Victims - 4 books and stories free download online pdf in Marathi

बळी - ४

बळी - ४
बराच वेळ झाला, तरीही मिठाईचं एकही दुकान दिसेना. केदारच्या मनावरचा ताण प्रत्येक मिनिटागणिक वाढत होता. शेवटी त्याने चिडून विचारलं,
" राजेश! मिठाईचं एक मोठं दुकान दुकान जवळ आहे म्हणाला होतास नं? एवढा वेळ का लागतोय?"
"ते दुकान बंद होतं! दुसरं कुठे दिसतंय का-- ते शोधतोय! घाबरू नका! तुम्हाला परत सोडूनच मी जाईन!" राजेशने उत्तर दिलं; पण त्याचा आवाज बदललेला होता. आता त्याच्या स्वरात केदारला जरब जाणवली.
"यांनी मला किडनॅप तर केलं नाही---- पण मला पळवून नेऊन त्यांना काय मिळणार आहे? मी काही कोणी मोठा उद्योगपती नाही -- किंवा मोठा पैसेवाला माणूस नाही! " तो मनातून घाबरून गेला होता. आता त्याच्या लक्षात येत होतं; की दोघांचंही शरीर कमावलेलं होतं. दोघेही पेहेलवान म्हणून शोभले असते. दोघाशी दोन हात करणं सोपं नव्हतं! केदार फक्त त्या टॅक्सीतून बाहेर कसं पडायचं; एवढाच विचार करत होता. त्या दोघांच्याही डोळ्यात दिसणा-या लाल रेषा त्याच्या मनाचा थरकाप उडवत होत्या. सुरुवातीला जी आपुलकी ते दोघे दाखवत होते, तिचा आता मागमूसही त्यांच्या वागण्या- बोलण्यात दिसत नव्हता.
अजून अाॅफिस सुटायला वेळ होता. रस्त्यावर गजबज चालू झाली नव्हती. टॅक्सी संथ गतीने धावत होती. केदारच्या नजरेत एक मोठं मिठाईचं दुकान आलं. आणि तो ओरडला,
"राजेश! टॅक्सी थांबव! तिकडे समोरच्या रस्त्यावर 'शांतिलाल स्वीट्स'चं दुकान आहे! मी उतरतो!" त्याने दरवाजा उघडण्यासाठी हँडलवर हात ठेवला; पण टॅक्सी थांबली नाही; पुढे जात राहिली. उलट केदारला जाणवलं; की टॅक्सीचा वेग थोडा वाढला होता!
"टॅक्सी का थांबवली नाही? मला उशीर होतोय! तुझ्या टॅक्सीतून भटकायला मला वेळ नाही! मुकाट्याने गाडी थांबव! मला उतरू दे! " केदारने रागाने विचारलं.
"ते दुकान चांगलं नाही! पुढे बघूया!" ड्रायव्हर चिडून म्हणाला.
"मला चालेल! मी इथे उतरतो! टॅक्सी थांबव!" केदार म्हणाला.
पण ड्रायव्हर न थांबता गाडी चालवत राहिला. काहीतरी काळंबेरं नक्कीच होतं; पण केदार त्या दोन धटिंगणांमध्ये फसला होता! परिस्थिती त्याच्या हाताबाहेर गेली होती.
काही वेळाने एका सुनसान रस्त्यावर गाडीला अचानक् ब्रेक लागला; आणि मोठा गचके घेत गाडी थांबली. बाजूला मोठं मैदान होतं. अजून तिथे माणसांची वर्दळ चालू झाली नव्हती.
"इथे का थांबलायस? इथे मोठं मैदान आहे! दुकानं तर दिसतच नाहीत!" केदार आता मनातून घाबरला होता.
"तू फार प्रश्न विचारतोस! तुझ्या बडबडीचा आता कंटाळा आलाय! राजेश! ह्याला आता गप्प बसवावंच लागेल!" केदारच्या बाजूला बसलेला माणूस म्हणाला. दुस-याच क्षणाला त्याच्या हातात पिस्तुल चमकत होतं.
"तुमचं हे काय चाललंय-- आणि कशासाठी---मला कळेल का? आपण आयुष्यात कधी भेटलो नाही! माझ्याशी तुमची काय दुश्मनी आहे? मला जाऊ द्या--- सोडा मला! पैसे हवे असतील, तर हे पाकीट घेऊन टाका!" केदारला आता फक्त टॅक्सीतून बाहेर पडायचं होतं. ते पिस्तूल पाहिल्यावर खूप मोठं संकट आपल्यासमोर उभं आहे, याची जाणीव त्याला झाली होती.
ड्रायव्हर केदारच्या दुस-या बाजूला येऊन बसला.
"असं कसं जाऊ देऊ तुला? एवढं सगळं जमवून आणलंय; ते तुला सोडून देण्यासाठी? " तो दात - ओठ खात म्हणाला.
क्लोरोफाॅर्मचा गंध केदारला जाणवला. दुस-याच क्षणी एकाने त्याच्या कानाजवळ पिस्तुल टेकवलं होतं, आणि दुस-याने रुमाल त्याच्या नाकावर दाबून धरला होता!
त्या दोघांना कल्पना नव्हती; की केदार स्विमिंग चँमियन होता. श्वास बराच वेळ रोखून घरू शकत होता. त्याने बेशुद्ध झाल्याचं नाटक केलं. पिस्तुल बाळगणा-या या दोन आडदांड गुंडांपुढे आपली डाळ शिजणार नाही--- प्रतिकार करून काहीही उपयोग नाही याची पूर्ण कल्पना त्याला होती.
केदार बेशुद्ध झाला आहे; याची खात्री झाल्यावर राजेश परत त्याच्या ड्रायव्हिंग सीटवर जाऊन बसला; आणि टॅक्सी चालू झाली. थोडा वेळ गेला; टॅक्सी चालवून राजेश आतापर्यंत कंटाळलेला असावा! तो मित्राला विचारू लागला;
"काय रे दिनेश! हे पार्सल किती वेळ सांभाळायचं? कोणाच्या लक्षात आलं तर? अजून काळोख पडायला वेळ आहे." तो आता मनातून घाबरला होता.
"दुस-या साथीदाराचं नाव दिनेश आहे तर!" केदार स्वतःशी म्हणाला.
" हे थंडीचे दिवस आहेत! सहा वाजले; की अंधार पडायला सुरुवात होईल! नंतर काळोखात ह्याच्याकडे कोणाचं लक्ष जाणार नाही! तोपर्यंत रस्त्यावर स्लो - स्पीडने गाडी चालवत रहा. नाहीतरी अजून आपल्याला बरंच लांब जायचं आहे! " दिनेश म्हणाला.
" खूप जोखमीचं काम आहे! रस्त्यात पोलिसांनी अडवलं तर सहा वाजायच्या आधीच आपले बारा वाजतील! " ड्रायव्हर वैतागून म्हणाला.
मैत्रीखतर एवढी जोखीम तुला घ्यावीच लागेल! आणि त्यातही तुला दिलेली नोटांची गड्डी विसरू नकोस! एवढे पैसे आयुष्यात कधी एकत्र पाहिले नसशील! प्लॅन पूर्ण झाला, की आणखी मिळतील! तू तिथपर्यत नेऊन सोडलंस, की तुझं काम झालं! पुढच्या कामासाठी मदत करायला माझे दुसरे मित्र येणार आहेत!"
केदार गप्प डोळे मिटून त्यांचं सगळं बोलणं ऐकत होता. बहुतेक दिनेश या प्लॅनचा मास्टरमाइंड होता. इतका योजनाबद्ध कट कोणी आपल्याविरूद्ध रचू शकेल, यावर आजपर्यंत साधं- सरळ आयुष्य जगलेल्या केदारने कधीही विश्वास ठेवला नसता; पण सगळं नाट्य त्याच्या नजरेसमोर घडत होतं! तेही ध्यानीमनी नसताना ---अचानक्!
"पैशांसाठी किडनॅप केलं जातं, हे अजूनपर्यंत ऐकलं होतं! त्यांना पैसे नको आहेत ; तर काय हवंय? हे माझा जीव तर घेणार नाहीत--?" कल्पनेनेच केदारचा थरकाप होत होता
त्याच्या नजरेसमोर बाल्कनीत उभी राहून निरोप देणारी कीर्ती येत होती --- टॅक्सीतून उतरताना, "लवकर या, नाहीतर सिनेमाला उशीर होईल!" म्हणणारी साधीभोळी रंजना आठवत होती --- आणि आई? तिचं काय होईल? ती हा धक्का कसा सहन करेल?" त्याचा धीर आता सुटत चालला होता.
********

केदारला या सगळ्या प्रकाराचं खूप आश्चर्य. वाटत होतं. तो विचार करत होता, धागे जुळवण्याचा प्रयत्न करत होता.
" या दोघांना मी कधी पाहिलं नाही. माझ्या विरोधात एवढा मोठा कट करण्याचं कारण काय असावं? कोण आहेत हे दोघे? ही टॅक्सी घराजवळ उभी होती; म्हणजे ह्या लोकांनी माझ्यावर पाळत ठेवली होती!--- बरं झालं रंजना बरोबर नाही; ती तिच्या बहिणीकडे सुखरूप आहे! लग्नानंतर प्रथमच किती हौसेने आवडीचा सिनेमा बघण्यासाठी बाहेर पडली होती--- पण नवरा आता येतो; असं सांगून गायब झाला--- काय वाटत असेल तिला? आत्तापर्यंत हवालदिल झाली असेल! पण मी तरी काय करू शकतो? यांच्याकडे पिस्तुल आहे; त्यामुळे टॅक्सीत असेपर्यंत तरी असेच नाटक करत गप्प रहाणं योग्य होईल! शिवाय त्यांच्या बोलण्यातून हे सगळं करण्यामागे त्यांचा हेतू काय आहे; हे सुद्धा जाणून घेता येईल! बघूया पुढे काय करतात ते!" केदारचं विचारचक्र चालू होतं.
*******
काही वेळातच अंधार पडू लागला. केदारने डोळे किलकिले करून बाहेर नजर टाकली. टॅक्सी वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरून बोरीवलीच्या दिशेने चालली होती. घरापासून तो आता खूप लांब आला होता. हे सगळं कशासाठी चाललंय --- त्याला काहीच कळत नव्हतं. मस्तक सुन्न झालं होतं. मनात भीति घर करू लागली होती. ते दोघेही आता गप्प होते. त्यांच्या चेह-यावर ताण स्पष्ट दिसत होता.
थोडा वेळ गेला, आणि राजेश उद्गारला,
"बोरिवलीला पोहोचलो एकदाचे ! थोड्या वेळात आपण गोराई बीचवर पोहोचू! तुझी माणसं तिथे वेळेवर येतील नं?! " त्याने दिनेशला विचारलं,
"हो! त्याची काळजी तू करू नकोस! माझे मित्रच आहेत सगळे! ते तिथले स्थानिक लोक असल्यामुळे त्यांच्यावर कोणीही संशय घेणार नाही! आपल्याला मोठी लाँच लागेल! आणि विश्वासू माणसं! ही सगळी व्यवस्था ते करणार आहेत! आपलं काम झालं; की रात्रीच्या पार्टीचीही व्यवस्था केलीय त्यांनी! माझ्या मनात वेगळीच भिती आहे! गोराईच्या गेटजवळ मोठा पोलीस बंदोबस्त असतो. पोलीसांपैकी कोणी याला बेशुद्ध स्थितीत पाहिलं, तर मात्र वाट लागेल!" दिनेश काळजीच्या स्वरात म्हणाला.

*********** Contd. -- part 5.

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED