श्वास असेपर्यंत - भाग ३ Suraj Kamble द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

श्वास असेपर्यंत - भाग ३

रस्त्याने आम्ही तीन - चार मित्र चाललो होतो. सर्वांची घरे एकाचं भागाला असल्याने आम्ही सोबत सोबत नेहमी जात असायचो आणि परत सोबतचं येत सुद्धा असायचो.पावसामुळे काही ठिकाणी रस्त्यावर पाणी साचले होते, कुठे जाण्यायेण्यामुळे चिकचिक झाली होती. वावरातून येणाऱ्या मजुरांच्या पायाला वावरातील माती लागून ती रस्त्यावर दिसत होती. काही ते मातीचे पेंड जमिनीवर घासून काढत होते.आमच्या मित्रांमध्ये खोडकर म्हणजे कैलास पण सर्व गावात त्याला कैलू म्हणत असायचे. त्याने रमश्या वर ते रस्त्यावर झालेल्या डोबऱ्यातील पाणी उडवले. त्यात रमश्या चा शर्ट आणि गांडीकडून छिद्र लागलेला त्याचा पॅन्ट भरला. तेव्हा परिस्थिती तशी असायची नवीन शर्ट - पॅन्ट हे वर्ष्यातून एकदा मिळत असायचा,ते ही महागात पडेल असं नाही तर स्वस्त घ्यायचं,आणि शाळा लागून काहीच दिवस झाल्याने रमश्या ने नवीन शर्ट पॅन्ट अजून घेतलेला नव्हता तो तसाच येत असायचा.मग रमश्या ने कैलू ला पकडलं आणि त्या साचलेल्या पाण्यात नेऊन भरवलं. आता दोघेही लागले एकमेकांना मारायला,कुस्ती खेळायला. मी मात्र आता ती सोडायला गेलो तर दोघांचं मिटल आणि माझ्यावर आलं ते तसच की दोघांचं भांडण तिसर्याचा लाभ पण माझं नुकसान झालं होतं, त्या दोघांनीही मला चांगलंच भरवलं.असच नेहमी भांडण होत असायचं पण ते तेवढ्याच वेळापूरत राहायचं, परत उद्या बोलणं सुरू वायच.असेच पावसाचे दिवस जात होते,शेतीची कामे वेगात चालली होती,काहींची पिके ही आता जमिनीवर येऊन डूलू लागली होती.सरांनी दिलेली उजळणी घरी करून करून परत शाळेत ते सर करवून घ्यायचे.

घरच्या असणाऱ्या जमिनीत सुद्धा बाबा आई यांनी ज्वारी पेरली होती,शेतातील पिके आता डोलू लागली होती,म्हणजे या वर्षी बऱ्यापैकी पाऊस झाला होता.आई बाबा दोघेही पीक पाहून आनंदित होत असायचे. पावसाळा गेला,शाळेंत ही आता नियमित वर्ग होत असायचे पिके आता कापणीवर आली होती,आमच्या घरी पोटाला पुरेल एवढं ज्वारी झाली होती,कुणाकडून उसनेवारी तरी आता या वर्षी आणावी नव्हती लागत.पिके निघताच त्याच महिन्यात दिवाळी हा सण आला...यावर्षी आपली दिवाळी चांगली होईल असं प्रत्येकच कास्तकाराला वाटत होतं. कारण दरवर्षी पेक्षा या वर्षी उत्पन्न हे बऱ्यापैकी झालं होतं.काही शेतकरी ही निघालेलं धान्य विकण्यास नेत असायचे पण आमच्याकडे वर्षभर पुरेल एवढीच ज्वारी झाली होती आणि तिला विकण्यास नेली तर मग पुन्हा वर्षभर उसनवारी आणून खावं लागेल म्हणून आम्ही बिजली या बकरीने दिलेला बोकड विकावयास आठवडी बाजारात घेऊन गेलो.तो बोकड ही चांगला तरतरीत दिसत होता,त्याला पाहून चांगली किंमत येईल असं बाबाला वाटत होतं.एकदाचा बोकड खाटकांनी घेतला व बऱ्यापैकी त्याची किंमत दिली,ते पैसे पाहून बाबांना खूप जास्त आनंद झाला होता.त्या दिवशी मी पहिल्यांदा तेवढे एकावेळेस पैसे पाहत होतो.

मी लहान असल्याने तो आकडा काही समजला नाही पण नक्कीच ते माझ्या नजरेत खूप जास्तच होते.आम्ही आठवडी बाजार केला,त्या दिवशी बाबांनी मला नवीन पॅन्ट शर्ट आणि चित्रासाठी फ्रॉक घेतला,आईसाठी साडी व बाबांनी स्वतःसाठी बांडी व एक चांगला बर्यापैकी कुठे जाता येता येईल असा एक पॅन्ट घेतला अन् आमच्या झिंगरी व बिजली साठी शिंगात अटकविण्यासाठी विणलेले रंगीबेरंगी फुलांचे बाशिंग घेतले. काही भाजीपाला आणि दोन पायल्या गहू घेतले,असा हा त्या दिवशीचा आमचा आठवडी बाजार झाला.आम्ही दुसऱ्यांची बैलगाडी घेऊन वापस निघालो,जेव्हाही कधी तालुक्याच्या ठिकाणी काम असलं,काही धान्य विकायचं असलं की कधी मालकासोबत बैलगाडी घेऊन जावं लागतं असे. नाही तर एखाद्या वेळेस तो मालक आमच्यासाठी सुद्धा बैलगाडी देत असायचा.येता - येता संध्याकाळ झाली,अंधार पडला होता,गावाजवळून तो आठवडी बाजार पंधरा सोळा किलोमीटरवर असणार. येता येता चांगलीच रात्र झाली होती. इकडे चित्रा झोपून गेली होती आणि आई आमची वापस येण्याची वाट पाहत होती.येताच हातपाय स्वच्छ पाण्याने धुतले लगेच आईने जेवण वाढले,जेवण करून सर्व जण लगेच झोपी गेलो.पण मला काही लवकर झोप आली नाही आणि येणार तरी कशी,????बाबांनी नवीन घेऊन दिलेला शर्ट पॅन्ट उदयाला उठून घालायचा होता,मग तो घालून मी गावभर फिरणार,मी त्यामध्ये एखाद्या हिरोसारखा दिसणार, इत्यादी स्वप्न डोळे बंद करून मी पाहू लागलो.

तीच सकाळ म्हणजे दीपावलीचा दिवस उजाडला. आईने अगोदरच घराला रंग रंगोटी केली होती.आज पूर्ण आतील घर सारवून टाकलं. बाबांनी घराबाहेर चा परिसर खराट्याने स्वच्छ झाडून टाकला.मी जमेल ती मदत आईला करू लागायचो. चित्रा मात्र आपली खेळण्यात गुंग होती तिला काल आम्ही तिच्यासाठी फ्रॉक आणला हे ही तिला माहिती नव्हतं, माहिती झालं असत तर घालून देण्यासाठी आईकडे रडली असती. नंतर बाबांनी बिजली व झिंगरी या बकऱ्यांना पाण्याने अंघोळ करून दिली. शिंगाला गेरूचा रंग लावला, काही ठिपके त्यांच्या पाठीवर सुद्धा मारले आणि बाजारातून आणलेलं बाशिंग त्यांच्या शिंगाला बांधन दिली,नवरी नवरदेव जसे लग्नाच्या दिवशीं नटतात तसच यांनाही नटवण्यात आलं होतं.दोघीही एकदम छान दिसत होत्या. मी ही सकाळी अंघोळ केली आणि आणलेले नवीन कपडे घातले,आणि घरभर फिरू लागलो,माझे नवीन कपडे पाहून चित्रा रडायला लागली,
" आई मला पण नवीन कपडे दे,"
म्हणून पाय घासून रडायला लागली. तिच्यासाठी सुद्धा कपडे आणले होते याची तिला कल्पना नव्हती.आईने सुद्धा तिची अंघोळ करून दिली आणि रात्री आणलेले कपडे तिला ही घालून दिले. चित्राने फ्रॉक घातला होता, तिचा तर आनंद गगनात मावेनासा झाला होता, दादाला कपडे आणले तर मलाही आणले म्हणून ती मटकून फिरत होती.आई बाबाने ही तयारी केली,त्यांनी ही आणलेली नवीन कापडे घातली होती,मग आईने जेवणासाठी आज बाजारातून आणलेल्या गव्हाची कणिक भरडून त्या पिठाच्या पोळ्या बनवल्या ,ताकाची कढी व वांग्याची भाजी असा स्वयंपाक बनवला होता.पहिल्यांदाच मी आज गव्हाच्या पोळ्या खात होतो,अतिशय चवदार,नरम आणि थोड्या भाकरी थपतात त्यापेक्षा कमी जाड्या होत्या,पण चव रोजच्या जेवणापेक्षा वेगळी होती.

जेवण झाल्यानंतर मी मित्रांसोबत फिरायला बाहेर निघालो. उद्देश हा की मित्रांनी माझा नवीन शर्ट पॅन्ट पाहावा. मग काहींनी फटाके फोडले.मी मात्र नुसता पाहत बसलो होतो. तसं ही त्याची भीती वाटत असायची. इतक्यात एका फटाका रस्त्याच्या असणाऱ्या बाजूच्या घरावर जाऊन पडला,अन् ते घर गवताचं असल्यांने घराने भर्रकन पेट घेण्यास सुरुवात केली,गवत जळायला लागलं,हे पाहून सर्व मित्र माझे पसार झाले,मी मात्र तेथेच उभा त्या आगीला पाहत बसलो.माझी हिंम्मत होत नव्हती की त्यांना सांगावं "आग लागली, आग लागली," " पाणी टाका,"पण माझी काही ओरडण्याची हिम्मत झाली नाही. इतक्यात त्या घरवाल्याच लक्ष माझ्याकडे गेलं,आणि हा इथे उभा असून सांगत नाही की घराला आग लागली,तर निव्वळ पाहत बसला आहे,जसा की याला खूप खुशी झाली असावी.मग त्याच घरवाल्याने आरडाओरड केली. "धावा, धावा, आग लागली," तेव्हा कुठे सर्व गावातील मंडळी आग विजवायला आली.त्यात माझे आईबाबा सुद्धा पाणी टाकायला आले.

इकडे ज्याचं घर पेटलं होतं त्या घरची बाई कपाळावर हात ठेवून धाय मोकलून रडत होती,बडबड करत होती.

" कुण्या हलकटांन माझ्या घराला आग लावली, कुणाला आमचं झोपडीचं सुख पहावल्या गेलं नाही, कुत्रे लेकायचे,दिसू द्या,नाही त माहीत तर होऊ द्या एका एकाचा मुडदा पाडतो, " अशी बडबड करत बसली होती.

शेवटी आगीवर नियंत्रण प्राप्त करण्यात गावकरी यशस्वी झाले.लोकांचा हाहाःकार थांबला.ज्यांनी ज्यांनी आपल्या घरातून आग विजवण्यासाठी भांडी आणली होती ती परत आपल्या घरी घेऊन चालली होती. काही बाया- माणसे आग कशी लागली असेल यावर चर्चा करत आपल्या आपल्या घरी निघाली होती, तर काही त्या घरच्या माणसाला सांत्वना देत होती,त्यात माझे आई बाबा ही समजावण्याचा प्रयत्न करत होते.त्या घराचा एक भाग पूर्णतः जळाला होता, त्यात त्या घरातील धान्य आगीत सापडली होती. होते नव्हते कपडे जळले होतें. काही भांडी जळून काळीकुट्ट झाली होती. तो व्यक्ती बिचारा खिन्न पणे उभा होता.तो फक्त लोकांचं बोलणं ऐकत होता.माझे आई वडील समजवत असतांना तो म्हणाला,

आबे महाद्या , " तुया पोरामुळे माया घराले आग लागली, त्यानंच मायासमोर फटाके फोडले,आणि तो फटाका माया घरावर उडाला आणि आग लागली,तुय पोट्ट नुसतंच आगीकडे पाहत होतं पण त्यान कुणाला सांगितलं सुद्धा नाही,त्याले वाटलं की मायावर नाव येईन म्हणून ते चिडीचूप होत.!!""

इतक्यात मी त्या काकांकडे गेलो,अन् मी म्हणालो,

" काका मी फटाका फोडला नाही,इथे जमलेल्या काही मुलांनी फटाके फोडले,मी नुसताच उभा होतो,मी फक्त घाबरून गेलो त्यामुळे माझ्या तोंडून एक शब्दही निघाला नव्हता."

पण त्याची बाई अन् तो काही केल्या ऐकत नव्हता. शिव्या आणि जोराचं बोलणं सुरू झालं. काय माहिती अचानक काय झालं,त्यानं माझ्या कानशिलात लगावली. मी आता रडायला लागलो, बाबांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला,पण त्याने बाबांनाही ढकलून दिले. त्याच्या धक्यांनी बाबा खाली पडले,त्यांना खरचटलं होतं, इतक्यात काही गावकरी मदतीला आले,आणि त्यांनी या भांडणाची सोडवणूक केली.शेवटी बाबा,आई आणि मी घरी परत आलो,तरी पण त्या बाईचं बोलणं सुरूच होत.एकदाचा वाद मिटला होता पण मनात काहीतरी खटकल्यासारखं वाटत होतं,माझ्या मूळे बाबांना आज त्याने धक्काबुक्की केली,त्यांना खरचटलं,खूप वाईट वाटलं.

पण घरी आलो तर वाद अधिकच वाढला,आई बाबांचं जोरात भांडण सुरू झालं.
" तू या कारट्याला बाहेर जाऊ दिलं नसतं तर हा वाद वाढलाच नसता,???"असं म्हणून बाबा चिडले होतें.

आई मात्र रडत होती ती म्हणत होती की,

" यात अमर ची आणि माझी काही एक चूक नाही,त्याला नवीन कपडे घालून फिरावयास वाटलं म्हणून तो आपल्या मित्रांसोबत खेळत होता,आता त्याला थोडी माहिती होतं की हा प्रकार घडणार म्हणून..पण त्या बाईला कुठे माहिती की आमच्या मुलांना आम्ही फटाके घेऊन दिलेच नाही,जास्त पैसे असते तर त्यांचे लाड ही पुरवले असते,पण आमचंच जगणं कठीण असते त्यात आम्ही फटाके देऊ शकत नाही."

" हो, बरोबर आहे तुझं सावित्री !!!!
पण त्या बाईच्या आणि त्या माणसाच्या मागे लागलं असतं वाद वाढला असता तर तो वाद विकोपाला गेला असता आणि यात कुण्या एकाच नुकसान झालं असत,!!"
असं म्हणत आता बाबांच्या डोळ्यात ही पाणी आलं.

मी मात्र एका कोपऱ्यात बसून यांच्या गोष्टी ऐकत होतो. तेव्हापासून मनात कायमची खूणगाठ बांधली की कधी दीपावली साजरी करायची नाही किंव्हा त्या दिवशी तरी आपण मित्रांसोबत खेळायचं नाही. मग गेली कित्येक वर्षे मी कधी दीपावली साजरी केली नाही,किंव्हा घरी झाली असेल तरी मी मात्र घरीच राहत असायचो.एकदाची ही भांडणाची,संकटाची रात्र संपली.

माझं नियमित पणे शाळेत जाणं सुरू झालं. आई - बाबा आपल्या कामाला जाऊ लागले. दिवस कसे निघून गेले कळत नव्हते. पहिल्या वर्गाची परीक्षा संम्पली. सर जेवढे शिकवायचे त्याचीच उजळणी करून जायचं एवढंच ते वय होतं. कित्येक वर्ष निघून गेले, पण माझ्या वर्गातील ज्योती पाटील नावाची मुलगी होती तिला काही मी अभ्यासात कधी हारवू शकत नव्हतो. कितीही अभ्यास केला तरी तीच माझ्या समोर असायची,पहिल्या नंबर नी ती पास वायची मी मात्र तिच्या मागेच असायचो. माझा पहिला नंबर येत नाही म्हणून मी नाराज होत असायचो.

तेव्हा देशमुख सर म्हणायचे, " अमर नंबर नाही आला म्हणून नाराज वायच नसतं, ही तर फक्त अभ्यासू परीक्षा असते,जीवनाची खरी परीक्षा अजून बरीच शिल्लक आहे. नुसत्या अश्या छोट्या मोठ्या परीक्षांनी तू नाराज होत असणार तर कसं चालेल बरं..????"

"धीर धर!!!!!एक दिवस तू ज्योती ला अभ्यासात मागे टाकशील...."

मी , " ठीक आहे !!!"

म्हणून परत आपल्या शाळेत नियमित जात असायचो.आई बाबांना ही आता बरं वाटत असायचं, कधी सर त्यांना भेटले की मग माझ्याविषयी सांगत असायचे कि अमर अभ्यासात चांगला आहे त्याला शिकू द्या,तुम्ही संकटं पेलून घ्या,पण त्याची शिक्षणाची आवड पूर्ण करा..आई बाबा अशिक्षित असून त्यांच शिक्षणाविषयी प्रेम होतं, ते नेहमी म्हणत असायचे,की आमचा अमर मोठा होऊन साहेब बनेल,मग आम्हाला एवढे कष्ट करावे लागणार नाही,आमचं ही एक चांगल घर असेल,तेव्हा आम्ही सुखात खाऊ,अशी स्वप्न ही ते नकळत रंगवत असायचे.

अशीच शाळेची दोन - तीन वर्षे निघून गेली. सोबतचं आता चित्रा मोठी झाली होती तिचंही नाव बाबांनी शाळेत घातलं होतं. आता ती माझ्या बरोबर शाळेत येऊ लागली. शाळेत चित्राचं ही कौतुक होत असायचं,तशी ती पाहायला गोंडस आणि कुणीही प्रश्न विचारला की लगेच उत्तर देत असायची मग ते बरोबर असो वा चूक पण ती बोलकी असायची.चित्राच्या शाळेच्या मैत्रिणी आता घरी येत असायच्या . त्या सुद्धा मला आता दादा म्हणत असायच्या.आता शाळेत आम्ही सोबत मोठे होत होतो, कधी कधी शिक्षक माझी स्तुती करत असायचे तेव्हा मनाला खूप बरे वाटत असायचे. माझे मित्र कैलू,नारायण,अजून दोन - तीन खोडकर होते पण मी अभ्यासू असल्याने त्यांनाही आता शिक्षकांचा मार कमी पडत असे.माझी फक्त एकाच व्यक्तीशी लढाई सुरू असायची ती म्हणजे आमच्या वर्गातील हुशार मुलगी ज्योती पाटील. तिलाच अभ्यासात मागे पाडायचं हेच ध्येयं नेहमी असायचं पण माझ्याच्याने ते काही सहज शक्य होत नसायचं. पण जिद्द सोडली नव्हती. म्हटलं मेहनत करत जावे,एक दिवस तरी त्याच फळ मिळेल, एवढी अपेक्षा घेऊनच अभ्यास करायचा प्रयत्न असायचा पण तो काही केल्या पूर्ण झाला नाही..शाळेचे दिवस भर्रकन जात होते,मी ही आता वरच्या वर्गात वर्षे दरवर्षं जात होतो.

आता मी इयत्ता सातवी मध्ये गेलो होतो. एकदा आमच्या शाळेंनी सांस्कृतिक कार्यक्रम साजरा करण्याचे ठरवले. तो कार्यक्रम २६ जानेवारीला घायचे ठरले होते.सर्व मुलांनी त्या कार्यक्रमात भाग घेण्यासाठी तयारी दर्शविली पण माझा काही नृत्य,नाटिका याच्याशी काही संबंध आला नाही त्यामुळे मी या कार्यक्रमात जास्त रुची दाखवली नाही.कुणी देशभक्तिपर गीते, कुणी भावगीत, कुणी देवावर आधारित भजन, गीत, कुणी नृत्य तर कुणी नाटिका सादर करणार होते. काही नाटिका सर सुद्धा मुलाना शिकवणार होतें. देशमुख सर, पांडे सर, मेश्राम मॅडम आदींनी आपआपल्या वर्गातील विद्यार्थ्यांची यादी करून त्यांच्याकडून नाटिकेचा सराव करून घेऊ लागले.अश्यातच पांडे सरांचं माझ्याकडे लक्ष गेलं,

अरे अमर,
" तू कोणत्याच कार्यक्रमात सहभागी होणार नाही काय???
तुला यामध्ये आवड दिसत नाही वाटते!!!" असे सर म्हणाले.

मी म्हणालो, " यापूर्वी मी कोणत्याही कार्यक्रमात सहभागी झालो नाही, आणि यातलं मला काही एक येणार नाही सर म्हणून मी भाग घेतला नाही म्हणून जे विद्यार्थी भाग घेत आहे त्यांना लागली ती मदत करायची आणि आपलं मनोरंजन करायचं असं माझं ठरलं आहे."

अरे अमर , " हा कार्यक्रम आपल्या सर्वांच्या मनोरंजनासाठी आहे ,सर्वांनी भाग घ्यायचा असतो,यांमध्ये गावातील गावकरी, गावातील सरपंच, पाटील, तसेच गावातील प्रतिष्ठित लोक प्रतिनिधी येत असतात मग त्यांना आपल्या शाळेची,आपल्या मुलांची कलागुण दाखवायला नको का??"
पांडे सर बोलत होते..

बरं ठीक आहे ....अमर , " मी एक नाटिका लिहितो खास तुझ्यासाठी !!!!! मग तू त्यात भाग घ्यायचा,आणि मला जमत नाही वैगरे काही एक म्हणायचं नाही."""

ठीक आहे सर , " मी त्या पात्राला न्याय देण्याचा प्रयन्त करेल."

दुसऱ्या दिवशी सरांनी एक नाटिका लिहून आणली. त्या नाटिकेचं नाव " दलितांवरील अत्याचार " असं च काहितरी होत. त्यात माझी भूमिका एक दलित युवक म्हणून होती व काही माझे सहकारी हे अत्याचारित दलित या भूमिकेत होते.काही मुलांना उच्चवर्णीय लोकांच्या भूमिका देण्यात आल्या होत्या. नाटकाचा शेवट तो असा की संविधानाने सर्वांना समान अधिकार दिले असून सुद्धा त्या अधिकाराचा वापर जेव्हा खालच्या पातळीवर लोक जेव्हा करतात,दलित जेव्हा करतात तेव्हा त्यांना अपमानित केल्या जातं. कधी कधी त्यांना पशुपेक्षाही हीन वागणूक दिल्या जाते, दलित वर्गातील स्त्रियांवर ही आज अत्याचार केला जातो तो होऊ नये मग हा दलित युवक सर्वांना जागरूक होण्याच आव्हान करतो आहे.

सांस्कृतिक कार्यक्रमासाठी अजून तीन चार दिवस शिल्लक राहिले होते. आम्ही नियमित आमच्या नाटिकेचा सराव करत असायचो.मधेच सर काही चुकलं की लगेच एक छडी देऊन ती चूक दुरुस्त करून घ्यायचे. कधी कधी पाठीवर सुद्धा बुक्की बसत असायची,त्यामुळे आपआपली पात्र सर्वानी काटेकोरपणे करायची अशीच सर्वांची ईच्छा असायची,जेणेकरून आपला मार चुकवता येईल.माझे संवाद फार काही जास्त नसल्याने माझे ते लवकर पाठांतर झाले,पण त्या संवादापेक्षा कृती जास्त करावी लागत असायची.सराव करताना मुलांच्या हातून मार खावा लागत असते,बरं तो मार खोटा - खोटा असायचा,पण इकडे पडणं, तिकडे पडणं, सारख मान खाली घालून वाकून राहणं त्यामुळे ती भूमिका करायला अवघड होती,पण पूर्ण नाटिका दरम्यान ती भूमिका सर्वात महत्वाची होती.

माझ्याच वर्गातील काही मुलं ही ब्राम्हणांची, सावकाराची सुद्धा होती. ज्यात विनायक,सदाशिव यांनी याच नाटिकेसाठी सरांनी त्यांना ब्राम्हणांची भूमिका दिली होती. सराव करतेवेळी या दोघांची ही खूप मजा येत असायची.शरीराने दोघेही धष्टपुष्ट होते,त्यांचे संवाद काही केल्या पाठांतर होत नसायचे,त्यामुळे सरांचा रोष नेहमी त्यांच्यावर असायचा.सर नेहमी त्यांना सवांद म्हटला नाही की मारत असायचे,ते म्हणतात न छडी लागे छम छम विद्या येई घम घम,तसचं यांनाही मार दिल्याशिवाय संवाद काही बरोबर बोलता येत नसायचे.
सर नेहमी म्हणत असायचे ,

अरे रेड्यांनो, " कधी होईल पाठांतर तुमचं?????तुमच्या आईवडिलांनी नुसतं खाऊ घातलं पण त्या खाण्यांबरोबर थोडी अक्कल ही खाऊ घातली असती तर फार बरं केलं असतं निदान तुमचे संवाद तरी पाठांतर झाले असते ना!!!!"

" त्यांनी कमवून ठेवलं तुम्ही मात्र नक्कीच त्यांचं नाव बुडाला लावणार एवढं नक्की!!!!या अमर कडे बघा, आई बाबा दोघेही राब राब शेतीत राबतात,दुसऱ्यांच्या कामावर असतात,तरी हा अमर अभ्यासाबरोबर याही कामात हुशार आहे. काही तरी थोडं याच्याकडून सुद्धा शिकून घ्या!!!"

मग सर चिडून निघून जात असायचे. सर गेल्यावर सरांच्या रागावण्याचा रोष मग हे दोघेही माझ्यावर काढत असायचे,ते घरी माझ्याविषयी सांगायचे तर उलट त्यांना मारच बसत असे म्हणून ते माझा जास्त राग करत असायचे.असेच दोन - दिवस निघून गेले. शाळेला रंगरंगोटी करण्यात आली. परिसर स्वच्छ करण्यात आला,जे कौलारू फुटलेले होते ते काढून नवीन बसवण्यात आले होते,बाहेरच्या भिंती रंगवून त्यावर म्हणी लिहिण्यात आल्या होत्या, झाडांना व्यवस्थित पाणी जिरण्यासाठी मातीचे आळे करण्यात आले होते. माझे व चित्राचे कपडे आईने स्वच्छ धुऊन काढले होतें, घरी इस्त्री नसल्याने एका डब्यामध्ये निवे पकडून तो डब्बा कपड्यावर फिरवला की कशी बशी इस्त्री बसत असायची....

एकदाची सव्वीस जानेवारी ची तयारी झाली. शेवटी तो दिवस उजाडला.मी आणि चित्रा शाळेचे कपडे घालून शाळेत आलो. सर्व विद्यार्थी चकचकीत तयारी करून आले होते,शिक्षकांनी सुद्धा पांढरे शर्ट व खाली पांढरेच धोतर परिधान केले होते. महिला शिक्षकांनी पांढर्याच रंगाची साडी व निळ्या रंगाचा झाम्पर घातला होता. अगदी त्या नीटनेटक्या दिसत होत्या.सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या प्रांगणामध्ये एका रांगेने उंचीनुसार उभे करण्यात आले.कार्यक्रमाच्या सुरुवातीला ध्वजारोहण करण्यात आले,त्यानंतर " जन - गण - मन अधिनायक जय हे," असं सर्वांनी राष्ट्रगीत बँडपथक यावर तालासुरात म्हनून राष्ट्रीय झेंड्याला सलामी देण्यात आली.लगेच विद्यार्थ्यांच्या रांगा करून पूर्ण गावात प्रभातफेरी काढण्यात आली..

त्यात सर्व विद्यार्थी " भारत माता की जय," "वंदे मातरम् " " गणराज्य दिन चिरायू होवो," " महात्मा गांधी की जय," डॉ.बाबासाहेब आंबेडकर की जय" इत्यादी जोरजोरात नारे देऊ लागले. ते नारे यासाठी होते की त्या ओरडणा ऱ्या मुलांकडे गावकऱ्यांच लक्ष जावे. पूर्ण गाव फिरून झाल्यानंतर सर्व पाहूणें मंडळी,गावकरी आणि सर्व विद्यार्थी सोबत शिक्षक परत शाळेत आपापल्या जागेवर जाऊन बसले.थोडा वेळ बसल्यानंतर आता सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात होणार होती. आम्ही जे सहभागी विद्यार्थी होते ते मागे जाऊन तयारी करू लागलो. काही विद्यार्थी आपले संवाद मोठ्यानीं म्हणू लागले . मी मात्र सर्वसंवाद मनातल्या मनात म्हणू लागलो. छातीत धडधड सुटली होती कारण कार्यक्रमात सर्व गाव उलटून आला होता.काही मुलांनी आपली देशभक्ती पर गीते सादर केली काहींनी डान्स केली .

आता आमच्या नाटिकेचा नंबर होता,सरांनी आमच्या नाटिकेचे नाव उच्चारण केले. तत्पूर्वी सरांनी आम्हांला बजावून दिल की अभिनय जसा मी तुम्हांकडून करवून घेतला तसाचं करायचा. घाबरण्याचं कारण नाही,आणि हो सवांद जर आठवले नाही तर आपल्या बाजूच्या विद्यार्थ्यांला लगेच विचारून घ्यायचं , अश्या सूचना देत सर आमच्यातून निघून जाऊन सर्व शिक्षक जिथे बसले होते तिथे येऊन बसले.नाटिकेचा शेवट हा माझ्याने होणार होता त्यामुळे मुख्य जबाबदारी ही माझ्यावर जास्त होती.शेवटी नाटिकेची सुरुवात झाली. सर्वांनी आपापल्या भूमिका करावयास सुरुवात केली. मी ही माझें सवांद स्टेजवरती येऊन म्हणू लागलो. मध्येच गावातील मुले टाळ्या वाजवत असायची तर कधी भावनिक संवाद असले की शांत होऊन ऐकत असायचे.
मी नाटिकेमधील संवाद म्हणू लागलो,

" सावकार , माझ्या घरी अन्नाचा दाणा नाही हो,
वरून पोरगं बिमार आहे,
भुकेने मरून जाऊ आम्ही,
मी केलेल्या कामाचा मोबदला म्हणून काहीतरी धान्य द्या हो,
मी तर फक्त तहान लागली म्हणूनच इथलं पाणी पिलो,
यानंतर अशी चुकी होणार नाही,आणि इथल्या कोणत्याही वस्तूला शिवणार नाही,"

अश्या विनवण्या सावकार म्हणजे आमच्या नाटकातील विद्यार्थी सदाशिव आणि विनायक यांना असे रडून संवाद म्हणत असतो.पण तेवढ्यात नाटिकेचा भाग म्हणून हे दोन्ही मला मारावयास लागतात. कधी यांचा चपलांचा मार तर कधी काठीचा मार सहन करावा लागतो सुरुवात ही हळू आणि खोट्या मारापासून होते जसे आम्ही सर्व सरावादरम्यान करत असायचो मी ही आपला नाटिकेचा भाग म्हणून विव्हळत असतो, रडत असतो,समोर सर्व गावकरी हे नाटक पाहून भावुक होतात, काही महिला अश्रू ही गाळायला लागतात, पण अचानक या दोघांना काय होते हे दोघेही चांगल्या जोरजोरात पोटावर, पाठीवर मारावयास सुरुवात करतात आता मात्र हा मार खोटा नसून खरा असतो पण मी अभिनय अजून दमदार व्हावा म्हणून तो सर्व मार सहन करतो, नंतर त्याच नाटकात हे दोघेही धान्य आणतात पण प्रथमतः दोघेही पायाने तुडवतात आणि मग घरून जायला सांगतात अश्या प्रकारे या नाटकाचा शेवट खालील ओळीने होतो...

काय गुन्हा केला आम्ही,
जन्म घेऊनी ईथे,
रोज आमची चामडी सोलली जाते,
अन्याय सहन करता जिथे..

घाम गाळताना होते ,
अंगाची लाही लाही,
अशी कशी हो नांदते,
या देश्यात ही लोकशाही....

उघड्या नागड्या वस्त्रावर करतो,
तुमची चाकरी,
पण तरीही मिळत नाही,
दोन वेळची पोटभर भाकरी..

कुत्र्या बकऱ्यांना करता
तुम्ही जवळ,
विटाळ आमचा होतो म्हणून
फेकता तुम्ही का हो दूरवर....

सोडा हा आता जातिवादपणा,
घरी लावून माणुसकीचा बाणा,
स्वीकार करुनी बुद्ध धम्म खरा,
बनवा देश अपूला न्यारा...

मानूनी संविधान ग्रंथ आपला
हाच शुभ संदेश बाबांचा तुम्हांला....

क्रमशः ......