Swapdwar - 4 books and stories free download online pdf in Marathi

स्वप्नद्वार - 4

स्वप्नद्वार ( भाग 4)


"काय आहे स्वप्नांची नियमावली " डोळे मोठे करून निशांत विचारू लागला.
" नियम क्रमांक एक.. कुठलाही मनुष्य हा फक्त दोनदाच त्याच्या स्वप्नदुनियेत जाऊ शकतो. नियम क्रमांक दोन.. स्वप्नदुनियेत जाण्याचा काही विशिष्ट कालावधी आहे. तो फक्त तेवढा वेळच त्या जगात राहू शकतो ".
" बस एवढेच नियम " निशांत स्मितहास्य देऊन म्हणाला.
" नाही आणखी पूर्ण ऐक.... जेव्हा तू स्वप्नदुनियेत जाशील तेव्हा तुझी संपूर्ण शक्ती, ज्ञानेंद्रिये, स्पर्शज्ञान सर्व काही त्या स्वप्नदुनियेत घेऊन जाशील. इथे तेवढं वेळ तुझं शरीर मेणाच्या पुतळ्यासारख होईल. ज्यात कुठलीही शक्ती, स्पर्शज्ञान नसेल. नाळीद्वारे चालणारा श्वास आणि धडकणार हृदय हा फक्त तुमच्या दोघात जोडणारा दुवा राहील " माथ्यावरील बारीक घामाचे थेंब पुसत डॉक्टर म्हणाले.
निशांतच्या चेहऱ्यावर प्रश्नाचे वलय निर्माण झाले होते. स्वप्नदुनियेच्या विचारत तो हरवून गेला होता. खाली जमीन न्याहाळत असलेला त्याचा चेहरा सरकन वर झाला " चालेल, मी तयार आहे " निशांत आत्मविश्वासाने म्हणाला.
योगेशचा चेहरा मात्र पडला होता " निश्या कशाला नसतं धाडस करतोय रे राहू दे नं " काळजीच्या स्वरात योगेश म्हणाला.
" नाही मला त्या स्वप्नदुनियेत जाऊन यावंच लागेल.. मला दिसणारं ते द्वार, ती अमानवी शक्ती. या माझ्या सर्व प्रश्नाची उत्तरे तिथेच आहे ".
" सांग तुला किती कालावधीसाठी त्या स्वप्नदुनियेत पाठवू? " एका शांत स्वरात डॉक्टरांनी प्रश्न केला.
" साधारणतः किती कालावधीसाठी तुम्ही पाठवू शकता ".
" स्वप्नदुनियेत राहण्याचा सर्वाधिक कालावधी आहे दहा मिनिट. मी साधारणतः पाच मिनिटासाठी लोकांना त्यांच्या स्वप्नदुनियेत पाठवत असतो "
" तुम्ही मला दहा मिनिटासाठी त्या स्वप्नदुनियेत पाठवा " निशांत म्हणाला.
डॉक्टर आणि योगेशच्या चेहऱ्यावर चिंतेचे धुके पसरले होते.
" आणि हो एक प्रश्न आणखी विचारायचाच राहिला.. अनाहतभेदन क्रियेत दुसरा चरण आहे संमोहनाचा. मग प्राचीन काळी तर संमोहन शक्य नव्हतं तेव्हाचे योगी, आचार्य तो चरण कसा पूर्ण करायचे? ".
काही वेळ डॉक्टरांच्या चेहऱ्यावर पसरलेली धुक्याची चादर दूर झाली. एक बारीक हास्य देत ते म्हणाले " संमोहन म्हणजे नक्की काय असतं.... संमोहन म्हणजे दुसऱ्याच्या मनाला सूचना देणं. प्राचीन काळातले योगी, आचार्य यांचे ध्यानच एवढे प्रगाळ होते कि त्यांच्या मनाला दुसऱ्यांनी सूचना द्यायची काही गरजच भासत नसे.. ते स्वतःच्या मनाला स्वतःच सूचना देत असतं.
" अच्छा असं आहे ते "
" हो... तुझे जर सर्व प्रश्न विचारून झाले असेल तर स्वप्नदुनियेचा पहिला चरण सुरु करूया का? "
" हो " निशांतने होकारार्थी मान डोलावली.
" एक गोष्ट आणखी तू जेव्हा स्वप्नदुनियेत जाशील तेव्हा पहिले तीस सेकंद आणि शेवटचे तीस सेकंद असा पूर्णतः फक्त एक मिनिट माझा आवाज तुला येईल. उरलेले नऊ मिनिट तुला तुझ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी मिळेल. तुझ्या स्वप्नदुनियेतल्या 9 मिनिटाच्या कालावधीतला कुठलाच आवाज मला येणार नाही " डॉक्टर म्हणाले.
"ठीक आहे...... आपण अनाहतभेदन क्रिया सुरु करू "

डॉक्टरांनी त्या रूममधल्या सर्व खिडक्या, दरवाजे बंद केले. एक गर्द शांतता त्या खोलीत पसरली होती. डॉक्टरांनी अनाहतचक्र आणि अनाहतभेदन क्रियेचे काही बीज मंत्र निशांतला सांगितले. निशांत काही वेळ घ्यानस्त बसला होता. क्षणार्धांतच शांततेत बुडालेली ती खोली बीजमंत्राच्या नादाने घुमू लागली. कुंडलिनी ऊर्जेची एक सुप्त शक्ती मूलाधार चक्रापासून अनाहतचक्रापर्यंत तर अनाहतचक्रापासून वर अतिशय वेगाने तिसऱ्या नेत्राजवळ एकवटवण्यास सुरवात झाली होती. निशांतच्या चेहऱ्यावरील भाव मिनिटा मिनिटाला बदलत होते. डॉक्टरांना कळून चुकल होतं. आता या क्रियेचा दुसरा चरण म्हणजेच संमोहनाची वेळ आली आहे.
" कसं वाटतंय तुला? " एका भारदस्त आवाजात डॉक्टरांनी विचारलं.
" कसलीतरी शक्ती वर जात आहे असंच वाटतंय "
" छान, आता तुला कसल्यातरी विचित्र आकृत्या, दृष्य दिसेल. ज्या तू तुझ्या जीवनात कधी पहिल्या असेल किंवा पाहिल्याही नसेल.... त्यानंतर तू स्वतःला कुठल्यातरी विचित्र जागी पाहशील ".
निशांतला ध्यानअवस्थेत अतिशय भीतीदायक विचित्र आकृत्या आणि दृश्य दिसत होते. काही आकृत्या तर काळजाचा थरकाप उडवणाऱ्या होत्या..... त्यांच्या चेहऱ्यावर भीतीचे सावट पसरले होते. काही क्षणातच त्याच्या नयनासमोर मिट्ट काळोख पसरला. आता तो कुठल्यातरी एका भल्या मोठ्या बिल्डिंगमध्ये होता.
" कुठे आहेस तू? " डॉक्टरांनी प्रश्न केला.
" कुठल्यातरी भव्य इमारतीत आहे.. धरतीच्या कितीतरी उंच आणि आकाशाच्या अगदी जवळ हि इमारत आहे. या इमारतीत माझ्या कितीतरी भावना उमलून आल्या आहे. मला अतिशय आनंदित प्रफुल्लित वाटतंय. उभ्या आयुष्यात कधीच एवढा आनंद, उत्साह मी अनुभवला नाही. ज्याप्रमाणे कोमल सुमने पहाटे पहाटेच सुंगधाचा वर्षाव करतात त्याचप्रमाणे हि इमारतहि जणू माझ्यावर हर्षेउल्हासाचा वर्षाव करीत आहे ".
" अतिउत्तम, म्हणजे तू भावनामय इमारतीत पोहचलाय.. ती इमारतीतची फक्त एकच बाजू आहे.त्या इमारतीची दुसरी एक बाजू पण आहे.. क्रोध, भीती, मत्सर. आता तू तिथून उडी मरून तुझ्या ध्येयांकडे प्रस्थान कर ".
निशांत त्या इमारतीवरून उडी मारतो आणि आपल्या स्वप्नद्वाराच्या प्रवासाला सुरवात करतो.
" आता तू कुठे आहेस आणि कसं वाटतंय तुला? " डॉक्टरांनी परत प्रश्न विचारला.
" इमारतीवरून उडी मारल्यामुळे माझं शरीर प्रचंड वेगाने जमिनीकडे धाव घेत आहे. वाऱ्या सोबत घेणाऱ्या घर्षणाने माझी पूर्ण कायाच अग्नीज्वाळेत भस्म होईल असं वाटतंय".
" आता तुझ्या शरीराचा वेग खूप कमी होतोय. आता काय दिसतंय तुला? "
" आकाशात मनोहर पक्षांचे थवे दिसत आहे. त्यांचा सुमधुर किलबिलाट माझ्या कानी पडत आहे. जमिनीवर असलेल्या लुसलुशीत गवताचे पाते, वाऱ्यावर झुलणारे नारळाचे काटेरी पाने आणि त्याला लागलेली इवलीशी नारळे मला सर्व अगदी स्पष्ट दिसतंय. उंचच उंच बिल्डिंग त्याला लागलेले काचही माझ्या नजरेस पडतं आहे".
" ठीक आहे.. म्हणजे तू तुझ्या स्वप्नदुनियेच्या अगदी जवळ पोहचलाय "
" हो आता माझ्या समोर तिचा गुहा आहे ज्यात ते स्वप्नद्वार आहे... दूरदूरपर्यंत तिमिराचे साम्राज्य पसरले आहे. फक्त थोडा अंधुकसा प्रकाश इथे आहे. गवत, झाडे - झुडपे, पशु -पक्षी कशाचेच किंचितही अस्तित्व इथे नाही.
" माझा आवाज तुला आता फक्त 30 सेकेंदच येईल.. "डॉक्टर म्हणाले.
" होय मी हि आता गुहेत जायलाच निघालोय. माझ पहिलं पाऊल मी त्या गुहेत ठेवलंय".
" माझा आवाज तुला येणं आता बंद होईल. 5...4....3.....2......1.."

9:30 मिनिटानंतर

निशांतचे शरीर जमिनीवर कोलमडले होतं. तो अतिशय जोरजोरात श्वास घेत होता. कुणीतरी जसे पाण्यात बुडतांनी संपूर्ण शक्तीनिशी श्वास घेण्याचा प्रयत्न करतो त्याचप्रमाणे निशांतही नाका तोंडानी श्वास घेण्याचा प्रयत्न करीत होता. डॉक्टरांनी त्याला प्यायला पाणी दिले. योगेश त्याला धीर देऊन सावरत होता.
" निशांत काय पाहिलंस तू त्या गुहेत? " डॉक्टरांनी विचारले.
" त्या गुहेत मी माझं पहिलं पाऊल टाकल. गुहेत कसलातरी कुबट वास येत होता. थोडा अंधुक प्रकाशही गुहेत होताच. अतिशय खसलेली ती गुहा होती. गुहेत दूरदूरपर्यंत कोळ्यांचे जाळे पसरले होते. आत गुहेच्या दोन्हीही बाजूला सुकलेल्या रक्ताचे डाग होते..शरीर शहारणारे ते भयानक आवाज. मी जसजसा समोर जायला निघालो तेव्हा काही काळाकुट्ट भीतीदायक सावल्या माझ्या पाठीमागून चालत होत्या. त्या गुहेत फक्त रातकिडेच... किर्रर्र... किर्रर्र... आवाज करत होते. डाव्या बाजूला गळणाऱ्या पाण्याचे टपटप.. स्वर माझ्या कानाभोवती पिंगा घालत होते. भीतभीतच मी माझी पाऊले समोर टाकीत होतो. एवढ्यात एक तरल हिरवा द्रव्य माझ्या मानेवर पडला. तो द्रव्य कुठून पडला म्हणून मी माझी नजर त्या दिशेला वळवली. समोरच दृश्य बघून कडाक्याची थंडीच माझ्या शरीरात भरली. गुहेच्या वर गुहेला एक भलंमोठं भगदाळ पडलं होतं आणि त्या भगदाळावर हिरवेगार तोंड, पांढरेफटक डोळे आणि लटकणारी जीभ असणारा जणू एक राक्षसच बसला होता. त्याच्या जिभेतुन हिरवागार तरल द्रव्य गळत होता. माझ्या माथ्यावरून घामाचे टपोरे थेंब ओघळू लागले होते. एक अवंठा गिळून मी माझ्या चालण्याचा वेग वाढवला. आता मी त्या द्वाराजवळ येऊन पोहचलो होतो. द्वाराला कोळ्याच्या जाळ्यांनी घेराव घातला होता. अतिशय काळंकुट्ट असं ते द्वार होतं आणि त्यावर असलेलं विचित्र नक्षीकाम जणू ते द्वार न उघडण्याचा इशाराच मला देत होत. अतिशय जीर्ण धागेदोरे त्या दरवाज्याला गुंडाळून होते. मी एका झटक्यात ते जीर्ण धागेदोरे तोडून टाकले आणि ते भव्य द्वार उघडले. काय असेल त्या स्वप्नद्वाराच्या आत आणि काय रहस्य असेल त्या द्वाराचे असे कितीतरी प्रश्न माझ्या समोर उभे ठाकले होते. द्वार उघडताच कुबट घाण वासाने माझं नाक फेंदारल होतं. फड.. फड... करत काही वटवाघुळे माझ्या कानाला स्पर्शून उडून गेले. आता मी ते द्वार उघडून आत प्रवेश केला. एक विचित्र खोलीच तिथे बनवली होती. मी थोडा समोर जायला निघालो मनात असंख्य प्रश्नांनी थैमान घातलं होतं. पायऱ्या असलेलं तळघरचं तिथे होतं. हृदयाची स्पंदने प्रचंड वेगाने धडधडत होती. मधातच येणारे किर्रर्र.. किर्रर्र आवाजाने काळजात धस्स.. व्हायचं. तळघराच्या संपूर्ण पायऱ्या ओलांडून मी तळघरात पोहचलो. एवढ्यात कसलीतरी हालचाल मला जाणवली. समोरची जमीन आपोआप उखरली. सर्वत्र धुळीचे लोट पसरले होते.. डोळे मिचकावत धुळीचे लोट बाजूला सारून मला समोर जे दिसलं ना..... त्यांनी मी पुरता हादरून गेलो. जमीन उखरून समोर तोच उभा होता.. ज्याला मी स्वप्नात कित्येकदा पहिलं होतं. तोच त्याचा अर्धा जळलेला चेहरा.. कुरतळल्यासारखे अस्तव्यस्त केस.. संपुर्ण शरीरावर कोरडी त्वचा त्यावर कुठल्यातरी हिंस्त्र श्वापदाने आपल्या तीक्ष्ण नखांनी ओरबडल्याच्या खुणा, डोक्याच्या खालच्या भागाजवळ दिसणारा लालसर भाग, त्याच्या त्या डोळ्याच्या जागी असणाऱ्या काळ्या कबिन्न खोपण्या. त्याच्या हातातली तलवार जमिनीला रक्तस्पर्श करीत होती. त्याला नेत्र जरी नसले तरीही त्याची क्रूर नजर आगठिणग्या बरसत होती.मी क्षणाचाही विलंब न करता आल्या माघारी पळ काढण्यास सुरवात केली. अतिशय जलदपणे मी पायऱ्या मागे टाकून तळघरातून वर येत होतो. तेव्हा अचानकपपणे पाय घसरून मी एका जागी पडलो. समोर तेच द्वार दिसत होतं. एका जोरदार वाऱ्याच्या झोताने तो दरवाजा बंद झाला होता. पायांचा पायऱ्यावर पडणारा खाड ... खाड.. असा स्वर माझ्या कानात घुमू लागला होता. तो स्वर अधिकच रौद्र रूप धारण करीत होता. मला कळून चुकलं होतं तो अतीशय जवळ येऊन ठेपला आहे. शरीरातील समग्र शक्ती एकवटून मी उठलो. बंद असलेलं ते द्वार उघडण्याचा अतोनात प्रयत्न करू लागलो.... एवढ्यात तळघरातुन तो हि वरच्या खोलीत पोहचला होता. शेवटी मी सुटकेचा श्वास टाकला.... ते द्वार उघडलं.... श्वास रोखून मी तेथून पळत होतो. किर्रर्र.. किर्रर्र करणारे ते आवाज, विचित्र भीतीदायक सावल्या, एक भयंकर राक्षस आणि ती अमानवी शक्ती या सर्वांना दूर टाकून मी गुहेच्या बाहेर येण्यासाठी धावत होतो. जसा मी गुहेच्या बाहेर आलो तसा तुमच्या आवाजाने माझे कर्ण तृप्त झाले... आता तुझ्याकडे फक्त तीस सेकंदच आहे..... 3...
2...1.. आणि शेवटी मी या वास्तविक जगात आलो.
पण बरीच प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे आणि एक गोष्ट त्या तळघराच्या खोलीत जरा विचित्रच वाटली ".
" ती कोणती? " डॉक्टर विचारू लागले.

क्रमश..

------निखिल देवरे






इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED