स्वप्नद्वार - 5 Nikhil Deore द्वारा भय कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

स्वप्नद्वार - 5

स्वप्नद्वार ( भाग 5)


भाग 4 वरून पुढे

त्या तळघराच्या भिंतीवर एक कुठलंतरी विचित्र वाक्य लिहून होत. सर्वांच्या चेहऱ्यावर कुतूहलाचे एक वलय निर्माण झाले होते .
" कुठलं वाक्य लिहून होत त्या भिंतीवर निशांत? " डोळ्यावरील चष्मा बरोबर करत एका धीरगंभीर स्वरात डॉक्टर विचारू लागले. मला सध्या ते काही आठवत नाही पण काहीतरी विचित्रच लिहलं होत त्या तळघराच्या भिंतीवर. डॉक्टरांच्या माथ्यावरील रेषा सरळ रेषेत ताठरल्या होत्या. चेहऱ्यावरील गंभीर भाव सावरून एक गोड हास्य देत डॉक्टर म्हणाले.
" अरे प्रत्येक स्वप्नांचा आपल्या जीवनाशी काही संबंध असतोच असे नाही. कधी कधी ते स्वप्न म्हणजे निव्वळ मृगजळ असते आणि मला तरी असे वाटते कि त्या स्वप्नांचा तुझ्या जीवनाशी तिळमात्र संबंध नसेल. म्हणजे बघ ना त्या स्वप्नद्वाराच कुठलंच सत्य आपल्या समोर आलेलं नाही. माझ्या बऱ्याच केसेस मध्ये मी हे बघितलंय कि त्यांच्या स्वप्नांचा त्यांच्या वास्तविक जीवनाशी काही एक संबंध नसतो ".
" हो मलाही असंच वाटतंय " एवढा वेळ शांत असणारा योगेश म्हणाला.
" मी दिलेले medicine आणि counseling बरोबर घे तुला भास होणेही काही दिवसातच थांबेल बघ ". निशांतला धीर देत डॉक्टर म्हणाले.
निशांतने फक्त होकारार्थी मान डोलावली. एकाजागी साठलेल्या शांत जलासारखे त्याचे मनही अगदी शांत झाले होते. परंतु शांत असलेल्या जलात कुणीतरी दगड मारल्यावर ज्याप्रमाणे असंख्य लहरी उठतात त्याचप्रमाणे निशांतच्या शांत मनात शंकेच्या असंख्य लहरी उठल्या होत्या.
" नक्की तो माझा भासच असेल" स्वतःच्या मनाला समजावत निशांत म्हणाला.

" सूर्याचे निरागस मलून किरणे मावळतीला
जातांना
जेव्हा काळरात्री गर्द तिमिराचे गिधाडपंख
पसरवतात
मृत्यूलाही शहारवेल असं बिभीस्त रूप घेऊन
तो परत आलाय...
तो परत आलाय... "

आता डॉक्टरांची ट्रीटमेंट सुरु करून तीन दिवस झाले होते. निशांतला भास होण काही प्रमाणात कमी झालं होत. एक आत्मविश्वासी, हसरा निशांत आता पाहायला मिळत होता. त्याच्या जीवनात काही काळ पसरलेले नैराश्याचे धुके बाजूला सरून आशेचे आणि चैतन्याचे किरणे सर्वदूर पसरले होते.

साधारणतः सायंकाळचा वेळ असेल. ताजतवानं होण्यासाठी निशांत बाथरूम मध्ये गेला. एका बालटीत पाणी घेऊन तो हात पाय धूत होता. ओजंळीत पाणी घेऊन चेहऱ्यावर थंडगार असं पाणी मारलं. क्षणातच नेत्र मिटल्या गेले. चेहऱ्यावरून पाण्याचे थंडगार थेंब ओघळत होते.निशांतने हाताने चेहऱ्यावरील थेंब पुसले आणि त्याची नजर स्थिरावली बालटीतल्या त्या हलणाऱ्या पाण्यावर. त्याची विस्फारलेली नजर अधिकच भेदकपणे त्या पाण्याला न्याहाळत होती. समोर पाण्यात त्याला जे दिसलं त्यामुळे त्याच्या काळजात अगदी धस्स.. झालं. कारण बालटीत त्याच अमानवी शक्तीच प्रतिबिंब होत. क्षणाचाही विलंब न करता त्याची विस्फारलेली नजर त्याला शोधण्यासाठी मागे वळली पण तिथे कोणीच नव्हते.
" भास असेल हा माझा " स्वतःच्या मनाला समजावत निशांत पुटपुटला. त्याच्या चेहऱ्यावर चिंतेच्या आणि भीतीच्या छटा उमटल्या होत्या. राहून राहून काहीतरी विपरीत नक्की घडेल अशीच भावना त्याच्या मनी दाटून येत होती.

रात्रीचे जेवणे आटोपली होती. निशांतच मन सायंकाळी दिसलेल्या अमानवी आकृतीमुळे कशातच रमत नव्हतं. रात्री 1 मिनिटसुद्धा त्याला झोप लागली नव्हती. रात्रीचे दोन वाजले होते. सायंकाळपासून निशांतच चित्त थाऱ्यावर नव्हतं. मन रमावं म्हणून तो घराच्या टेरेस वर गेला. मस्तपैकी कानात हेडफोन घालून तो रोमँटिक असे गाणे ऐकत होता. एवढ्यात त्याचा मोबाईल आपोआप स्विच ऑफ झाला. कानातले हेडफोन त्याने बाहेर काढले. टेरेस वर एका रेषेत लावलेले तीन विजेचे बल्ब एका पाठोपाठ एक असे ताडकन फुटले. सर्वत्र काळोख पसरला होता. रस्त्यावर असणाऱ्या पथदिव्याचा अंधकसा उजेड मात्र टेरेस वर पसरला होता. निशांतला कसलीतरी विचित्रच हालचाल त्याच्या भिंतीवर जाणवली. भिंतीवर काहीतरी विचित्र सावल्या उमटल्या होत्या. त्या सावल्याही त्याला ओळखीच्या वाटत होत्या. निशांतच्या मानेवरील शिरा ताठरल्या होत्या. त्याच्या अंगात कडाक्याची थंडी भरली होती. डोळे मिचकावत तो भिंतीवरच्या त्या सावल्या पाहू लागला होता. त्यातली एक सावली त्यांचीच होती. त्या सावलीत तो जीव मुठीत धरून सैरवैर पळत सुटला होता. कारण त्याच्या मागे त्याच अमानवी शक्तीची सावली त्याचा क्रूरपणे नायनाट करण्यासाठी धावत होती . एका जागी त्या सावल्या थांबल्या त्या अमानवी शक्तीच्या सावलीने आपली तलवार काढून एक जोरदार प्रहार निशांतच्या सावलीवर केला. तसंच निशांतच शरीर दोन भागात कापल्या गेल. रक्ताच्या चिळकांड्या निशांतच्या चेहऱ्यावर आल्याचा भास निशांतला झाला. तसा तो भानावर आला.
" नाही हे सत्य नाही.... हा फक्त माझा भास आहे " निशांत स्वतःशीच पुटपुटत होता. हृदय प्रचंड वेगाने धडधडत होत. त्या अमानवी शक्तीची सावली अधिकच गडद होऊन काळी होऊ लागली होती. निशांत श्वास रोखून सर्वकाही पाहत होता. ती सावली अतिशय गर्द होऊन अधिकच आक्राळ विक्राळ होऊ लागली होती. त्या सावलीने आता विराट रूप धारण केले होते आणि.... तिच अमानवी शक्ती त्या सावलीतून बाहेर पडली होती. त्याच्या चेहऱ्यावरील तो लालसर भाग अधिकच बिभित्स दिसत होता. निशांतच्या हृदयाची स्पंदने अधिकच वेगाने धडधडत होती.
" नाही हे खरं नाही आहे... हा फक्त माझा भास आहे" निशांत स्वतःच्या मनाशीच पुटपुटत होता. ती अमानवी शक्ती अधिकच त्वेषाने पुढे पुढे येत होती. त्याची ती क्रूर नजर निशांतवर आगठिणग्या बरसवत होती. जळलेल्या त्याच्या हातातील तलवार जमिनीला रक्तस्पर्श करीत होती. निशांत मागे भिंतीला टेकला होता. त्या अमानवी शक्तीने त्याच्या हातातील तलवारिने एक जोरदार प्रहार त्याच्या मस्तकावर केला. विजेच्या वेगाने निशांतने तो वार अडविला. त्या प्रहाराची खूण त्या भिंतीवर उमटली होती. त्याच्या शरीरावर असलेल्या त्या खुणा आणि त्याच ते भयानक रूप पाहून निशांत स्तब्ध झाला होता. तेथून कसातरी जीव वाचवून तो आपल्या खोलीत आला होता. टेरेसवर त्या अमानवी शक्तीची भेसूर आक्रसणारी किंचाळी त्याच्या कानावर पडली होती. निशांतला कळून चुकले होते कि तो त्याच्या रुमकडेच येत आहे. पायऱ्यावर तलवारीच्या घर्षणाचा भीषण स्वर थैमान घालत होता. त्याची ती आक्रसणारी कर्कश्य किंचाळी शरीराचा चांगलाच थरकाप उडवीत होती. गर्द काळोख्या त्या काळरात्री ती अमानवी शक्ती निशांतला आपल्या पंजात पकडण्यासाठी सज्ज झाली होती. परंतु कितीही प्रयत्न केला तरी ती अमानवी शक्ती त्याच्या खोलीत प्रवेश करू शकत नव्हती. तिथे असलेलं देवघर आणि सकारात्मक ऊर्जेचं रिंगण त्याल रोखत असावं. निशांतने कशीतरी ती रात्र अर्धवट झोपून काढली.

पहाटे उठताच निशांतला बरेचसे प्रश्न पडले होते. काल जी घटना घडली ती खरंच वास्तविक घटना आहे कि माझा भास. या प्रश्नाने त्याचे मन ग्रसित झाले होते. त्याचे पाऊल आपोआपच टेरेसकडे वळले होते. टेरेसवरील समोरच दृश्य पाहून त्याचे धाबे चांगलेच दणाणले होते.. त्याच्या मनगटावरील शिरा घट्ट आवळल्या होत्या... श्वास घ्यायलाही त्याला अडथळा होत होता. कारण भिंतीवर त्याच्या प्रहाराची खूण निशांतच्या दृष्टीस पडली होती.
" म्हणजे काल जी घटना घडली ती वास्तविक घटना होती ". एवढेच शब्द त्याच्या ओठावर तराळले.
आपल्या थरथरत्या हाताने त्याने खिशातला मोबाईल काढला आणि एक कॉल लावला.
" हॅलो "
" हॅलो डॉक्टर मी निशांत बोलतोय "
" हा बोल निशांत कसा आहेस? " डॉक्टर विचारू लागले.
" डॉक्टर मी खूप मोठी चूक केली आहे. तो आता स्वप्नदुनियेला भेदून वास्तविक जगात आला आहे " थरथरत्या शब्दांनी निशांत म्हणाला.
" काय? शक्यंच नाही " डॉक्टरांनाही एक धडकी भरली.

क्रमश...