Victims - 14 books and stories free download online pdf in Marathi

बळी - १४

बळी -- १४
केदार घरी असल्यामुळे प्रमिलाबेन अानंदात होत्या; डाॅक्टर पटेलनाही तो मनापासून आवडत होता; पण "एवढे दिवस झाले, तरी अजून पोलीसाना काही धागा दोरा कसा मिळाला नाही? इतका हुशार मुलगा नक्कीच चांगल्या घरातला अाहे --- त्याच्यासाठी काहीतरी करायला हवं!" असं डाॅक्टर पटेलना मनापासून वाटत होतं. ते पोलीस -स्टेशनला जाऊन इ. संग्रामना परत एकदा भेटले.
"मी तुमच्याकडे सहा महिन्यांपूर्वी जखमी अवस्थेत मिळालेल्या मुलाविषयी रिपोर्ट लिहिला होता! काही माहिती मिळाली का? " त्यांनी इन्सपेक्टरना विचारलं.
"आमचा तपास चालू आहे. पण थोडातरी धागा- दोरा कुठून तरी मिळायला हवा नं? आश्चर्याची गोष्ट आहे, की तो मुलगा हरवल्याची कंप्लेट अजूनपर्यंत कोणीही केलेली नाही! असं कधी होत नाही! लोक माणूस वेळेत घरी आला नाही, की घाबरून प्रथम अामच्याकडे येतात! फार फार तर काही दिवस वाट बघून पोलिसांना नक्कीच इनफाॅर्म करतात! पण ही केस वेगळी आहे! तो मराठी बोलतो; म्हणजे इथलाच आहे! त्यामुळे आम्ही महाराष्ट्रात सगळीकडे फोटो पाठवले होते, पण उपयोग झाला नाही. त्याच्या बोलण्याच्या पद्धतीवरून तो पुण्या-मुंबईसारख्या शहरी भागात रहाणारा वाटतोय! आता आम्ही इंटरनेटवर त्याची काही माहिती मिळाली तर पहाणार आहोत. आजकाल मुलांची मॅट्रिमोनियल साइटवर किंवा फेसबुकवर माहिती मिळते; पण त्यासाठी नाव माहीत असावं लागतं! फोटोवरून ओळख शोधणं थोडं कठीण अाहे! पण आम्ही वेबसाइटवर हा मुलगा सापडला आहे; असे मेसेज टाकणार आहोत; आणि त्याचा फोटो देणार आहोत-- बघूया! आज ना उद्या काहीतरी माहिती नक्की मिळेल! " इन्स्पेक्टर म्हणाले.
जरा थांबून ते पुढे म्हणाले,
"आमचे प्रयत्न चालू आहेत; पण आमचा तपास अाजतागायत तसूभरही पुढे सरकला नाही! त्याच्या मेमरी लाॅसवर उपाय चालू होते नं? त्याला काही आठवू लागलंय का?"
"तीच मोठी अडचण आहे! तो कोण- कुठला -- हे त्याला अजूनही आठवत नाही! नाही! जोपर्यंत त्याचे नातेवाईक मिळत नाहीत, तोपर्यंत त्याला आम्ही त्याच्या नशिबावर सोडू शकत नाही! माझी पत्नी - प्रमिला तर त्याला मुलगा मानते; त्यामुळे त्याची पूर्ण जबाबदारी तिने स्वतःवर घेतली आहे! सध्या तो आमच्या घरी आहे; पण लवकर त्याच्याविषयी काही कळलं तर बरं होईल; कारण सगळी सुखे असूनही तो मात्र मनातून अस्वस्थ आहे! त्याची तगमग बघितली; की वाईट वाटतं! त्याचं आयुष्य मार्गी लागलं, तो त्याच्या माणसांमध्ये गेला, की माणुसकीच्या नात्यानं घेतलेल्या या जबाबदारीतून आम्ही दोघे मोकळी होऊ; कदाचित त्याला त्याच्या कुटुंबीयांच्या सहवासात जुन्या गोष्टी आठवू लागतील!" ते म्हणाले.
"काळजी करू नका; काही तरी मार्ग नक्की सापडेल! तुमच्यासारखी चांगली माणसं त्याच्या पाठीशी आहेत! आणि आमचा तपासही चालू आहे!" इन्सपेक्टर संग्राम हसत म्हणाले.

*********
हाॅस्पिटलचं काम बघायला सुरूवात केल्यापासून केदारचा वेळ चांगला जात होता. डाॅक्टर आणि प्रमिलाबेन त्याला घरातला सदस्य असल्याप्रमाणे वागवत होत्या.
हाॅस्पिटलमध्ये दिवसभर काम करून रात्री थकून अंथरुणावर पाठ टेकली; की केदार विचार करू लागे! "माझं घर कुठे असेल? त्या घरात कोण कोण असेल? त्यांना माझी आठवण येत असेल? जर येत असेल तर मला शोधत अजून कोणी आलं कसं नाही? त्याच्या भूतकाळाची ओळख म्हणून फक्त एक घड्याळ त्याच्याकडे होतं! त्या घड्याळाकडे बघून त्याच्या मनात विचार येत असे, " हे इतकं महागडं घड्याळ मला कोणी दिलं असेल? आईने -- की बाबांनी? असं असेल तर त्यांचं किती प्रेम असेल माझ्यावर! ---- पण मग कोणी मला शोधत इथपर्यंत अजून का आलं नाही? खरं म्हणजे त्याच्या स्विमिंग प्रॅक्टिससाठी मीराताईंनी ते वाॅटरप्रूफ घड्याळ त्याला काॅलेजच्या दिवसांमध्ये घेऊन दिलं होतं. मधे अनेक वर्षे गेली होती, त्यामुळे पोलिस घड्याळाचा काही रेकाॅर्ड शोधू शकले नव्हते.
इथे प्रमिला मॅडम त्याच्यावर मुलाप्रमाणे माया करत होत्या, पण केदारला उगाचच मनात वाटत राही, की मी ह्यांच्यावर ओझं म्हणून जगतोय!
त्याला अशा मनःस्थितीत पाहिला, की प्रमिलाताईंना खूप वाईट वाटत असे. त्या त्याला धीर देत असत,
"तू भूतकाळाविषयी फार विचार करू नकोस! त्यामुळे तुला त्रास होईल! त्यापेक्षा कामात मन रमव! आला दिवस आनंदात घालव! तू जेवढा रिलॅक्स रहाशील तेवढी तुझी तब्येत लवकर सुधारेल! "
"तुमच्याबरोबर मी आनंदातच आहे! तुम्ही मला मुलाप्रमाणे जपता! औषधपाणी सांभाळता! हाॅस्पिटलची कामे पहाण्यात वेळ छान जातो!" केदार हसत म्हणाला.
"पण मला असं वाटतं, की तू फार विचार करतोस! तुझं स्वतःचं कुटुंब कसं असेल? आई-बाबा कोण असतील? घर कुठे असेल?------ हे सगळे विचार तुझ्या डोक्यात सतत चालू असतात ; याची कल्पना आहे मला; पण मला खात्री आहे-- लवकरच तुझ्या नजरेसमोरचा अंधार दूर होईल---- तुला तुझं पूर्वायुष्य आठवेल-- आता हेच बघ नं, तुला काॅम्प्यूटरचं ज्ञान आहे हे तुला स्वतःलाच कळलं; तसेच तुझ्या पूर्वायुष्याचे कप्पे हळू हळू नक्कीच उलगडत जातील! पण तोपर्यत स्वतःला जप!"
" तुमच्यातच मी आईला बघतो! आई यापेक्षा जास्त काय करू शकली असती? डाॅक्टर अंकलही मला बरा करण्यासाठी किती मोठ्या डाॅक्टरांचे सल्ले घेतायत, पोलीस स्टेशनच्या पाय-या झिजवतायत; हे मी पहातोय! तुम्ही दोघंही मला किती आपलेपणा देता, हे मी बोलून दाखवणार नाही! माझ्या या जन्मात कोण माझी माणसं होती हे माहीत नाही, पण तुमच्याशी माझं गेल्या जन्माचं काहीतरी नातं नक्कीच आहे! नाहीतर एका अनोळखी माणसासाठी एवढं कोण करतं? पूर्वायुष्य आठवत नाही; त्यामुळे मला स्वतः मध्ये काहीतरी अपुरेपण जाणवतो! पण तुम्ही म्हणता तेसुद्धा खरं आहे! जास्त विचार करू लागलो; की डोकं दुखायला लागतं, रात्र- रात्र झोप येत नाही! मला माझ्या विचारांवर ताबा ठेवावा लागेल! मी तसा प्रयत्न नक्कीच करीन! "
**********
प्रमिलाबेन केदारचे पोटचा मुलगा असल्याप्रमाणे लाड करत होत्या. त्याला भुतकाळ आठवत नव्हता; एवढं सोडलं, तर वर्तमानात त्याला काहीच कमतरता नव्हती. त्या घरचा मुलगा असल्याप्रमाणे सगळ्या सुखसोई त्याला मिळत होत्या. शिवाय डाॅक्टर पटेल त्याच्या प्रकृतीवर बारीक लक्ष ठेऊन होते.
तो रविवारचा दिवस होता. हाॅस्पिटलमधून सगळे लवकर घरी आले होते. संध्याकाळी 'टायटॅनिक' पिक्चर लागला होता. रजनीकांत उर्फ केदारही टाइमपास म्हणून टी व्ही समोर बसला होता. टी व्ही मध्ये हळू हळू समुद्राने रौद्र रूप धारण केलं, समोरची दृष्य बघताना केदारचा श्वास जोरजोरात चालू झाला; तो घामाने भिजून गेला, हे त्या दोघांनी पाहिलं.
" रजनी! तुझी तब्येत ठीक आहे नं? कसला त्रास होतोय तुला?" त्यांनी विचारलं.
" प्लीज! मी माझ्या खोलीत जाऊन झोपतो! हे मृत्यूचं तांडव मी पाहू शकत नाही!" केदार उर्फ रजनीकांत डोकं दोन्ही हातांनी गच्च धरत म्हणाला.
प्रमिलाबेन टी व्ही बंद करत त्याला पाणी देत म्हणाल्या,
"आम्ही अनेक वेळ हा सिनेमा बघितला आहे, मी टी. व्ही बंद करते! तू इथेच शांत बस! तुला बरं वाटेल!"
थोडा वेळ शांत बसल्यावर केदारची अस्वस्थता थोडी कमी झाली; त्याला जरा बरं वाटू लागलं.
"काय झालं रजनी? एवढा अस्वस्थ का झाला होतास?" डाॅक्टर पटेल चिंतेच्या स्वरात विचारत होते.
"सर! टी व्ही मध्ये खवळलेला समुद्र दिसत होता--- मला अचानक् वाटू लागलं; मला बोटीवरून कोणीतरी समुद्रात फेकलं आहे, आणि मी खवळलेल्या समुद्रात हात - पाय मारत आहे!" हे बोलताना केदारच्या चेह-यावर भीतीची छाया स्पष्ट दिसत होती!
"तू आम्हाला समुद्राजवळच जखमी अवस्थेत मिळाला होतास! कदाचित् खरोखरच कोणीतरी तुला समुद्रात ढकललं असेल! तुला आणखी काही आठवतंय का?" प्रमिलाबेन विचारू लागल्या.
केदारने फक्त नकारार्थी मान हलवली.
त्या रात्री केदारला झोप लागत नव्हती. डोळ्यासमोर सतत फेसाळणारा समुद्र येत होता! पहाटे त्याला झोप लागली; पण झोपेतही तेच दृष्य त्याचा पाठलाग करत होते. पण आता तो समुद्र पोहून पार करत होता; पण त्या स्वप्नांमध्ये मधेच आपलं लग्न होत आहे; सप्तपदी चालली आहे; अशी दृष्येही तो पहात होता. चेहरे मात्र धूसर दिसत होते. कधी एका स्त्रीचे सोनेरी लांबसडक केस-- तर कधी मेंदी लागलेले हात -- तर कधी मधूर हास्याचा ध्वनी---! पण केदार तिच्या जवळ जाऊ लागताच ती हवेत विरून जात होती.
******** contd.-.part -15.

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED