. एलेना चा जन्म पण तिकडचाच. तिच्या वडिलांचा बिजनेस आता एलेना पहाणार होती. तिला फ्री रहायची सवय होती. तोडकं मोडकं मराठी बोलता येत होतं तिला पण इकडचे रीती रिवाज संस्कृती काहीच माहिती नव्हती. यश ने तिकडे असताना तिच्यावर कोणतीही बंधने लादली नव्हती मात्र भारतात वेगळं वातावरण वेगळी संस्कृती आहे त्या प्रमाणे तिने स्वतःला बदलावे असे यश ला वाटत होते.परंतु आपले रहाणीमान सोडायला एलेना तयार नव्हती. तसही तिला ते अवघड झाले असते. यश ने सरळ भारतात रहाण्याची इच्छा व्यक्त केली
रात्र खूप झाल्याने माईने सगळ्यांना झोपायला सांगितले. एलेना आणि सारिका तिच्या रूम मध्ये गेल्या तर माई यशच्या रूम मध्ये जाऊन त्याच्या केसांत तेल लावू लागल्या. त्यांची बोटे केसात फिरत असताना यश ला छान झोप लागते
पण इकडे जाईसाठी आजची रात्र खूप त्रासदायक ठरणार होती.
क्रमशः.....