बळी - १० Amita a. Salvi द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • चाळीतले दिवस - भाग 6

    चाळीतले दिवस भाग 6   पुण्यात शिकायला येण्यापूर्वी गावाकडून म...

  • रहस्य - 2

    सकाळ होताच हरी त्याच्या सासू च्या घरी निघून गेला सोनू कडे, न...

  • नियती - भाग 27

    भाग 27️मोहित म्हणाला..."पण मालक....."त्याला बोलण्याच्या अगोद...

  • बॅडकमांड

    बॅड कमाण्ड

    कमांड-डॉसमध्ये काम करताना गोपूची नजर फिरून फिरून...

  • मुक्त व्हायचंय मला - भाग ११

    मुक्त व्हायचंय मला भाग ११वामागील भागावरून पुढे…मालतीचं बोलणं...

श्रेणी
शेयर करा

बळी - १०

बळी - १०
कपाटातून रंजनाचे स्त्रीधन अचानक् अदृश्य झालेले पाहून घरातल्या सगळ्यांच्या चेह-याचे रंग उडाले होते. एकामागून एक धक्के बसत होते. शरीराने आणि मनाने थकलेल्या मीराताईंमध्ये आता उभं रहाण्याचीही शक्ती नव्हती. डोळ्यासमोर काळोखी येऊ लागली होती. त्या किर्तीला म्हणाल्या,
""घरात कोणी आलं नाही! कपाटातल्या वस्तू कुठे जाणार? तिथेच कुठेतरी ठेवल्या असशील! कीर्ती! इकडे ये; आणि जरा बघ बाळ!" मीराताई म्हणाल्या!
कीर्तीने पूर्ण कपाट शोधून काढलं, पण तिला काहीही मिळालं नाही.
"नाही आई! कपाटात कपड्यांशिवाय काहीही नाही!" ती हताश स्वरात म्हणाली.
"कपाटाची चावी तुमच्या दोघांकडेच असते नं? घरी बाहेरचं कोणी आलं नाही! दुसरं कोण हात लावणार?" मीराताईंनी रंजनाला विचारलं.
घरातला ऐवज गेल्यामुळे मीराताई मनातून घाबरल्या होत्या! घरात दुपारनंतर त्या आणि कीर्ती दोघीच होत्या. दोघींच्या अंगावर नको ते बालंट येण्याची शक्यता होती. त्यामुळे सावध होऊन त्या आता कणखर आवाजात रंजनाची उलटतपासणी घेत होत्या. त्यांनी आता स्वतःला सावरलं होतं!
"यांच्या लग्नानंतर मी कपाटाच्या चाव्यांचे दोन्ही जुडगे केदारकडे सुपूर्द केले होते! आता माझ्याकडे चावी नाही!" त्या मोहनरावांकडे बघत म्हणाल्या.
" होय! एक चावी माझ्याकडे ; आणि दुसरी केदारकडे असते ! ही रूम केदारची आहे! मी फक्त माझ्या साड्या आणि काही वस्तू या कपाटात ठेवल्या आहेत; त्यासाठी इथे येते! एरव्ही इथे माझा वावर नसतो! दुपारीसुद्धा मी तयार होण्यासाठी तिथे गेले होते; त्यावेळी कीर्तीताई माझ्याबरोबर होत्या --- त्यानंतर तिथे काय झालं; ते मला माहीत नाही---- म्हणजे केदार ---? पण सिनेमाला जाताना तो दागिने आणि एवढे पैसे का घेऊन जाईल? ---"
रंजना बोलताना चाचरली, आणि बोलताना थांबली; पण तिला काय म्हणायचं होतं; हे लक्षात आल्यावर मीराताईंच्या पायाखालची जमीन सरकली! सगळ्यांच्या मनात आतापर्यत केदारची काळजी होती पण आता मात्र विचारांची दिशा बदलू लागली होती.
" केदार--- नाही नाही! तो असं काही करणार नाही!" मीराताई स्वतःशीच पुटपुटल्या.
" म्हणजे तो ऐवज घेऊन केदार पळून गेला गेला? तो सगळं ठरवून-- प्लॅन करून तर घरातून निघाला नव्हता?---- काही बाहरचं -- मुलीचं लफडं? ---" शेवटी मोहनराव न राहवून म्हणाले.
" नाही हो! असं काही नाही! अगदी आपण बरं आणि आपलं काम बरं; असं वागणं होतं त्याचं! मित्र खूप आहेत; पण मुलींपासून नेहमीच दूर रहायचा तो! " मीराताईं बोलत असताना रंजना मधेच बोलू लागली,
"पण मी इथे अाल्यापासून बघत होते---सतत लॅपटाॅपवर काम करत असायचा! तो माझ्याशी कधी नीट बोललासुद्धा नव्हता! नवीन लग्न झालेलं असताना त्याचं असं वागणं पाहिलं; की मला आश्चर्य वाटत असे! पण मी या घरातल्या माणसांना आपलं म्हटलं होतं--- त्याच्यात मी माझा आनंद शोधत होते! केदार आज ना उद्या माझ्याशी आपलेपणाने वागेल; या आशेवर दिवस काढत होते---- पण आज अचानक् त्याला मला घेऊन बाहेर जावंसं वाटलं! त्याच्या मनात काय होतं; मला काही कळलं नाही! मी सिनेमा बघायच्या निमित्ताने आम्ही एकत्र बाहेर जाणार; या आनंदात होते!"
रंजना भावनाविवश होऊन बोलत होती. तिच्या डोळ्यातून अश्रुधारा ओघळत होत्या.
मीराताई आता निःशब्द झाल्या होता. केदार किती साधा- सरळ आहे; हे त्यांना माहीत होतं; पण समोर दिसणा-या गोष्टी वेगळंच काही दर्शवत होत्या. केदार असं काही करेल; यावर त्यांचा अजूनही विश्वास बसत नव्हता पण "तुम्ही माझ्या मुलाविषयी चुकीचं बोलताय!" असंही त्या मोहनरावांना ठासून सांगू शकत नव्हत्या. कारण समोर आलेले पुरावे त्या नाकारू शकत नव्हत्या.
"रंजनाचं बोलणं मलाही पटतंय! मलाही केदारचं वागणं थोडं विचित्र वाटलं होतं! आज प्रथमच दोघं फिरायला घराबाहेर पडली होती --- पण हा वेळ एकमेकांबरोबर घालवण्याऐवजी माझी पुस्तकं देण्याच्या निमित्ताने केदारने तिला माझ्या घरी पाठवलं! त्याच्या मनात असं काही असेल; हे तिला कसं कळणार होतं? इतका साधा- सरळ दिसणारा मुलगा असा वागेल, असं कधीच वाटलं नव्हतं! आपण माणसं ओळखायला चुकतो; हेच खरं! "
"असं काही असेल; तर पोलीस कंप्लेंट करायची की नाही हे तुम्ही सगळे मिळून ठरवा! कारण चौकशीमध्ये ह्या गेलेल्या ऐवजाविषयी आपल्याला सांगावं लागेल, आणि प्रकरण वेगळंच वळण घेईल! केदारचा शोध घेतला जाईल -- पण केदार मिळाला, तर की चोरीच्या गुन्ह्याखाली त्याला अटक होईल! दुसरा मार्ग म्हणजे-- केदारची काही दिवस वाट पाहाणं -- ! काही दिवसांतच नक्कीच आपल्याला कुठून ना कुठून त्याच्याविषयी माहिती कळेल, किंवा तो स्वतःच घरी परत येईल! " मोहनराव म्हणाले.
"किंवा तू पोलिसांकडे तुझ्या गहाळ झालेल्या दागिन्यांविषयी रीतसर गुन्हा दाखल करू शकतेस. दागिन्यांबरोबरच ते केदारचाही पत्ता लावतील." ते रंजनाकडे बघत पुढे म्हणाले.
"नको! नको! त्याला माझ्याशी संसार करायचा नाही; म्हणून बहुतेक तो रागावून घरातून निघून गेलाय! किती झालं; तरी तो माझा नवरा आहे; त्याला पोलिसांनी गुन्हेगार म्हणून उभा करावा, हे मला आवडणार नाही. माझंच नशीब वाईट आहे. माझ्यासारख्या गावंढळ मुलीला इतका शिकलेला --- हुशार -- देखणा नवरा मिळाला; पण बहुतेक हे लग्न त्याला मान्य नव्हतं. शेवटी त्याचा निर्णय त्याने घेतला. नवीन लग्न झालेलं असताना दिवसभर काँप्यूटरमध्ये -- नाहीतर पुस्तकांनध्ये डोकं खुपसून बसत होता, किंवा मित्रांबरोबर वेळ घालवत होता; आॅफिसमधून त्या सिद्धेशबरोबर दिवसभर जोक्स आणि हास्याचे फवारे माझ्या कानावर पडायचे; पण माझ्याशी बोलायला मात्र त्याच्याकडे वेळ नव्हता. तेव्हाच मला संशय आला होता की ह्याने माझ्याशी मनाविरूध्द तर लग्न केलं नाही? माझा संशय खरा ठरला! जाऊ दे! जिथे असेल; तिथे तो सुखी राहू दे! मला त्याने खरं सांगितलं असतं, तर मीच बाबांकडे गावाला निघून गेले असते! त्याला घर सोडून जायची काय गरज होती?" रंजना ढसढसा रडत बोलत होती.
मीराताईंना तर आता आपल्याला वेड लागेल असं वाटत होतं. एका दिवसात सगळी समीकरणं बदलली होती. त्यांचा आजपर्यंतचा आदर्श सुपुत्र आज सगळ्यांनी मिळून पुराव्यानिशी गुन्हेगार ठरवला होता. आता कोणाच्याही मनात त्यांना केदारविषयी काळजी दिसत नव्हती -- प्रत्येकाच्या मनात होता फक्त त्याच्याविषयी संशय!
मीराताईंना आठवत होतं ; --- लग्न ठरलं, तेव्हा केदार म्हणाला होता,
" आई! कोणीतरी म्हणालं; चांगली मुलगी आहे--- म्हणून लगेच तिला पाहिलंस आणि जवळ- जवळ होकार कळवून आलीस! आपण त्यांना ओळखत नाही-- तिची थोडी चौकशी करायची गरज तुला वाटली नाही? आयुष्याचा प्रश्न आहे; एवढी घाई करून कसं चालेल? शिवाय तिचं शिक्षण खूप कमी आहे ! मला माझी पत्नी खूप हुशार, उच्चशिक्षित पाहिजे होती; तू माझं नुकसानच केलं आहेस! पण आता तू शब्द दिला आहेस, तर मी मुलगी बघायला तुझ्याबरोबर येतो; पण ती जर मला पसंत नसेल तर नकार द्यायचा! कबूल?-- पण नंतर मात्र रंजनाला बघितल्यावर त्याने आनंदाने होकार दिला होता ----- आता असं वाटतंय, की मला वाईट वाटू नये, म्हणून तर तो रंजनाशी लग्नाला तयार झाला नव्हता? ---- "
" माझं मन राखण्यासाठी लग्न करून नंतर असं काही करण्यापेक्षा केदारने तेव्हाच लग्नाला स्पष्टपणे नकार दिला असता तर बरं झालं असतं! आणि माझंही चुकलंच---- त्याचीही पत्नीच्या बाबतीत काही स्वप्नं असतील, हे मला कळायला हवं होतं --- "
या सगळ्या प्रकाराचा दोष त्या स्वतःला देऊ लागल्या होत्या. स्वतःच्याही नकळत, स्वतःच्याच घरात चोरी करून आपला मुलगा पळून गेला आहे, हे त्यांनी मनोमन मान्य केलं होतं. इतरांबरोबरच त्यांच्याही विचारांची दिशा बदलली होती! या सगळ्या प्रकरणात घडलेल्या घटनांची एकमेव साक्षीदार रंजना होती. त्यामुळे जे काही ती सांगेल, ते खरं मानलं जात होतं. रंजनाविषयी सगळ्यांच्या मनात इतकी सहानुभूती निर्माण झाली होती, की तिच्या बोलण्यावर त्यांनी डोळे मिटून विश्वास ठेवला होता!
******* contd.-- part. 11