Sobat books and stories free download online pdf in Marathi

सोबत

सोबत

शशीने रात्रीचे जेवण पावणे दहा वाजता उरकले.सिगारेट ओढण्यासाठी तो बसस्टँडजवळच्या पक्याच्या टपरीकडे आला.हिवाळा असल्यामुळे सगळीकडे सामसूमच होती. टपरीजवळ अनोळखी दोघेजण उभे होते,सिगारेट ओढून ते दोघेही निघून गेले. थोडया वेळात एक बस आली. रात्री बसस्टँड मध्ये प्रवासी नसल्यामुळे ड्रायव्हरने बस आतमध्ये न नेता बाहेरच थांबवली. त्या बस मधून एक युवती उतरली. शशी सिगारेट ओढता-ओढता तिच्याकडे पाहत होता. खांबावरील बल्बचा प्रकाशात तिचा चेहरा स्पष्ट दिसत होता. त्या प्रकाशात तीचं सौंदर्य तो न्याहळत होता.तिचा आकृतीबंधही खुपच विलोभनीय होता. त्याने मोबाईलमध्ये पाहिले, सव्वा दहा वाजले होते. ती नक्कीच शेजारच्या कुठल्यातरी खेडेगावची असावी आणी कोणीतरी येण्याची वाट पाहत असावी, असा अंदाज त्याने मनाशीच बांधला. थोडा वेळाने तो तिच्या जवळूनच गाडीवरून घराकडे गेला.त्यावेळी तिच्या नजरेत त्याला मदतीची अपेक्षा दिसली. पण तो तसाच पुढे गेला. आता साडे अकरा वाजत आले होते. तिला अंधारात रात्रीच्या वेळी एकटीला सोडून आल्यापासून त्याच्या मनाला चैन पडत नव्हती. त्यामुळे तो परत बसस्टँडकडे आला.ती तेथेच उभी होती.तिच्या बाजूलाच चार तरुण मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा घालत होते. ती भेदरलेली दिसत होती.

शशीने तिच्याजवळ जात तिला धीर देत ‍विचारले, “कोठे जायचे आहे?”

‍तिला शशी जवळ आल्यामुळे जरा हायसे वाटले.

त्या टुकार मुलांच्या टोळक्याकडे पाहत ती म्हणाली,“बाळापूरला जायचंय.

तो, “मग एवढा उशीर का केला?”

ती,“ खरं तर मी दुपारीच पुण्याहून निघाले होते. पण वाटेत बस फेल झाली. त्यामुळे मला यायला उशीर झाला.फोन देता का प्लीज, मला घरी फोन करायचा आहे.”

शशीने तिला मोबाईल दिला. तिने कोणाला तरी फोन केला तो नंबर कव्हरेज एरियाच्या बाहेर होता. ती म्हणाली, “ भावाला फोन केला होता, पण लागत नाही. डोंगरात गाव आहे ना आमचं. आणी बस पकडण्याच्या गडबडीत माझा मोबाईल कोठेतरी पडला. त्यामुळे मला कोणाला फोन पण लावता आला नाही. नाहीतर आतापर्यंत माझा भाऊ मला गाडीवर न्यायला आला असता.”

टुकार पोरांचं टोळकं शशी आल्यामुळे जरा लांब गेले होते. पण ते लांबूनच या दोघांनाही चिडवत होते. शशीला वाटले हिला घरी न्यावे तर घरचे म्हणतील कोणाला घेवून आलास? मग काय सांगायचं? तो या विचारात असतानाच तीच त्याला म्हणाली, “ मला सोडवायला येता का? मी एकटीच आहे आणी त्यात रात्रीची वेळ आहे.”

शशीने थोडा वेळ विचार केला आणी त्याने तोंडाला मफरल गुंडाळून स्वत:चे जरकीन काढून तिला दिले. हिवाळयाचे दिवस होते त्यामुळे खुपच थंडी पडली होती. गाव संपला, गार वारं सुरु झालं. शेतीला पाणी दिलेले होते त्यामुळे गारव्यात आणखीनच भर पडली होती. शशीलाही हुडहुडी भरली होती. त्याचं अंग थंडीने कापत होतं. तरी तो सावधगीरीने गाडी चालवत होता.तिलाही थंडी वाजत होती. त्यामुळे ती शशीच्या मागे दडून बसली होती. रस्ता आधीच खड्डयांचा असल्यामुळे ब्रेक दाबताच त्या दोन तरुण जीवांचा एकमेकांना स्पर्श होत होता आणी ते दोघेही त्या स्पर्शाने मनातच सुखावत होते.

त्याने तिला विचारले, “तु येणार आहेस म्हणून घरी का सांगीतलं नाही मग?”

ती म्हणाली, “माझी पी.एस.आय पदी निवड झाली आहे. आजच निकाल लागला. तेव्हाच मी घरी फोन केला होता. पण फोन लागला नाही. मग ठरवलं, प्रत्यक्ष जावूनच घरच्यांना ही आनंदाची बातमी सांगायची.त्यामुळे लगेच निघाले पण बस फेल झाल्यामुळे यायला उशीर झाला.”

तिला बोलता-बोलता शशी मनातून आनंदून गेला होता.ती जितकी सुंदर ‍ तिचं बोलणंही तितकच मंजुळ आणी सुंदर होतं. ती त्याच्या कानाजवळ बोलत होती.तिचे ते अमृततुल्य स्वर त्याला कानामध्ये साठवून ठेवावेसे वाटत होते. बोलता-बोलता ते मुख्य रस्ता सोडून डोंगरदऱ्यातल्या आड मार्गाच्या रस्त्याला लागले. अर्ध्या रस्त्यामध्ये गेल्यानंतर अचानक गाडी बंद पडली. शशीने खाली उतरुन गाडी चालू करण्याचा प्रयत्न केला. गाडीमध्ये पेट्रोलही भरपूर होते, मग अचानक गाडी बंद कशी पडली याचा त्याला बोध होईना. सगळीकडे काळोख होता समोरचेही काहीच दिसत नव्हते. त्याने तिच्या हातातून मोबाईल घेवून टॉर्च चालू करून इकडेतिकडे पाहिले,त्याच्या सर्वांगाचा थरकापच उडाला. कारण तो ज्या जागेवर उभा होता त्या जागेवर गेल्याच आठवडयामध्ये त्याच्या मारवाडी ‍मित्राचा खुन झाला होता. त्याचा तो मित्र खुपच स्त्री लंपट होता. तो ही असाच एका अनोळखी बाईला सोडवायला गेला होता आणी त्या बाईनेच तिच्या साथीदारांसह त्याच्या अंगावरील सोने आणी अंगठया काढून घेवून त्याचा खुन केला होता. इतक्या वेळापर्यंत त्याच्या सोबतची मुलगी फोन लागत नाही म्हणत होती. आता तिने शशीच्या मोबाईल वरून कोणाला तरी फोन करुन मी अर्ध्या रस्त्यात आले आहे असे सांगीतले होते. तिने बहुतेक तिच्या साथीदारांना फोन केलेला असावा, असा त्याने मनाशीच तर्क केला.

शशीने बराच वेळ गाडी चालू करण्याचा प्रयत्न केला आणी शेवटी त्याच्या प्रयत्नांना यश आले. गाडी चालू झाली.तेवढयात ती म्हणाली, "आता आमचं गाव जवळच आलं आहे ,आताच मी भावाला फोन केला होता तो निघाला आहे इकडेच." तिचे बोलणे ऐकून त्याला तिच्यावर विश्वास ठेवावा की नाही, अशी द्विधा मन:स्थिती झाली. पण ती जर खरी असेल तर तिला अशा आडरानात एकटीला सोडणेही त्याला बरोबर वाटत नव्हते. तो तसाच तिला गाडीवर बसवून पुढे निघाला.तिने जर त्याच्या बरोबर काही दगाफटका केला, तर कसे सटकायचे याचा शशी विचार करत होता. चोहोबाजूने कोणी येत तर नाही ना याचा कानोसा घेत होता. त्या काळोखात झाडांच्या फांद्या हलल्या तरी त्याचा जीव घाबरा होत होता. तिला कसलीही भिती वाटत नसल्याचे त्याच्या लक्षात आले. आणी अचानक दोन मोटारसायकल त्यांच्या जवळ आल्या. प्रत्येक मोटार सायकलवर तीन-तीन जण होते. आणी त्यांच्या हातात काठया आणी कुऱ्हाडी होत्या. ती खाली उतरली.क्षणार्धात शशीने विजेच्या चपळाईने गाडी वळवली आणी त्याने जोरात रेस केली. त्या गडबडीत एका धोंडयावर गाडी गेल्यामुळे तो गाडी सकट खाली पडला. त्याने पाहिले, ते लोक त्याच्याकडेच येत होते. तो पटकन उठला. तो पर्यंत ते त्याच्याजवळ आले होते. आता गाडी उचलायला आणी चालू करायलाही त्याच्याजवळ वेळ नव्हता. तो तसाच पळत सुटला. ती त्याला आवाज देत होती. पण त्याने मागे सुद्धा पाहिले नाही. तो वाट दिसेल तिकडे रानारानातून पळत सुटला. त्या माणसांमधील चौघे जण त्याच्या मागे पळत सुटले.पळता-पळता तो ऊसाच्या फडात शिरला. ते चौघेही तिथे आले. त्यांनी थोडा वेळ त्याची शोधाशोध केली, तो न सापडल्यामुळे ते निघून गेले. शशी कोणी नसल्याची खात्री हळूच बाहेर आला. त्याने खिशामध्ये चाचपून पाहिले, तेव्हा त्याच्या लक्षात आले, त्याचा मोबाईलही तिच्याजवळच राहिला होता. मोबाईल जवळ नसल्यामुळे वेळेचा त्याला बोध होईना. आतापर्यंत पळाल्यामुळे त्याच्या अंगात गरमी आली होती, त्यामुळे त्याला थंडी वाजत नव्हती. पण आता त्याला थंडी वाजु लागली होती.पळता-पळता त्याची मफलर रस्त्यातच पडली होती. जरकीन सुद्धा त्याने तिला देवून टाकले होते. कडाक्याची थंडी पडली होती. थंडीपासून बचावासाठी कोठे निवारा किंवा काही पांघरायला मिळते का? याचा तो शोध घेऊ लागला. पण चोहोबाजूला शेतच होती. घर, झोपडी कोठेच दिसत नव्हती.

एका जागेवर थांबणे सुरक्षित नाही हे समजून तो आता पुढे-पुढे चालु लागला. तेवढयात त्याला एके ठिकाणी जाळ दिसला. एखाद्या शेतकऱ्यानं काही तरी पेटवून दिलं असावं, तेथे जावून शेकता येईल. या विचाराने तो त्या जाळाकडे आला. तेव्हा त्याच्या लक्षात आलं, तो स्मशानात आला होता. कारण त्याच्या चोहोबाजूंनी समाध्याच समाध्या होत्या.तो शेकोटी समजून ज्या जाळाकडे आला होता, तिथे कोणाचं तरी ताजं प्रेत जळत होतं. आगीतून निघून फुपाटयात पडल्यासारखी त्याची गत झाली. त्याचं सर्वांग थरथर कापत होतं. तो तसाच तेथून पळत सुटला, तेव्हा त्याला लाईटचा प्रकाश दिसु लागला. त्याने मनाशीच अंदाज बांधला येथे मसणवाटा आहे म्हणल्यावर उत्तरेला दिसणाऱ्या लाईट नक्कीच कोणत्या तरी गावातील असाव्यात. तो लगबगीने त्या गावाकडे गेला. तो त्याच परिसरातील होता. त्या गावाजवळ जाताच त्याने ओळखले हे मोरेवाडी गाव आहे. म्हणजे तो त्याच्या गावाकडे जायचे सोडून रात्रीच्या अंधारात दिशाभूल झाल्यामुळे त्याच्या स्वत:च्या गावाच्या विरुद्ध दिशेला आणखी दूर आला होता.

त्याला पाहून दूरवरुन कुत्रे भुंकु लागले. जवळ-जवळ दहा ते बारा कुत्रे होते. त्याच्या मनात भिती दाटून आली.रात्रीची वेळ आहे आपण एकटेच आहोत आणी या गावात अनोळखी आहोत. जर हे कुत्रे आपल्या अंगावर आले, तर या वेळेला आपल्याला वाचवायलाही कोणी येणार नाही.असा विचार त्याच्या मनात आला. तो गावात न जाता तसाच परत फिरला. तो आणखी रानात शिरला. त्याची आणखी दिशाभुल झाली. नेमके कोठे जावे त्याला काहीच कळेना. अंधारामुळे दिशा समजून येईनात. तो कोठे आहे हे सुद्धा त्याला उमजेना. समुद्रात दिशा चुकलेल्या जहाजासारखी त्याची अवस्था झाली. जिकडे पहावे तिकडे काळोखाचा समुद्रच त्याला दिसु लागला. आता आपले काही खरे नाही, या विचाराने त्याच्या मनात भिती बसली. त्याची विचार करण्याची शक्ती क्षीण होऊ लागली. त्याच्या बुद्धीचा ताबा भितीनेच घेतला. तो चालत-चालत पुन्हा त्याच स्मशानाकडे आला. आता मात्र भितीने त्याचे हातपायच गळाले. तो एकाच जागेवर मटकन खाली बसला.स्मशानापासून पटकन दूर जाण्याच्या विचाराने तो उठला. पण पाय खुप जड झाल्यासारखे त्याला वाटू लागले. तो तसाचा प्रयत्न करत पुढे-पुढे चालू लागला. आणी चालता-चालता तो कुठेतरी खोल पडत आहे असे त्याला वाटले. पाण्याचा स्पर्शाने आणी धपकन आलेल्या आवाजाने त्याच्या लक्षात आले, तो विहीरीमध्ये पडला होता. तो बाहेर निघण्यासाठी पायऱ्या शोधु लागला. तो विहीरीच्या सर्व बाजूने आतमध्ये चाचपू लागला पण त्याला पायऱ्या सापडल्या नाहीत. तो आधीच थकलेला होता, पोहण्याने तो जास्तच थकून गेला. पण सुदैवाने त्याच्या हाताला पाण्याच्या मोटरीला बांधून वर झाडाला बांधलेले दावे लागले. तो त्या दाव्याला धरुन थोडावेळ थांबला. आता त्याच्या अंगात त्राणच राहिले नव्हते. तरी तो सर्व शक्ती पणाला लावून कसा बसा वर आला. आणी त्याने विहीरीच्या काठावरच अंग टाकून दिले. तो उठण्याचा प्रयत्न करु लागला. पण आता त्याला उठताही येईना. तरीही त्याने अंगातली सगळी ताकद एकवटली आणी तो पुढे-पुढे चालू लागला. पण जायचे कुठे त्याला काहीच कळेना. तो परत त्या स्मशानाजवळच आला होता. ते प्रेत आता जळून राख झाले होते. आता जाळ विझून नुसते निखारे राहिले होते. कोणीतरी माणूस जीवनातील सर्व सुख-दु:ख भोगून राख होवून पडला होता. शशीने पुढे चालण्याचा प्रयत्न केला.पण आता त्याला चालवेना, त्याचे पाय एकमेकांत घुटमळु लागले, त्याला ग्लानी आली आणी तो धाडकन खाली कोसळला.

सकाळी एक मेंढपाळ मेंढया चारायला आला,त्याने शशीला पाहिले. त्याने साथीदारांच्या मदतीने शशीला त्याच्या घरी आणून सोडले. शशीच्या घरचे आधीच काळजीत होते. त्याने घडलेला सगळा प्रसंग घरी सांगीतला.गाडी गेली, मोबाईला गेला पण जीव तर वाचला यामुळेच त्याच्या घरचे समाधानी होते. त्याने अंघोळ केली आणी तो बैठक खोलीमध्ये चहा पीत बसला. तेवढयात ती रात्रीची मुलगी आणी चार-पाच माणसं शशीचाच शोध घेत तेथे आले होते. त्यांच्यासोबत शशीची गाडीपण होती.पण आता भिण्याचं कारण नव्हतं. कारण आता दिवस होता आणी ते त्याच्या गावात होते. पण हे जर चोर-दरोडेखोर असते, तर असे इथे आले नसते. हे ही त्याच्या डोक्यात आले. शेजारच्या चिंटयाने शशीचे घर त्यांना दाखवले होते. ते शशीच्या घरी आले. त्यांच्यातील एका म्हाताऱ्याने शशीला रामराम घातला. शशीनेही त्यांना रामराम घातला.

तो म्हातारा म्हणाला, " मी हिचा वडील आहे. ग्यानबा काळे,बाळापूरचा.काल तुम्ही आमच्या पोरीला सुखरुप आमच्यापर्यंत पोहचवले, त्याबद्दल आभार मानायला आलो आहोत. कालच तुम्हाला गावात मुक्कामाला ठेवायचे होते पण तुम्ही का पळालात ते काही समजले नाही?"

त्यावर शशीच्या सगळी गोष्ट लक्षात आली होती.त्याला आता पूर्ण समजले, त्याचा गैरसमज झाला होता. मग तो म्हणाला, "काही दिवसांपुर्वीच तुमच्या गावाच्या शिवारात माझ्या मित्राचा खुन झाला होता. तो कोणत्यातरी अनोळखी बाईलाच सोडवायला गेला होता.त्या बाईनेच तिच्या साथीदारांच्या मदतीने त्याचा खुन केला होता. रात्री तुमच्या हातात काठया आणी कुऱ्हाडी पाहून मीही तुम्हाला दरोडेखोरच समजून पळालो."

हे ऐकल्यानंतर सगळे हसु लागले.

तेवढयात एकजण बोलला, "मी हीचा भाऊ आहे. ही अशी अचानक इकडे आली. आमच्या शिवारात आधीच चोरटयांचा सुळसुळाट होता,आणी काल सकाळच्यालाच परटाच्या बाबुला शिवारात वाघरु दिसलं होतं. म्हणून आम्ही काठया आणी कुऱ्हाडी घेवून आलो होतो. आन् तुम्ही आम्हाला दरोडेखोर समजून पळालात.आम्ही खुप शोधलं तुम्हाला, पण तुम्ही काही सापडला नाहीत. तेव्हा ही तुमची गाडी घेवून इकडे आलोत."

आता शशीच्या मनातील गैरसमज पूर्णपणे दूर झाला होता.त्याने रात्री त्याची कशी परेशानी झाली हे सर्वांना सांगीतले. ते ऐकताना तिच्या चेहऱ्यावर भिती,खिन्नता स्पष्ट दिसत होती.

ती म्हणाली, "माझ्यामुळे उगाच तुम्हाला त्रास झाला."

शशी म्हणाला, " ते जाऊ दे.तुमच्या पासून पळून गेल्यावर बरं त्या वाघरानं माझी शिकार केली नाही. दैव बलवत्तर म्हणूनच मी वाचलो."

त्या दिवसापासून शशीच्या आणी तिच्यामध्ये बरीच जवळीक निर्माण झाली. नकळतपणे ते दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. बोलता-बोलता एकेदिवशी तो तिला म्हणाला, " त्या दिवशी मी तुझ्या सोबत आलो आणी मीच एकटा पडलो. खऱ्या आयुष्यात पण मी एकटाच आहे. माझी सोबती होशील का?"

त्याच्या बोलण्याने ती लाजली, तिलाही तेच हवं होतं. तीही आयुष्याच्या वाटेवर त्याच्या सोबत चालायला तयार झाली.

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED