स्वप्नद्वार - 3 Nikhil Deore द्वारा भय कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

स्वप्नद्वार - 3

स्वप्नद्वार ( भाग 3)


निशांत आणि योगेश Dr विजय कांत यांच्या क्लीनिक मध्ये पोहचले. Dr विजय कांत हे भारतातले सर्वोतकृष्ट मानसोपचारतज्ञ होते. कितीतरी न सुटलेल्या केसेस ते अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने सोडवत असे. क्लिनिकमध्ये लावलेल्या सुवासिक अगरबत्तीमुळे निशांतचे नाक फेंदारले होते.

Dr विजय कांत हे 40- 45 वयाचे, सावळा रंग, चेहऱ्यावर स्मितहास्य, लांबसडक नाक, डोळ्यावर मोठ्या फ्रेमचा चष्मा असून त्यांच आकर्षीत करणार असं उठावदार व्यक्तिमत्व होतं. निशांत आणि योगेश दोघेही त्यांच्यासमोर बसले होते. निशांत एकापाठोपाठ एक सर्व गोष्टी सविस्तरपणे सांगू लागला... कि त्याला आधी वाईट स्वप्ने पडायची त्याचबरोबर काही दिवसांपासून विचित्र असे भास होत आहेत. अर्जुन जसा माश्याच्या डोळ्यावर एक चित्तानि लक्ष केंद्रित करून होता तसेच डॉक्टर निशांतवर बारीक लक्ष ठेऊन होते. त्याच्या प्रत्येक हालचालीवर त्यांची बारीक नजर होती. डॉक्टरांच्या हातातील पेन पेपरवर चालून भराभरा अक्षर उमटत होते. निशांतची सर्व माहिती ते कोडिंग मध्ये लिहत होते.
" कधी पासून होत आहे हे सगळं " डॉक्टरांनी निशांतला विचारल.
" साधारणतः तीन महिन्यापासून जेव्हा मी काही स्वप्नांनी ग्रसित रुग्णांना हाताळत होतो तेव्हापासून " मोठ्या ऐटीत निशांत म्हणाला.
डॉक्टरांनी त्याची साधी दखलही न घेता त्याला काही गोळ्या लिहून दिल्या आणि परत कॉउंसिलिंग साठी बोलावलं.
" कुणासमोर आपल्या ज्ञानाची कागदी घोडी नाचवताय डॉक्टर साहेब. मी स्वतःही मानसोपचारतज्ञ आहे " निशांत स्वतःशीच पुटपुटत होता. त्याच्या मनात धुसमटत असलेला अहंकार आता त्यांच्या चेहऱ्यावर आला होता.
" सर खरंतर मला त्या स्वप्नात दिसणाऱ्या द्वाराच रहस्य उलगडायचं होतं. मला तुम्हाला आणखी एक प्रश्नही विचारायचा होता कि तुम्ही मानसिक रुग्णांना इतक्या सहजपणे हाताळता तरी कसे आणि जर त्यांचे काही स्वप्नातील प्रश्न सोडायचे असेल तर नक्की काय विशेष उपाय असतात ".
" मानसिक रुग्णांसाठी प्रेम आणि जिव्हाळा हाच सर्वात प्रथम उपाय आहे नंतर मग औषधगोळ्या, कॉउंसिलिंग ह्या सर्व दुय्यम गोष्टी येतात " एक स्मितहास्य देऊन डॉक्टर म्हणाले.
" सर त्या स्वप्नद्वाराचे सत्य उलगडण हे माझे लक्ष्य आहे. त्यासाठी कृपया तुम्ही माझी काही मदत करू शकता का " त्याच्या मिणमिणत्या डोळ्यात कळवळ दिसून येत होती.
" खरंतर मी तुला त्या स्वप्नाच्या दुनियेत पाठवू शकतो " आपल्या लांबसडक नाकावरून हात फिरवून डॉक्टर म्हणाले.
" काय? आणि ते कसे शक्य आहे? निशांत आणि योगेशच्या चेहऱ्यावर कुतुहलाच्या छटा उमटल्या होत्या.
" स्वप्न...... माझ्या तरुणपणापासूनचा सर्वात जिव्हाळ्याचा आणि संशोधनाचा विषय. कितीतरी पुस्तके, सिद्धांत आणि प्रबंध मी स्वप्नांवर लिहले आहे. स्वप्न :- भ्रम कि वास्तव, शेवटच स्वप्न, स्वप्नसाद, खूप स्वप्न खूप अनुभव ( many dream many experience ) हे माझे काही मराठी आणि इंग्रजी मध्ये प्रकाशित झालेले पुस्तके आणि प्रबंध आहे.
" हे सर्व तर ठीक आहे पण स्वप्नाच्या जगात जाण्याचा सिध्दांत तरी काय? " हजार सश्यांची उत्सुकता असणाऱ्या निशांतच्या चेहऱ्याने क्षणार्धांतच प्रतिप्रश्न केला.
" अरे हो पूर्ण ऐक तरी.... स्वप्न रूग्णांसाठी औषधगोळ्या कॉउंसिलिंग हे सर्व उपाय तर आहेतच पण फक्त एक टक्के लोकांना त्यांच्या जीवनातील काही अनुत्तरित प्रश्न सोडविण्यासाठी मी त्यांना त्यांच्या स्वप्नदुनियेत पाठवू शकतो. राहिला प्रश्न स्वप्नाच्या दुनियेत पाठवण्याचा सिध्दांत तर ऐक मग.... "
निशांतच्या चेहऱ्यावरील कुतुहलाच्या छटा अधिकच गडद होऊ लागल्या होत्या आणि डॉक्टरांचे शब्द ऐकण्यासाठी त्याचे कान आसुसले होते. आपल्या खुरट्या दाढीवरून हात फिरवून डॉक्टर म्हणाले
" हे सर्व अनंत असीम जग एकाच सिध्दांतावर चालत आहे आणी तो सिद्धांत म्हणजे कार्यकार्यानुभव सिध्दांत. ज्याला दुसऱ्या शब्दात कारण आणि परिमाण असे म्हणतात. इंग्रजीमध्ये याच Theory ला Cause and effect theory नि ओळखतात . मानव हा नेहमी परिणामाकडून कारणाकडे वळत असतो. उदाहरण द्यायचे झाल्यास... तेथून कुठिनतरी धूर निघत आहे म्हणजेच तिथे कुठेतरी आग लागली असावी. आग लागणे हे कारण आहे तर धूर निघणे हा त्याचा परिणाम आहे. आणखी एखाद उदाहरण द्यायच झाल्यास... हवेत खूप जास्त गारवा जाणवत आहे म्हणजेच नक्की कुठेतरी पाऊस पडला असेल. हवेतला गारवा जाणवणे हा परिमाण आहे तर पाऊस पडणे हे कारण आहे. ह्याच सिद्धांतावर समग्र सृष्टी विसावली आहे. मानवाच शरीर, इंद्रिये, स्पर्शज्ञान याच सिध्दांतावर चालत ". डॉक्टरांचा गळा सुकला होता. समोर ठेवलेल्या ग्लासमधलं पाणी पिऊन ते परत बोलू लागले.

" पण मानवीजीवनासाठी हा सिध्दांत थोड्या वेगळ्या पद्धतीने कार्य करतो त्याच मूळ म्हणजे..... कारण आणि परिणाम यांच्यामध्ये अभेद्य असलेली भिंत त्याला सर्वजण मानवी भावना या नावाने ओळखतात " डॉक्टर म्हणाले.
" मला काही समजलं नाही सर " निशांत कुतूहलाने म्हणाला.
" उदाहरण देऊन सांगायचे झाल्यास... माणूस जर कुठल्या परीक्षेत अव्वल आला तर त्याला हर्षउल्हसीत आनंद होतो आणि तो मनसोक्तपणे नाचू लागतो. म्हणजेच जर परीक्षेत अव्वल येणं हे कारण असलं तर नाचणे हा त्याचा परिणाम आहे. त्याच्याच मधातली अभेद्य भिंत म्हणजे आनंदरूपी भावना. दुसरं उदाहरण द्यायचं झाल्यास जर एखाद्याने एखाद्याच्या श्रीमुखात भडकावली तर तो ही क्षणाचाही विलंब न करता त्यांच्या कानशिलात चपराक लाऊन देतो. म्हणजे कुणाच्या तरी श्रीमुखात भडकावणे हे कारण आहे तर परत त्याला चपराक लावून देणं हा परिणाम आहे आणि त्यांच्या मधात असणारी अभेद्य भिंत म्हणजे राग. याच सिध्दांताचा वापर करून हजारो वर्षांपूर्वी जेव्हा अध्यात्माचा आरंभ झाला तेव्हा अध्यात्माच्या वेगवेगळ्या शाखा निर्माण झाल्या होत्या .हटयोग, कर्मयोग, ध्यानयोग ह्या काही अध्यात्माच्या अग्रगणी शाखा आहेत. त्यापैकी ध्यानयोगातले मेरुमणी आचार्य राघवेंद्र यांनी आभासी जगात जाण्यासाठी एका क्रियेचा निर्माण केला. ती क्रिया म्हणजे अनाहतभेदण. भावनारूपी माध्यमांनी त्या आभासी जगात प्रवेश करणे हाच त्या क्रियेचा मूळ उद्देश होता. या संपूर्ण ब्रह्माण्डात त्या आभासी जगाचे कुठे ना कुठे अस्तित्व असतेच. स्वप्नाच्या बाबतीतही काही वेगळं नाही. वाईट स्वप्ने पडली तर दिवसभर माणसाचे कशातच लक्ष लागत नाही. स्वप्न पडणे हे कारण... दिवसभर लक्ष न लागणे हा त्याचा परिणाम तर बैचैनी हे त्यांच्या मध्ये असलेली भावनारूपी भिंत. " इतक्या वेळ बोलत असलेले डॉक्टर शांत झाले. खूप वेळ पासून बोलत असल्यामुळे त्यांचे पातळ ओठ सुकले होते. समोर असलेल्या पाण्याच्या ग्लासातला एक घोट घेतला. सर्व अद्भूतं आणि अकल्पनीय गोष्टी ऐकल्यामुळे निशांतच्या चेहऱ्यावर काही प्रश्नचिन्ह उपस्थित होते.
" ही अनाहतभेदन क्रिया म्हणजे नक्की आहे तरी काय? " निशांतने कुतूहलाने प्रश्न विचारला.
" मानवी शरीरातील सर्वोच्च शक्ती म्हणजे कुंडलिनी शक्ती. मानवाच्या जननइंद्रियापासून ते डोक्यापर्यंत सात चक्र असतात. त्यातलं जननइंद्रियाजवळ असलेलं पहिलं चक्र म्हणजे मूलाधार चक्र आणि सरळ रेषेत त्याच्याच वर असलेलं दुसरं चक्र म्हणजे स्वाधिष्ठान, तिसरं चक्र मणिपूर, चौथ चक्र अनाहत, पाचव चक्र विशुद्धी, सहावं चक्र आज्ञा आणि शेवटचं डोक्यावर असलेलं सातव चक्र म्हणजे सहस्त्रार. हे सर्व चक्रे कुठल्या नि कुठल्या शक्तीच प्रतिनिधित्व करीत असतात. यापैकी चौथ्या क्रमांकाचं चक्र म्हणजेच अनाहत चक्र जे आपल्या भावनात्मक शक्तीच प्रतिनिधित्व करत. जेव्हा आपल्या अनाहत चक्रातली भावनात्मक शक्ती तसेच तिसऱ्या नेत्रातल्या काही सुप्त शक्ती एका जागी एकवटवल्या आणि भावनात्मक माध्यम बनवून सोबतच विशिष्ट प्रकारच्या संमोहनाने आपण अगदी सहजपणे त्या विशिष्ट जगात प्रवेश करू शकतो. या संपूर्ण क्रियेला अनाहतभेदन क्रिया म्हणतात . आचार्य राघवेंद्र यांच्या ज्ञानयोगाचा उगम या पुस्तकात या क्रियेच वर्णन केलं आहे. कित्येक तरी युगंधर पुरुष ज्ञानप्राप्तीच्या मार्गावर असतांना अनाहतभेदन क्रियेचा वापर करून काही प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपल्या वेगळ्या दुनियेत नक्कीच जाऊन येतात . ही क्रिया वर्तमानकाळात आचार्य राघवेंद्र यांच्या थोडक्याच अनुयायांना आणि फक्त काही बोटावर मोजता येणाऱ्या लोकांना ही क्रिया ठाऊक आहे त्यातला मी एक आहे. ब्रिटिश फिलॉसॉफर लाऊ स्मिथ यांनी त्यांच पुस्तक spirituality and science या पुस्तकातही या अनाहतभेदन क्रियेचा स्पष्टपणे उल्लेख केला आहे ". डॉक्टर काही वेळ शांत झाले. आपल्या डोळ्यावरचा चष्मा काढून ते रुमालाने पुसू लागले.
एवढ्या साऱ्या अनाकलनीय गोष्टी ऐकुन योगेश आणि निशांत अवाक झाले होते. त्या खोलीमध्ये काही काळ शांतता पसरली होती. फक्त फॅनचा घर.... घर करणारा आवाज तेवढा होता. त्या शांततेला भंग करत डॉक्टर म्हणाले " प्रत्येक चक्रांना जागृत करण्याचा काही बीजमंत्र असतो. जेव्हा गाढ प्रगाळ ध्यानात अनाहत चक्राचा आणि अनाहतभेदन क्रियेच्या बीजमंत्राचा उच्चार केल्यावर सुप्त शक्ती एकवटण्यास सुरवात होईल. त्यानंतर सुरु होईल संमोहनाचा दुसरा चरण. जर दोन्ही गोष्टी अगदी बरोबर जुळून आल्या तर नक्कीच कोणीही त्या स्वप्नदुनियेत प्रवेश करू शकेल.
निशांतच्या माथ्यावरील रेषा सरळ रेषेत ताठरल्या होत्या. कसल्यातरी गूढ विचारत तो मग्न झाला होता. न राहवून तो म्हणाला.
" सर मला त्या विचित्र द्वाराच रहस्य उलगडायला त्या स्वप्नदुनियेत जायचं आहे ".
समोर ठेवलेला पेपरवेट दूर करून डॉक्टरांनी एका भेदक नजरेने निशांतकडे पहिले. निशांतची आणि डॉक्टरांची नजर ऐकमेकांना भिडली होती.
" एवढं सोपं नाही ते निशांत. मी फक्त 1 टक्के लोकांना ज्यांना काही प्रश्न सोडवण खूपच अनिवार्य आहे त्यांच्याच साठी मी या क्रियेचा वापर करतो. 1 टक्क्यांपैकी फक्त 0.5 टक्के लोकांवर ही अनाहतभेदन क्रिया यशस्वी होते कारण शरीरातील चक्ररूपी सुप्त शक्ती ऐकवटवणन काही एवढं सोप काम नाही ".
" पण सर मला काहीही करून त्या द्वाराच सत्य समोर आणायचंय. माझा आणि त्या द्वाराचा संबंध तरी काय याचा ध्यास मला लागला आहे आणि काहीही करून तो इतक्या सहजा सहजी मनातून जाणार नाही " अतिशय शांत शब्दात निशांत म्हणाला.
" ती जागा जर अतिशय नकारात्मक असेल तर पुढे काय होईल... मला सांगता येणार नाही. मला तरी असे वाटते तू त्या स्वप्नदुनियेत न गेलेलाच बरा.. काही दिवस medicine घे अराम कर एकदम ठणठणीत बरा होशील ".
एवढ्या वेळ शांत असलेला योगेश म्हणाला " निश्या असलं काही धाडस न केलेलंच बरं रे बाबा "
" सर फक्त एकदा मला त्या स्वप्नदुनियेत जाऊद्या ही कळकळीची विनंती " निशांत म्हणाला
" ठीक आहे पाठवीन मी तुला.... पण स्वप्नाची काही नियमावलीही आहे ".

क्रमश...
या कथेचा पुढचा भाग उद्या प्रकाशित होईल

----- निखिल देवरे