बळी -- ८
आज केदारला नशीबाची भक्कम साथ मिळत होती. इतक्या काळोखातही, कोणी तरी समुद्रात पोहून येत आहे, आणि हात हलवून मदत मागत आहे; हे शामने पाहिलं. दुस-याच क्षणी त्याच्या लक्षात आलं; की तो माणूस आता बुडणार आहे.
"अरे संदीप! तो माणूस बुडतोय बघ!" म्हणत त्याने केदारकडे इशारा करत पाण्यात उडी मारली, आणि पोहत केदारजवळ गेला; त्या वेळी केदारची शुद्ध पूर्णपणे हरपली होती.
शाम उत्तम पोहू शकत होता, पण बेशुद्ध केदारला धरून बोटीपर्यंत आणणं; त्याच्यासारख्या किरकोळ देहयष्टीच्या माणसासाठी सोपं नव्हतं. तो कसाबसा त्याला घेऊन बोटीजवळ आला, आणि तिथून ते दोघे मित्र मोठ्या जिकीरीने त्याला फुटपथपर्यंत घेऊन आले.
पण. फुटपाथवरील दिव्यांच्या उजेडात आल्यावर संदीप ओरडला,
"अरे शाम! ह्याच्या चेह-यावर रक्त ओघळतंय--- आणि तुझा शर्टही रक्ताने भिजलाय!" केदारच्या डोक्याला मोठी जखम झाली होती; हे पाहून तो पुढे विचारू लागला,
"याच्या डोक्याला मार कसा लागला? रक्ताची धार लागलीय! " रक्त बघून तो घाबरला होता. एकतर अनोळखी माणूस-- आणि जखमी --- नसत्या चौकशा मागे लागण्याची शक्यता होती.
" मला वाटतं, हा बराच वेळ पोहत असावा--- इतका वेळ-- की शेवटी त्याच्या अंगातली शक्ती संपली; आणि हात पाय चालेनासे झाले! हा जेव्हा बुडू लागला,, तेव्हा किना-याजवळच्या मोठ्या खडकावर डोकं आपटलं असावं! बहुतेक त्यामुळेच त्याची शुद्ध हरपली असावी! ह्याचं नशीब चांगलं होतं, की इतक्या रात्रीच्या काळोखात मी याला मदतीसाठी हात उंचावताना पाहिलं! आपण तिथे नसतो; तर याचं काही खरं नव्हतं!" शाम म्हणाला.
आजूबाजूला काही लोक जमले. गर्दीतून अनेक सूचना येऊ लागल्या,
"याला हाॅस्पिटलला न्यायला हवं!" गर्दीतून एकजण म्हणाला.
"पण त्याला हाॅस्पिटलपर्यंत न्यायचं कसं? गाड्या वेगानं पळतायत! कोणी गाडी थांबवेल, असं वाटत नाही! अॅम्ब्युलन्स यायला वेळ लागेल; आणि तोपर्यंत हा आणखी सीरियस होईल!" दुसरा एकजण म्हणाला.
" याचं नाव -गाव सुद्धा आपल्याला माहीत नाही. हाँस्पिटलमध्ये नेल्यावर प्रथम पोलीस केस होईल! असाच रक्तस्त्राव होत राहिला, तर चौकशी पूर्ण होईपर्यंत हा तग धरू शकेल की नाही---- सांगता येत नाही." शाम खूपच दयाळू हृदयाचा माणूस होता-- एका अनोळखी माणसाचीही त्याला एवढी काळजी वाटत होती! त्याने येणा-या एका टॅक्सीला हात केला.
टॅक्सी थांबली नाही; पण तिथली गर्दी बघून, आणि शाम टॅक्सी थांबवण्यासाठी हात उंचावत आहे, हे पाहून बाजूने जाणारी एक कार थांबली. आतून एक मध्यमवयीन गुजराथी दांपत्य उतरले. त्यांनी विचारलं,
"काय झालंय? इथे एवढी गर्दी का जमलीय?"
"तुम्ही डाॅक्टर आहात नं? हा माणूस समुद्रात बुडत होता---- ह्या शामने त्याला वाचवला; पण बहुतेक खडकावर डोकं आपटून तो जखमी झालाय---- खूप रक्त वहातंय--- जरा बघा त्याला!" त्यांच्या गाडीवरील रेड क्राॅसचं चिन्ह बघत संदीप म्हणाला.
डाॅक्टर पुढे अाले, पण केदारला बघून त्यांचा चेहरा गंभीर झाला,
"याला लगेच हाॅस्पिटलमध्ये अॅडमिट करावं लागेल! ट्रीटमेंट लगेच सुरू झाली, तरच हा वाचेल!" ते पत्नीकडे बघत म्हणाले.
"आपलं हाॅस्पिटल इथून जवळच आहे! चांगल्या घरातला मुलगा दिसतोय! आपण घेऊन जाऊया का?" सौ प्रमिलाच्या मनात असहाय अवस्थेत पडलेल्या केदारकडे बघून ममता जागृत झाली होती.
"पण प्रमिला! ही पोलीस केस आहे! कायद्यानुसार पोलीसांना प्रथम कळवावं लागेल!" डाॅक्टर पटेल म्हणाले.
"म्हणूनच मी आपल्या हाॅस्पिटलमध्ये नेऊया, असं म्हणतेय! मोठ्या हाॅस्पिटलमध्ये पोलीस चौकशी होऊन उपचार सुरू होईपर्यंत हा तग धरू शकेल, असं वाटत नाही! तुम्ही पोलीसांनाही कळवा. या दोघांना आपण आपल्या बरोबर घेऊन जाऊ. ते काय घडलं, हे पोलिसांना सांगतीलच! पण तोपर्यत तुम्ही ट्रीटमेंट चालू करा! त्याचे प्राण वाचवणं, हे तुमचं डाॅक्टर म्हणून पहिलं कर्तव्य आहे!" प्रमिलाबेन डाॅक्टरांना समजावत म्हणाल्या.
पत्नीच्या स्वरातली कळकळ डाॅक्टरांनाही जाणवली.
"मी डाॅक्टर पटेल! माझ्या नवजीवन हाॅस्पिटलचं नाव तुम्ही ऐकलंच असेल! या तरूणाला अॅडमिट करून उपचार चालू करूया! याला माझ्या गाडीत बसवा, आणि तुम्ही दोघे आमच्याबरोबर या! मी तपासलंय त्याला--- वेळेवर उपचार मिळाले, तर काळजीचं कारण नाही!" डाॅक्टर शाम आणि संदीपकडे बघत म्हणाले.
तिथल्या काही जणांनी कसंबसं केदारला त्यांच्या गाडीत बसवलं. डाॅक्टर पटेलनी फोन करून
हाॅस्पिटलच्या कर्मचा-यांना स्ट्रेचरची व्ववस्था करायला सांगितलं. हाॅस्पिटलजवळ टीम तयार होती. केदारला आय. सी. यू. मध्ये अॅडमिट करून घेतलं गेलं; आणि त्याच्यावर लगेच उपचार सुरू झाले.
डाॅक्टर पटेलनी पोलीस चौकीवर फोन करून घडलेली हकीकत सांगितली ! त्यांना कोणतीही जोखीम घ्यायची नव्हती! काही वेळातच पोलीस आले.
"मी आणि माझी पत्नी प्रमिला रात्री हाॅस्पिटलमधून घरी चाललो होतो, सी फेसवर गर्दी पाहिली, म्हणून काय झालंय हे पहाण्यासाठी कार थांबवून उतरलो ! तिथे या तरूणाला जखमी अवस्थेत पाहिलं; वेळेवर ट्रीटमेंट मिळाली नसती, तर त्याच्या जीवावर बेतलं असतं, म्हणून इथे घेऊन अालो, आणि ट्रीटमेंट सुरू केली! आश्चर्याची गोष्ट म्हणजे समुद्रातून पोहून येताना त्याची पूर्ण दमछाक झाली होती! आणि तो बुडणार होता; अशा अवस्थेत किना-यावर एका बोटीवर गप्पा मारत बसलेल्या या शामने आणि संदीपने त्याला पाहिलं आणि वाचवलं! पण आम्ही कोणीही ह्याला ओळखत नाही! त्याच्या डोक्याला भरपूर मार लागला आहे; रक्तस्त्राव खूप झाला आहे. मी ट्रीटमेंट चालू केली आहे! तो एवढ्या रात्री समुद्रात पोहायला का गेला होता--- हे एक गूढ आहे! तो शुद्धीवर आल्यावर सगळा उलगडा होईल! !"
"ते तुम्ही योग्यच केलंत! पण आपल्याला याच्या घरी कळवायला हवं! त्याच्या मोबाइलमध्ये--- किंवा पाकिटात नाव-- पत्ता काही तरी सापडेलच!" इन्सपेक्टर त्यांच्या बरोबर आलेल्या काँस्टेबलना म्हणाले.
त्यांनी शोधण्याचा प्रयत्न केला; पण त्यांना मोबाइल किंवा पैशांचं पाकिट मिळालं नाही.
"याची ओळख सांगणारी कोणतीही वस्तू याच्याजवळ नाही; हे आश्चर्य आहे. बोटात नवीन अंगठी आहे ! घड्याळही खूप महागातलं आहे! श्रीमंत घरातला वाटतोय --- पण या वस्तूंवरून लगेच ठावठिकाणा नाही कळणार! याच्या घरचे लोक त्याला शोधत असतील! त्याचं नाव - गाव कळलं असतं, तर बरं झालं असतं! अशी साहसे करून मुलं आईवडिलांना घोर लावतात! बिचारे किती काळजी करत असतील!"
"तो शुद्धीवर आला, की नाव-गाव सांगेलच! तरूण मुलगा आहे. लवकर रिकव्हर होईल. आता जखमेतून होणारा रक्तस्त्रावही थांबला आहे." डाॅ. पटेल म्हणाले.
इन्स्पेक्टरना एकंदर प्रकरण काहीसं संशयास्पद आहे असं वाटू लागलं होतं. एका पोलिसाला त्यांनी तिथेच थांबायला सांगितलं; आणि केदार शुद्धीवर आला; की त्याचा जबाब नोंदवायला सांगून ते तिथून निघाले.
असिस्टंट डाॅक्टर- प्रकाशना सूचना दिल्या आणि रात्रपाळीच्या एका नर्सला - निशाला- केदारची काळजी घ्यायला सांगून पटेल दांपत्यही घरी जायला निघालं.
दुस-या दिवशी दोघं हाॅस्पिटलमध्ये आली, तेव्हा केदार शुद्धीवर आला होता. दोघांनी सुटकेचा श्वास सोडला. त्या अनोळखी तरूणासाठी त्यांनी खूप मोठा धोका पत्करला होता.
"तो पहाटे शुद्धीवर आला! आता त्याची प्रकृती उत्तम आहे, फक्त नवीन जागा आणि माणसं पाहिल्यामुळे गोंधळल्यासारखा वाटतोय! मी खूप प्रयत्न केला,पोलीस काकांनी त्याला काही प्रश्न विचारून जबाब नोंदवण्याचा प्रयत्न केला, पण तो काही बोलतच नाही, फक्त अनोळखी नजरेनं सगळीकडे बघतोय! " निशा म्हणाली.
" तू नक्कीच रात्रभर त्याच्याजवळ बसून होतीस! तुझ्या डोळ्यांवरून कळतंय, की तू रात्रभर याची व्यवस्थित काळजी घेतलीआहेस! --- आता तू घरी जाऊन विश्रांती घे! खूप चांगलं काम केलंस तू!"डाॅक्टर म्हणाले.
" काल रात्री त्याची प्रकृती खूपच खालावली होती, आणि त्याच्या परिवारातलं कोणीही त्याच्याकडे लक्ष द्यायला नव्हतं, त्यामुळे माणुसकी म्हणून त्याची काळजी घेणं भाग होतं! आताच त्याला परत झोप लागली आहे!अजून सकाळचा स्टाफ आला नाही; मी दिवसपाळीच्या नर्स येईपर्यंत थाबू का?" केदारकडे सहानुभूतीची नजर टाकत निशा म्हणाली.
"तू खूप थकली आहेस! घरी जा! आता आम्ही आहोत इथे!" प्रमिलाबेन म्हणाल्या.
डाॅक्टर आणि प्रमिलाबेन डाॅक्टरांच्या केबिनमध्ये जाऊन बसले. काही वेळाने डाॅक्टर प्रकाश त्यांना भेटायला आले. ते सांगू लागले,
" तो आता खूपच बरा आहे; पण स्वतःविषयी काहीच सांगत नाही. मी त्याच्याशी बोलायचा प्रयत्न केला, पण तो काहीही बोलत नाही खूप गोंधळलेला दिसतोय. काॅन्स्टेबल त्याचं स्टेटमेंट घेण्यासाठी तो शुद्धीवर येण्याची वाट बघत रात्रभर थांबले होते! पण त्यांनी विचारलेल्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर त्यानं दिलं नाही! ते अजूनही तुमची वाट बघत थांबले आहेत! आता बहुतेक ते तुम्हालाच प्रश्न विचारतील!
"बघूया काय होतं ते! अगोदर मी त्या तरूणाशी बोलून बघतो; आणि इन्सपेक्टरनाही बोलावून घेतो!" डाॅक्टर म्हणाले. त्यांचा चेहरा गंभीर दिसत होता.
*********
contd. -- part --9