स्वप्नद्वार - 6 Nikhil Deore द्वारा भय कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

स्वप्नद्वार - 6

स्वप्नद्वार ( भाग 6)


हि कथा काल्पनिक असून फक्त मनोरंजनासाठी काही स्थळांचा उल्लेख केला आहे.


भाग 5 वरून पुढे


निशांतच्या घरी योगेश आणि डॉक्टर अगदी शांत बसून तिघेही हलकेच ऐकमेकांकडे पाहत होते. एक गर्द शांतता त्या खोलीत पसरली होती. अधून -मधून फॅनचा घर... घर... आवाज सर्वांच्या कानी पडत होता. तिघांच्याही चेहऱ्यावर काळजीचे धुके पसरले होते. एका दबक्या आवाजात डॉक्टर म्हणाले
" तुला खात्री आहे काल जी घटना तुझ्यासोबत घडली ती वास्तविक घटनाच आहे?".
" हो.... काल त्याने इतक्या जोरात माझ्या डोक्यावर प्रहार कि त्याची खूण अक्षरक्ष त्या भिंतीवर उमटली आहे " केविलवाण्या स्वरात निशांत म्हणाला.
" कठीण आहे सर्वच आता... खूपच अद्भूतं आणि अकल्पनिय गोष्ट आहे हि " डॉक्टर म्हणाले.
" आता काय होणार? " चिंताग्रस्त कंठातून योगेश विचारू लागला.
" आपल्याला काही ना काही मार्ग लवकरच काढावा लागेल. निशांत मला एक सांग त्या तळघरात लिहलेल्या विचित्र वाक्याशिवाय तुला आणखी काही आठवत का? "डॉक्टर विचारू लागले.
" तस तर मला काही आठवत नाही आहे ".
" आठव...आठव निशांत काही तर असेलच. तो स्वप्नदुनिया भेदून वास्तविक जगात आला आहे म्हणजेच ती स्वप्नदुनिया या समग्र ब्रह्माण्डात कुठे ना कुठे असेलच ".
निशांत त्या स्वप्नद्वारच्या आणि स्वप्नदुनियेच्या गूढ विचारात बुडून गेला होता. डॉक्टर खिडकीजवळ उभे राहून आपल्या मृदू नजरेने बाहेरील जग न्याहाळत होते. इतक्यात आनंदी स्वरात निशांत म्हणाला
"एक गोष्ट आठवली मला ".सर्वांच्या चेहऱ्यावर उत्सुकता ओसंडून वाहत होती.
" काय आठवलय तुला? " डॉक्टर विचारू लागले.
" जेव्हा मी आकाशातून त्या स्वप्नदुनियेत प्रवेश केला तेव्हा गुहेच्या अगदी जवळ असतांना आकाशातून मला उडणाऱ्या सोनेरी गरुडाचा एक भव्य पुतळा अंधुकसा दिसला होता ".
" वाह ! अगदी उत्तम " आनंदी स्वरात डॉक्टर म्हणाले.
" म्हणजे त्या सोनेरी गरुडाच्या पुतळ्याचा जर आपण शोध लावला तर आपण त्या स्वप्नदुनिये पर्यंत नक्कीच पोहचू शकतो ".
डॉक्टरांनी नेटवर सुवर्ण गरुडाचे बरेच रिझल्ट चेक केले आणि एका रिझल्टवर निशांतनि थांबायला सांगितले.
" हा बिल्कुल हाच सुवर्णगरुडाचा पुतळा मी माझ्या स्वप्नात पहिला होता " निशांतच्या माथ्यावर आठ्या जमा झाल्या होत्या.
" बर आता आपण या सुवर्णगरुडाचा इतिहास काय आहे हे पाहू " डॉक्टर अतिशय हळुवार आवाजात म्हणाले. सर्वजण अतिशय कुतुहलाच्या चेहऱ्याने नेट मध्ये डोके खुपसून त्या सुवर्णगरुडाच्या पुतळ्याचा इतिहास वाचत होते. डॉक्टरांनी माथ्यावरून हात फिरवीत नेट मधून आपले डोके बाहेर काढले आणि सांगू लागले
" आंध्र प्रदेश मधील वर्धन घराण्यातील राजा वीरवर्धन याने हा सुवर्ण गरुडाचा पुतळा उभारला फक्त एवढीच माहिती नेटवर सापडली आहे ".
" राजा वीरवर्धन बद्दल मी बरीच माहिती वाचली आहे पण सुवर्ण गरुडाच्या पुतळ्याचा उल्लेख माझ्या वाचनात कुठेच आला नाही आहे " निशांत मोठया ऐटीत सांगत होता. एक वेगळेच तेज त्याच्या चेहऱ्यावर उमटले होते.
" सर्वच गोष्टी इतिहासात लिहल्या जातातच असे नाही ना. आता आपल्याला राजा वीरवर्धन याची राजधानी म्हणजेच आत्ताची आंध्र प्रदेशातील कूचिपूरम येथे जावे लागेल. तिथेच एखाद्या इतिहासतज्ञांच्या मदतीने आपण राजा वीरवर्धन आणि सोनेरी गरुडाच्या पुतळ्याची अधिक माहिती जमवू" डॉक्टर म्हणाले.
योगेश आणि निशांतच्या चेहऱ्यावर बरेच प्रश्न उभे राहिले होते. त्यांनी फक्त होकारार्थी माना डोलावल्या.
" मी सर्वासाठी फ्लाईटच्या तिकीट बुक करतो. आपण आजच कुंचीपूरमसाठी रवाना होऊ " निशांत म्हणाला. सर्वजण आता एका अज्ञात प्रवासासाठी निघाले होते. तो जीवघेणा प्रवास कुठल्या वळणावर येऊन थांबेल कुणालाच ठाऊक नव्हतं.

मावळत्या तांबूस सूर्यकिरणात कुंचीपुरम अधिकच सुंदर दिसत होत. आता आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे इथेच मिळेल असा विश्वास प्रत्येकाच्या चेहऱ्यावर झळकत होता. निशांत आणि योगेशने तिथल्या एका इतिहासतज्ञांचा पत्ता शोधून काढला होता. योगेश, निशांत आणि डॉक्टर यांची पाऊले आपोआप त्या इतिहासतज्ञांच्या घराकडे वळली होती.

इतिहासतज्ञ संकेत यांच्या घरी पोहचताच संकेतनि सर्वांना बसायला सांगितले. त्यांचे योग्य आदरतिथ्य करून पुढील चर्चेस सुरवात केली.
" आम्हाला राजा वीरवर्धन आणि सुवर्ण गरुडाच्या पुतळ्याचा नक्की काय इतिहास आहे हे जाणून घ्यायचे आहे. तस मी राजा वीरवर्धनबद्दल बरंच काही वाचल आहे पण सुवर्ण गरुडाच्या पुतळ्याचा इतिहास माझ्या वाचनात अजूनपर्यंत तर आला नाही ". निशांत सांगू लागला.
" इतिहासातील प्रचंड शौर्यवान, धैर्यशील सम्राट म्हणजेच वर्धन घराण्यातील राजा वीरवर्धन.... राजा वीरवर्धन खरा ओळखला जातो "ठगांचा कर्दनकाळ "म्हणून. ठग ज्याला पेंढारी या नावानेही संबोधले जाते ".
" हो... मी पण असं वाचल आहे " इतिहासतज्ञांची गोष्ट मधातच थांबवत निशांत म्हणाला.
" राजा वीरवर्धन यांच्या राज्यात ठगांनी प्रचंड धुमाकूळ माजवला होता. सामान्य जनतेला अगदी त्रस्त करून सोडले होते. चोरी, दरोडा लुटारू या सर्वामुळे सामान्य जनता मेटाकुटीला आली होती. अश्या तिमिरकाळात आपली समशेर उपसून राजा वीरवर्धनने ठगांचा पुरता बंदोबस्त केला. " राजा वीरवर्धन" नाव जरी काढले तरी ठगांच्या तोंडच पाणी पडत असे. यात सांगायची सर्वात मुख्य गोष्ट म्हणजे राजा वीरवर्धन याने ठगांचा सरदार चेतनसिंघ आणि त्याचा मुलगा अलोकसिंघ याला उभ्या रणांगणात आपल्या समशेरीने यमसदनी धाडले होते ".
इतिहासतज्ञ संकेत मधातच थांबले. सर्वजण राजा वीरवर्धन यांच्या पराक्रमाची गोष्ट ऐकुन रोमांचित झाले होते.
" इतिहासात सुवर्ण गरुड पुतळ्याबद्दल दोन मत आहे. काही इतिहासतज्ञांच्या मते ठगांवर मिळवलेल्या शौर्याचं प्रतीक म्हणजे सुवर्ण गरुड पुतळा... तर काही इतिहासतज्ञांच्या मते फक्त राज्याला सुशोभित करणारा पुतळा म्हणजे सुवर्ण गरुड म्हणून याबद्दल कुठे जास्त नमूद केलं नाही आहे ".योगेश आणि निशांत ऐकमेकांकडे पाहत होते.
" एक गोष्ट आणखी सांगायचीच राहीली... ठगांची एक भाकड भयकथाही आंध्र प्रदेश मध्ये प्रसिद्ध आहे " खट्याळपणे हास्य देत संकेत म्हणाले.
निशांतच्या चेहऱ्यावरील रोमांचीत हावभाव एका क्षणार्धातच मावळले होते. आता योगेश, निशांत आणि डॉक्टर यांच्या चेहऱ्यावर भयछटा उमटल्या होत्या. त्या भयछटा भीतीने अधिकच गडद होऊ लागल्या होत्या.
" कुठली भयकथा प्रसिद्ध आहे? " एका गंभीर स्वरात निशांत म्हणाला.
" एवढी काही ऐकण्यासारखी नाही आहे " हसत हसत संकेत म्हणाले.
" पण आम्हाला ती कथा ऐकायची आहे " थोड्याश्या चिडक्या स्वरात निशांत म्हणाला.
" बर ठीक आहे इथले प्रसिद्ध योगी आचार्य विष्णूगुप्त आणि त्यांचे शिष्य आर्य त्या अख्यायिकेबद्दल तुम्हाला विस्तृतपणे सांगेल. मी त्यांना फोन करून इथेच बोलावून घेतो " संकेत म्हणाले.
इतिहासतज्ञ संकेत यांनी फोन करून आचार्य विष्णुगुप्त यांना बोलावणे धाडले. आता इकडल्या तिकडल्या गप्पागोष्टी सुरु झाल्या होत्या. निशांतच्या चेहऱ्यावर एक बैचेनी पसरली होती.

एवढ्यात अचानक संकेतच्या घरातील वीज गेली. बाहेर वाऱ्याने अतिशय तीव्र रूपात जोर धरला होता. कसल्यातरी अनामिक काळ्या वादळाची चाहूल निशांतला लागली होती.
" तुम्ही थांबा इथे मी मेणबत्ती घेऊन खोली प्रकाशमय करतो " संकेत म्हणाले आणि घरात मेणबत्या शोधू लागले.
आता त्या खोलीत सर्वत्र काळोख पसरला होता. योगेशच्या मोबाईलचा अंधुकसा प्रकाश त्या काळोखाची तीव्रता कमी करत होता. निशांत उठून त्या अंधारात आपला मोबाईल चाचपडत होता. एवढ्यात तलवारीच्या घर्षणाचा तोच भीषण स्वर त्याच्या कानात घुमू लागला. त्याची कानशिलं त्याला गरम भासू लागली होती. आपल्या पाठीमागे कुणीतरी काळ दृष्टी आपल्यावर रोखून धरली आहे हे त्याच्या लक्षात आलं होत. काही कळायच्या आतच तलवारीचा एक जोरदार प्रहार त्याच्या पाठीवर झाला.
" आई गं..... " एक जोरदार आरोळी त्या खोलीत घुमली. योगेश आणि डॉक्टरहि भीतीने शहारले होते. त्यांच्या तोंडातून एक शब्दही पुटपुटत नव्हता. अमानवी शक्तीच्या त्या जोरदार प्रहाराने निशांत जमिनीवर कोसळला होता. त्याच्या पाठीतून भळाभळा रक्त ओघळू लागले होते. घायाळ झालेल्या एका निरागस पक्षांसारखी त्याची अवस्था झाली होती. कुठल्याही क्षणी आता आपला प्राण जाणार हे त्याला कळून चुकलं होत. संकेतला आपल्या घरात नक्कीच काहीतरी विचित्र घडत आहे याचा अंदाज त्याने बांधला होता. मिणमिणत्या मेणबत्तीच्या प्रकाशात त्याच ते बिभित्स रूप पाहून त्याच्या अंगावर काटा उभा राहिला होता. त्याचा ते अर्धवट जळलेला चेहरा, कुर्तळल्यासारखे अस्तव्यस्त केस, संपूर्ण शरीरावर कोरडी त्वचा आणि त्यावर असलेल्या तीक्ष्ण ओरबळल्याच्या खुणा पाहून संकेतचे हातपाय लटपटायला लागले होते. त्या अमानवी शक्तीने निशांतच्या मानेवर दुसरा प्रहार करण्यासाठी तलवार उचलली होती

क्रमश....

टीप :- उद्या या कथेचा पुढचा भाग प्रकाशित होईल. 🙏आपल्याला हि कथा कशी वाटत आहे हे अभिप्रायाने कळवा 🙏