स्वप्नद्वार - 2 Nikhil Deore द्वारा भय कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

स्वप्नद्वार - 2

स्वप्नद्वार ( भाग 2 )

ही कथा काल्पनिक असून केवळ मनोरंजनासाठी काही स्थळांचा उल्लेख केला आहे.

भाग 1 वरून पुढे.

सूर्य माथ्यावर चढला होता. रात्रभर निशांतची झोप न झाल्यामुळे त्याचे डोळे चुरचुरत होते. आईच्या आवाजाने अर्धझोपेत असलेला निशांत अंथरुणावर जागा होऊन बसला होता. संपूर्ण शरीर एका वेदनेन जखडल्यासारख वाटत होत. गरम पाण्याचा शॉवर घेऊन त्याने त्या जखडलेल्या शरीराला स्फूर्ती दिली. थोड्याच वेळात स्वतःला टापटीप करून तो त्याच्या लहानपणीच्या मित्राला अर्थातच योगेशला भेटायला फॉरनो कॅफेत निघाला. मागच्या काही महिन्यापासून वाईट स्वप्नामुळे त्रस्त झालेल्या निशांतने आज सर्व कामाला विराम दिला होता आणि स्वतःसाठी काही वेळ आज काढला होता.

निशांतची कार भरघाव वेगाने अंतर कापून फॉरनो कॅफेजवळ येऊन थांबली. योगेश आधीच तेथे पोहचला होता. निशांतने फॉरनो कॅफेत पाय ठेवताच दूर बसलेल्या योगेशवर त्याची दृष्टी पडली. मध्यम गोरा, अंगात पांढरा शर्ट आणि काळा पॅन्ट त्याला सुशोभित करणाऱ्या मोरपंखी कोटामुळे तो कमालीचा आकर्षण दिसत होता. आपल्या खुरट्या दाढीवरून हात फिरवीत तो निशांतची वाट पाहत होता. निशांत त्याच्या बाजूला जाऊन बसला.
" एक मेडीयम साईझ पिझ्झा आणि दोन हॉट कॉफी " निशांतने वेटरला ऑर्डर दिली. कॅफेमध्ये छान अस हलक - हलक रोमँटिक म्युझीक सुरु होत.
समोर असलेल्या पिझ्झाचा एक तुकडा हातात घेऊन योगेश म्हणाला
" काय निश्या परत तेच स्वप्न".
" हो रे योग्या महिन्याभरापासून एक शिकारी आपल्या सावजाचा जसा पाठलाग करतो तसच हे भयानक स्वप्न काही महिन्यापासून माझी पाठच सोडत नाही आहे".
" अरे निश्या स्वतःला जरा बघ तरी कसला देखणा आणि रुबाबदार आहेस तू. काही रोमँटिक चित्रपट पाहा, पबमध्ये जा, छानपैकी कुठेतरी फिरून ये. काय सारख सारख एकच एक त्या मानसोपचार विषयावर संशोधन करत बसलाय आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सत्याचा स्वीकार करायला शिक तुला खरंच एका चांगल्या मानसोपचारतज्ञाची गरज आहे ".
योगेशचे बोलणे ऐकुन निशांतच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले. त्याच्या कपाळावर आठ्यांनी गर्दी केली आणि आवाज चढवून तो म्हणाला.
" काय ! मीच या भारतातला सर्वोत्तम मानसोपचारतज्ञ आहे "
" मित्रा तू खूप हुशार आहेस त्यात कुठलीच शंका नाही. वैद्यकीय विद्यालयातून तू गोल्ड मेडलिस्ट आहेस पण खरंच काही गोष्टी डोळसपणे स्वीकारायला शिक. तुला खरंच एका चांगल्या मानसोपचारतज्ञाची गरज आहे ".
इतक्यात कॅफेमधल ते हलक हलक रोमँटिक म्युझी क बंद पडल. आपल्या पाठीमागे कुणीतरी काळ दृष्टी आपल्यावरच रोखून धरली आहे हे निशांतला आजूबाजूच्या बदलांनी जाणवल. त्याच्या कपाळावर घामाचे दवबिंदू जमले होते. त्यातील काही घामाचे थेंब कशालाही न जुमानता सरळ रेषेत ओघळून त्याच्या चेहऱ्यावर स्थिरावले होते. विजेच्या वेगाने त्याने मागे पहिले. आता त्याच्या जीवात जीव आला कारण मागे कोणीही नव्हते. दूरवरून कोणीतरी त्यावर सतत नजर ठेवून आहे अस त्याला सारख वाटत होत. इतक्यात कसल्यातरी आवाजाने त्याच्या कानात घंटानाद केला.
" योग्या तो आवाज ऐकला का रे तू? "
" कसला आवाज " हॉट कॉफीचा कप टेबलावर ठेऊन योगेश म्हणाला.
" जमिनीच्या घर्षणाचा आवाज आहे तो. बहुतेक त्याची रक्ताळली तलवार जमिनीला घासत असावी "
" काय बोलत आहेस तू निश्या? कसला आवाज? कसली तलवार? शुद्धीवर ये तू निश्या ".
" मला ईथून लवकरच निघायला हवं " असं म्हणतच निशांत तडकाफडकीने कॅफेतून बाहेर पडला आणि कार सुरु करून त्याच्या क्लिनिकच्या दिशेने भरघाव वेगाने कार पळवू लागला.

कार वाऱ्याच्या वेगाने पळत होती. असंख्य प्रश्नांनी त्याच्या मनात काहूर माजला होता. वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यातही त्याला हुरुहूरणारी नकारात्मकता जाणवत होती. रस्ता बोगद्यातून असल्यामुळे त्याची कार बोगद्यात शिरली आणि सर्वत्र अंधाराची काळी चादर पसरली. समोरच दृश्य बघून त्याच्या तोंडच पाणीच पडाल . त्याची कानशिल त्याला गरम जाणवत होती कारण बोगद्याच्या शेवटच्या टोकाला तेच द्वार होत जे त्याने स्वप्नात पहिल होत. तेच काळाकुट्ट द्वार...... तेच विचित्र नक्षीकाम. श्वास रोखून तो सर्व पाहत होता. त्याच्या मनगटावरच्या शिरा ताठरल्या होत्या. हात -पाय लटपटल्यामुळे कारवरचे नियंत्रण केव्हाच सुटले होते . त्यामुळे ती कार त्या द्वाराला जोरात धडकली होती. एवढ्यात निशांतच्या दृष्टीस पडला तो. आपली रक्ताळली तलवार घेऊन तो कारजवळ येऊन उभा राहिला. निशांतच पूर्ण शरीर सुन्न होऊन थंड पडल होत. हातातल्या तलवारीचा एक जोरदार प्रहार त्याने कारच्या काचावर केला. प्रहार करताक्षणीच असंख्य काच निशांतच्या चेहऱ्याला घासून गेले म्हणून त्याने आपले थरथरते डोळे काही क्षणासाठी बंद केले. बाहेर लोकांच्या कुजबुजण्याने त्याला जाग आली. त्याच्या सर्व शरीरात वेदना उसळल्या होत्या. अंधुक दिसणाऱ्या त्या डोळ्यांनी बाहेर लोकांची जमलेली गर्दी पहिली ती शेवटची आणि लगेचच त्याची शुद्ध हरपली.

डोळे उघडताच तो त्याच्या घरात हे त्याच्या लक्षात आलं. बाजूला बसलेल्या डॉक्टरांनी त्याला पेन किलर च इंजेकशन दिल होत. त्यालाही काही काळ आरामाची गरज आहे हे त्याच्या त्रासामुळे त्याला जाणवत होत. आईने त्याच्या कपाळावरून हात फिरवून सांगितलं कि त्याचा संयम सुटल्यामुळे बोगद्याच्या कडेला त्याच्या कारची जोरदार धडक झाली. सुदैवाने काही लोकांनी त्याच्या मोबाईलवरून घरी फोन केला आणि त्याला सुखरूप घरी पोहोचवलं. निशांतच्या मनाला बरेच प्रश्न पडले होते. खरंच त्याच्या कारची बोगद्याला धडक झाली कि काहीतरी वेगळंच सत्य आहे. तो आहे तरी कोण? आणि ते स्वप्न माझाच पाठलाग का करतंय? असे बरेच प्रश्न त्याला पडले होते. आपल्याला भास तर नाही होत ना अशी शंका त्याच्या मनाला चलबिचल करीत होती.

विचारचक्रात अडकलेल्या निशांतला डोळा कधी लागला हे कळलच नाही. डोळे उघडताच त्याला जाणवलं कुठल्यातरी विचित्रच जागी तो आहे. त्या खोलीत सर्वत्र धुळीचे साम्राज्य आहे. आजूबाजूला सर्वत्र कोळ्याच्या जाळ्यांनी घेराव घातला आहे. समोरच दृश्य बघून तर त्याच्या शरीरतातली शिरन शीर थरारली कारण समोर तेच द्वार होत आणि त्या द्वाराला उघडून तो आत आला होता. तेच त्याच बिभित्स रूप.... त्याच्या चेहऱ्यावर असलेल असुरी हास्य. त्याच्या जळलेल्या हातात तलवार धरून तो त्याच्याकडेच येत होता. त्या धारदार तलवारीवर त्याच्या हाताची मजबूत पकड असल्यामुळे त्या जळक्या हातातून रक्त सरळ रेषेत टपकत होत. समोरच सर्व काही आकलनाच्या बाहेरच आहे हे निशांतन ओळखलं. निशांतच्या घश्याला कोरड पडली होती. खरंतर त्याला जोरात ओरडायचं होत पण तोंडातून आवाजच निघत नव्हता. निशांतने डोळे मिटले समोर मिट्ट काळोख पसरला. कशीबशी शरीरातली शक्ती एकवटून तो ओरडला.
" आई गं.... "
स्वयंपाक घरात असलेली आई पटकनच त्याच्या जवळ आली आणि काय झालं म्हणून विचारू लागली. डोळे मिटून घामाने ओलाचिंब झालेल्या हाताने तो समोर काहीतरी खुणावू लागला.
" अरे निशांत मी आहे "
योगेशच्या आवाजाने त्याने डोळे उघडले आणि सुटकेचा श्वार टाकला.
" काकूचा फोन आला होता कि तुझा अपघात झालाय म्हणून मी इथे आलोय ".
त्याच्या हातातील काही पुष्पगुच्छ दाखवून तो म्हणाला " तुझ्यासाठी काही पुष्पगुच्छ ही आणली आहे ".
आई परत स्वयंपाक घरात जाऊन आपल्या कामात मग्न झाली
" निश्या तू एवढा घाबरलास का? आणि ओरडला तरी कशाला? " योगेश म्हणाला.
" योग्या आता तर मला आभासी जग आणि वास्तविक जग यातला फरक ओळखणंही कठीण होत चाललंय ".
" काय? " निशांतच्या त्या शब्दांनी योगेशच्या चेहऱ्यावर काळजीचे धुके जमले.
" मित्रा तुला खरंच एका चांगल्या मानसोपचारतज्ञाची गरज आहे. अति महत्वकांक्षा, अति संशोधन तुला कुठल्यातरी विचित्रच मार्गावर घेऊन चाललंय ".
" हो रे आता मलाही तसंच वाटायला लागलंय "
" भारतातील सर्वोकृष्ट मानसोपचारतज्ञ माझ्या ओळखीचे आहे. आपण भेटायचं का त्यांना उद्या? "
" हो नक्कीच " निशांत म्हणाला.
"त्या स्वप्नद्वारापासून सुटका केल्यापेक्षा त्याचा माझ्या जीवनाशी संबंध तरी काय आहे हे शोधण माझ्यासाठी सर्वात जास्त महत्वाच आहे आणि खरंच मला आता एका चांगल्या मानसोपचारतज्ञाची गरज आहे" निशांत स्वतःच्या मनाशीच पुटपुटला.

क्रमश

--- निखिल देवरे