सुट्टीच्या दिवसात मग नेमकं काय करायचं त्यात काही गावातील मित्र मला चिडवत असायचे. त्यातील रमेश, बाबाराव यांच्याशी चांगलीच गट्टी असल्याने ते नेहमी म्हणायचे , " अमर आता शहरात जाऊन मोठा साहेब होईल. मोठं घर बनवणार. नवीन - नवीन कपडे घालणार, अशा गोष्टी करून मला चीडवत असायचे . पण मला त्यांचा स्वभाव माहिती होता. ते नेहमी गंमत करत असायचे.
घरच्या बकऱ्या झिंगरी,बिजली आता म्हाताऱ्या झाल्या होत्या. त्यांच्यापासून बराचं मोठा वृक्ष तयार झालेला होता. तिचा पिल्लांपासून बरेचदा आम्हांला आर्थिक मदतही झाली होती . मी सुट्टीच्या दिवसांत बकऱ्या चारावयास रानात घेऊन जात असायचो. इकडे- तिकडे हिंडायचं. मध्येच मोहोळ दिसले की, ती उडवून त्यावर ताव मारायचो. बाबाराव च्या घरी मासे पकडायचा व्यवसाय असल्याने, मासे पकडण्याची कला त्याला थोडी थोडी अवगत होती. मग बकऱ्या पाण्यावर गेल्यानंतर मासे, खेकडे, पकडण्याचा आमचा खेळ रंगत असायचा. मग ते कधी - कधी घरी आणायचं नाही तर तिथेचं भाजून खायचो.
आई-बाबा नेहमीचं पाटलाकडे वावरात कामाला असायचे. काम करून घरी यायचं , मग घरी आल्यानंतर गरमागरम चहा पिऊन बाबा भिंतीला टेकून बसायचे . टेकून बसता बसता झोपेची डुलकी सुद्धा घेत असायचे.कामाने शरीर पूर्ण थकून गेलेलं असायचं. आई आपली आल्या आल्या स्वयंपाक करण्यात गुंतून जायची. गावात काही मोजक्याचं लोकांकडे वर्तमानपत्र येत असायचे. त्यात सुधाकर पाटील, देशमुख पाटील , कुलकर्णी यांचा वाडा आणि काही शिक्षक , त्यांच्याकडे वर्तमानपत्रे येत असतं. चालू असलेल्या घडामोडी वर्तमानपत्रातून समजत असे. बाबा पाटलाकडे कामाला असायचे , त्यामुळे मी तिथे नेहमी पाटलांचा पेपर वाचून झाला की, ते बाहेर पेपर ठेवत असायचे. मग तो पेपर मी वाचून काढत असे. एवढी धडपड यांसाठी होती की, निकाल लागण्याची तारीख जवळ येत होती आणि कधीही निकाल लागू शकत होता. निकाल वर्तमानपत्रांमध्ये येत असल्याने मी पेपर चाळत बसायचो.
तो गोरा चेहरा, सडपातळ काया, कमरेपर्यंत केस , सरळ नाक, कानात डौलदार झुमके, केसाची वेणी केलेली आणि कुणाच्याही नजरेत भरावी अशी, ती पाटलांकडे दिसली . पाहुणे आले असावे बहुतेक . असो पण, तिला पाहून मनाला फार बरं वाटलं. असाच विषय मी मित्रांकडे काढला असता, तेव्हा त्यांनी मला सांगितले आहे ती लक्ष्मी आहे, पाटलांची लेक. म्हणे जिल्याच्या ठिकाणी शिकते. ती पण तर मॅट्रिकला होती रे . तेव्हा कुठे मला लहानपणी शाळेत असलेली ती लक्ष्मी आठवली. केवढी मोठी झाली ना ती आता!!!!टप्पोरे डोळे , नजरेत भरावा असाचं बांधा, सांगता सांगता मित्र मात्र मलाच चिडवायला लागले.
अरे अमर , " कसा आहेस तू ????"
मागून मला आवाज आला . मी नुकताच पेपर चाळत बसलो होतो . तेवढ्यातच लक्ष्मीने मला आवाज दिला. बरेचदा अशी नजर भेट झाली होती , परंतु मी तिच्याशी बोलण्याचं धाडस केलं नाही .
" लक्ष्मी तू आहेस !!!!
मला वाटलं नाही ते तू असणार म्हणून ?????"
" नाही म्हणजे कधी बोललीस नाही तू, म्हणून म्हटलं कुणी तरी दुसरंच असावं. "
' बरं मी ठीक आहे '!!!!
" तू कशी आहेस ??????आणि पेपर कसे गेलेत तुझे???????
तोच तर विचार नेहमी डोक्यात चालू असतो की ,
" कसा निकाल लागेल ??????"
भान हरपत गेल्यासारखी लक्ष्मी बोलून गेली.
" छानचं लागेल बुवा तुझा निकाल ......
" हुशार आहेस तू !!!!
शाळेत होतो तेव्हाही तुला मी अभ्यासात मागे टाकू शकलो नाही, छान लागेल तुझा निकाल ...."
एवढे बोलून मी चालता झालो. कुणाला दिसल्यास अडचण होऊ नये म्हणून मी माझी सुटका करून घेतली होती. तशी नजरभेट कधी, बोलणं , कुणी नसल्यावर होत असायचं. पण का कुणास ठाऊक????? पण लक्ष्मी नजरेआड होताचं तिचा चेहरा तासन तास डोळ्यांसमोरून जात नसे. तो तिचा सहवास हवाहवासा वाटत होता . कदाचित यालाच प्रेम म्हणायचं का ??????? मग दुसरं माझं मन म्हणत असायचं...
" आपण कसला विचार करतो आहे????? "
लक्ष्मी मैत्रीच्या नात्याने बोलत असणार आणि आपल्या मनात असा विचार येतो हे , चुकीचं आहे . ती पाटलाची पोर. मी महाराच्या घरी जन्म घेतला. ती वाड्यात राहते . तू मोडक्या तोडक्या घरांत. तिची जात वरची आणि आपण खालच्या समजल्या जाणाऱ्या जातींचे. त्यामुळे मनातील विचार बाजूला ठेव, असं वेळीचं माझचं मन मला समजावून सांगायचं.
एकदाचा दहावीचा निकाल लागला. बऱ्यापैकी मला ६४ टक्के मिळाले होते. शाळेत मी दुसऱ्या क्रमांकाने पास झालो. इथेही पहिला येण्यात कमीच पडलो. मी चांगल्या टक्क्याने पास झालो म्हणून आईबाबांना खूप आनंद झाला होता. गावातील काही लोकंही माझं कौतुक करत असल्याने मलाही आणि घरच्यांना ही बरं वाटतं असायचं. लक्ष्मीला ७० टक्के मिळाले होते. तिने आताही बाजी मारलीचं होती. आनंद सुद्धा चांगल्या टक्क्यांनी पास झाला होता. शेवटी अकरावी प्रवेश करण्याची तयारी करू लागलो व आता आपल्याला कॉलेजमध्ये प्रवेश मिळेल अशी स्वप्नं रंगवू लागलो. पुन्हा तेच मला आई बाबांना सोडून बाहेरगावी शिकायला जावं लागणार होतं. शेवटी मी आणि आनंदने एकाच महाविद्यालयात प्रवेश घेतला. परत नवीन वसतिगृहात दोघांनाही प्रवेश मिळाला.
जिल्ह्यातील हे वसतिगृह जुन्या बोर्डिंग पेक्षा मोठे होते. एका खोलीत सहा साथ विध्यार्थी राहतील अशी सोय होती. जेवण पोट भरेल असं मिळत असायचं. याचं वसतिगृहात नवीन मित्रांची ओळख झाली. आम्हीं नियमित कॉलेज करू लागलो. कॉलेजच्या व्यतिरिक्त काही अवांतर वाचनाची पुस्तके चाळू लागलो . नवीन शहर, नवीन लोकं ,नवीन नवीन सूट बूट घातलेली, चांगली शर्ट घातलेली साहेब इथे दिसत असायचे. त्यामुळे माझं मन मात्र आपल्याकडे कधी असणाऱ या गोष्टी म्हणून आंतल्या आत झुरत असायचं. " आपण कोणते पाप केलले असणारं !!!!" असे निरनिराळे विचार मनात येत असायचे.
मी आपल्या खोलीमध्यें वाचत बसलो होतो. तेवढ्यात एक विध्यार्थी,
" अमर, तुला वार्डन सरांनी त्यांच्या कार्यालयात भेटायला सांगीतले !!!"
हे शब्द ऐकताचं माझ्या सर्व अंगावर काटा आला . एक भीतीयुक्त धडधड निर्माण झाली. श्वास वेगाने वाहू लागले. ज्याप्रमाणे हरिण आपल्याला वाघ मारणार म्हणून अंगात जेवढी ताकद असते तेवढ्या ताकदीने ते हरिण वाघाच्या तावडीतून सुटून आपला जीव वाचविण्यात यशस्वी होते, तेव्हा हरणाच्या ह्रदयात जेवढी मरणाच्या दाढेतून वाचलो म्हणून जी धडधड असते , तशीच भीतीयुक्त धडधड वाढली होती. मी आपला चुपचाप खाली मान घालून सरांच्या कार्यालयकडे गेलो .
" मी आंत येऊ , सर ?????"
हो , ये !!!!! सरांनी आंत बोलवलं.
" तूच का अमर अवथरे?????"
आता मात्र सरांनी थोड्या मोठ्या आवाजात म्हणाले.
हो सर , मीच अमर !!!!
मी आपला मान खाली घालुन उत्तर देत होतो.
" तुला काही त्रास आहे का या वसतिगृहात????
वसतिगृहात राहणाऱ्या मुलांपासून ?????"
सर आता रागीट चेहरा करून बोलत होते.
मी म्हणालो , " नाही सर !!!"
" मग नेतेगिरी जरा बंद करा !!!"
" शिकण्यासाठी आलो , शिक्षण घ्या !!!!! उगाचं नेतेगिरी , जातिवाद करत बसू नको!!!!
सर संतापाने बोलत होते .
" सर , माझी चूक तरी काय ????? मी नेमकं केलं तरी काय?????
माझ्या डोळ्यांत आता अश्रू आले होते ,ते निघणार होते पण त्यांना डोळ्यांतचं साठवून ठेवले..
" ज्या कामांसाठी आलो , तेच करा !!!! नाहीतर वसतिगृहातूंन बाहेर काढण्यात येईल!!!!"
सर बोलत होते .
" मी सॉरी सर !!!!
म्हणत आपल्या खोलीवर येऊन रडू लागलो. प्रवेश जर नाकारला तर माझं काय होईल???? या विचारांनीच पुर्ण अंग गरम झालं होतं. डोकं दुखायला लागलं होतं , पण सरांनी मला बोलू दिले नाही !!! माझं ऐकून घेतले नाही !!!! शेवटी ते सर , आपण कुणी नाही म्हणून आपल्यालाचं शांत बसावं लागलं.
ते झालं असं की , माझ्या शेजारी रूम मधले मुलं , नेहमी आवाज करायचे. ते आपल्या रूममध्ये सिगरेट, बिड्या ओढत असायचे. मी बरेचदा माझ्या डोळ्यांनी बघितलं . मी आणि आनंद ने त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. त्यात काही आमच्यापेक्षा मोठे तर काही आमच्यापेक्षा लहान होते. आमचं म्हणणं हे होतं की आवाज करू नका????? या सिगरेट ,बिड्या आणि तुमच्या आवाजाचा आम्हांला त्रास होतो. पण ते कधी ऐकत नसायचे. सरांना सांगतो म्हटले की , ते उलट आम्हांला शिव्या देत असायचे. म्हणायचे आम्हांला,
" माजलेत काय रे तुम्ही महारांनो !!!!!!"
आया बहिणीवरून शिव्या घालायचे. कदाचित त्यांनी माझ्याशी बदला म्हणून सरांना माझ्याविषयी काही वेगळंच बनवून सांगितलं असणार, त्यामुळे सर माझ्यावर रागावले . जातीने मात्र येथेसुद्धा पाठ सोडली नाही. असेचं जातिवाचक शब्द, कधी शिव्या, तर कधी मारण्याच्या धमक्या हे नित्याचंच झालं होतं . आनंद नेहमी मला म्हणतं असायचा ,
सोडून दे रे त्यांना !!!! ते असतील मोठ्या घरची मुलं. आपली परिस्थिती बघ !!! आपण कशासाठी आलो याकडे लक्ष दे !!!! तेव्हा कुठे मी तो विषय सोडून देत असायचो.
पाहता-पाहता आमची दोन वर्षे कशी गेली आम्हांला कळले नाही . एवढ्याचं शिक्षणावर आपणाला थांबून जमणार नाही , यापुढे आपल्याला शिक्षण घ्यायचे आहे अशी मी आणि आनंदने मनाशी खूणगाठ बांधली होती. चांगले टक्के मिळाले असल्याने आई-बाबांनाही काही खोलीसाठी पैसे पाठवावे लागत नव्हते. वसतिगृह मिळणारचं एवढं पक्के असायचं. त्यामुळे पुढील शिक्षण घ्यायचं, एवढेचं ध्येय मनात ठेवून शिक्षण घ्यायचं चाललं होतं. तेव्हाच आपल्याला मोठे होता येईल, नोकरी लागेल, आपल्या शिक्षणाचा काही उपयोग समाजासाठी होईल असे मनोमन वाटत असायचं.
क्रमशः ......