वारी समर्पणाची मेघराज शेवाळकर द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

वारी समर्पणाची



सारंग आशुतोषची वाट पहात बसला.. आशुतोषनेच त्याला तिथे बोलावले होते..
" काय बोलायचंय.. महत्वाचं आहे म्हणे? कॉलेज मध्येही बोलू शकला असताच की? " सारंग धुसफूसला.
वाट पाहून सारंग कंटाळला होता.. आशुतोष.. जो जुनिअर होता.. पण जास्तच क्लोज फ्रेंड बनला होता.. सारंगला प्रश्न पडायचा....
" असं काय आहे आशुमध्ये की मी त्याच्याकडे ओढला जातो? मनात ठरवतो आता हयाचं अजिबात ऐकायचं नाही.. लहान असूनही हक्क गाजवतो.. आताचच पहा.. मला बोलावून स्वतःच आला नाही.. आता बस पुन्हा ऐकायचं नाही.. " सारंग मनात बोलत होता.
दुरून येणारा आशुतोष दिसताच त्याचं मन आनंदाने भरुन गेलं.. राग छू मंतर झालेला होता..
" सॉरी सॉरी. ते सरांनी थोडं ताणल म्हणून. " आशु म्हणाला
" मी उगाचं ताटकळत बसलो त्याचं काय? " सारंग.
" सॉरी बोललो की? उठाबशा काढू का? कान पकडून.. " आशु म्हणाला.
" त्याची.. गरज नाही.. तूला काय बोलायचं? बोल पटकन.. बघ अंधारुन आलंय.. पाऊस केव्हाही सुरु होईल. " सारंग.
" मला ना.. तूला.. काही... ते.. ते.. " आशु अडखळला.
" बोल की घडाघडा.. आता का त त प प करतो आहेस.. एरव्ही तर अखंड बडबड करतोस.. " सारंग म्हणाला.
" तू शांत रहा ना.. आधीच नेर्व्हस झालोय..! त्यात तू ओरडतो.. " गाल फुगवत आशु म्हणाला.
" आता बोलणार आहेस का? निघायचं.. " सारंग.
" लेट मी कंफेस.. माझं तुझ्यावर प्रेम आहे.. आय लव्ह यू..
तुझ्याशिवाय नाही जगू शकणार? " आशु एका दमात बोलून गेला.. तो सारंगकडे पहात राहिला, सारंग स्तब्ध झाला होता ..
" बोल काही.. " आशु म्हणाला.
" आशा.. हे काय आहे? मी गे नाहीये.. मी तूला फक्त मित्र मानतो.. अन तू हे मनात... " सारंग म्हणाला.
आशुतोष कोलंडला.. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले.. त्याचा चेहेरा कोमेजला.. डोळ्यात अश्रू तरळले.. त्याचा चेहरा सारंगच्याने बघावेना.. सारंग पाठीमागे वळाला..
" हे बघ आशु.. आपण चांगले मित्र आहोत.. आणि आयुष्यभर राहू.. पण प्रेमाचं म्हणशील तर.. " सारंग बोलतं आशुकडे वळाला..
आशु होताच कुठे.. तो निघून गेला होता.. त्याचा रडवेला चेहेरा लक्षात येताच तो क्षणभर गहिवरला.. तो आशूला शोधू लागला.. दूरवर आशु धावत जाताना दिसला.. तो लगबगिने त्याच्या मागे निघाला.. बाईक शुरु करुन सारंग आशुचा पाठलाग करु लागला.. काही मिनिटात तो आशुसोबत होता.. आशु डोळे पुसत धावतच होता..
" आशा थांब.. बस गाडीवर.. मी सोडतो तूला.. " सारंग म्हणाला.. आशुतोष आपल्याचं तंद्रीत धावत होता.. पावसाला सुरुवात झाली.. सारंग विनवत होता.. पण तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता.. त्याचे अश्रू पावसाच्या ओघाळणाऱ्या पाण्यात मिसळून गेले होते..

चिंब झालेल्या सारंगने आपल्याला रुममध्ये जाताच कपडे बदलले.. त्याला कॉफीची तल्लफ झाली म्हणून ती बनवून घेतली.. डोकं प्रचंड दुखतं असल्याने त्याने बाम चोळला.. डोळे बंद करुन झोपण्याचा प्रयत्न केला.. डोळ्यासमोर आशुतोषचा रडवेला चेहेरा तरळला.. सारंगने डोळे उघडले.. बाजूला पडलेला मोबाईल उचलला आणि कॉल केला.. रिंग जातं होती.. आशूने कॉल उचलला नाही.. सारंग कॉल लावत राहिला..
" उद्या कॉलेजमध्ये बोलू.. वेडा आहे.. मैत्रीला प्रेम समजून बसलाय.. उद्या समजावून सांगेन.. " सारंग मनाशी बोलला.
सकाळी कॉलेजमध्ये सगळीकडे शोधलं.. तो नव्हताच.. सारंग त्याला फोन सुद्धा लावत होता... आता तर नॉट रिचेबल ट्यून वाजू लागली.. आता सारंगला त्याची काळजी वाटू लागली..
" मला त्याची एव्हढी काळजी का वाटतेय?.. इतके मित्र आहेत.. कोण आलंय.. कोण नाही आलंय.. आपलं लक्ष पण नसतं.. मग एकटा आशुतोष आला नाही तर एव्हढा का फरक पडतोय.. त्याचा चेहेरा डोळ्यासमोर येतोय.. त्याचा तो उदास, रडवेला चेहेरा डोळ्यासमोर आल्यावर मन बेचैन होतं.. हृदयात कालवाकालव होते.. हृदयात? खरंच? .. हे काय आहे? मी सुद्धा त्याच्या प्रेमात पडलोय? " सारंग विचार करत होता. " आपलंही आशुतोषवर प्रेम आहे.. मनाने कबूल करताच, काळजात लहर उठली.. मनात गोडं भावना उफाळून आली.. सारं कसं उत्साहाने भरुन गेलं.. परत आशुतोषचा रडणारा चेहरा आठवताच त्याचं मन रडायला लागलं..
" काय असेल? तो आजारी असेल? रागात आहे? की जीवाचं बरं वाईट.. " सारंग हादरला.
त्याच्या मित्रांकडून घरचा पत्ता घेऊन तो आशुच्या घरी पोहोचला.

" आशुतोष कॉलेजला येत नाही.. म्हणून चौकशी करायला आलोय.. " सारंग दारातच म्हणाला.
" तू सारंग ना? ये आत ये.. " आशुची आई म्हणाली.
" तुम्हाला कसं माहिती? मीच सारंग म्हणून .. " सारंग.
" सारखं तुझ्याविषयी बोलतं असतो.. तूझा मोबाईल मध्ये असणारा फोटोही पाहिलाय.. " आई.
" त्याला बोलवता का? मला बोलायचंय त्याच्याशी. " सारंग
" तो नाहीये..!" आई.
" कुठे गेलाय का? " सारंगने विचारले.
" त्याचे बाबा आषाढी वारी करतात पायी.. हयावेळी त्यांना जाणे शक्य नव्हते.. मग आशुच म्हणाला की तो जाईन... हयांनी, मी किती समजावलं पण नाहीच ऐकला.. हट्टाने गेला.. कधीच देवदेव न करणारा माझा आशू हया वेळी कसाकाय तयार झाला..! नवलंच वाटलं.. " आई.
" कधी येईन वापस..? " सारंगने विचारले.
" द्वादशी.. अजून चार पाच दिवस लागतील.. " आई.
बोलण्या बोलण्यात दिंडीचं नाव, पत्ता, पंढरपूरात कुठे मुक्काम असतो.. सारं विचारुन घेतलं.. तो बाहेर पडला तो मनात पक्का निर्धार करुन.

सारंग पंढरपूरात पोहोचला, चौकशी केली तर असं कळलं अजून दिंड्या दोन मुक्कामावर आहेत.. परवा म्हणजे दशमीला वाखरीला येतील.. तेथील रिंगण झालं की पंढरपूर... सारंगला एकट्याला लक्ष लागेना म्हणून तो दिंडीच्या मुक्कामी आला.. त्याचा अंदाज चुकला.. वैष्णवांचा मेळा तिथे अवतरला होता.. लाखोंच्या संख्येने वारकरी.. हजारो दिंड्या.. मुक्कामी होत्या.. त्यात असणारे लाखो भाविक.. जागोजागी आरत्या.. भजन चालू होते.. एव्हढ्या गर्दीत आशुतोष.. त्याची दिंडी.. कशी शोधणार? त्याला यक्ष प्रश्न पडला..
" काय शोधताय माऊली? " एकाने विचारले.
" हरवलेल्याला शोधतोय.. रागावून निघून आलाय. " सारंग म्हणाला.
" हया वारकऱ्यांच्या अथांग सागरात कसा हो गावणार? एक काम करा.. माउलीच्या पालखी जवळ हुडका... " तो.
" तिथे मिळेल?.. " सारंगने विचारले.
" वारकरी वाटेत चुकतात, एकमेकांपासून वेगळे होतात.. मग एकचं खूण असते.. मुक्कामी पोहोचलो की माऊलीच्या पालखी जवळ हुडकायचं.. तिथे चौकीवर सांगून पुकारा करुन बघा.. " तो वारकरी म्हणाला.
" तुमचे खूप खूप आभार.. " हात जोडून सारंग म्हणाला.
" माऊली.. एकमेकांना मदत करणं हा वारकरण्याचा धर्मच आहे.. काळजी नका करु.. मिळेल तो.. अन पांडुरंग पाठीशी असल्यावर कसलं भय.. कसली चिंता.. सारं त्याच्यावर सोपवा.. हया भक्ती रसात न्हाऊन घ्या.. पांडुरंग.. पांडुरंग.. " तो म्हणाला.
सारंग गडबडीतच माऊलीच्या पालखीचा मुक्काम होता तिथे पोहोचला..
वारकऱ्यांचा मेळा पांडुरंगाच्या भक्तीत रंगून गेला होता. माऊलीच्या दर्शन आरतीसाठी वारकरी जमले होते.. सारंगचे हात आपोआप जोडल्या गेले.. त्याने मनोमनी प्रार्थना केली.. मनात एक आशा जागली.. सारंग त्या मेळ्यात आशुतोषला शोधू लागला.. पण त्याला यश येत नव्हतं..तो तिथे असणाऱ्या चौकी जवळ आला.. आपल्या मोबाईल मध्ये असणारा आशुतोषचा फोटो दाखवून नाव सांगितलं.. तिथून नाव घोषित करण्यात येऊ लागलं.. त्या प्रयत्नाला यश आलं नाही..
" उद्या सकाळी पालखी मार्गक्रमण करेल त्यावेळेस मिळाला तर बघा.. " चौकीवरील पोलीस म्हणाला.
सारंग रांगेत उभा राहिला.. माऊलीची पालखी स्थानापन्न झाली तिथे जावून मस्तक ठेऊन दर्शन घेतलं.. बाजूला कीर्तन सोहोळा रंगला होता.. कंटाळलेला सारंग त्या सोहोळ्यात रममान झाला.. भक्तीरंगात साऱ्याचा विसर पडला.. कीर्तन संपताच.. हरिपाठ सुरु झाला... सारंग तिथून उठला आणि बाहेर आला...
दुसरा दिवसही हया गर्दीत तो आशुतोषला शोधत राहिला पण तो सापडला नाही... सापडत सापडत तो वारकऱ्यासोबत चालत होता.. टाळ, मृदूंग.. त्याच्या तलावर चालणारे अभंग.. गजर.. सारंग भक्ती रसात न्हाऊन निघाला होता.. पालखी वाखरीला पोहोचली.. तिथे रिंगण पार पडलं अन माऊलीच्या पालखीने पंढरपूरात प्रवेश केला.. वारकऱ्यांच्या उत्साहाला उधाण आलं.. माहेरपणाला आलेली लेक आपल्या आईला भेटल्यावर जशी हरखून जाते.. वारकरी आपल्या विठाईला भेटायला मिळणार म्हणून हरखुन गेली होती..

सारंग आशुतोषच्या दिंडीचा शोध घेत एका मठात पिहोचला..
" मावशी आशुतोष..? " सारंगने विचारले.
" तो आताच दर्शनाच्या रांगेला लागलाय.. त्याला लवकर परत जायचे म्हणतं होता.. " त्या म्हणाल्या.
" किती वेळात येईल?.." सारंगने विचारले.
" पोरा.. आषाढी वारी आहे.. माणसांचा जनसागर उसळलाय.. दर्शनाला दिवस दिवस लागतो.. काय माहिती केव्हा येईल.. तू का शोधतोय त्याला?.. " त्यांनी विचारले.
" मावशी.. तो मित्र आहे माझा.. मी आलो दर्शनाला.. त्याच्या आईकडून कळालं तो पायी वारीला आलाय.. म्हणून शोधतोय.. जाताना सोबत जाता येईल. " सारंग.
" केव्हा येईल ते सांगता नाही येणार.. पण तूझा नंबर देऊन जा.. म्हणजे आल्यावर कॉल करायला लावते.. " त्या.
सारंगने त्यांना नंबर दिला आणि तो आशुतोषला शोधायला निघाला..
सारंग चंद्रभागेकडे निघाला.. तेथील गर्दी आणि पाणी पाहून तो तिथेच थबकला...
" माऊली स्नान करायच नाही का? " एका वारकऱ्याने विचारले.
" नाही.. एव्हढी गर्दी अन ते गढूळ पाणी?.. " नाक मुरडत सारंग म्हणाला.
" माऊली वारीत आला आहात.. पूर्ण श्रद्धेने.. त्याच्या चरणी समर्पित होऊन वारी करावी.. त्या माय चंद्रभागेत अंघोळ केल्याने पापांच नाश होतो... गर्दी कितीही दिसली तरी तुम्हाला कसलाही त्रास होणार नाही. " तो म्हणाला.
" पण आपलं नाव? " सारंगने विचारले.
" इथे प्रत्येक जण त्या विठूरायाचे वारकरी आहेत.. एकमेकांना भक्त म्हणूनच ओळखतात.. इथे लहान मोठा, श्रीमंत गरीब, जातपात असं काही नसतं.. त्यामुळे वारकरी एकमेकांच्या पाया पडतं असतात.. सारे वैष्णव भाई भाई..हाच वारकरण्याचा धर्म.. हाच मार्ग.. मुखी पांडुरंग नाव अन भोळा भाव.. " तो म्हणाला.
"सारंगने आपले कपडे अन बॅग त्याच्या सुपूर्द केले अन स्नान करायला गेला.. तयार होऊन त्या वयाने लहान असणाऱ्या वारकऱ्याच्या पाया पडला.. तो सुद्धा सारांगच्या पाया पडला.. बॅग घेऊन तो मंदिराकडे निघाला.. दर्शनासाठी भलीमोठी रांग पाहून त्याचा भ्रमनिरास झाला.. रांगेत सापडेल म्हणून तो ही दर्शनाच्या रांगेत लागला.. मुखात हरीनाम.. पायात लय आणि मनात त्याच्या भेटीची आस.. सारंग त्या वातावरणात रंगून गेला.. एवढावेळ चढ उतार करुन तो गाभाऱ्यात पोहोचला.. त्याने डोळेभरून त्या सावळ्या विठ्ठलाचे दर्शन घेतले...
" पांडुरंगा.. माझ्यासारख्यां नास्तिकाला भेटीला बोलावले.. नकळत का होईना एकादशीचा उपवास घडवलास.. अंतःकरण शुद्ध झालं.. आता त्या अंतःकरणात वसलेल्या आशूची भेट होऊ दे.. त्याच्याजवळ माझं प्रेम कबूल करायच आहे.. त्याला आधी नकार देऊन जी चूक केली ती सुधारण्याची संधी दे.. " सारंग समोर गेला.. आपलं मस्तक विठुरायाच्या पायावर ठेवलं.. दर्शन घेऊन तो बाहेर पडला.

सारंग बाहेर येऊन थांबला.. त्याने परत एकवार मंदिराकडे तोंड करुन हात जोडले.. डोळे बंद करुन प्रार्थना केली.. समाधानाने डोळे उघडून वळला.. आश्चर्य.. त्याच्या मागे.. आशुतोष डोळे बंद करुन हात जोडून उभा होता.
आशुतोषने डोळे उघडताच समोर सारंग दिसला..
" सारंग.. तू अन इथे..? " आश्चर्याने आशूने विचारले.
" तुझ्यासाठीच आलोय..!" सारंग म्हणाला.
" मी तर वडिलांची वारी चुकू नये म्हणून आलोय.. " आशू.
" पण मी तुझ्यासाठी आलोय.. " सारंग.
" तू काय बोलतो आहेस मला काहीही कळलं नाही. " आशू.
" इथे नको.. बाहेर जावू.. मग बोलू.. " सारंग.
दोघे बाहेर पडले.. बाहेर आल्यावर सारंगने त्याला मिठीत घेतले..
" काय करतो आहेस सारंग?... " आशू म्हणाला.
" आपल्या प्रेमाला मिठीत घेतोय.. " सारंग
आशुतोष त्याच्याकडे आश्चर्यचकित होऊन पाहू लागला..
" बरोबर ऐकतो आहेस.. माझं तुझ्यावर प्रेम आहे आशू.. " सारंग म्हणाला.
" हे कसं झालं? तू तर.. " आशू बोलत होता.
सारंगने त्याच्या ओठांवर बोटं ठेवतं बोलणं थांबवलं.
" बच्चा.. त्यादिवशी माझा नकार ऐकताच तू रडत पळालास.. माझ्या डोळ्यासमोरून तूझा तो उदास चेहरा जातच नव्हता.. तू कॉल उचलत नव्हतास.. कॉलेजला पण येत नव्हतास.. तूझ्या अनुपस्तितीत मला लक्षात आलं, आपल्यात फक्त मैत्री नाही.. तू म्हणतोस तसं प्रेम आहे.. तू हसलास.. माझं जग हसत.. तू रडलास.. माझं हृदय रडत.. हो आशू हे प्रेमच आहे.. आय लव्ह यू. " सारंग म्हणाला.
" माझी वारी सफल झाली म्हणायची.. " आशू म्हणाला.
" हो वारी समर्पणाची.. जे आपलं एकमेकांप्रति असेल..
समर्पण त्या पांडुरंगाच्या चरणाशी.. आपण पुढील वर्षी जोडीने वारीला येऊ.. " सारंग म्हणाला. दोघे इतर देवस्थानाना भेटी दयायला जोड्याने गेले..

|| समाप्त ||

मेघराज शेवाळकर