बळी - १ Amita a. Salvi द्वारा साहसी कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

बळी - १

बळी -१
केदार सकाळपासून त्याच्या आॅफिसमध्ये काम करत होता, आणि आतापर्यंत बोअर झाला होता, आज. त्याचा जिवलग मित्र आणि बिझनेस पार्टनर सिद्धेश आला नव्हता. सिद्धेशच्या खळखळुन हसण्यामुळे एरव्ही ही खोली भरून गेलेली असायची! समोर आलेल्या फाइल्स कधी संपायच्या, हे कळत सुद्धा नसे!
कोणाची तरी चाहूल लागली, म्हणून केदारने दरवाजाकडे पाहिलं; त्याची नवपरिणित पत्नी रंजना आत आली! सकाळपासून त्या खोलीत बसून कंटाळेल्या केदारला ताज्या थंड हवेची झुळुक आल्यासारखं वाटलं.
रंजना आज आनंदात होती आणि प्रसन्न - हस-या चेह-यामुळे मुळातच अतुलनीय सौदर्य लाभलेली रंजना अधिकच सुंदर दिसत होती! केदारजवळ येऊन रंजना हसत हसत सांगू लागली,
" नेहा दीदीचा आईंना फोन आला होता! तिने आज रात्री आपल्याला डिनरसाठी बोलावलं आहे! तिचं अगोदर आईंशी बोलणं झालं; आईंची परवानगी मिळाल्यानंतर ती माझ्याशीही बोलली! "नक्की या" असं म्हणाली आहे! रंजनाच्या आवाजातील गोडव्याने केदार विरघळून गेला.
आजचा दिवस काही वेगळाच दिसत होता! एरव्ही घरात स्वतःच्या बंद कोशात वावरणारी रंजना आज मोकळेपणाने बोलत होती.
मुंबईत रंजनाच्या जवळच्या नात्यातलं असं नेहा दीदीशिवाय कोणीही नव्हतं. केदार म्हणाला,
"ती अधेरीला रहाते नं? आपण आज सिनेमा बघायला जाऊया का? 'नवरंग' थिएटरला अमिताभचा मस्त सिनेमा लागलाय! दीदीच्या घराच्या जवळच थिएटर आहे! " केदारने विचारलं.
"अमिताभ--- माझा फेव्हरिट आहे! नक्की जाऊया!" रंजना उत्साहाने म्हणाली.
तिच्या नजरेतील चमक पाहून केदार मनातल्या मनात हसला; ती दररोज सकाळी वर्तमानपत्रात सिनेमाच्या जाहिराती आवडीने पहाते; हे त्याच्या नजरेतून सुटलं नव्हतं; म्हणूनच त्याने हा सिनेमाला जायचा बेत केला होता! रंजना खुश दिसतेय, हे बघून आपली युक्ती कामी आली याचा आनंद त्याला झाल,; लगेच लॅपटाॅप बंद करत तिला म्हणाला,
" आज तुझ्या चेह-यावर हसू आहे! किती छान दिसतेयस! नेहमी अशीच रहा-- आमच्या घरात घाबरून रहाण्याचं काहीही कारण नाही! घरातली सगळी माणसं तुला समजून घेतील! खूप प्रेमळ आहेत सगळेजण! आणि माझी आई तर तुला आईचं प्रेम देईल; खूप मायाळू आहे ती! खरं म्हणजे इथे आल्यापासून तुला स्वतःला अनुभव आला असेलच; मी सांगायची गरज नाही!;" केदारचं बोलणं ऐकून रंजना थोडी गंभीर झाली आणि जमीनीकडे बघत, त्याची नजर चुकवत म्हणाली,
" केदार! गैरसमज करून घेऊ नकोस! मी माझ्या घरापासून इतक्या लांब आलेय! नवीन परिसर- अनोळखी माणसं--- तुमच्या घरातील सगळेच खरंच खूप छान स्वभावाचे आहेत! पण मला नवीन माणसांशी लगेच जवळीक साधता येत नाही! ---- थोडा वेळ लागतो --- मी मला जमेल तसं जुळवून घ्यायचा प्रयत्न करतेय! काही दिवसांचा प्रश्न आहे--- लवकरच सगळं नीट होईल! तुम्ही काळजी करू नका!"
लग्न ठरल्यापासून प्रथमच रंजना केदारशी इतक्या मोकळेपणाने बोलत होती. हे सुंदर क्षण संपूच नयेत असं केदारला वाटत होतं. तो आर्जवी नजरेने तिच्याकडे पहात तो म्हणाला,
" इथे बस!! थोडा वेळ बोल माझ्याशी!" समोरच्या खुर्चीकडे बोट दाखवत केदार म्हणाला. यावर त्याच्यापासून दूर जात , आणि लाघवी हास्य करत किचनकडे बोट दाखवत रंजना म्हणाली,
" खूप कामं पडली आहेत! आपल्याला संध्याकाळी जायचं आहे! पटापट रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी करून ठेवावी लागेल! तोपर्यंत तुम्हीसुद्धा तुमचं आॅफिसचं काम पूर्ण करून घ्या!"
रंजनाशी खूप बोलावं ; असं केदारला वाटत होतं; तिचा सहवास अधिक मिळावा या लालसेपोटी त्याने विचारलं,
"तीनच्या शो ला जाऊया का?"
"नको! मला तयारीला वेळ तर हवा ! संध्याकाळचा सहाचा शो ठीक आहे!" रंजना गडबडून म्हणाली.
"आपण जरा लवकर निघूया! तू वेळेवर तयार रहा! " केदार म्हणाला. पण तीनचा शो बघायला जाऊ असं म्हणताच रंजना एवढी भांबावून का गेली; हे त्याला कळत नव्हतं! --- आणि स्वयंपाकाचं काम तर अजूनही आईच तर सांभाळते! रंजनावर अजून तरी घरची कोणतीही जबाबदारी आईने टाकलेली नाही, हे त्याला माहीत होतं; पण त्याने मनातल्या प्रश्न रंजनाला विचारले नाहीत. वाद-विवाद करून त्याला तिचा मूड घालवायचा नव्हता!
" हो! नक्की! रंजना गोड हसून म्हणाली.
रंजना किचनकडे गेली ; आणि केदार लॅपटाॅप उघडून त्याचं काम पूर्ण करू लागला!
******
" आत येऊ का? तुझ्यासाठी काॅफी आणलीय!" मीराताईंचा आवाज ऐकून कामात गर्क झालेल्या केदारने चमकून दरवाजाकडे बघितले.
"अग आई! परवानगी काय मागतेस? ये नं आत! मी तर आज कोणी माझ्याशी बोलायला येईल; याची वाट बघतोय! आज सिद्धेश आला नाही! नीतावहिनीला आणि नंदनला घेऊन दोन दिवसांसाठी बाहेरगावी गेलाय! सकाळपासून एकट्याने काम करून कंटाळा आलाय!" केदार हसत म्हणाला.
केदारने काही महिन्यांपूर्वी एका मोठ्या कंपनीतील साॅफ्ट वेअर इंजिनियरची नोकरी सोडून सिद्धेशबरोबर पार्टनरशिपमध्ये कन्सल्टन्सी बिझनेस सुरू केला होता. सिद्धेश चार्टर्ड अकाउंटंट होता ; तर केदार काॅम्प्यूटर एक्स्पर्ट होता दोघेही मेहनती होते, आणि प्रामाणिक होते, त्यामुळे त्यांचा बिझनेस उत्तम चालला होता.
शेखरची -- केदारच्या वडिलांची नोकरी चांगली होती. गोरेगावला एक छोटा बंगला त्यांनी मोठ्या आवडीने घेतलेला होता. त्यांच्या मागे मीराताईंनी मोठ्या कष्टाने मुलांना वाढवलं होतं, खूप अडचणी आल्या; पण त्यांनी बंगला विकला नव्हता. या बंगल्यात शेखरच्या आठवणी होत्या! केदारने घरातील एका खोलीत आपले आॅफिस थाटले होते.
"आताच रंजनाच्या नेहा दीदीचा फोन आला होता! तुम्हाला रात्री जेवायला बोलावलंय! मी परस्पर होकार देऊन टाकला; पण नंतर विचार आला; --- खरं म्हणजे तुला अगोदर विचारायला हवं होतं! तुझं काही महत्वाचं काम असलं तर---- म्हणून तुला सांगायला आले! तुला जमणार नसेल, तर तसं तिला लगेच कळवावं लागेल!" मीराताईंच्या या बोलण्यावर केदार हसला आणि म्हणाला,
"काहीही अडचण नाही! मी आणि रंजना आज सिनेमा बघायला जाणार आहोत! 'नवरंग' थिएटर अंधेरीला तिच्या दीदीच्या घरापासून जवळच आहे! येताना नेहा दीदीकडे जाऊन मग घरी येऊ! मात्र घरी यायला उशीर होईल--- चालेल नं?"
"काहीही हरकत नाही! सावकाश या! रंजना आणि नेहाच्या गप्पा संपेपर्यंत निघायची घाई करू नकोस! तिचं मनही जरा मोकळं होऊ दे! इथे नवीन माणसांमध्ये गप्प - गप्प असते! " मीराताई समजूतदारपणे म्हणाल्या.
********
खरं म्हणजे केदारचं लग्न मीराताईंनी थोडंसं हट्टानेच जमवलं होतं! एकदा एका नातेवाईकांच्या लग्नाला त्या पुण्याला गेल्या होत्या. एका ओळखीच्या माणसाने रंजनाकडे त्यांचं लक्ष वेधलं. तिची खूप स्तुती केली!
"ही कारखानदार श्रीपतरावांची मुलगी! दिसायला कशी नक्षत्रासारखी आहे; तुम्ही पहातच आहात! फार शिकलेली नाही, पण मोठ्या घरातली चांगल्या संस्कारातली मुलगी आहे! तुमचं घर अगदी छान सांभाळेल!" ते मीराताईंना म्हणाले. काही वेळाने त्यांनी मीराताईंची श्रीपतरावांशी- रंजनाच्या वडिलांशीही ओळख करून दिली. श्रीपतरावांनी मीराताईंच्या कुटुंबाची चौकशी केली; आणि आपल्या गावी सहकुटुंब येण्याचं आमंत्रण त्यांना दिलं! श्रीपतरावांसारख्या मोठ्या आसामीचं स्थळ केदारसाठी येणं; ही मीराताईंसाठी अभिमानाची गोष्ट होती. मीराताईंना हे सगळं योगायोगाने घडतंय असं वाटत होतं; पण खरी गोष्ट वेगळीच होती! रंजनासाठी कोणीतरी केदारचं स्थळ सुचवलं होतं; त्यानंतर श्रीपतरावांनी केदारची पूर्ण चौकशी करून हे सगळं घडवून आणलं होतं.
मुंबईला आल्यावर त्यांनी रंजनाला पहायला जाण्यासाठी केदारच्या मागे लकडा लावला. देखण्या आणि हुशार केदारशी मैत्री वाढवायचा प्रयत्न काॅलेजमध्ये आणि आॅफिसमध्येही अनेक मुलीनी केला होता; पण कुटुंबाविषयी जबाबदारीची जाणीव असल्यामुळे केदार नेहमीच मुलींपासून दूर राहिला होता. उत्तम करिअर करून मगच लग्नाचा विचार करायचा; हे त्याने ठरवून ठेवलं होतं! पण त्याने नेहमीच त्याच्याप्रमाणेच उच्च शिक्षण घेतलेल्या शहरी रहाणीच्या स्मार्ट जीवन -संगिनीची स्वप्ने बघितली होती. जेव्हा रंजना फार शिकलेली नाही, हे त्याला कळलं; तेव्हा त्याने मीराताईंना समजावण्याचा त्याने बराच प्रयत्न केला, पण शेवटी आईच्या हट्टासाठी रंजनाच्या गावी जायला तयार झाला.
******** contd-- part 2