बळी -- ११
मोठ्या माणसांमध्ये बोलणं बरं दिसणार नाही; हा विचार करून नकुल आणि कीर्ती - दोघंही आतापर्यत गप्प होती. पण मोठ्या भावाची बदनामी नकुलला सहन होईना; तो रंजनाकडे बघत रागाने म्हणाला,
"आमचा दादा असा वागू शकत नाही. त्याच्यावर असले घाणेरडे आरोप लावू नका! तो कुठे-- आणि कसा असेल?--- मला त्याची खूप काळजी वाटतेय! चला काका! आपण पोलीस कंप्लेट देऊन येऊ!"
आता कीर्तीसुद्धा बोलू लागली,
"आमच्यावर इतकं प्रेम करणारा आमचा दादा आम्हाला असं फसवेल, हे शक्यच नाही! आई तू हिच्यावर विश्वास ठेऊ नकोस!"
यावर रंजनाचा कांगावा परत सुरू झाला,
"केदार तुमचा आहे, मी परकी आहे; तुम्ही काल आलेल्या मुलीवर का विश्वास ठेवाल? पण एक गोष्ट लक्षात ठेवा --- माझा तो नवरा आहे --- सात फेरे घेतलेयत मी त्याच्याबरोबर! त्याला एक चोर म्हणून जर उद्या शिक्षा झाली; तर मला आवडणार नाही! या घराचा सन्मान अबाधित ठेवणं, हे सून म्हणून माझं कर्तव्य आहे--- मोहन दादा! मिसिंग कंप्लेट करायची नाही!"
मीराताई मुलांना समजावू लागल्या,
"कीर्ती!- -नकुल! रंजना बरोबर बोलतेय! तुम्ही अजून लहान आहात--- तुम्हाला अजून या दुनियेची कल्पना नाही! गुन्हेगाराच्या कुटुंबालाही हे जग गुन्हेगारासारखी वागणूक देतं! तुम्हाला खूप त्रास होऊ शकतो! ---- आपण थोडे दिवस केदारची वाट बघूया!
त्यांच्या या बोलण्यावर कीर्ती आणि नकुलकडे गप्प रहाण्याशिवय दुसरा पर्याय नव्हता.
पोलीसांकडे तक्रार न करण्याचा निर्णय झाल्यावर थोड्या वेळाने रंजनाची बहीण आणि मेहुणे तिथून निघाले.
"मुलं घरी वाट बघत असतील! आम्ही आता निघतो! काही गरज पडली, तर फोन करा! ---- काळजी करू नका! तो लवकरच परत येईल!" ती दोघं मीराताईंना धीर देण्यासाठी म्हणाली. हे आधाराचे पोकळ शब्द कितपत खरे ठरतील याविषयी त्यांना स्वतःलाच खात्री नव्हती.
********
दुस-या दिवशीपासून रंजनाने तिच्या खोलीत स्वतःला बंद करून घेतलं होतं! मीराताईंना स्वतःचं दुःख बाजूला ठेऊन , मोठ्या मिनतवा-या करून तिला खाऊ- पिऊ घालावं लागत होतं! रंजना आता आई- वडिलांची वाट बघत होती. मीराताईंच्या आणि कीर्तीच्या प्रश्नांना उत्तरं देऊन ती कंटाळली होती! तिला सतत आरोपीच्या पिंज-यात उभं असल्यासारखं वाटत होतं. घरातल्याया सुतकी वातावरणाने तिचा जीव गुदमरत होता! या घरातून तिला लवकरात लवकर बाहेर पडायचं होतं.
दोन दिवसांनी श्रीपतराव पत्नीसह आले. मोहनरावांनी त्यांना झाला प्रकार कळवला होता. रंजनाची आई घरातल्या माणसांना आणि रंजनाला धीर देण्याऐवजी स्वतःच अश्रू गाळत होती. तिचं रडणं मनापासून होतं! लग्न होऊन महिना व्हायच्या आधीच मुलीचा संसार विस्कटला होता! याउलट श्रीपतरावांच्या रागाचा पारा चढला होता! ते गरजले,
" आम्ही इतक्या विश्वासाने आमची मुलगी तुमच्या घरात दिली; पण आता असं वाटतं, की तिचं आयुष्य उध्वस्त करायला आम्ही कारणीभूत ठरलो आहोत! पूर्ण चौकशी करून मगच मुलीचं लग्न ठरवायला हवं होतं! उत्तम स्थळ आहे, असा विचार करून लग्नाची घाई केली! चूक माझीच होती!"
मीराताईंना त्यांचा राग समजत होता. त्या म्हणाल्या,
" हे सगळं आमच्यासमोर सुद्धा अचानक् आलं आहे! मी तुमची हात जोडून माफी मागते! मला काही कल्पना असती, तर मी रंजनाचं असं नुकसान केलं नसतं! केदार असा वागेल, हे आजही मला खरं वाटत नाही! मी त्याला जन्मापासून बघितला आहे---- तो असा नाही! माझा केदार अतिशय गुणी मुलगा आहे! खरं काय--- आणि खोटं काय--- मला काहीच कळत नाही! डोकं बधिर झालंय! इथे आमच्यावर काय परिस्थिती ओढावलीय; जरा विचार करा!"
यावर श्रीपतराव जरा शांत झाले, आणि म्हणाले,
"खरं म्हणजे तुम्ही पोलिसात कळवायला हवं होतं! आपण मिसिंग कम्प्लेन्ट करूया! मी माझ्या ओळखी वापरून त्याला शोधून तुमच्यासमोर उभ करतो! त्याशिवाय सत्य काय आहे, हे कळणार नाही!"
वडिलांच्या या प्रस्तावावर रंजनाने हरकत घेतली,
"बाबा! हे घर आणि घरातली माणसं माझी आहेत! त्यांची बदनामी झालेली मला आवडणार नाही! त्याला परत यायचं, तेव्हा तो येऊ दे! मला दागिन्यांचा मोह नाही! केदारने मला आपलं म्हटलं नाही, तर दागिने आणि पैसे घेऊन मी काय करू? नको --- पोलिसात जाणं नको!" ती रडत रडत म्हणाली.
"मग आपण फक्त त्याची वाट बघण्यात दिवस घालवायचे का? त्याला शोधण्याचे काही प्रयत्न करायला नकोत? सत्य परिस्थिती काय आहे, हे शोधून काढण्याचं काम पोलीसच करू शकतात! दागिन्यांचं सोडून दे---- पण जवळची माणसं म्हणून, केदारचा शोध घेणं, हे आपलं कर्तव्य नाही का? असे स्वस्थ बसून राहिलो; तर त्याच्या बाबतीत नक्की काय घडलंय, कसं कळणार?" श्रीपतराव तिला समजावण्याचा प्रयत्न करू लागले.
"केदार जाताना दागिने आणि पैसे बरोबर घेऊन गेला हे पाहिलं; तेव्हा सगळं काही मला समजलं आहे! पोलीसांकडे जाऊन मला घराची अब्रू चव्हाट्यावर आणायची नाही! माझं नशीबच वाईट आहे! हा विषय आता सोडून द्या बाबा!" रंजना हात जोडून म्हणाली.
यावर श्रीपतरावांचा नाइलाज झाला.
"बघा! आमच्या मुलीवर आम्ही कसे संस्कार केलेयत! इतकं होऊनही ती तुमच्या घराचा विचार करतेय! इतकी चांगली बायको मिळाली; पण तुमचा मुलगा दुर्दैवी ठरला! दैव देतं, आणि कर्म नेतं म्हणतात ते यालाच!"
थोडा वेळ विचार करून ते मीराताईंना म्हणाले,
" रंजना इथे राहिली; तर सतत विचार करत राहील; काही दिवसांसाठी तिला आमच्याबरोबर गावी घेऊन जातो. "
रंजनाची गेल्या काही दिवसात झालेली दशा मीराताईंनाही बघवत नव्हती.
" रंजना! बाळ! तुझे बाबा बरोबर बोलतायत! काही दिवस तू त्यांच्याबरोबर रहा!" त्यांनी संमती दर्शवली.
"तुमचे पैसे लवकरात लवकर परत करण्याचा मी प्रयत्न करेन!" त्या रंजनाच्या आईला म्हणाल्या,
"पैशांचं महत्व नाही हो --- पण ---" रंजनाच्या आईचं वाक्या अर्धवट राहिलं; कारण श्रीपतराव हात जोडून बोलू लागले,
"त्याऐवजी केदारला शॊधून आणा! पैशांची कमतरता माझ्याकडे नाही! माझ्या मुलीचा संसार उभा राहिलेला पहायचाय मला! तुम्हाला माहीतच आहे; आमच्या घराण्यात मुलीचं लग्न फक्त एकदाच होतं! एकदा केदारशी लग्न झालं; आता ती शेवटपर्यंत त्याची बायको म्हणून जगेल! तुम्हीच विचार करा; माझ्या मुलीला कसलं आयुष्य जगायला भाग पाडलंय तुमच्या मुलानं! ती आता कुमारिका नाही; आणि विवाहिता तर फक्त नावाला अाहे!" हे बोलताना त्यांच्या डोळ्यात भरलेलं पाणी मीराताईंच्या नजरेतून सुटलं नाही!
"बाबा! माझी खात्री आहे! केदार एक दिवस नक्की परत येईल! या घराला सोडून तो फार दिवस राहू शकणार नाही! तुम्ही जराही काळजी करू नका!" रंजना म्हणाली. पण ती हे आपल्याला धीर देण्यासाठी बोलत आहे, हे श्रीपतरावांना कळत होते. तिच्या डोळ्यातले अश्रू ओघळताना त्यांना बरंच काही सांगून जात होते.
त्यांचं बोलणं ऐकून खाली मान घालण्याव्यतिरिक्त मीराताईंकडे दुसरा पर्याय नव्हता. रंजनाने एवढं घाबरवून सोडलं होतं; की त्यांच्यातील आई केदारवर पोलीस केस घालायला तयार होत नव्हती.
मीराताईंनी माहरी जायची परवानगी देताच, रंजना पडत्या फळाची आज्ञा शिरोधार्य मानून आई-वडीलांबरोबर निघाली.
**********
रंजना माहेरी गेली. ती काही दिवस तिकडे राहून परत मुंबईला येईल, असं मीराताईंना वाटलं होतं; पण ती काही परत आली नाही. मीराताईंनी तिला फोन करण्याचा प्रयत्न केला; पण रंजनाची आई फोनवर आली. ती म्हणाली,
"ती घरी नाही; तिने कसलासा क्लास सुरू केला आहे; रात्री उशीरा घरी येते! काय करणार? आपलं शिक्षण कमी असल्यामुळे नवरा सोडून गेला; ह तिनं मनाला खूप लावून घेतलंय! दिवस -रात्र मेहनत करतेय! सकाळी घरून निघते, ती रात्री घरी येते! तालूक्यावरून येणा-या जाणा-या एस. टी. ठराविक वेळातच आहेत, त्यामुळे येण्या- जाण्यात खूप वेळ जातो! तुम्ही फोन करू नका; मीच तिला फोन करायला सांगेन!"
एवढं बोलून त्यांनी फोन बंद केला गेला. चार शब्द सुद्धा त्या अगदी तुटकपणे बोलल्या. मीराताईंना आता त्यांच्या लेखी जराही किंमत राहिली नव्हती.
यानंतर रंजनाचा एकही फोन आला नाही. एकच समाधान होतं; की दागिने आणि पैशांची भरपाई रंजनाने अजून मागितली नव्हती. एवढी तरी माणुसकी दाखवली; यासाठी रंजना आणि तिच्या वडिलांचे त्या मनोमन आभार मानत होत्या. जर भरपाई मागितली असती; तर त्या कुठून देणार होत्या? पतींची मिळणारी फॅमिली पेंशन हाच त्या कुटुंबाचा सध्या आधार होता. नकुलचं इंजिनिअरिंगचं शेवटचं वर्ष होतं. त्याल डिग्री मिळायला अजून काही महिन्यांचा अवधी होता. कीर्तीचं काॅलेजचं हे पहिलं वर्ष होतं. केदार त्या दिवसानंतर जणू हवेत विरघळून गेला होता. त्याची वाट पाहून मीराताईंचे डोळे थकून गेले. सुरुवातीच्या दिवसांमध्ये मनात आशा होती पण नंतरचा निराशेचा काळ सरता सरत नव्हता. कीर्ती आणि नकुलच्या भविष्याचा विचार करून, डोळ्यातले अश्रू जगापासून लपवत मीराताई एक एक दिवस पुढे ढकलत होत्या.
********* contd.--- part 12