श्वास असेपर्यंत - भाग २ Suraj Kamble द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • चाळीतले दिवस - भाग 6

    चाळीतले दिवस भाग 6   पुण्यात शिकायला येण्यापूर्वी गावाकडून म...

  • रहस्य - 2

    सकाळ होताच हरी त्याच्या सासू च्या घरी निघून गेला सोनू कडे, न...

  • नियती - भाग 27

    भाग 27️मोहित म्हणाला..."पण मालक....."त्याला बोलण्याच्या अगोद...

  • बॅडकमांड

    बॅड कमाण्ड

    कमांड-डॉसमध्ये काम करताना गोपूची नजर फिरून फिरून...

  • मुक्त व्हायचंय मला - भाग ११

    मुक्त व्हायचंय मला भाग ११वामागील भागावरून पुढे…मालतीचं बोलणं...

श्रेणी
शेयर करा

श्वास असेपर्यंत - भाग २

मी अमर , माझा जन्म अगदी स्वातंत्र चळवळीच्या नंतरचा असावा. एक छोटंसं आमचं गावं. खूप काही लोकसंख्या नसणार तरी चार- पाचशे लोकं त्या गावात राहत असत. सर्वच धर्माची लोकं तिथे राहत असायचे. त्यात एक आमचं छोटंसं कुटुंब.आईच्या पोटी तशी चार - पाच जन्माला आली पण काही जन्मताच मेली तर काही एक वर्ष असताना दगावली. तो काळच तसा होता. वेळेवर औषध नाही किव्हा मग दवाखाना नसल्याने,साथीचे रोग,महामारी असल्याने जास्त मुले वाचत नसायची,त्यात मी आणि बहिण चित्रा वाचलो. बाबा महादेव आणि आई सावित्री यांच्या पोटी जन्माला आलेला हा “अमर”. घरची परिस्थिती साधारण होती. एका महार कुटुंबात माझा जन्म झाला. अन्याय,अत्याचार हे काही नवीन नसायचं. मेलेल्या जनावरांची मांस खाने, चामडी सोलून विकणे, झाडू बनविणे, चाकरी करणें, मजुरी नसल्याने काही काही चोरीही करत असायचे. पोट भरावं हाच एक उद्देश्य. काही एक दारूही विकायचे,आणि काही त्याच दारूच्या नशेत राहत असायचे. जेव्हा कुठे एक माणूस आमच्यासाठी, आमच्या हक्कासाठी लढला आहे, ते म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर . तेव्हापासून हा समाज थोडा वैचारिक पातळीने, राहणीमान,नीटनेटकी ठेवण ठेवण्यास सुरुवात झाली होती. त्यातच त्यांनी या अमानवी समजल्या जाणाऱ्या अस्पृश्य प्रथेला विरोध करून आम्हांला मानव म्हणून जगण्याचा अधिकार दिला. पण जात ही काही केल्या पुसल्या गेली नाही. प्रत्येकच वेळेस या उच्च - नीच जातीचा आम्हांला फटका बसत असायचा...

एकूण चार माणसे आमच्या कुटुंबात असल्याने घरही खूप छोटं चं होतं. एखादा जास्तीचा पाहुणा घरी आला की झोपायची अडचण येत असायची. मग आईला बकऱ्या बांधतात तिथे झोपावं लागत असायचं. हा बकऱ्यावरून आठवलं आमच्या घरात दोन चांगल्या बकऱ्या होत्या.एकीला आवडीने झिंगरी आणि दुसरीला बिजली म्हणतं असायचो. बिजली नाव यासाठीच बाबांनी ठेवलं होतं की ती वर्ष्यातून दोन - दोन पिलांना जन्म देत होती. त्यामुळे विजेसारखी पटकन पिल्ले मोठे होऊन आम्हाला त्याच पैशातून मिळकत मिळत असायची. आमचं कुटुंब ही काही प्रमाणात त्यावर चालत असायचं.बोलता बोलता एक मुद्दा विसरून गेला होता, की पाहुणा घरी आला तर आईला बकऱ्या बांधायच्या खोलीमध्ये झोपावं लागत असे. आता तुम्ही म्हणाल की बाईच्या जातीला तिथे झोपावं लागत असायचं..त्याचं कारण असं होतं की नवीन माणूस असल्याने आणि घरात जागा नसल्याने,तो नवीन माणूस बाहेर झोपू शकत नाही,बाबा झोपलेही असते पण परका माणूस आणि आई आत तर ते विचित्र वाटायचं म्हणून मग सोपा उपाय म्हणून आम्ही सर्व आत आणि आई बाहेर झोपत असायची. बिचारी कामावरून यायची,सर्वांना जेवण बनवून द्यायची,आम्ही जेवण झाल्यावर लगेच झोपी जात असू,पण आई शेवटी जेवण करायची,घरातली सर्व कामे आटोपली की मग झोपी जात असायची. पाहुणा घरी आला की नित्यनेमाने ती आपल्या मैत्रीणी झिंगरी आणि बिजली जवळ जाऊन पडल्या पडल्या झोपी जायची. तसं घर काही विटा सिमेंट नी बांधलं नव्हतं, तर घराच्या भिंती या मातीच्या चांगल्या लिपुन तयार केल्या होत्या. पावसाळा आला की त्यांना बदबद ओल येत असायचं, पूर्ण भिंती या पाण्याने ओल्या होऊन जायच्या. मग घरात एकदम कसातरी कुजट वास येत असायचा, ज्याने जीव घुटमळत असे, पण पर्याय नसायचा. घरावर सुद्धा काही स्लॅब टाकलेला नव्हता. ते वडिलांनी घेऊन ठेवलेली अर्धी अधिक फुटकी असलेली कवेलू वर घराचं छत झाकण्यासाठी होती. घरात सुद्धा काही दाग दागिने ,संपत्ती, धन यातलं काही एक नव्हतंच. हातांवर आणणे आणि पानावर खाणे अशी तेंव्हा आमची किंव्हा आमच्या या सर्व महारवाड्याची परिस्थिती होती. घरी वाडवडीलोपार्जित छोटासा जमिनीचा तुकडा होता. तिच्यातचं कष्ट करण्यात आई वडिलांनी पूर्ण आयुष्य खर्ची केलं होतं. ती जमीन काही प्रमाणात आमच्या कुटुंबाची भूक भागवत असायची.तसेच आई बाबा नेहमी पाटील,सावकार यांच्या कामावर असल्याने पोट भरन सहज होऊन जात असायचं पण काही पैसे शिल्लक पडत नसायचे.

बहीण चित्रा दोन - तीन वर्ष्याची असणार, तेव्हा तिचा सांभाळ, तिला पाहणं, खेळवणं, तिच्याशी राहणं, तिला हसवण , जेवण भरवणं, इत्यादी छोटी - मोठी कामे माझ्या कडे असायची. आई सतत दुसऱ्यांच्या शेतात कामाला जात असल्याने, माझं हे काम नित्य नेमाच झालं होतं. आई आपल्या कुटुंबाची तहान भूक भागविण्यासाठी, आपल्या मुलांना दोन वेळच अन्न मिळविण्यासाठी राब - राब काम करत असायची. ती आमच्यावर खूप जीवापाड प्रेम करत असायची. आपल्या पतीच्या खांद्याला खांदा लावून उभी राहत असायची. एवढं सगळं करून तिच्या नशीबी सुख नावाचा शब्दच नव्हता. म्हणून प्रत्येकाला आई असावीच. ज्यांना जन्मताचं आई सोडून गेलेली असते त्यांना खरी आईची महती कळते. पण आमच्या नशिबी आमच्यावर जीवापाड प्रेम करणारी आई भेटली होती..आई नेहमी मला म्हणतं असायची,

अरे अमर ," देवासमोर हात जोडत जा, त्यांच्या पाया पडत जा, त्यांना वंदन करत जा."

मग मीचं आपला मिश्कीलपणे आईला म्हणतं असायचो,
अरे आई , " ज्याला पाहिलं नाही, जो दिसत नाही, मग त्याच्यासमोर हात जोडण्यात काय अर्थ???"

" तू आमच्यासाठी कष्ट करते, बाबा ही करतात,मग तुम्हीच आमच्यासाठी देव नाहीत का???"

या सर्व बोलण्यावर आई मात्र शांत होऊन जायची. तिच्या कडे माझ्या प्रश्नांची उत्तरे नसायची.. तेवढं मला समजत होतो मी चांगला आठ - नऊ वर्षाचा होतो. एवढं काही नाही , पण थोडं फार समजत असायचं. बहीण चित्रा आपल्या खेळण्यात खुश असायची. मी सुद्धा तिला खेळवत असायचो. त्यामुळे आई बाबा एवढं माझं ही प्रेम तिच्यावर होतं.दुसऱ्यांनी जरी तिला कडेवर घेतलं तरी ती रडत असायची,पण माझ्याजवळ येताच मी कसातरी आपल्या ताकदीनिशी उचलत असायचो,तेव्हा कुठे तिचं रडणं थांबत असायचं.

रूपाने गोरी पान, टपोरे डोळे,गाल गुबगुबीत असलेले,डोक्याचे केस कुरळे,आणि तीच ते हकलत, तोकड्या आवाजात बोलणं, म्हणजे " जेवायला म्हणायचं असलं की, " देवायला दे!!! असं ती म्हणत असायची. ती बोलली की आम्ही सर्व हसत असायचो. घराबाजूचे नेहमी म्हणत असायचे, भाऊ असावा तर अगदी अमर सारखाच. वयाने लहान असून सुद्धा आपल्या बहिणीला किती चांगल्या प्रकारे वागवत असतो, खेळवत असतो, खरंच हा मुलगा म्हणजे चित्राची आईच बनला आहे. त्या शेजारी काय बोलायचं हे काही फारसं कळत नसायचं. अश्यातच बाबांनी माझं नाव शाळेत घातलं. त्या पूर्वी शाळा हे नाव ऐकलं तर होतं पण तेथील वातावरण कसं असतं, याची काही कल्पना नव्हती. बहीण चित्रा सुद्धा आता थोडी मोठी झाली होती. ती आजूबाजूला खेळत असायची. तिचे ही लहान - लहान मित्र - मैत्रिणी झाल्या होत्या. मला मात्र शाळा नाव ऐकून भीती वाटत होती. कधी गेलो नाही, कुणी मित्र नाही, मग शाळेत सर मारणार तर नाही असे विवीध प्रश्न मनात येत होते.

शेवटी शाळेत जाण्याचा पहिला दिवस उजाडला , बाबांनी मला शाळेत आणून सोडून दिलं. सरांशी ते काय बोलले त्यांचं त्यांनाच माहिती आणि निघून गेले. मी मात्र त्यांच्या पाठमोऱ्या शरीराकडे ते नाहीसे होत पर्यंत पाहत राहिलो. एवढ्यातच शाळेची घंटा वाजली. शाळेचे सर्व विद्यार्थी शाळेच्या आवारात एक - एक रांग करून उभे राहिले. मी पण जिथे लहान उंचीचे मुलं दिसतात तिथे जाऊन उभा राहिलो. एका विद्यार्थ्यांने एक आवाज दिला. सर्व विध्यार्थी जे जुने होते ते एका तालात " जण - गण - मन अधिनायक - जय हे भारत भाग्य विधाता," म्हणू लागले. मी मात्र नुसताच उभा होतो. एकदाची सर्व प्रार्थना आटोपली. सर्व विध्यार्थी आप आपल्या वर्गामध्ये जाऊन बसले. मी ही माझा पहिला वर्ग कुठे आहे शोधत होतो पण काही समजत नव्हतं . शेवटी एक सर आले त्यांनी मला सांगितले की तुझा हा इकडे वर्ग आहे,त्या वर्गात जाऊन बैस. मी मुकाट्याने जाऊन सर्वात मागे जाऊन बसलो...

वर्गात जाऊन पाहतो तर नुसता गोंधळ चालला होता. कुणी मला इथे बसू दे म्हणून भांडत होती, काही कुस्ती खेळत होती तर काही मुली चक्क एकमेकींच्या वेणी आवरून भांडत होत्या, तर काही आई - बाबा करून रडत होते. वर्गात कमी अधिक ३० ते ४० मुलं मुली असणार. शाळेच्या आतल्या भिंती रंगवून होत्या, काही जागी चित्र काढले होते, काही जागी काहीतरी लिहून होते, कारण मला तर सध्या वाचताच येत नव्हतं काही जागेवर पाढे लिहून ठेवले होते. एक सरांसाठी टेबल आणि एक प्लास्टिक च्या बारीक दोरीने गुंडाळलेली खुर्ची होती, आणि त्या टेबलावर एक काळ्या रंगाची गोल केलेली आखूड काठी ठेवलेली होती, नंतर काही दिवसांनी तिला छडी, किंव्हा रूळ, म्हणतात असं माहिती झालं. त्या छडीला पाहताच मनात भीती निर्माण वायची. अभ्यास केला नाही तर किंव्हा सरांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे नाही दिल्यास त्या छडीचा वापर सर करत असायचे. मी एक थैला घेऊन शाळेत आलो होतो,त्यात काळ्या रंगाची पाटी ठेवली होती आणि सोबत एक लेखन, लिहिण्यासाठी, मी पांढरा शर्ट आणि खाली निळा घुडघ्यापर्यंत असणारा पॅन्ट घालून शाळेत आलो होतो. माझ्या शाळेचा तोच गणवेश होता म्हणून बाबांनी मला तो घालून दिला असावा. इतक्यांत एकदम सर्व वर्गात शांतता पसरली. काही तरी अचानक संकट आलं की काय म्हणून आता पर्यंत गोंधळ घालणारी पोरं एकदम चूप झाली. आपल्याला आता मार बसणार या धाकाने जिथली मुलं तिथे जाऊन बसली. काहींनी उगाच सोंग म्हणून आपल्या थैल्यातील पाटी व लेखन काढली. समोरून एक उंच धिप्पाड व्यक्तिमत्त्व शरीराने मजबूत पण वयाने थोडे म्हातारे , अंगावर एक काळा कोट, खाली पांढऱ्या रंगाचे धोतर , चेहऱ्यावर शोभेल अश्या पिळदार मिश्या , खांद्याला लटकवलेली एक पिशवी, अशी एक व्यक्ती वर्गात येऊन खुर्चीवर जाऊन बसली.

आता वर्ग म्हटला की निरनिराळ्या स्वभावाची मुले असतात, त्यातीलच एक उठून उभा झाला आणि त्या खुर्चीवर असणाऱ्या व्यक्तीला प्रश्न केला, "तुम्ही कोण???"
आणि परत आपल्या जागेवर जाऊन बसला. सगळ्यांनी त्याच्याकडे एकदम नजर वळवली, आणि मग सर्व त्या व्यक्तीकडे पाहू लागले. काही वेळानंतर त्या व्यक्तींनी स्मित हास्य करत बोलायला सुरुवात केली. " खूप छान प्रश्न विचारला बेटा तू!!!!" खूप धाडसी मुलं आहे म्हणायची या वर्गातील. मी तुमच्या वर्गाचा वर्गशिक्षक आहे. माझं नाव देशमुख सर आहे. तुम्ही मला सर म्हणून आवाज देऊ शकता. वर्गशिक्षक म्हणजे मी तुम्हांला सर्वच विषय शिकवणार आहे.आज शाळेचा पहिला दिवस असल्याने आपण फक्त एकमेकांची ओळख करून घेऊ बघा..जसा मी माझा परिचय दिला तसाचं प्रत्येकांनी आपल्या जागेवर उभं राहून आपलं नाव सांगायचं आहे, अगदी मी सांगितलं त्या पध्दतीने. या रांगेमधील एक एक मुलगा उभा होऊन आपला परिचय देईल..बर सांगा मग तुमचा परिचय..
सर्व मुलं एकमेकांकडे पाहू लागले पण कुणीही जागेवरून उभे राहून बोलत नव्हतं, शेवटी सर म्हणाले, " ज्यांनी मला उभा राहून प्रश्न केला तोच आज आपला पहिला परिचय देईल." तो मुलगा लगेच उभा झाला आणि आपलं नाव सांगितलं..

" माय नाव कैलू गणपत पेंदाम आणि पटकन तो खाली बसला."

सरांनी पुन्हा त्याला उभे केले आणि म्हणाले,

अरे बाबा, " मायं नाही माझं म्हणायचं, आता आपण शाळेत शिकतो आहे न मग आजपासून माझं म्हणायचं मग आता परत तुझं नाव अगदी व्यवस्थित सांग बघू????? आणि तुझं नाव कैलू नसेल तर कैलास असेल.!!!!!"

आता मात्र त्या मुलाने आपलं नाव व्यवस्थित सांगितलं. आता एक मुलगा उभा झाला त्याने आपलं नाव सांगितलं, शंकर दिनकर कांबळे.

त्यानंतर सरांनी पुन्हा त्याला एक प्रश्न केला,

" की तुला कश्यात आवड आहे,
???? तुला काय काय आवडते ???खेळ कोणता आवडतो???? सांग बघू ."

त्या मुलाने तुटक - तुटक " मला खेळायला आवडते, कुस्ती खेळायला आवडते." सर्व मात्र आता हसू लागले...

आता सरांनी आपला मोर्चा मुलीकडे वळवला..

एक मुलगी उभी झाली, " तिचा रंग सावळा होता, केस गुंडाळलेले होते, निळा फ्रॉक पायापर्यंत आणि त्याच्या आत एक पांढर शर्ट घातलं होतं.

सरांनी तिला प्रश्न केला, " तुझं नाव काय आहे गं मुली??? "

असा प्रश्न विचारताच तिने रडायला सुरुवात केली, काही केल्या तिचं रडणं थांबत नव्हतं,!!!!

सर म्हणाले , " अगं , मी तुला फक्त तुझं नाव विचारलं!!! मग यांत घाबरण्यासारखं काहीच नाही न!!!!
बघ बरं, मुलांनी कशी छान छान उत्तरे दिलीत!!!"

पण ती काही केल्या शांत झाली नाही. शेवटी सरांनी तिला एक लेखन दिली तेव्हा कुठे ती शांत झाली. एक - एक सर्वांनी उत्तरे दिली.

एका मुलीला उभे केल्यावर तिने आपलं नाव चंद्रकला गुणाजी पेरकुंडे सांगितले.

सरांनी पुन्हा एक प्रश्न विचारला ,

" तुला काय - काय आवडते???"

तिने लाजत - लाजत बहुधा मनात विचार अगोदरचं केला असावा,
" मला विहिरीचं पाणी भरायला आवडते,असं सांगितलं, "
पुन्हा एकदा सर्व मुलांनी हसण्यास सुरुवात केली.

बिचारी चंद्रकला लाजेने मान खालून बसून गेली.. कुणी तुकाराम, कुणी सखुबाई, कुणी पुंजाबाई, कुणी सुनंदा ,तर कुणी महादेव,भीमा, रामदास, कुणी अंकुश,अशी सर्वांनी नावे सांगितली. तर कुणी मला गिल्ली - दांडू खेळण्यात आवड आहे, तर कुणी लंगडी, तर कुणी रगोरी , कुणी टिप्पर ( कवेलू पासून तयार केलेली आणि पायांनी सरकवायची ) खेळण्यास आवडते असं सांगितले.

एक - एक सर्वांनी नावे सांगून झाल्यावर शेवटी मी बसल्यावर माझा नाव सांगण्याचा नंबर आला होता. मी भीत भीत उभा राहिलो. हात पाय थरथरत होते, तरी कसा तरी उभा राहिलो, आणि माझं नाव मी सांगु लागलो, अमर महादेव अवथरे . मी अगदी दबक्या आवाजात उत्तर दिलं. " आता मला वाटलं सर नेहमी सारखे जसे इतर मुलांना प्रश्न केले की तुला आवड कश्यात आहे, तुला कोणता खेळ आवडतो वैगरे त्या प्रश्नांची उत्तरं मी मनातल्या मनात शोधून ठेवली होती. म्हटलं सरांनी प्रश्न विचारला की लगेच आपण उत्तर द्यायचं की ,
" मी माझी बहिण चित्राला दिवसभर सांभाळत असायचो , तिच्या सोबत खेळणं आवडते, इत्यादी उत्तर मी देणार होतो ."

हे उत्तर दिल्यावर सर्व मुलं माझ्याकडे पाहून नक्कीच हसतील, पण मी माझं उत्तर तेच देण्याचा निर्णय घेतला होता. कारण आतापर्यंत कोणता खेळ मी खळलो नाही मग उत्तर तरी कोणतं देणार , खेळाचं नाव सांगून मोकळं होता येत होतं पण जर सरांनी त्या खेळाविषयी अधिक ची माहिती विचारल्यास मग पंचाईत येणार म्हणून जे विचार केला तेच उत्तर आपण द्यायचं, अश्या विचारात असतांना,

सरांनी एक भलताच प्रश्न विचारला, तो म्हणजे असा की
" तुझ्या या अमर नावाचा अर्थ तुला माहिती आहे का???"

आता मात्र मी गोंधळात पडलो, ज्याचं उत्तर तयार केलं तो प्रश्न सरांनी न विचारता एक वेगळाच प्रश्न विचारला. आता मी माझ्या नावाचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करू लागलो, आठवू लागलो. ते एकदा बाबांनी मला कथा सांगताना मी सहजच त्या कथेमध्ये अमर ,हुतात्मा हे शब्द आले होते. तेव्हा मी त्याचा अर्थ माझ्या बाबांना विचारला होता.

ती कथा अशी होती की, " आपला भारत देश पूर्वी सोन्याची खाण म्हणून ओळखला जात असायचा. या देशात सगळीकडे समृद्धी, सौख्य नांदत होते. पण याच देशावर काही बाहेरून आलेल्या गोऱ्या लोकांची नजर पडली. हे गोरे लोक बुद्धीने हुशार होते, इथल्या भोळ्या जनतेला वेगवेगळी प्रलोभने देऊन या गोऱ्या लोकांनी इथे व्यापार करण्यास सुरुवात केली. पण खरी त्यांची नजर ती इथल्या संपत्ती वर होती. इथल्या जनतेत शिक्षणाचा अभाव, एका विशिष्ठ वर्गाकडे शिकण्याची जबाबदारी, जाती - धर्मात भेदभाव, असल्याने त्यांनी आपली सत्ता, हुकूमत या भोळ्या जनतेवर लादण्याचा प्रयत्न केला आणि संम्पूर्ण भारताला त्यांनी गुलाम बनविले. जेव्हा हा अन्याय दिवसागणिक वाढत गेला, त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी काही तरुण युवकांनी विरोध केला, ज्यामध्ये सुखदेव, भगतसिंग, राजगुरू, मंगल पांडे, खुदिराम बोस, सावरकर बंधू, यांनी हा विरोध केल्याने फासावर लटकविण्यात आले. त्यांनी आपल्या प्राणाचे बलिदान हा देश स्वातंत्र्य होण्यासाठी दिले. ते अमर झाले, ते हुतात्मा झाले. त्यानंतर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, सरदार पटेल, पंडित नेहरू, यांनी या परकीय राजवटीतून बाहेर काढण्यास मदत केली, आणि आपल्या देश्याला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्यामुळे जेवढे या स्वतंत्र युद्धात सहभागी झाले , तेवढे इथे अमर झाले."

तेव्हा अमर या शब्दाचा अर्थ असा की जो कधीही मरत नाही तो अमर ,जो नेहमी लोकांच्या आठवणीत राहतो,
असा अर्थ बाबांनी मला तेव्हा सांगितला होता. शेवटी मी सरांनी विचारलेल्या प्रश्नांच उत्तर सांगितले की, अमर म्हणजे जो कधीही मरत नाही तो अमर,जो सर्वांच्या आठवणी तो मेल्यावर ही त्याच्या कार्याने सदा जिवंत राहतो तो अमर..

सगळे विद्यार्थी माझ्या बोलण्याकडे पाहत होते. सरांनी जवळ येऊन माझी पाठ थोपटली ,आणि माझ्यासाठी टाळ्या वाजविण्यास सांगितले. त्या दिवशी सर म्हणाले, " खूप छान "!!! आणि योग्य असं उत्तर दिलं बघ तू अमर."
" मग त्या आपल्या नावानुसार वागण्याचा आणि बनण्याचा प्रयत्न करशीन!!!!!"
सरांचे हे शब्द काही वेळ कानातच घुमत राहिले. तेव्हा पासून मनात एक विचार, संकल्प करून मोठं होण्याचा प्रयत्न केला.वय तरी नऊ वर्षे जवळपास असेल माझं. जरा उशिराच नाव घातलं माझं शाळेत ते यासाठी असावं की बहीण चित्रा लहान होती आई बाबा नेहमी कामावरून उशिरा येत असायचे म्हणून मी चित्राचा सांभाळ करण्यातच मोठा झालो.आता चित्रा आपल्या लहान मुलीसोबत खेळत असायची..

शाळेचा पहिला दिवस संपला. मी घरी आलो. आई - बाबा येण्याची वाट पाहू लागलो. नेहमी ते जवळपास दिवस बुडाला की कामावरून येत असायचे तोपर्यंत मी घरातील दिवा पेटवला. चित्रा बाहेरून खेळून आली,आई बाबाची वाट पाहत ती थकून झोपून गेली. मी आज मात्र खुश होतो, मनातल्या मनात सर्व मुलांनी माझ्यासाठी टाळ्या वाजविल्या, हे सारख आठवत होत आणि मग हळूच एकटाच मी हसत होतो.हा आजचा दिवस आईबाबांना सांगण्यासाठी आतुर झालो होतो,त्यांची येण्याची वाट पाहत बसलो होतो. इतक्यात आई बाबा घरी आले, दोघांनीही येताच हातपाय धुतले व आई आपल्या घरच्या कामावर लागली.

आईने गुळाची काळी चाय केली, तशी घरी नेहमीच काळी चाय बनत असायची दूध कुठून आणणार हा कधी कधी बनत असायची पण गाईच्या नाही तर जेव्हा आमच्या बकऱ्या पिल्लांना जन्म द्यायची तेव्हा बकरीच्या दुधाचा चाय घरी बनत असायचा. कधी ते दूध सुद्धा आई प्यायला द्यायची आणि म्हणत असायची ,
" खूप शक्ती असते या दुधात!!!"
म्हणून मी , चित्रा गट - गट पिऊन घेत असायचो. मला तशी जोराची भूक लागली होती, आईने मला वाटीत चाय दिला आणि बाबांना स्टीलच्या ग्लास मध्ये चाय दिला, जो पूर्णत: काळाकुट्ट झाला होता, व आईने चाय घेतला.एक एक घोट घेत नाही तितक्यात चित्रा रडत रडत आई ----आई करत जागी झाली, " मला भूक लागली म्हणून रडू लागली,"!!! तेव्हा मी तिला जवळ घेतलं,
सकाळची बनवलेली कडक आलेली भाकरी होती तिला चाय मध्ये बुडवून दोघांनीही ती खाल्ली. तसं ही मला नेहमी चाय आणि भाकर आवडत असायची. तोच आमचा सकाळचा,संध्याकाळचा नाश्ता असायचा.

आज मुलांना दूध, ब्रेड,बिस्किटं मिळत असतात पण आम्हाला भाकरीवर चं राहावं लागतं असे.चाय पिऊन संपला. आईने ती चाय ची भांडे एकत्र केली, इतक्यात आईच्या मैत्रिणीनी में ~~~में करत तिला आवाज दिला. अहो एवढा विचार नका करू तिच्या मैत्रिणी म्हणजे आमच्या झिंगरी आणि बिजली.त्यांनी हंबरडा फोडला. आई आल्यावर त्यांची ही नेहमीची सवय होती. त्यांना माहिती होत असायचं की आईने आपल्यासाठी चारा आणला असणार या आशेने त्या नेहमी में मे करत असायच्या.आई त्यांचं हंबरण समजून गेली,लगेच तिने वावरातून आणलेला चारा बकऱ्यांना टाकला आणि मायेनी पाठीवरून हात फिरवला. तेव्हा कुठे त्या शांत झाल्या.बाबांनी आपल्या जागेवरच भिंतीचा आधार घेतला आणि आपलं शरीर सैल सोडून दिलं. आई परत स्वयंपाक करण्यात गुंग झाली. चित्रासुद्धा आईला थोडी मदत करत होती मदत कसली हो ती फक्त खेळ करत होती. पिठाचा गोळा घेऊन उगाच भाकरी थापल्यागत करत होती. पण तिच्या भाकरी काही गोलाकार होत नव्हत्या म्हणून ती परत परत मोडून भाकरी थापत असायची, थापलेली भाकर आईला दाखवत होती आणि जमली का म्हणून विचारत होती. स्वयंपाक होईपर्यंत तिची एक भाकर तयार होत नसायची. मी आपला बसलो होतो चित्राची मजा पाहत. विचार करत होतो की आई किव्हा बाबा आजचा शाळेचा पहिला दिवस कसा गेला म्हणून विचारतील, पण कुणी काही विचारेंना.

शेवटी आईने भाकरी थापत थापत प्रश्न केलाच, दोघेही शिक्षणाविषयी अनभिज्ञ होते म्हणजे त्यांना लिहीन वाचन काही जमत नव्हतं. कधी त्यांना शाळेत जायचा योग आला नसावा वा तेव्हां आपल्या मुलांना शिकवून काय करायचं,शेवटी कामालाचं जावं लागेल म्हणून ते अशिक्षित राहिले.पण त्यांनी आपल्या मुलाला शाळेत टाकलं याचं मनोमन आनंद होत असे.

" अमर मग आज शाळेत काय झालं?????मज्जा आली की नाही शाळेत,??? असा प्रश्न आईने केला.

आता मी ही त्याचीच वाट पाहत बसलो होतो की हे कधी विचारतील आणि मी कधी सांगेल,

मी म्हणालो,
" आई आजचा शाळेचा पहिला दिवस खूप आनंदात गेला. पहिल्या दिवशी आमच्या सरांनी आमचा परिचय करून घेतला, एका मुलीला उभं केलं पण ती रडायला लागली, काही केल्या तिचं रडणं थांबत नव्हतं मग सरांनी एक तिला लेखन दिली तेव्हा कुठे तीच रडणं थांबलं, यावर आई बाबा हसू लागले...

" अरे अमर तुझं वैगरे सांगणार आहे की नाही????, की दुसऱ्यांचचं सांगणार आहे!!!!!

अगं आई , " थांब सांगतो ना,""

मी माझं नाव सांगितलं, " अमर महादेव अवथरे "

तेव्हां सरांनी पुन्हा एक प्रश्न विचारला की,
" अमर या नावाचा अर्थ तुला माहिती आहे का???"

मग मी बाबानी सांगितलेल्या कथेवरून उत्तर सांगितलं तर सरांनी माझ्यासाठी टाळ्या वाजवायला लावल्या, सर्व मुलांनी माझ्यासाठी टाळ्या वाजवल्या..

तेवढ्यात आईने पटकन जवळ घेऊन गालाचा मुका घेतला,
”माझं बाळ,मोठं गुणांच पोर ग बाई,!! "
असं म्हणाली.
रात्री जेवणात आईने आज भाकर आणि फुगवलेल्या तुरीची भाजी ज्याला आम्ही घुगऱ्या म्हणत असायचो त्या केल्या होत्या. जेवण झाल्याबरोबर शरीर जमिनीवर टाकता न टाकता कधी झोप लागली कळलंच नाही. सकाळ उजाडली, आई आपल्या कामाला लागली, बाबा पण वावरात कामावर जाण्याच्या तयारीत होते, मी ही शाळेची तयारी केली आणि शाळेत जाऊ लागलो, एकामागून एक दिवस भरभर निघून जात होते.

जुलै चा महिना असल्याने शेतातील सर्व कामे आता आटोपली होती. नांगरणी, वखरणी, काडी कचरा वेचून झाला होता. शेतकरी फक्त आता पाऊस येण्याची वाट पाहत बसले होते, पाऊस आला रे आला की जमिनीत बियाणे टाकायची एवढंच बाकी होतं. सर्वांनी धान्य, बियाणे अगोदरचं खरेदी केली होती. ढगाळ वातावरण असल्याने पाऊस कधीही येण्याची शक्यता होती, पण पाऊस थोडा नेहमी प्रमाणे हुलकावणी देत होता. पाऊस येण्यापूर्वी घरात पाणी गळू नये म्हणून माणसे घरावरील कौलारू बरोबर फेरत होती, फुटला असल्यास नवीन बसवत होती, कुणी एक जळणासाठी लाकूड आपल्या सुरक्षित जागी ठेवत होती, कुणी आपल्या वासरांसाठी चारा घेऊन येत होती, सर्व गावकरी अगदी काटेकोर तयारीनिशी बसले होते.
मी शाळेत आलो,प्रार्थना झाली,सरांनी शिकविण्यास सुरुवात केली , शाळेचे एक दोन तास उलटले असणार तेच अचानक वारा वाहू लागला, काळे ढग तयार झाले, ते हवेबरोबर इकडून तिकडे धावत होते, पाऊस येणार हे नक्की झालं होतं. तोच पावसाने लगेच आपली हजेरी लावली. सर्वत्र पाऊस सुरू झाला, आम्ही सर्व विद्यार्थी शाळेच्या आवारातच उभे होतो. काही विद्यार्थी पळत पळत घरी गेले, मात्र आम्ही काही मित्र पाऊस पाहत बसलो होतो. तो पहिलाच पाऊस होता, जिकडे तिकडे मातीचा सुगंध दरवळत पसरला. पाऊस आता एकसारखा बरसत होता.शाळा काही पक्की इमारत,पक्की बांधलेली नसल्याने, तसेंच त्यावरील काही कौलारु फुटून असल्याने त्या कवेलूमधून पावसाच्या धारा लागल्या होत्या.सर्वत्र ढगाळ असणार वातावरण काळ्याकुट्ट ढगामुळे अधिकच ढगाळ झालं. त्यामुळे भर दुपारीच सायंकाळ झाली की काय वाटत होतं.

शाळेच्या आवारात सगळीकडे पाणी आणि चिखल तयार झाला. काही विद्यार्थी घरी जाण्यासाठी कुरकुर करीत बसले होते, तर काही त्या पावसाचा आनंद लुटत होते, काही मात्र रडत होते, सर त्यांना समजावून सांगत होते की ,
" अरे रडू नका, पाऊस कमी झाला की शाळेला आज सुट्टी होईल, पण पाऊस जाईपर्यंत तुम्ही इथेच थांबा!!!

आता जर घरी गेले तर तुम्ही ओले व्हाल,आणि सोबत तुमचा थैला ,आणि त्यात असणारी पुस्तकं सुद्धा ओली होईल,
म्हणून बाबांनो तुम्ही इथेच थांबा, "असे सर मुलांना समजावून सांगत होते.

माझी काही विद्यार्थ्यांसोबत आता मैत्री झाली होती. ज्यात कैलू, नारायण, रमेश, यांच्याशी चांगलीच मैत्री झाली होती. त्यापैकी कैलू हा एक खोडकर विद्यार्थी, बाकी पण होते पण कैलू एवढे नव्हतेच.आम्ही पाऊस जाण्याची वाट पाहत बसलो होतो,एकदाचा पाऊस थोडा वेळ शांत झाला,आता फक्त थेंब - थेंब पाऊस पडत होता, त्यामुळे आता घरी जाण्यास हरकत नव्हती, सरांनी सर्वांना आज सुट्टी दिली.

आम्ही सर्व घराच्या दिशेनी निघालो . पाऊस आता पूर्णतः थांबला होता,जिकडे तिकडे ते काळेभोर असणार आकाश लालसर झालं, तितक्यात आकाशात इंद्रदेवाने म्हणजे इंद्रधनुष्य ने आपली हजेरी लावली. त्याचे ते विविधांगी रंग पाहण्यात काही वेळ निघून गेला. त्या इंद्रधनुष्य कडे पाहून मनात विचार येत असे की हा नेमका निर्माण तरी कसा झाला असावा???? मग आपला एक विचार असा की सूर्याने ढगांमध्ये बाण मारला त्यामुळे हा पाऊस पडला, आणि आता ढग विरून गेल्यामुळे फक्त आता तो इंद्रधनुष्य म्हणजे धनुष्य उरला असावा, व तो आपले विविध रंग टाकून हे आकाश सुद्धा आपल्या रंगासारखे बनवू पाहत असावा.....


क्रमशः .....