पहिले पाढे पंचावन्न. टाकबोरू द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

पहिले पाढे पंचावन्न.

प्रेम ही चमत्कारी भावना फक्त मेंदूतील एक रसायन आहे हे शास्त्रीय सत्य मानायला मन धजावत नाही. कारण, प्रेमाचा आवाका मेंदूपूरताच सीमित राहत नाही. कवटीच्या सीमा भेदून सगळ्या रोमरोमात प्रेमाचा संचार होत असतो. प्रेम ही मानवाला पुरून उरणारी भावना आहे. माणूस संपतो; पण प्रेम संपत नाही!
कोणीही प्रेम म्हणलं की पहिल्यांदा जोडीदाराचे प्रेम असाच अर्थ घेतला जातो हा या शब्दाला असणारा शाप आहे. प्रेम कोणावरही जडू शकतं, नाही का? आई-वडिलांवरच प्रेम, गुरूप्रेम, पाल्यावरचं प्रेम, मैत्रीप्रेम, देशप्रेम, राष्ट्रप्रेम, निसर्गप्रेम, ईश्वरावरच प्रेम. प्रेम करण्यासाठी कोणीही चालतं असं असलं तरी आपल्या लक्षात ठळकपणे राहतं ते जोडीदारावरच प्रेम. आयुष्यातील जोडीदारावर असणारं प्रेम वेगळं आणि शाळेतलं प्रेम वेगळं. शाळेतलं—जास्त करून एकतर्फीच असणारं—प्रेम हे मुळात प्रेम नसतंच! उत्सुकता, कुतूहल, नाविन्य, जीवशास्त्रातील 'क्लिष्ट' प्रक्रिया जाणून घेण्याची अतीव इच्छा, विरुद्धलिंगी व्यक्तीसोबत गप्पा मारून त्या व्यक्तीला जाणून घेण्याची तलफ, त्यात पुन्हा चित्रपट प्रसंगाचा मेंदूवर अकस्मात झालेला भडिमार, पौगंडावस्थेत शरीरात धावायला लागलेली संप्रेरके या सर्व गोष्टींना कथा-कादंबर्‍यातील गुलाबी प्रेमाची फोडणी देऊन, पाचवी ते दहावीची, पाच वर्षे मंद आचेवर शिजू घातलं की 'शाळेतील प्रेम' नावाचा पदार्थ तयार होतो. कोणाचा फक्कड बनतो, कोणाचा करपतो, कोणाला पोळतो, कोणाचा थंड होतो, कोणाचा शिजतो पण खाता येत नाही याउलट कोणाच्यातरी ताटलीत अनपेक्षितरित्या येऊन पडतो! असो.
शाळेतील पहिल्या प्रेमाच्या आठवणी आल्हाददायकच असाव्यात असा काही नियम नाहीये. आभाळ आल्यावर जुनेपुराणे शिक्षकांनी दिलेले शारीरिक आणि प्रेमाने दिलेले मानसिक घाव दुखू ही शकतात. यामुळे पावसाचा आणि पहिल्या प्रेमाचा संबंध आहेच. शाळा आणि पावसाळा यांच नातं तर जन्मो-जन्मांतरीचं आहे. म्हणून मग आपोआपच शाळा, पावसाळा आणि पहिलं प्रेम हातात हात घालून कायमच मानवी मेंदूभोवती घिरट्या घालत राहतात.
काहीजण उगीचच प्रेमाला ढगांच्यापलीकडे पोहोचविण्याचा प्रयत्न करत असतात. समजा जर प्रेम स्वर्गातून—किंवा नरकातून किंवा पाताळातून—मर्त्यलोकात येत असतं तर या विश्वात ते कधीही, कोठेही, कसही भेटायला हवं होत; मात्र शेकडा नव्वद टक्के लोकांना पहिलं प्रेम शंभराच्या आत पटसंख्या असणाऱ्या शाळेच्या वर्गातच सापडतं! असं का?
एकूणच प्रेमाचा आणि स्वर्गाचा काहीएक संबंध नाहीये. प्रेमाचा कशाशी संबंध असेलच तर तो वयाशी असावा. पाचवी-सहावीला वर्गात अचानक नवीन मुलींचा शोध लागतो. ही आपल्या वर्गात होती? कधीपासून? मग याआधी का नाही दिसली? असे गुढ प्रश्न याच सुमारास पडायला लागतात. लगोलग 'आपली' शोधून तिचं नामकरण करण्याचा विधीवत सोहळा मित्रमंडळीतर्फे पार पाडला जातो. कधीकधी उमेदवारांची संख्या दोन किंवा दोनपेक्षा जास्त असते! अशावेळी मग चुरशीने निवडणुकांचे सामने खेळले जातात. ज्या त्या पक्षाच्या लोकांकडून जोरदार प्रचारही केला जातो. ज्या दोघांना 'काहीतरी' करायचं असतं ते राहतात बाजूला आणि वानरसेनाच अंड्यावर येते. मुख्य पात्रांनी एकमेकांची छेड काढायची असते हा साधा नियमही वानरसेनेला माहिती नसतो. जोडीदाराच्या नावाने-आडनावाने आरोळ्या ठोकण्याची मक्तेदारीच वानरसेना घेते. याच वानरसेनेला बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना अशा मानसिकतेमुळे कधीकधी अनैच्छिक अडचणींना तोंड द्यावं लागत. या अडचणी अशा काही अंगलटी येतात की शब्दात सांगणे कठीण आहे.


"पद्या माझ्या बापाला कळलं तर मी मेलोच बघ." सहदेव सांगत होता. "आधीच बा लय मारतय आन त्यात पुन्हा ही आसलं कारण मिळाल्यावर तर सोडायचाच नाई."
प्रथमेशचा चेहरा राठ झाला होता. "तुझे वडील काय जगावेगळे आहेत होय? मलापण मार मिळेलच की."
"मग आता रं?" सहदेवचा ज्वलंत प्रश्न.
"माहित नाही." प्रथमेशची टोलवाटोलवी. "तरी मी तुला म्हणालो होतो 'तिच्या नादाला लागू नको' म्हणून."
"तू *** लय साजूक आहेस का? माझ्यानंतर तू बी छेड काढलीच की." सहदेवने प्रथमेशला झापलं.
"मी काय म्हणतोय आपण संत्याकडं जाऊ तोच काहीतरी मार्ग काढेल."
"पण आज तर संत्या आलाच नव्हता."
"त्याला काय होतय." प्रथमेश म्हणाला, "हे प्रकरण तर त्याचच हाय ना."
"चल मग जाऊ त्याच्याकडं आन सांगू त्याला सगळं."
सहदेव असं म्हणाल्यावर दोघेही संतोषच्या घराकडे चालायला लागले. शाळा सुटून ऊन्हे उतरणीला लागली होती. हे दोघेही माळ तुडवत गावाकडे निघाले होते. सहदेव, प्रथमेश आणि संतोष या तिघांची मैत्री कट्टर. या तिघांत भांडणे झाली तेवढ्या वेळा मिटली देखील. शाळेतल्या गुरुजींच्या छडीपासून ते शिपायाकडून घेतलेल्या परीक्षेतल्या प्रश्नपत्रिकेपर्यंतचे सगळे प्रश्न या तिघांनी एकोप्याने व एकजुटीने हाताळले. आजचा प्रकार मात्र वेगळा होता. आजच्या प्रकारात 'मुलीचा' सहभाग होता. त्यात संतोष आज आलेला नव्हता म्हणून दोघांच्या मनात असंतोष दाटलेला होत. दोघांनीही शांततेत रस्ता तुडवायला सुरुवात केली.

'आज शाळेत गेलो नसतो तर बरं झालं असतं' सहदेवला वाटत होतं. दररोज सकाळी कधीही शाळेच्या घंटेआधी शाळेची इमारत न पाहणारा सहदेव आज अपघातानेच साडेअकरा वाजता शाळेच्या प्रांगणात उभा होता. 'घरी राहिलो तर भुईमूग उपटायला रानात जावं लागेल' या विचारातच त्याने गुपचूप रात्रीची भाकरी चापली आणि पळतच शाळा गाठली.
वर्गात पिशवी टाकल्यावर दुसरं काही काम नसल्याने तो मैदानात भटकत होता. शाळेच्या मैदानातील फळ्याजवळच काहीजणांचं काम चालू होतं. ते लोक शाळेत पूर्वी कधी दिसले नव्हते. सहदेवने जवळ जाऊन पाहिलं तर ती माणसे भिंतीला छिद्रे पाडत होती. 'इथे छिद्रे मारण्याच प्रयोजन काय?' या प्रश्नाला जास्त विचारशक्ती न देता सहदेव प्रथमेश आणि संतोषची वाट बघत बसला. जरा वेळाने शाळेत गर्दी जमायला लागली तेव्हाच कधीतरी प्रथमेश आला.
"काय लगा एवढा उशीर आसतोय का कुठं?" सहदेवने प्रथमेशच्या पाठीत गुद्दा रवला.
"तूच लवकर आलाय." प्रथमेशने गुद्द्याचा प्रतिकार गुद्द्याने केला खरा; पण त्याची उंची कमी पडली.
प्रथमेशने दप्तर ठेवलं मग सहदेवने त्याला मैदानातील फळ्याजवळ आणलं. मघाशी पाडलेल्या छिद्रांत खिळे ठोकण्याचं काम चालू होतं.
"काय असेल रे?" प्रथमेशने विचारलं.
"तुला माहिती नाही?" सहदेवने आश्चर्याने विचारलं.
"नाही."
"मलापण नाही माहिती!" सहदेव निराशेने म्हणाला.
"विचार ना विचार." प्रथमेशने खिळे ठोकणाऱ्या माणसाकडे पाहून सहदेवला कोपरखळी घुसवली.
"तूच विचार की." असं म्हणून सहदेव तिथून निघाला.
हे दोघे व्हरांड्यातून वर्गात निघालेले असताना शालिनी वर्गाबाहेर आली. पाटलांच्या शालिनीला 'आठवी-क' या वर्गाच आकर्षण केंद्र म्हणता आलं असतं. शालिनी दिसायला उजवी असली तरी तिच्या प्रसिद्धीमागे सौंदर्याचा भाग नसून, नुकतच जन्माला आलेलं शालिनीच 'प्रकरण' हे प्रसिद्धीच मूळ कारण होतं. संतोष आणि शालिनीच, काहीच नसताना, काहीतरी आहे अशी अफवा शाळेत पसरलेली होती. खरंतर ही अफवा संतोषनेच सहदेव व प्रथमेश करवी जाणून-बुजून पसरवून घेतली होती. वाळलेल्या उसाच्या पाचटातून आग पळावी तशी ही अफवा शाळाभर पळाली. येता-जाता शालिनीला विनाकारण 'वहिनी, संतोष, संत्या' अशा काही निरर्थक आरोळ्या ऐकाव्या लागत होत्या. या आरोळ्या तिला निरर्थक भासण्याचं कारण म्हणजे तिला स्वतःलाच या 'प्रकरणाची' खबर नव्हती!
मित्राच्या आयुष्यात सुखाची उधळण होण्यासाठी हातभार लावावा या उदात्त हेतूने सहदेवने "एऽऽऽ संत्याऽऽऽ" अशी जबर आरोळी शालिनीच्या पाठमोऱ्या आकृतीकडे फेकली.
'माकडाने बघाव माकडाने करावं' या नियमाचा मान राखण्यासाठी लगेचच प्रथमेशने सहदेवच्या आरोळीच समर्थन ललकारीने केलं! नंतर हे दोघे बराच वेळ, आवाजात चढउतार करून, शालिनीच्या मागे संतोषच्या नावाने बोंबलत फिरत होते. शेवटी शालिनीचा संयम तुटला. शाळेच्या निर्जन कोपऱ्यावर नेऊन तिने दोघांवर प्रश्नांचा भडिमार सुरू केला.
"का रे उगाचच संतोषच्या नावाने बोंबलत माझ्यामागे फिरताय?" तिने सहदेवकडे पाहिलं.
त्याने खांदे उडवले. "कोण मी? मी नाही." आणि प्रथमेशकडे पाहिलं. प्रथमेशने सुद्धा खांदे उडवून नकार दिला आणि सहदेवकडे पाहिलं.
दोघांकडे आळीपाळीने पाहून शालिनी खेकसली. "मग संतोष, संतोष असा आवाज काय आभाळातून येतोय?" दोघांनी सालस चेहरा करून आभाळाकडे पाहिल! "बरेच दिवस झाले तुमचा बधिरपणा चालू आहे. त्या संतोषलाच विचारणार होते; पण म्हणलं त्याला काही बोलले तर त्या मूर्खाचा गैरसमज व्हायचा." 'विचारणार होते' प्रथमेश मनातल्या मनात या शब्दांच्या अर्थाचा अनर्थ करतच होता. "अजून एकदा जरी माझ्या मागं संतोषच्या नावाने चिडवलं तर . . . "
"तर?" सहदेवच्या आवाजात गुरमी होती, का भय, का मग नम्रता हे ओळखता येत नव्हतं.
"तर गुरूजींना नाव सांगेन."
"आम्ही खरच संत्याला शोधत होतो." सहदेव कळवळला या खेपेस त्याच्या आवाजात आर्जव होतं. "पद्या तू सांग की लगा."
प्रथमेशने त्याची कड खेचली. "आम्ही खरच तुला काहीच नाही म्हणालो."
आता शालिनी थोडी ताठ उभी राहिली, तिच्या डोळ्यांत चमक आली. "का मग सांगू माझ्या वडिलांना?"
पाटील गावचे बडे प्रस्थ नसले तरी पूर्वजांकडून वारसाहक्कात आलेल्या घराणेशाहीमुळे लोक त्यांचा मान राखत. आर्थिक सुबत्ता नसली तरी पाटलांकडे व्यवहाज्ञान आणि माणूसकीचा वाहता झरा होता. गावात यात्रे-जत्रेच्या कार्यक्रमापासून ते कोण्या स्वर्गीय व्यक्तीच्या दहाव्या-तेराव्यापर्यंत सर्वच वेळी पाटलांना मानाच निमंत्रण दिलं जात असे. शाळेतल्या गुरुजींचे पाटलांसोबत चांगले संबंध होते. शालिनीला धावण्याच्या स्पर्धेत किंवा इतर क्रीडास्पर्धेत उघडउघड जास्त गुण देता येत नसले तरी शाळा कार्यालयात—कोणी जवळ नसताना—ते शालिनीला चार-दोन गुण जास्तीचे देऊनही टाकत. बाकी मग सहदेव व प्रथमेश या दोघांचेही वडील पाटलांच्या रानात अधूनमधून हजेरीवर कामाला असायचेच. त्यामुळे पाटलांचे नाव ऐकल्यावर दोघांचेही धाबे दणाणले.
"चल र लगा शाळा भरली आसलं." सहदेवला एकाएकी शिक्षणाची ओढ लागली; पण इतक्या लवकर त्यांची सुटका करेल ती शालिनी कसली?
"कळलं ना एकदा सांगितलेलं?" दोघांनीही होकारार्थी मान हलवली. "नंतर संतोषच्या नावाचा जप माझ्या मागे करणार का?" दोघांनीही नकारार्थी मान हलवली. "बेअक्कल." जळजळीत शिवी त्यांच्या तोंडावर मारून शालिनी निघून गेली. हे दोघेही अपराधीपणाच्या भावनेत चूर होऊन वर्गात शिरले; परंतू वर्गात शिरताच जादू व्हावी तसं ती भावना गायब झाली.
अचानक वर्गात टापटीप कपडे घालून आलेली माणसे पाहून गुरुजी हडबडले. मुलांनी उठून, जमेल तितक्या सुरात, एक साथ नमस्तेऽऽऽ ची तान दिली.
"नमस्कार विद्यार्थीमित्रांनो . . . " आलेल्या माणसांपैकी कोट घातलेल्या एका व्यक्तीकडून विद्यार्थीमित्रांनो सारखे अनोखे शब्द ऐकून पोरं थोडीशी दबकली.
" . . . आम्ही 'महिला संरक्षण कायदा' या संस्थेतून आज तुमच्या भेटीस आलेलो आहोत. महिलांचे सबलीकरण करून देशाला उज्वल भविष्याप्रत नेणे हेच आमचे ब्रीद आहे. आजच्या सावित्रीच्या लेकींनी संपूर्ण जग त्यांच्या कवेत घेतलं असलं तरी, शालेय जीवन हे मुलींसाठी थोडसं खडतरच मानलं जातय. ग्रामीण भागातील शालेय जीवनाच्या समस्या आणखी वाढतात. आपल्या शाळेतील मुलींना अशा त्रासाला सामोरं जाण्याची वेळ येऊ नये यासाठी आम्ही एक नवीन उपक्रम राबवत आहोत. मुलींना कधी घरचा तर कधी वर्गात विशिष्ट मुलांकडून मिळणारा मानसिक त्रास सहन करावा लागतो. यामुळे शिक्षणाकडे दुर्लक्ष तर होतच; पण काही बाबतीत मुलींना शिक्षण सोडावं लागतं. ही परिस्थिती विचारात घेता आपल्या शाळेच्या प्रांगणातील मुख्य फळ्याजवळ आम्ही तक्रारपेटी बसवलेली आहे.
"शाळेतील कोणत्याही विद्यार्थिनीला कोणाचाही, कसलाही त्रास होत असेल, कोणी दबाव आणत असेल किंवा कोणाचा मानसिक छळ सहन करावा लागत असेल तर तिने फक्त त्या संबंधित व्यक्तीच्या किंवा मुलाच्या नावाची एक चिठ्ठी त्या तक्रारपेटीत टाकायची. मुलींना चिठ्ठी टाकण्याची भीती वाटू नये म्हणून तिने त्या चिठ्ठीवर स्वतःचं नाव टाकलं नाही तरी चालेल. आणि जरी तिने नावं लिहिलं तरी त्या नावाची गोपनीयता राखली जाईल."
कोटधारी प्रमुखाने लेकरांवर यथेच्छ शाब्दिक गोळीबार केला. त्यांच्या बोलण्याचा अर्थ आधी गुरुजींनी—पूर्ण पाच मिनिटे वापरून—स्वतः लावून घेतला आणि सोप्या शब्दात मुलांना खरंतर मुलींना सांगितला.
"तुम्हाला जर शाळेत, घरी, गावात कोणता पोरगा त्रास देत असेल तर त्याचं नाव एका कागदावर लिहायचं आणि त्या पोराबद्दल आणखी काही माहिती असेल तर ती पण लिहायची मग स्वतःच नाव त्या चिठ्ठीवर न लिहिता, ती चिठ्ठी न घाबरता बाहेरील फळ्याजवळच्या डब्यात टाकायची. त्या डब्यावर 'तक्रारपेटी' असं लिहिलेलं आहे, कळालं?"
"कळालं?" मुलींचा होकार घुमला. मघाशी अर्थबोध न झाल्याने गोंधळलेले विद्यार्थी आता घाबरलेले दिसू लागले.
"आणि जर संबंधित मुलीची तक्रार मोठी असेल तर पोलिसांची मदत घेतली जाईल. तसेच त्या, विद्यार्थिनीला त्रास देणाऱ्या, विद्यार्थ्याला शाळेतून निलंबितही करण्यात येईल." कोटधारीने तंबी दिली.
पोलिसांचे नाव ऐकून मुलांच उरलासुरल धैर्य गळालं. सूचना वजा धमकी देऊन महिला संरक्षण कायदा संस्थेचे कार्यकर्ते निघून गेले. मधल्या सुट्टीत आवर्जून तक्रारपेटी पाहण्यासाठी भलीमोठी गर्दी मैदानातील फळ्याजवळ जमली. प्रथमेशने आणलेला डबा सहदेवने आणि त्याने मिळून रिचवला मग दोघे पळतच मैदानावर आले. तक्रारपेटीत त्यांना उत्सुकता शमवणारं काहीच न सापडल्याने त्यांचा हिरमोड व्हायचा तो झालाच. पाणपोईवरून पाणी ढोसून दोघेही माघारी येत असताना त्यांना शालिनी नजरेस पडली. दोघांनी मग उरलेली सुट्टी शालिनीच्या मागे संतोषच्या नावाचा उद्धार करण्यात सार्थकी लावली! 'संत्या आला नाही? संत्या कुठय?' अशा फुटकळ प्रश्नांनी तिला त्रास दिला. यावेळी सोबत मैत्रीण असल्याने शालिनी फारशी रागाला गेलीच नाही.

"दी गी आवाज." सहदेवने प्रथमेशला पुढे ढकलल.
"तुला काय धाड भरली होय?"
दोघांनाही संतोषच्या वडिलांचा खत्रूड स्वभाव ठाऊक होता. त्याच्या घरासमोर थांबून दोघेही एकमेकांना धक्काबुक्की करत होते. अर्थातच प्रथमेश धक्का द्यायचा आणि सहदेव बुक्की मारायचा!
"काय रे काय करताय?" संतोषच्या मोठ्या बहिणीचा आवाज ऐकून दोघांच्या टिवल्या-बावल्या थांबल्या. ती नुकतीच विहिरीवरून हंडा घेऊन घरी आली होती. "कोण संत्या पाहिजे का?"
"होय." प्रथमेश म्हणाला.
"संत्या, पद्या आन साद्या आल्यात." ती आवाज देतच वाकून छोट्याशा चौकटीतून आत शिरली.
संतोष धावतच बाहेर आला. येताना अनावधानाने चहासोबत खात असलेला पारले तो बाहेर घेऊन आला होता. "काय रे?"
"आज का नाही आलास?" प्रथमेश.
"रानात काम होतं म्हणून नाय आलो. बोलकी काय म्हणतोस?"
"तुला काहीतरी महत्त्वाचं सांगायचय, चल तिकडे." प्रथमेशने संतोषच्या घराशेजारी असणाऱ्या मोठ्या चिंचेच्या झाडाकडे बोट दाखवलं.
तिकडे जाता-जाता सहदेवने संतोषच्या हातातला पारलेचा पुडा खेचला मग प्रथमेशनेही पारलेचा आस्वाद घेतला. तो पारले पूर्वस्थितीत घरी जाण्याची शक्यता शून्यापेक्षाही कमी असल्याने संतोषने सुद्धा चालता-चालता एक पारले बिस्कीट खेचलं.
"बोल की, काय म्हणतोस?" संतोषने प्रथमेशला विचारलं.
"आज शाळेत एक म्याटर झालाय." प्रथमेशने सांगितलं. "तू आज यायला पाहिजे होतं. तू असता तर एवढा म्याटर झाला नसता."
"म्याटर?" संतोषने कान टवकारले.
प्रथमेशने मानेनेच पुढची धुरा बिस्कीट खात असणाऱ्या सहदेवकडे सोपवली व पुड्यातील अजून एक पारले खेचलं. दोघांना संभाषणात गुंतवून पारले गडप करण्याचा त्याचा हेतू प्रथमेशने हाणून पाडला म्हणून सहदेव थोडासा नाराज झाला. त्याच्या तोंडातला बिस्किटांचा तोबरा संपवून तो बोलता झाला. तोवर संतोषने एक पारले खेचलं.
"ती आज शाळेत कसलीतर माणसं आलती." सहदेव.
"कसली तर?" संतोषची चौकस बुद्धी.
"कसली तर म्हणजे दोन पायावरच चालत हुती; पण त्यांनी शाळेत ते 'हे' बसवलय."
"तक्रारपेटी." प्रथमेशने पुस्ती जोडली.
"हां तक्रारपेटी."
"बर मग?" संतोषने थंडाईत विचारलं.
"त्यात कुणच्याबी पोरीनं तिला त्रास देणाऱ्या पोराच्या नावाची चिठ्ठी टाकली तर त्या पोराला शाळेतन निलंबु . . . निलूंबा . . . " सहदेवची बोबडी वळली. "शाळेतन काढून टाकत्यात!"
"शाळेतून निलंबीत करतातच . . . " प्रथमेश सांगायला लागला तसं सहदेवने पारले कडे ध्यान दिलं आणि शेवटची दोन बिस्किटे मुठीत घट्ट दाबुन धरली. " . . . मग पोलिसांना नाव सुद्धा सांगतात."
सहदेवच्या बंद मुठीवर बळाचा प्रयोग करून संतोषने दोन बिस्किटे हिसकावली त्यातलं एक स्वतःला घेतलं आणि दुसरं प्रथमेशला दिलं. तक्रारपेटी, निलंबन, पोलीस या गोष्टींच फारस गांभीर्य त्याला नव्हतच. घरात चहा थंड होतोय याची काळजी त्याला जास्त होती.
"मग काय झालं त्या तक्रारपेटीच ?" संभाषण जिवंत ठेवण्यासाठी संतोषने प्रयत्न केला.
"शालिनीन त्यात चिठ्ठी टाकली की लगा." सहदेवने पँटला हात झटकत सांगितलं.
आता मात्र संतोषचे पाय लटपटायला लागले, घशाला कोरड पडली. निलंबन, पोलीस या गोष्टींनी आता त्याच्या मेंदूत वादळाच रूप घेतलं. "का बरं टाकली शालिनीन चिठ्ठी?"
"हे या पद्यामुळं!"
"साद्या . . . माझ्यावर नाव का म्हणून घेतलस?" प्रथमेश गुरकावला आणि तिथेच दोघांची झंगड-पकड सुरू झाली.
संतोषने कसबस दोघांना थांबवलं. "काय झालं ते तर नीट सांगा." त्याला हातात ओला ऊस धरलेल्या वडिलांचा चेहरा दिसायला लागला.
"सकाळी ह्यो पद्या शालिनी माग संत्या, संत्या बोंबलत फिरत होता."
"मी एकटाच होतो काय रे साद्या? तुला सांगतो संत्या पहिल्यांदा साद्यानच आवाज दिला."
प्रथमेशकडे लक्ष न देता सहदेव सांगत राहिला. "शालिनीन याला सांगितलं की 'मला चिडवलं तर गुर्जीला आन पाटलाला नाव सांगेन' म्हणून, पर ह्यो पद्या चिडवतच राहिला."
आता मात्र प्रथमेशच्या संयमाची सीमा संपली. "मी नाही चिडवलं. शाळा सुटल्यावर पण साद्यानेच तिला चिडवलं, लय चिडवलं. आणि शेवटी वैतागून शालिनीन कागदावर काहीतरी लिहून तो कागद तक्रारपेटीत टाकला." सगळा प्रकार प्रथमेशने संतोषच्या लक्षात आणून दिला.

शाळा सुटली तेव्हा सहदेवने प्रथमेशला थांबवून धरलं 'आधी शालिनीला वर्गाबाहेर निघू दे' त्याने डोळ्यांनीच इशारा केला. शालिनी तिच्या मैत्रिणीसोबत वर्गाबाहेर निघाली तसे हे दोघे तिच्यामागे संतोषच्या नावाची हाकाळी देतं फिरायला लागले. सहदेवचा जोर चढलेला पाहून प्रथमेशच अंगही शिवशिवायला लागलं. त्यांनेही वाहत्या गंगेत चार-पाच आवाज सोडून दिले. शेवटी शालिनी शेजारच्या वर्गात शिरली, हे दोघे बाहेरच थांबले! दुसर्‍याच मिनिटाला हातात घडी केलेला छोटासा कागद घेऊन शालिनी बाहेर आली ती थेट, मैदानावर फळ्याच्या शेजारी टांगलेल्या, तक्रारपेटीपाशी थांबली. 'हे दोघे पाहताहेत' याची खातरजमा करून तिने तो कागद तक्रारपेटीत सोडला आणि या दोघांना लगोलग हरेक कृत्याचा पश्चाताप व्हायला लागला.
"का ग शालिनी काय टाकलस तक्रारपेटीत?" मैत्रिणीने शालिनीला विचारलं.
"काय नाही ग, दोन पोरं चिडवतात सारखं त्यामुळे टाकली त्यांच्या नावाची चिठ्ठी!"
बहुधा वर्गातल्या एका मिनिटात दोघींनी हे संभाषण ठरवलं असावं; पण हे संभाषण ऐकून सहदेव आणि प्रथमेशची खात्री झाली की तिने त्यांच्याच नावाची चिठ्ठी तक्रारपेटीत टाकली होती.

चिठ्ठीत नेमकं काय आहे? हे माहिती नसल्यामुळे संतोष सुद्धा घाबरला. "काय असेल रे चिठ्ठीत?" त्याने प्रथमेशला विचारलं.
"काय माहिती?" प्रथमेश म्हणाला.
"तुझं नाव असेलच." सहदेवने संतोषला अजून घाबरवल.
"का रे माझं नाव का म्हणून? मी तर आज आलोच नव्हतो." मिळेल ती पायवाट धरून संतोष सटकण्याचा प्रयत्न करत होता.
"पण तिला आम्ही तुझ्याच नावाने चिडवलं म्हणून तुझं नाव असणारं." सहदेवने मुद्दा रेमटला.
"तुम्हाला कोणी सांगितलं होतं चिडवायला?" संतोष असं म्हणाल्यावर हे दोघे त्याच्याकडे खुनशी नजरेने बघायला लागले. त्यांच्या विखारी नजरेत संतोषला, त्याने या दोघांना खास शालिनीला चिडवण्यासाठी चारलेला शेवचिवडा दिसला! संतोषने सारवासारव केली. "नाही तसं नव्हतं म्हणायचं मला. मला म्हणायचं होतं की आज मी आलेलो नसताना तिला माझ्या नावाने चिडवायला कोणी सांगितलं होतं?" संतोषच्या मुद्द्यात दम होता.
दररोज या दोघांसोबत संतोष असायचा त्यामुळे ते संतोष सोबत बोलता-बोलता शालिनीला चिडवायचे.
"तरीपण तुझं नाव आसलच." सहदेव म्हणाला.
"तुम्ही चिडवलय तर तुम्हीच बघा काय करायचय ते, मला उगाच म्याटर मधे खेचू नका." संतोषने दोघांना समजावलं.
"हीच का दोस्ती?" प्रथमेश म्हणाला, "लगा आमचा जीव तुमच्यावर आणि तुमचा खेटरावर!"
"बरोबर आहे रे पद्या काय नसतं दोस्ती-बिस्ती." सहदेवने री ओढली. " *** आग लागली की सगळेच आधी स्वतः पाण्यात जाऊन बसत्यात. मग मागच्याच काय का होईना."
दोघांची नाराजी संतोषला पेलवणारी नव्हती. "नाही रे लगा तसं नाही; पण मी म्हणतोय की हा म्याटर तुमचा आहे तर तुम्ही दोघेच सोडवा. आणि तसंही मी उद्या शाळेला येणार नाही. मला उद्यापण रानात काम आहे." हे त्याने नुकतचं ठरवलं होतं.
"आमचा म्याटर?" सहदेवच्या मस्तकातली अळी हलली. "आमचा म्याटर? **** त्वा तुझ्या बापाची बिडी चोरलीस तवा तुला वाचवायला मीच आलो होतो की ** *** " सहदेवाने उपकाराची जाणीव करून दिली.
"त्याबदल्यात निम्मी बिडी त्वा बी वडलीच की!" उपकाराची परतफेड दोनदा होत नसते हे संतोषने सहदेवला समजावलं.
"आणि मला?" प्रथमेशने विचारलं. "सगळी मजा दोघं मिळून करताय आणि मी म्हणजे नुसता नावाला?"
संभाषणाचा विषय भलत्याच मुद्द्यावर सरकायला लागला हे कळल्यावर संतोषने पुन्हा मूळ मुद्द्याला हात घातला. "मग आता काय करायचं?"
"तेच तर विचारायला तुझ्याकडे आलोय." प्रथमेशने सांगितलं.
"असं कर तू शालिनीकडं जा आन तिला चिठ्ठी परत काढायला सांग. मग सगळा विषयच थांबल." सहदेवने उपाय सुचवला.
सहदेवचा उपाय क्षणातच संतोषला दिवास्वप्नात घेऊन गेला. मनातच तो शालिनीला भेटला, तिला 'प्रेमाने' चिठ्ठी माघारी घ्यायला सांगितली आणि तिने घेतलीसुद्धा! मग त्यांच 'जुळलं' . . .
"जर तिने पाटलाला म्हणजे तिच्या बापाला सांगितलं तर?" प्रथमेशच्या जलजहाल शंकेने संतोषची तंद्री भंग पावली.
"तुमचं तुमी कस निस्तरायच ते निस्तरा उगीच मला मधी वढू नका." संतोषने निक्षून सांगितलं.
सहदेवने यारीदोस्तीच्या आणाभाका घेण्याआधी संतोषच्या आईने त्याला आवाज दिला. क्षणाचाही विलंब न लावता "आलो आलो." तो ओरडला. "बघा तुम्ही काय होतय उद्या आणि सांगा मला." तो घराकडे पळाला. "आये उद्या बी रानात काम आहे ना?" त्याने दारातूनच विचारलं.
सहदेवने प्रथमेशच्या गळ्यात हात टाकला आणि संतोषला शिव्यांची लाखोली वाहतच दोघे निघाले.
"आता काय करायचं?" प्रथमेशचा प्रश्न.
"काय करायचं?" सहदेवने विचार केला. "आता निवांत घरी जाऊन जेवायच मग झोपायचं. उद्या बघूया काय होतय ते."
प्रथमेशला त्याची कल्पना पटली. "संत्यान कशी गद्दारी केली बघितलं ना तू?"
"वेळ सगळ्यांवर येत आसती. आपण बी गद्दारी ध्यानात ठेवायची."
"बर ते जाऊ दे. संत्या बिडीचं काय म्हणत होता सांग की."
"इथ काय चाललंय? तू काय विचारतोय?" सहदेवने हाणलेली टपली प्रथमेशने हुकवली.
"मला भीती वाटतीये साद्या." प्रथमेश म्हणाला, "उद्या गुरुजींनी ती चिठ्ठी वाचली, तर ती माणसे येतील, पोलिस येतील, मग आपण घरी बापाला काय सांगायचं?"
सहदेवने मनात दाबलेली भीती गपक्यात वर आली. "भ्या तर मला बी वाटतंय." संभाषण एवढ्यावरच थांबवून ते दोघे फाट्यावर वेगळे झाले आणि घराकडे निघाले.
घरी पडवीला पिशवी भिरकावली आणि सहदेव घराबाहेर येऊन निवांत बसून राहिला. मधेच घरात जाऊन फडताळातली अर्धी भाकरी रिचवली मग घरातच बसून राहिला. सगळे रानातून दमून घरी आलेले असल्याने त्याच्याशी कोणी काही बोललच नाही. शेवटी खाली पाठीवर झोपून निवांतपणे साठ वॅट दिव्याच्या मंद तांबड्या-पिवळसर प्रकाशाभोवती भिरभिणारे पतंग बघत त्याची झापड लागली.

ते लोक वाऱ्याच्या वेगाने शाळेत शिरले, तसे मास्तर पुन्हा एकदा हडबडले. त्या लोकांनी एका क्षणात मास्तरांच्या कानात काहीतरी सांगितलं, मास्तरांचे डोळे लालबुंद झाले. त्या लोकांनी मास्तरांना बोलण्याची संधी दिली, आग्रह केला.
"सहदेव उभा रहा." मास्तर ओरडले.
तेव्हा मधल्या सुट्टीनंतर अर्धग्लानीत असणारा सहदेव खडबडून जागा झाला. त्या अधिकाऱ्यांनी तिथून प्रकरण हातात घेतलं. त्यांनी सुरुवातीलाच पटकन सहदेवचे दोन्ही हात पाठीमागे गुंडाळून त्याला बेड्या ठोकल्या. आठवीच्या पोराला बेड्या! असा कोणता गुन्हा त्याने केलेला होता? त्याला बोलण्याची संधी दिली गेली नाही, सोबतच काय चाललंय हे त्याला समजावण्याची गरजही त्या लोकांना वाटली नाही. त्याला दंडाला धरून खेचतच शाळेच्या मैदानात आणलं गेलं तर तिथे पोलिस उभे होते. एका अधिकाऱ्याने पटकन येऊन त्याच्या चेहऱ्यावर काळा रुमाल बांधला. तेवढ्यात बसण्याच्या जागी सहदेवला दोन बांबूंचा—किंवा एका बांबूच्या दोनदा—सटासट स्पर्श जाणवला!
'देवा प्राण तळमळला' सहदेवच्या ओठांवर आलेले शब्द त्याने पोटातच अडवून धरले.
त्याला तसंच खेचत नेण्यात आलं. मधेच कधीतरी त्याला आईचा रडण्याचा आवाज आला, त्याने काळ्या कपड्याच्या झिरमिरीतून समोरचं दृश्य पाहण्याचा अतोनात प्रयत्न केला तेव्हा त्याला अस्पष्टपणे रडणारी आई दिसली. अचानक आईची जागा वडिलांनी घेतली!
पोलिसांनी त्याला धरलेल असूनसुद्धा वडिलांचे हात त्याच्या गालावर उमटले.
" *** हे धंदे कराय शाळत जातूस व्हय **** " पोलिसांनी वडिलांना अडवलं, हे एक बरचं केलं!
त्याला नेऊन जीप मधे बसवण्यात आलं. कोणत्या मार्गाने निघालोय? हे कळायला मार्ग नव्हता! बर्‍याच वेळाने जीप थांबली, त्याला उतरवून कुठेतरी नेऊन उभं केलं गेलं. गळ्याला कासऱ्याचा स्पर्श जाणवला तेव्हा सहदेवच अंग शहारलं. मानेवरचे, आणि होते नव्हते तेवढे सगळे, केस ताठ उभे राहिले.
"अंतिम इच्छा?" एक जाडाभरडा आवाज काळाकपडा चिरून सहदेवच्या कानात घुमला.
"गुन्हा? माझा गुन्हा काय?" सहदेवने विचारलं. "मी निर्दोष आहे!" गुन्हा माहिती नसताना त्याने माफीनामा सुद्धा जाहीर केला.
"पाटलाच्या शालिनीची छेड का म्हन काढलीस? तोच तुझा गुन्हा! मुलीची छेड काढणाऱ्याला कायदा जिवंत सोडणार नाही." आवाज थांबला आणि सहदेवच्या पायाखालच फाळकाट दुभंगल, सहदेव हवेतच पाय झाडायला लागला!

"ए साद्या . . . ए साद्या . . . " सहदेवला गालावर मुंग्या आल्याचा भास झाला. "आवो बघा की साद्याला फेफरे आल्यात. ए साद्या . . . "
सहदेवला गालावर पुन्हा मुंग्या जाणवल्या आणि कांद्याच्या वासाने नाकाला झणका बसला तेव्हा त्याने खाडकन डोळे उघडले. पाहतो तर काय? आईने त्याला मांडीवर घेतलेलं, वडिलांच्या हातात बुक्कीने नेस्तनाबूत केलेला कांदा, पाठीमागे साठ वॅट दिव्याच्या प्रकाशात भिरभिणारे पतंग. 'स्वप्न होतं.' तो स्वतःशीच म्हणाला.
"का रे बाबा, काय झालं? झोपतच येड्यावानी का करायला लागला होता? पाय काय झटकतोय? हात काय हलवतोय?"
"काही नाही, स्वप्न पडलं होतं." सहदेव असं म्हणाल्यावर जो तो आपापल्या कामाला लागला.
हे आजचं स्वप्न सत्य व्हायला उद्याचा दिवस पुरेसा होता. त्याने विचार केला आणि तो तडकच निघाला. "आई मी जरा पद्याच्या घरला जाऊन येतो."
"कशाला रात्रीचं चाललाय तिकडं? आताच तर फेफऱ्यातून उठलाय बस की देवा-देवा करत."
"अभ्यासाचं काम आहे." असं सांगुन त्याने पायांना जो वेग दिला तो प्रथमेशच्या अंगणातच आखडता घेतला.
वहीच्या छापडीने वारं घेत प्रथमेश अंगणातच बसला होता. सहदेवने खुणेची शीळ घातली तसा तो उठून याच्या जवळ येऊन उभा राहिला. आल्या-आल्या त्याने सहदेवच्या दंडाला चिमटा काढला.
"मला का म्हणून चिमकुरा काढलास?" सहदेव कळवळला.
"नाही, मला वाटलं तू आलास हे पण स्वप्नच आहे!"
"मग तुझ्या दंडाला काढना चिमकुरा." सहदेवने त्याला मिळालेला चिमटा व्याजासकट परत दिला. "कसलं स्वप्न?"
"माझ्या स्वप्नात मला पोलिसांनी पकडलं होतं." प्रथमेश दंड चोळता-चोळता सांगू लागला. "मला पोलिसांनी रानात नेलं आणि . . . गोळी हाणली माझ्या डोक्यात!"
सहदेवच अंग भीतीने थरारलं. कवटीच्या मागच्या बाजूला, रूपयाच्या आकाराच्या, छिद्राचा त्याला भास झाला. "का मारली गोळी? शालिनीला चिडवलं म्हणून?"
"तुला कसं कळलं?"
"मला बी आसच स्वप्न पडलं लगा पद्या. मला फासावर दिलं बघ पोलिसान!"
"मग आता?"
भीतीने दोघांची विचारचक्रे गरगरा फिरवली. दोघेही या संकटातून सुटून जीव वाचवण्याचे पर्याय शोधत होते.
"चल पद्या आजच्या आजचं सगळं प्रकरण मिटवून टाकू. उद्यावर ढकलल तर माहित नाही काय होईल."
"आता कुठे जायचं? या वेळेला?" प्रथमेशला अर्थबोध झाला नव्हता. "प्रकरण मिटवायच म्हणजे काय करायचं?"
"जिथं सगळं सुरू झालय तिथंच समद संपवायच." सहदेवच्या आवाजात निर्धार होता.
"संपवायच . . . " पद्याच्या हातातली छापडी गळून पडली. "म्हणजे शालिनीला . . . " त्याने उजवा हात आडवा करून गळ्यावर फिरवला.
" **** तिला कुठं मारतो? ** *** " सहदेवने प्रथमेशचा हात गळ्यापासून ओढून पिरगाळला.
"मग काय करायचं?"
"तू तुझ्या बा ची सायकल घे, मला ठाऊक आहे काय करायचय ते."
"आधीच या वेळेला घराबाहेर पडणं मुष्किल त्यात पुन्हा सायकल. नक्की काय करायचय?"
"मला जीव वाचवायचाय! विचार कर," सहदेव म्हणाला, "जर माझं—किंवा तुझं—स्वप्न खरं झालं तर?"
"मी येतो तुझ्यासोबत; पण मला आधी काहीतरी सांगशील की?"
"जास्त प्रश्न ईचारू नगस." सहदेवने प्रथमेशला घराकडे पिटाळलं. त्याला आताच पर्याय सांगितला तर तो कधीच येणार नाही हे सहदेवला चांगलच माहिती होतं. वाटेतून मधेच प्रथमेश माघारी आला.
"घरी काय सांगू?"
"तुझं घर, तू काय बी सांग!"
"तरीपण?"
"सांग संत्याच्या घरी चाललोय."
"कशाला?"
" *** **** "
सहदेवने हासडलेली शिवी उरात घेऊनच प्रथमेशने घड्याळात पाहिलं. सात वाजून गेले होते. "आई मी संत्याच्या घरला जाऊन येतो." प्रथमेशने आईला सांगितलं. "साद्यापण आलाय. अभ्यासाचं काम आहे म्हणतोय."
"एवढ्या रात्रीच? उद्या-बिद्या जा." आईने तव्यावर भाकरी टेकवून दोन्ही हात अलगद बाजूला सारले आणि तांब्यात हात बुडवून तव्यावरच्या भाकरीवर पाण्याचा हात फिरवला. "साद्याला बी म्हनाव जा घरला."
"महत्त्वाचं काम आहे." प्रथमेश इतकंच म्हणाला आणि मग त्याचे वडील बोलू लागले.
"काय खोटं सांगतुय **** आज संत्याचा बाप भेटला होता. त्यो तर मनाला संत्या साळतच गेला नाही! आणि तुम्ही त्याला अभ्यास विचारायला चाललाय व्हय! कुठाय साद्या? ऐ . . . साद्या . . . "
प्रथमेशच्या वडिलांची हाक ऐकून आधीच झाडाखालच्या अंधारात थांबलेला सहदेव आणखीनच अंधारात शिरला.
"जाऊदे मी नाही जात." प्रथमेशने आईला सांगितलं. "संत्याला आजचा अभ्यास सांगायला पाहिजे म्हणून चाललो होतो."
"त्याच्या अभ्यासाची काळजी असेल तर ईल की तो." आई म्हणाली तसा प्रथमेशचा चेहरा पडला. नाविलाजाने तो सहदेवला नकाराचा निरोप सांगायला निघाला. "लवकर ये." आईने नकळतपणे त्याला परवानगी दिली सुद्धा.
त्याने पटकन आत डोकावून सांगितलं. "बा सायकल नेतो."
त्या चोवीस इंची बाबा सायकलने नळीतून पाय घालून अर्ध पायंडल मारणाऱ्या प्रथमेशच्या तोंडाला फेस आणला. त्याचा वेग(?) पाहून शेवटी सहदेवने सायकल घेतली व सीटवर बसून पूर्ण पायंडल हाणून सायकलला वेग मिळवून दिला. चंद्राचा प्रकाश बर्‍यापैकी साथीला होताच. शिवाय रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांचा प्रकाशही होता. मधूनच रस्त्याच्या कडेला लावलेल्या डांबावरून येणाऱ्या दिव्याच्या प्रकाशाच दर्शन व्हायचं. इतकं असूनही सायकल नकळतपणे गचक्यांत जातच होती. कॅरेजवर सीटला धरून प्रथमेश निर्विकारपणे बसला होता. समोर काय वाढून ठेवलंय याची तिळमात्र कल्पनाही त्याला नव्हती. बोलायचं बरंच काही होतं; परंतू कॅरेजने खालून दिलेल्या दणक्यांनी त्याचा आवाजच निघत नव्हता. शेवटी सहदेवने सायकल गावाच्या वेशीवरून बाहेर काढली तेव्हा त्याला राहवलं नाही.
"कुठे . . . जायचय . . . साद्या?" कॅरेजच्या दणक्यांनी प्रथमेशचा आवाजही तुटत होता.
"शाळत."
"शाळेत! कशाला?"
"त्या तक्रारपेटीतून चिठ्ठीच काढून घ्यायची!" सहदेवला तशा अवस्थेत सुद्धा हसू आलं. "मग बघू कोण काय करतय आपल्याला!"
इतक्या रात्री शाळेत जाऊन असला घोर अपराध करायचा ही कल्पनाच प्रथमेशला सहन झाली नाही. त्याने विरोध केला. "साद्या नको रे लगा, चल घरी. उद्या जर गुरुजीला कळलं तर लय मारत्याल."
"तुझ्याकडे दुसरा पर्याय आहे?" सहदेवचा एकच प्रश्न पुरेसा होता.
'रात्री शाळेत जाऊन गुन्हा करणे ही बाब तितकीशी वाईट नाहीये कारण, बघायला तिथे आहेच कोण?' प्रथमेशने शांतपणे पुढे पाहायला सुरुवात केली.
रात्रीच्या अंधारात सहदेवच्या धापांचाच काय तो आवाज घुमत होता. बाकी मग कसल्याशा किड्यांचे, चिटपाखरांचे, झाडांच्या सळसळत्या पानांचे आवाजही होतेच. पायी अर्ध्या तासाचा शाळेचा रस्ता सायकलवर असून सुद्धा कटत नव्हता. मनात अनाकलनीय भीतीही होतीच. शाळा जवळ यायला लागली तसं प्रथमेशच काळीज धडधडायला लागलं, कोणीतरी बंदुकीच्या फैरी झाडाव्यात तसा धाड-धाड आवाज त्याच्या कानात घुमायला लागला, कानशिले तापली, घसा कोरडा पडला त्याने हातानेच सहदेवला थांबायला सांगितलं.
"काय?" सहदेवने विचारलं आणि एक पाय टेकवत तो अधांतरीच उभा राहिला.
"थांब जरा." प्रथमेशने कॅरेजवरून ऊडी मारली. "शाळेत जायचं?"
"नुसतं जायचं नाही, काम करूनच यायचं."
"सायकल?"
"घेऊन जायची."
प्रथमेशने स्पष्टपणे नकार दिला. "आपल्याला कोणी पकडलं तर सायकल सुद्धा जप्त होईल. मग माझा बाप मला सोडायचाच नाही."
"मग काय करायचं?" सहदेवने विचारलं.
"असं करूया मी सायकल घेऊन इथेच थांबतो, तू जाऊन ती चिठ्ठी घेऊन ये."
प्रथमेशच षडयंत्र सहदेवच्या लक्षात आलं. "चिडवताना मी एकट्याने चिडवलं का रे **** ? तू येत असशील तर जायचं नाहीतर चल घरी माघारी."
"चल!"
"कुठं?"
"शाळेत." प्रथमेश नाविलाजाने म्हणाला.
शाळेजवळ येईपर्यंत अंगात असणारं थोडथोडकं धैर्यही आता गळून गेलं होतं. प्रथमेशची असणारी भीती घालवण्यासाठी सहदेवने त्याला त्यापेक्षा मोठी भीती दाखवली.
"समज उद्या शाळेत चिठ्ठी उघडली आन त्यात फक्त तुझच नाव असेल तर . . . तर तुला एकट्यालाच मरावं लागलं."
"माझ नाव? एकट्याच?" प्रथमेश घाबरला. "तसंतर मग तुझं एकट्याचं नाव पण असू शकतं की! कारण, चिडवायला सुरवात तू केली होती."
निकाल लागत नव्हता, वाद-विवाद होत होते. तशातच शेवटी सहदेवने प्रथमेशला एकच प्रश्न विचारला. "तू येणार आहेस का नाही? मी तर चाललो बघ." थोडसं थांबून तो म्हणाला, "तू बी संत्यासारखा गद्दार निघशील आसं वाटल नव्हतं! थू: असल्या दोस्तीवर!"
'कपाळावर गद्दारीचा शिक्का!' आता मात्र सहदेवसोबत जाणं आवश्यकच होतं. ते दोघे चालतच निघाले. शाळेसमोरुन जाणाऱ्या रस्त्याला खेटूनच ऊसाचं रान सुरू व्हायचं. रानाला वळसा घातला आणि—शाळेसमोर दिव्याचा डांब असल्याने दिव्याच्या उजेडात—शाळा दिसायला लागली. तेवढ्यात प्रथमेशला सायकलच ध्यान झालं.
"साद्या सायकलच काय करायचं?" त्याने विचारलं.
सहदेवने आजूबाजूला पाहिलं विचार केला मग सरळ बांधावरून उतरून सायकल ऊसाच्या सरीत आडवी केली.
"साद्या लगा सायकल कुणी नेली तर?" प्रथमेशचा आवाज केविलवाणा झाला.
"कोण नाही नेत, चल तू मी आहे." सहदेवने त्याला आश्वस्त केलं.
त्याच्या आश्वासनाने सायकल सुरक्षित राहण्याची शाश्वती नव्हतीच. अर्ध मन सायकलवर आणि अर्ध भीतीत बुडालेल या अवस्थेत दोघे शाळेजवळ आले. शाळेला गेट नावाची वस्तू होती ती फक्त दिसण्यासाठीच, दोन्ही दरवाजांना थोडसं फाकवून धरलं की एका माणसाला आत जाण्यापूरती जागा लगेच तयार व्हायची. शाळेची दुमजली इमारत भुताचा वाडा भासायला लागली, डांबावरील दिव्याच्या पिवळसर प्रकाशात शाळेच्या खिडक्या झपाटलेल्या डोळ्यांसमान भासत होत्या. शाळेच्या प्रांगणातील झाडांवर बसलेली भुते क्षणात खाली उडी टाकतील व आपला जीव घेतील असा भास दोघांनाही होत होता.
"मी इथच थांबतो." प्रथमेश म्हणाला. बोलता-बोलता थरथरणारे पाय स्थिर करण्याचा निष्फळ प्रयत्नही तो करत होता.
"मग माझ्यासोबत कोण येणार?" सहदेवने विचारलं. त्याने थुंकी गिळून घशातली कोरड मिटवण्याचा प्रयत्न केला.
"कोणी आलं तर? मी इथे थांबून लक्ष ठेवतो आणि कोणी आलच तर तुला सांगतो पटकन."
"चल कोण येत नाही." सहदेवने आग्रह केला आणि प्रथमेशच्या हाताला हिसका दिला. त्याने दुसऱ्या हाताने गेट घट्ट धरून ठेवलं होतं, हाताला हिसका बसला तसं गेट प्रचंड आवाज करून आदळलं. दोघांची पळता भुई थोडी झाली.
गेटचा आवाज विरला तेव्हा सहदेव म्हणाला, " *** *** गेट धरलास का? मी जाऊन आलो तू इथेच थांब." आपण घाई केली नाही तर नसतं लचांड गळ्यात पडेल हे त्याला कळून चुकलं.
तक्रारपेटीकडे निघालेल्या सहदेवच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत प्रथमेशने शाळेबाहेर नजर फिरवली, कोणीच नव्हतं, अंधारातच तक्रारपेटीच्या काळ्या डबड्याला झटणारा सहदेव त्याला स्पष्ट दिसत होता. थोड्याच मिनिटांच्या झटापटी नंतर सहदेव त्याच्या जवळ आला. त्याने गेट ताणून धरलं.
"थांब आताच नाही जायच." सहदेव म्हणाला.
"मग कधी जायचं?"
"अडचण आलीये?" सहदेवने सांगितलं तेव्हाच दोघांची जीव वाचवण्याची उरलीसुरली उमेद नष्ट झाली.
"कसली अडचण?"
"पेटीला कुलूप आहे."
"मग रे आता? जायचं का घरी?"
"घरी जाऊन काय करतो ** " सहदेव म्हणाला, "तू चल माझ्यासोबत मला मदत कर कुलूप तोडायला."
"कुलूप तोडायला? कुलूप तोडायला! कुलूप तोडायला."
तीन वेळा तीन आवाजात प्रथमेशने विचारलं त्याचा सहदेववर काहीही परिणाम झाला नाही. त्याने प्रथमेशचा गेट धरलेला हात हळुवारपणे सोडवला आणि दुसऱ्याच क्षणाला त्याला खेचायला सुरुवात केली. 'असही मरणार तसही मरणार' प्रथमेश विचार करत होता. 'मग आता इथेच मेलेल खूप-खूप चांगल.' भविष्याचा विचार सोडून त्याने रानात पडलेल्या सायकल चा विचार सुरू केला. 'देवा सायकल जपून ठेव.'
"आता काय करायच?" प्रथमेशने तक्रारपेटीच्या कुलपाकडे पाहत विचारलं.
तक्रारपेटीच कुलूप खूप लहान होतं—अर्थातच कमकुवतही होतं. पेटी बंद रहावी इतकचं त्या कुलपाच नियोजन केलं गेलेल असाव.
"तू इथे थांब." सहदेवने बरोबर कुलपाच्या खाली प्रथमेशला उभं केलं. "कुलूप पकड." प्रथमेशच्या उंचीने आताही त्याला दगा दिला. सहदेवने त्याला कसतरी उचलल. "कुलूप पकड **** " सहदेव हळू आवाजात ओरडला.
प्रथमेशने उजव्या हाताची अनामिका कुलपात घातली व दोन्ही हातांनी कुलूप पकडलं. तेव्हाच सहदेवने त्याला सोडलं. हवेत अधांतरी लटकत्या प्रथमेशच्या हातावर दोन्ही हातांचा भार देऊन दोन्ही पाय उचलून सहदेव पण लटकला. दोन सेकंद हा डोंबारी खेळ चालला आणि कुलपाने शरणागती पत्कारली.
प्रथमेश काळाचं भान न ठेवता बोंबलायला लागला. त्याची अनामिका कुस्करली गेली होती. सहदेवने पटकन त्याच्या तोंडावर स्वतःच्या उजव्या हाताचा पंजा दाबून धरला. थोड्याच वेळात त्याला हाताला ओलावा जाणवला. प्रथमेशच्या डोळ्यातून पाणी घळाघळा वहायला लागलं.
"माफ कर लगा; पण तू कुलपात हात कशाला घातला?" त्याने प्रथमेशच सांत्वन केलं आणि पेटी उघडली.
पेटीत एकच चिठ्ठी होती, निश्चितच शालिनीची. सहदेवने चिठ्ठी काढली आणि एकाएकी दोघांनीही मानगुटीवर भूत बसल्यासारखं जिवाच्या आकांताने गेट कडे धाव घेतली. मधेच सहदेवने प्रथमेशचा हात धरला तसा प्रथमेश अजूनच घाबरला. तो भीतीने ओरडणार तेवढ्यात सहदेवने त्याला शांत केलं.
"पद्या माघारी चल."
"आता काय राहिलय?"
"माघारी चल लगा तुला सांगतो." दोघे पळतच माघारी पेटी जवळ आले.
सहदेवने पेटीची कडी लावली, कुलूप होतं तसं अडकवलं मग दातखीळ बसेपर्यंत ताकद लावून कुलूप दाबलं उपयोग—शून्य! कुलूप बसत नव्हतं. त्याने हातातली चिठ्ठी प्रथमेशकडे दिली. देवाचं नाव घेऊन अंगातली सगळी शक्ती त्या कुलपावर प्रविष्ट केली. देवाच्या कृपेने कुलूप लागलं!
कुलूप ओढून तोडलं की कधीकधी कुलपाची मुख्य कळच प्राण सोडते. अशावेळी ते कुलूप विना चावीचच माघारी बसवता येतं. छोट्याशा कूलपाला होतं तसं बसवण्यासाठी सहदेवची ताकद पुरेशी होती. त्याने प्रथमेशच्या हातातली चिठ्ठी घेतली आणि दोघे सुसाट निघाले. सहदेवने गेट ताणलं तेव्हा प्रथमेश बाहेर पळाला.
"मी रे ***** ?" सहदेवने प्रथमेशला आठवण करून दिली.
एकटाच पळत निघालेला प्रथमेश माघारी आला. कसंबसं त्याने गेट फाकवलं आणि दोघांनी, पळत येऊन, सायकल उचलून धूम ठोकल्यानंतर रानाच्या कोपऱ्यावर येऊनच दम सोडला. दोघांनीही सायकल रस्त्यावर आडवी केली आणि तोंडाने शरीरात प्राण भरायला सुरुवात केली.
बोलण्यापुरता प्राण शरीरात आला तेव्हा प्रथमेश म्हणाला, "उघड चिठ्ठी."
"उघडायची काय त्यात?" सहदेवने थोडा आणखी प्राण फ्फूफुसात खेचला. "सरळ फाडून टाकायची."
"थांब रे साद्या, चिठ्ठीत काय लिहिलय ते तर बघू आधी."
"बरोबर आहे."
सहदेवने चिठ्ठी उघडून अंधूक प्रकाशात डोळ्यांना चिकटवली, उलटीपालटी केली आणि तोंडाने अजूनच वेगात प्राण खेचला आणि शालिनीला निब्बार शिवी हासडली.
"शालिनीन **** फसवल आपल्याला! "
प्रथमेशने चिठ्ठी तपासली—चिठ्ठी कोरी होती! "अंधारात दिसत नसेल." बराच वेळ शून्यात पाहत प्रथमेश म्हणाला, "चल घरी जाऊन बघू."
शालिनीला आणखी निवडक शिव्या देत व सोबतच संतोषच्या नावाचा जयघोष करत सहदेवने सायकलवर टांग मारली. वाटेत दिव्याखाली थांबून दोघांनीही चिठ्ठी पुन्हा तपासली. चिठ्ठी कोरीच होती. सहदेवने सायकल वेशीपासून आत वळवली तेव्हा बराच अंधार पडला होता.
"साद्या . . . " प्रथमेश म्हणाला, "चिठ्ठी रिकामी होती याचा अर्थ तुला कळला का रं?"
"कळला की. शालिनीन **** फसवल आपल्याला."
"तसं नाही रे."
"मग कसं?" सहदेवची उत्सुकता.
"शालिनीला आपण संत्याच्या नावाने एवढ चिडवलं तरीपण तिनं आपलं नाव चिठ्ठीत लिहिलं नाही म्हणजे मग तिला संत्या आवडत असेल का रे?"
प्रथमेशचा युक्तिवाद ऐकून सहदेवच्या मणक्यात चमक भरली! या युक्तिवादाच्या मागचं सत्य त्याला कळून चुकलं.
"होय लगा तू म्हणतोस ते खरं असेल; पण आपण संत्याला सांगायचं नाही. मगाशी बघितलं ना, त्या गद्दारान आपल्या दोघांना कसं कटवलं?"
"मरू दे त्याला तसचं. साद्या उद्या जर संत्याने 'काय झालं' म्हणून विचारलं तर?"
"तर सांगायचं काहीच नाही झालं. त्याला कशाला काय सांगायच?" सहदेवने सायकल चौकातून त्याच्या घराकडे वळवली.
"थांब साद्या आधी मला सोड मग तू जा घरी."
"मी कसा जाऊ चालत? मला सोडून तू जाशील की घराकडं सायकलवर." सहदेवने सरळसोट नियोजन सांगितलं.
प्रथमेशने उत्तरादाखल मुरगळलेली अनामिका दाखवली. 'अंधारात एकट्याने जायचं' या विचाराने मनात दाटलेली भीती त्याने अनामिकेच्या बहाण्याने दडवली.
सहदेवने सायकल प्रथमेशच्या दारात थांबवली. "बोट मुरगळलेल घरी सांगू नकोस आन निवांत झोप आता." प्रथमेशने शर्टच्या वरच्या खिशातली चिठ्ठी त्याच्याकडे दिली. "याचं काय करायचं आता?" असं म्हणून सहदेवने चिठ्ठी फाडली मग घराकडे निघाला.
प्रथमेशने माघारी आल्याबरोबर घड्याळात पाहिलं. आठ वाजले होते, तासातच सगळा थरार संपला होता, मृत्यूचं भय पळालं होतं, दोघा वीरांनी जीवावर खेळून आलेला काळ परतवून लावला होता; मात्र दोघांची मनस्थिती दोरीला साप समजून घाबरणाऱ्यासारखी झाली होती.
प्रथमेशची आई त्याची वाट पाहत होती. तिने त्याला जेवायला वाढलं, स्वतःलाही घेतलं. बाकी सर्वजण झोपले होते त्यामुळे दिवा लावण्याची भानगड नव्हती. रॉकेलच्या चिमणीचा मंद निळा-जांभळा प्रकाश, काजळीचा पसरलेला गंध, चिमणीच्या ज्योतीत आत्मसमर्पण करणारे पतंग पाहत, आईच्या प्रश्नांची उत्तरे देत त्याने जेवन आटोपलं. चूळ भरून मग एकदाचं अंथरुणावर अंग सोडलं. आईच्या भांडी घासण्याच्या आवाजाकडे लक्ष देता-देताच त्याला झोप लागली.
घरी पोहचल्यावर सहदेवने आईच्या बक्कळ शिव्या खाल्ल्या, काळजीमय प्रेमापोटी तिने सरपणातली काठी काढून त्याच्या दोन्ही पोटऱ्यांवर सपासप बसवली, ती सुद्धा जेवली नव्हती, दोघांनीही भाकरी मोडली, विचारातच पोटात घास ढकलले. सहदेवने तोंड खंगळून अंथरून जवळ केलं. आजसारखी निश्चिंत झोप गेल्या कैक वर्षात त्याने अनुभवली नसावी.

"शाळेत महत्त्वाचं काही नसेल, तर आज चल रानात." सकाळी-सकाळी वडिलांच बोलणं ऐकत सहदेव भाकरी मोडतच होता.
शेवटी आईने मध्यस्थी केली. "असेल महत्त्वाचं काहीतरी म्हणून तर चाललाय शाळत."
पोटात भर पडल्यावर सहदेवने पिशवी उचलली आणि शाळा गाठली. घाबरतच त्याने शाळेत पाऊल टाकलं. तक्रारपेटी जवळ तोबा गर्दी व अस्पष्ट चर्चा सुरू असणार असं त्याला वाटत होतं—त्याचा अपेक्षाभंग झाला. वर्गात प्रथमेश त्याचीच वाट बघत होता. गेल्या-गेल्याच प्रथमेशने त्याला पेराजवळ काळीनिळी झालेली अनामिका दाखवली.
नंतर दोघेही बाहेर व्हरांड्यात फिरायला लागले. आजही संतोष आलेला नव्हता, तो येणार नव्हता याची दोघांनाही पुरेपूर कल्पना होती. मधेच दोघांनी तक्रारपेटी जवळ जाऊन चोरट्या नजरेने कुलूप पाहिलं, कोणता पुरावा मागे राहिलाय का? तेही तपासलं. शेवटी ते पुन्हा व्हरांड्यात आले. शालिनी मुद्दामच दोन-तीनदा त्यांच्या पुढून गेलेली या दोघांनीही पाहिलं होतं; परंतू त्यांनी थंडच राहायचं ठरवलं. सगळा त्रास कायमचा मिटला म्हणून शालिनी निश्चिंत झाली.
आजही मास्तरांनी पटावर हजेरी घेताना कित्येकांच्या कुळाचा उद्धार केला मग शाळेचे तास सुरू झाले. मधल्या सुट्टीत दोघांनीही प्रथमेशचा डबा खाल्ला, वातावरण मस्त असल्याने आणि खायला दोघे असल्याने डबा लवकरच संपला. थोडासा वेळ मैदानात घालवावा या हिशोबाने दोघे निघाले. पाणपोईवरून माघारी येताना त्यांना शालिनी दिसली, तिच्या मैत्रिणीसोबत.
"ए संत्या . . . " नकळतपणे प्रथमेशच्या तोंडातून आवाज निघालाच. कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडच!
सहदेवने चिडून प्रथमेशची अनामिका पिरगाळली. "काल काय झालं माहिती नाही का तुला?" तो हळू आवाजात म्हणाला, "तरी बी आजून चिडवतोस?"
"चुकून झाल रे लगा." प्रथमेशने तळमळत चूक मान्य केली.
"ठरलं आजपासून पुन्हा कधीच शालिनीला चिडवायचं नाही."
"चालतय की." प्रथमेश म्हणाला, "पण मग संत्याचं जुळलं का र?"
प्रथमेशने मैत्रीचा धागा अजूनही धरलेला होता. तेव्हा सहदेवलाही संतोषने देऊ केलेल्या अर्ध्या बीडीची जाणीव झाली. त्याच्या मनातल्या कृतज्ञतेला उकळी फुटली.
"थांब जरा." त्याने प्रथमेशला व्हरांड्यातील एका खांबाच्या मागे खेचलं. तिथून एका डोळ्याने चोरून पुढे पाहिलं. शालिनी अजून फार लांब गेलेली नव्हती. तोच सहदेवने हुबेहूब बोकडाच्या आवाजात शालिनीला आवाज दिला. "एऽऽऽ संत्याऽऽऽ "
सकाळपासून आनंदात असणाऱ्या शालिनीच्या कपाळावर आठी उमटली. सहदेवने आवाज कितीही बोकडासारखा काढला तरी त्याचा आवाज न ओळखण्याइतकी ती बोळ्याने दूध पीत नव्हती. कुत्सित हास्य करून तिने मानेला हलका झटका दिला. 'पहिले पाढे पंचावन्न' शालिनी मनातल्या मनात म्हणाली आणि तिने मार्ग तोडायला सुरुवात केली.



—समाप्त.


[ ही कथा संपूर्णतः काल्पनिक असून या कथेतील पात्रे, स्थळ, काळ, वेळ अथवा इतर कोणत्याही गोष्टीचा वास्तवाशी काहीएक संबंध नाही. असा संबंध आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग आहे. सोबतच कोणत्याही जिवंत अथवा मृत व्यक्ती, संघटना किंवा धर्माला दुखावण्यासाठी हे लेखन करण्यात आलेले नाही. असे आढळल्यास आधीच क्षमा मागतो. क्षमस्व.

लेखक कोणत्याही अमली पदार्थांचे किंवा शरीरास हानिकारक असणाऱ्या तत्सम पदार्थांचे सेवन, समर्थन अथवा प्रचार करत नाही—आपलाच रंगारी. ]