श्वास असेपर्यंत - भाग ९ Suraj Kamble द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

श्वास असेपर्यंत - भाग ९

अरे अमर, " आता नोकरी लागेल ना रे तुला ????" असा खोचक सवाल आईने मला विचारला.

" का गं आई,मला अशी का विचारणा करत आहे???
पुन्हा शिक्षण घ्यायचं म्हणतो मी. शिक्षण झाले की लागेलचं नोकरी !!!! मग तेच नोकरी करणार, आणि तुमचा सांभाळ....
एवढं तर काम आहे माझ्याकडे.

तसं नाही रे , " बघ ना, बाबांच्या पायाला जखम झाली!!! शेतात आता त्यांना जास्त काम होत नाही, चालताना त्रास होतो . बरेचं दिवस झाले हा त्रास होत आहे , पण काही आराम अजून त्यांना झालेला नाही...

बाबा आणि मी सुद्धा थकली आहे , त्यामुळे तू दोन पैसे कमवून आणावे व आपलं शिक्षण सुद्धा सुरू ठेवावं...."
असं मी म्हणत होते, आई नम्रपणे बोलून गेली.

एव्हाना शिक्षण आपल्या समाजातील मुलांनी घेतलं पाहिजे, तरचं आपला विकास होईल, आपली परिस्थिती सुधारेल , या विचाराने प्रेरित झालेली माझी अशिक्षित आई मला आज अशी म्हणत आहे ...

" बघा तिला आपल्या नवऱ्याचे दुःख पाहवल्या जात नसावे,!!!" म्हणून मला हे म्हणत आहे. म्हणुन मी वाद नको होण्यापेक्षा, ' मी म्हटलं ठीक आहे , करेल मी जे काम मिळेल ते '.

हे शब्द माझ्या बाबांनी ऐकले. बाबा म्हणाले, " तुला काही एक काम करण्याची गरज नाही !!! तुझा बाप अजून जिवंत आहे . तो अजून पर्यंत मेलेला नाही. शरीरात जेवढी रग आहे, तोपर्यंत मी काम करणार आहे पण तू आपलं शिक्षण सोडायचं नाही "

कदाचित यालाच बापाचं प्रेम म्हणत असावं का?????पायाची जखम एवढे इलाज करून बसली नाही,चालतांना त्रास होत आहे तरीही हा बाप काम करेल पण तू शिक्षण थांबवु नको म्हणत आहे. माझ्या बाबांची अपेक्षा सतत मी शिक्षण घ्यायची होती. परत आईने मला या विषयावर कधी नंतर म्हटलं असेल काही आठवत नाही.

जिल्याच्या ठिकाणी बी.ए. साठी प्रवेश घेतला. प्रवेश घेतला ते महाविद्यालय बरंच मोठं होतं. महाविद्यालयाच्या खोल्या, महाविद्यालयाचे शिक्षक - प्राचार्य, परिसर, विविध झाडे लावलेली,मग त्यात अशोका,गुलमोहर,कडुनिंब,काही मोगरा,गुलाब,काही शोभेची झाडे लावण्यात आली होती. नियमित तासिका होत असत. आनंद ,मी, व या पदवी अभ्यासक्रमात काही मित्रांची ओळख झाली होती, असा आमचा तीन - चार लोकांचा ग्रुप तयार झाला होता. आतापर्यंतच्या अभ्यासात आणि पदवी परीक्षेच्या अभ्यासात बराच फरक जाणवत होता. जेवढं विचारलं तेवढंच लिहायचं आणि उत्तराची लांबी ही प्रश्नाच्या गुणांनुसार असायची . आता मात्र पाठांतर करणे आणि तेच लिहिणे हे पदवी परीक्षेत कठीण होते. फक्त वाचत बसायचं, वाचन करतांना विविध विषयाच्या नोट्स लिहून ठेवायचो ,अवांतर वाचनाची आवड लागली होती . राज्यशास्त्र ,इतिहास ,अर्थशास्त्र विषय असल्याने विविध घडामोडी, अर्थ विषयक घडामोडी, जगातील विविध क्रांती ,मार्क्‍सवादी,लेनिन विचारसरणी, प्लूटो,सॉक्रेटिस,अरिस्टेटल इत्यादी विचारवंत वाचण्यात लक्ष देऊ लागलो.

जसं वाचन वाढत गेले , तसतशी ज्ञानात भर पडून विचार प्रगल्भ होऊ लागले .महाविद्यालया मधल्या चर्चासत्रामध्ये भाग घेऊ लागलो, वादविवाद स्पर्धा, सामाजिक कार्यक्रमात, सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेणे इत्यादी नित्याचे काम झाले होते. दिवस कसे भराभर निघून जात होते , काही कळतचं नव्हते. वसतिगृह आता आपलं घरचं वाटू लागल्याने घरी थोडे दिवस थांबलो की , परत वसतिगृहाची ओढ लागलेली असायची. मैत्रीत दिवस निघत असायचे, मग कधी मित्राने सिनेमाला म्हटलं की, असले पैसे तर जायचं नसल्यावर पण शहरी मित्र असल्याने ते मला आणि आनंदाला ऍडजेस्ट करून घेत असायचे . याचं वाचनाच्या सवयीमुळे काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न करू लागलो. काही तरी लिहिले की परत परत वाचून काढत असायचो, नाही जमलं ,काही चुका वाटत असल्यास परत फाडून दुसरं लिहिण्याचा प्रयत्न करू लागलो. कविता- लेख लिखाणाचे वेडच लागले होते. कधी मग महाविद्यालयात काव्य वाचनात सहभागी होत असायचो.

महाविद्यालयाला सुट्टी असल्याने मी आणि आनंद दोघांनी आनंदच्या गावी जाण्याचे ठरवले. बरेच दिवस झाले होते, आम्ही गावाला गेलो नव्हतो. या शहरी दुनियेत जरा जास्तचं रमलो होतो . नवीन _ नवीन मित्र , रस्त्याने जाणाऱ्या गाड्या, इमारती या नजरेत भरत असायच्या आणि त्याच्याच विश्वात रमून जात असायचो. गावाकडे जाण्यासाठी आम्हीं वसतिगृहातुन पैसे घेतले आणि खाजगी बस ने आनंदच्या गावी निघालो . बस एक काही स्टॉप नंतर थांबली. त्यानंतरचा प्रवास आम्हांला पायदळ जावं लागणार होतं बस थांबली. आम्ही उतरलो आणि पायी चालत चालत पोहोचलो . एक आडवाट रस्ता आनंदच्या गावी जात होता. पाहोचता पाहोचता सायंकाळ झाली होती. अंग दुखत होते. पाय पण दुखत होते . एवढे चालून थकलो होतो.

रस्त्याच्या एका कडेला कडुनिंब, काटेरी झाडे , काटेरी सुबाभूळ, कुणाच्या वावराला काटेरी कुंपण लावलेले होते. मी नवीन असल्याने कुत्रे माझ्यावर येऊन भुंकत होती . काही पक्षी आपापल्या घरट्यांकडे परत जातांना दिसत होते . झाडावर बसून कावळ्यांचा काव - काव ऐकू येत होता. रस्त्याच्या लागूनचं लहान मुले हागायला बसलेली होती. जागोजागी रस्त्यावर मनुष्याची विष्ठा ,रांगोळी सारखे ठिपके अशी दिसत होती. काही गावातील बायां आम्हांला पाहून मध्येच उभ्या होत होत्या.मग आम्ही आम्हीं दूरवर गेल्यावर परत आपल्या विधीला बसत होत्या. गावाच्या शेजारी लागूनच आनंदचे घर होते. असा प्रवास करता करता एकदाचं आनंदच्या घरी पोहोचलो . घरांवर फुटकी,काही चांगल्या स्थितीत असलेली कवेलू रचलेली होती.घराला मातीच्या भिंती घातल्या होत्या. कोंबड्या-बकर्यांचा आवाज आजूबाजूला येत होता.आनंदच्या घरी सुद्धा बकरी असल्याने तिच्या पिलांचा आवाज येत होता. घराच्या आजूबाजूला अंधार होता. एखादा किडा कर्रर्रर्रर्र आवाज करून मधून जात होता. एकदाचा आम्ही घरात प्रवेश केला. घरांत दिवा पेटत होता. तोच मिणमिण करणारा दिवा घरभर प्रकाश देत होता. बहुतेक आनंदाची आई आत्ताच कामावरून आली असणार . केस विंचरले नव्हते .साडी वर कमरेत खेचून धरली होती. चाय मांडण्याच्या तयारीत होती. इतक्यात आम्ही आंत गेलो .

यापूर्वी आनंदने माझ्याविषयी त्यांच्या आईला सांगितलं असणार आणि यावेळेस मी आणि आनंद सोबत येणार अशी बऱ्याच दिवसांपूर्वीच कल्पनां घरी दिली असावी. तोच आनंदच्या आईने मला विचारले?????
" तूच का अमर ??????" आमचा आनंदा नेहमी तुझ्याविषयी सांगत असतो . "

" माझा एक अमर नावाचा मित्र आहे . अभ्यासात हुशार आणि दोघे सोबतचं कालेजात असून हॉस्टेल वर सुद्धा एकाचं खोलीत राहत असतो इत्यादी इत्यादी.........."

मी म्हणालो , हो काकू, " मीच तुमच्या आनंदाचा मित्र अमर!!!!."

जा चालून चालून दमले असणार तुम्ही , " पायावर पाणी घाला, बरं वाटेल तेवढंच!!!!!!!!!"

" आमच्या गावात कोणाला ठाव !!!!सरकार कवा रस्ता देते बनवून तर ?????"?
" तुम्ही हात पाय धुवा , मी तुमच्यासाठी चाय करते"

आम्ही लगेच थंड पाण्याने स्वच्छ हात पाय धुतले. चालून खूप थकलो होतो, थंड पाण्याने थोडा थकवा निघून गेल्या सारखा मला वाटत होता. तिकडून खेळून आलेली लहान मुलगी म्हणजे आनंद ची बहिण" दादा~~~~ दादा म्हणतं धावत आली. साधारण दहा वर्षाची असणारं !!!! रूपाने गोरी होती , नाक , डोळे सुंदर वाटत होते . चेहऱ्यावर दादा दिसताचं तिचा आनंद ओसंडुन वाहत होता. अंगात निळ्या रंगाचा फ्रॉक आणि केसांच्या दोन वेण्या घालून होती. येता येताचं तिने दादांचा थैला पाहण्यास सुरुवात केली . तिला माहीत असावं की , दादा गावी आला की नेहमी तिच्यासाठी काही खायला खाऊ आणत असावा. येतांना आम्ही तिच्यासाठी मिठाई घेतली होती. लगेचं तिने खायला सुरुवात केली . आम्हीं चाय पिऊन घराच्या भिंतीला टेकुन बसलो होतो. विचार करता - करता डोळे पाणावून आले . आपली चित्रा असती तर , तिने पण असंच दादा~~~~दादा म्हणून मला हाका मारल्या असत्या. आपण मग तिचा लाड केला असता , तिच्यासाठी शहरातून खाऊ आणला असता , पण नियतीने आपल्याशी असा घात केला की, चित्राला आपल्या पासून कायमचं दूर केलं.

" ये सरस्वते, रांडचे !!! जेवण वाढ मले!!!! "

घरांमध्ये कोण तरी मोठ्या आवाजात आणि डोलत आवाज दिला. तेव्हा मी भानावर आलो.

" आला दारू ढोकसून!!!! "

' दिवस-रात्र काम करते आणि हा मेला लेकाचा, रोज दारू पिऊन तमाशा करते!!!! '
आनंदाची आई सरस्वती बडबड करायला लागली. तो आनंद चा बाप होता . आनंदाचा बाप हमाली काम करत असायचा, त्यामुळे रोज दिवसभर अंगावर ओझे पेलायचा आणि रात्री घरी येतांना त्याचं मिळालेल्या पैश्याची दारू पिऊन घरी तमाशा करत असायचा. आनंदसाठी मात्र हा तमाशा नवीन नव्हता. पण आपला मित्र आल्यावर असा प्रकार होणार नाही अशी त्याची आशा होती .एवढे वर्षे आपण अमर सोबत असतो पण आपला बाप रोज दारू पिऊन तमाशा करतो,आईला कधी कधी मारतो याची कल्पना आनंदने काही दिली नव्हती.

सांगणार तरी कसं !!!!! बाप तो शेवटी जन्मदाता बापचं असतो आणि कसाही असला तरी तो बाप असतो. पण आज आनंद चा चेहरा पार त्या तमाशा मुळे उतरला होता . मी वेळीच ओळखून घेतलं. मीच धीर देत त्याला म्हणालो,

" अ रे आनंद , चालायचं हे सर्व!!!! त्यात तू स्वतःला वाईट वाटून घेऊ नकोस. "
आणि हे मला नवीन नाही. आपल्या समाजासाठी अशा गोष्टी नवीन नाही . खायला अन्न नाही, हाताला काम नाही, कसायला स्वतःची शेती नाही, कुणी कामावर ठेवतात मग कधी , त्याच्यावर चोरीचा आरोप करून त्यांची चामडी सोलून निघे पर्यंत पोलीसांकडून मारले जाते. आपल्याकडे पाहण्याच्या नजरा यांच्या या गुन्हेगारी वृत्तीच्या असतात. आपल्या आया बहिणी कामावर असता ,स्वतःला उच्चभ्रु समजणाऱ्या लोकांकडून त्यांच्या इज्जती लुटल्या जातात,वेळप्रसंगी खून करून पुरावे नष्ट केले जातात,आणि गुन्हा करणारे खुलेआम फिरत असतात आणि मरतात फक्त आपली सामान्य जनता. नेहमी फसवणूक ही आपल्याचं लोकांची केल्या जाते. "

ही परिस्थिती वाईट आहे. त्यात तुझ्या बाबांचा मुळीच दोष नाही .आपण फक्त चाकरीचं करण्यासाठी जन्माला आलो की काय, याचीचं भीती मनात नेहमी वाटत असते . शेवटी आनंदच्या आईने जेवायला वाढले. जेवणात तुरीच्या घुगऱ्या आणि भाकरी थापल्या होत्या. जेवल्या बरोबर आम्ही निवांत पडून कधी झोप लागली आम्हालांचं कळले नाही. काकू मात्र बडबड करत कधी झोपी गेल्या काही कळले नाही.

दुसऱ्या दिवशी झालेल्या प्रकाराबद्दल आनंदच्या बाबाला वाईट वाटत असणार. आम्हीं जात असतांना ते म्हणाले ,

" पोरांनो, " अभ्यास करून नोकरीवर लागा!!!!! परिस्थिती लय खराब आहे. आपल्याला व आपल्या समाजाला यातून तुम्हीच बाहेर काढण्यास मदत करणार आहे. आमचं तर आयुष्यही असंच चमडी सोलण्यात, मेलेली जनावरे खाण्यात, दुसऱ्यांची गुलामी करण्यात गेली. तुमच्यापुढे संपूर्ण आयुष्य पडले आहे . तेव्हा मला जाधव सर आठवले. ते नेहमी अशाच विषयी म्हणतं असायचे. आपल्या समाजाची परिस्थिती खराब आहे ,आपल्याला यातून मार्ग काढायचा असेल तर शिक्षण घ्यावं लागेल."

आनंदाचे बाबा शिक्षित नसून तरी ते,त्याच्या बाबांचे शब्द मनात घर करून गेले .आम्हीं निघतांना मी मात्र आनंदच्या त्या छोट्या बहिणीला खाऊसाठी काही पैसे देऊन, आम्ही दोघांनी वस्तीच्या बाहेरचा रस्ता पकडला. रस्त्याने जातांना मात्र चित्राचा चेहरा आठवून मला गहिवरून येत होतं. आनंदने कदाचित ओळखलं असावं.
तोच मला म्हणाला, अरे अमर, जशी ती माझी बहिण आहे ,तशीच मग ती तुझी पण बहीणच नाही होईल का????? कारण मला माहित आहे, तुला चित्राची आठवण येत असेल. मग माझ्या बहिणीमध्ये तू चित्राला शोध. तेव्हा कुठे मी भानावर आलो.

क्रमशः....