देवदूत Prathamesh Dahale द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

देवदूत


" आता आपले काही खरं नाही !...मला नाही वाटत आपण इथून वाचू !..." ईशा पुन्हा पुन्हा तेच बोलत होती.
आता इंद्रजित चांगलाच वैतागला.
" मॅडम , तुम्ही स्वतः तर घाबरलेल्याच आहे , पण तुम्ही दुसऱ्याला घाबरवू नका..काही होणार नाही..आर्मी चे जवान येतील..धीर धरा.." इंद्रजित सर्वांना धीर देत होता.
इतर सर्व भीतीने घाबरून गेले होते. एक वयोवृद्ध आजीबाई सतत हात जोडून देवाकडे प्रार्थना करत होती. दुसरी एक महिला साडीच्या पदराने डोळ्यातील पाणी पुसत कोणीतरी मदतीला येईल या आशेने समोरच्या पारदर्शक दरवाज्यातून बाहेर पाहत होती. ऑफिसची साफसफाई करणारे दामू काका शांतपणे ऑफिसच्या बॉसच्या केबिन समोर खुर्ची टाकून बाहेर एकटक नजरेने बघत होते. त्या दोन महिला , काका , आणि ईशाने जवजवळ या पुरातून आपण बाहेर पडू याची आशाच सोडली होती. पण इंद्रजितने अजून आशा सोडली नव्हती. या पाच जणांत सर्वात तरुण असल्याने या कठीण परिस्थितीतही त्याने धीर सोडला नव्हता.
ऑफिसच्या बाहेर दुरदूरपर्यंत गुडघ्याएवढं पुराचं पाणी आपल्यासोबत बरंच काही घेऊन वाहत चाललं होतं. ऑफिसबाहेर लावलेल्या स्वतःच्या गाड्या वाहून जाताना या पाच जणांनी आपल्या डोळ्यांनी पाहिल्या होत्या. पण हताशपणे उभं राहून वाहून जाणाऱ्या गाड्या पाहण्याशिवाय ते काही करू शकत नव्हते. बाहेर जाण्याचे धाडस कोणीही केले नाही , पाण्याचा वेग इतका होता की ऑफिसचे दार उघडून बाहेर गेलं , तर वाहून जाण्याशिवाय पर्याय नाही.
" हे रामा ! वाचव मला , माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर.." त्या आजीबाई हात जोडून देवाला साद देत होत्या. ईशाला तिचा राग येत होता. इथं पुरात अडकून पडलोय आणि या आजी प्रार्थना करताय ! तिला तसाही धार्मिक गोष्टींचा पहिल्यापासून राग होता. ती रागाने आणि निराशेने इकडून तिकडे अस्वस्थपणे पाहत उभी होती.
दामू काका खुर्चीतून उठत रिसेप्शन वरच्या लँडलाईन जवळ गेले. एक नंबर लावला. आता तरी लागेल अशी त्यांची अपेक्षा होती. पुन्हा त्यांचा अपेक्षाभंग झाला. खचलेल्या मनाने ते पुन्हा खुर्चीत येऊन बसले. चेहऱ्यावर मात्र शांतता कायम होती.
" ताई , आपण रडू नका , धीर धरा.." इंद्रजित त्या रडणाऱ्या महिलेला आधार देत म्हणाला.
" कसा धीर धरू ? माझा पोरगा घरी एकटाच आहे.." तिने मोठ्याने हंबरडा फोडला. मायेच्या ममतेने तिचा बांध फुटला. तिला पाहून इंद्रजितला कसेतरी वाटले. आजीबाई तिच्या पाठीवर हात ठेवत धीर देऊ लागल्या.
" ओ मिस्टर , तुम्ही काय दुसऱ्याला धीर देण्याचा ध्यास घेतला आहे ?..ते सोडून आपल्याला इथून कसं वाचता येईल ते पहा.." ईशा इंद्रजितला खडूसपणे बोलली.
तिच्याकडे दुर्लक्ष करत तो काय करता येईल याचा विचार करू लागला. आर्मीचे जवान लवकर येतील याची काही चिन्हे नव्हती. कारण त्यांचे प्राधान्य ऑफीसच्या मागच्या बाजूला असलेल्या झोपडपट्टीतील लोकांना वाचवण्याचेच असणार होते. एक तासापूर्वी दामू काकांनी ऑफिसच्या काही लोकांना अडकलो असल्याचे कळवले होते. लवकर आर्मीचे जवान तिथे पोहोचतील अशी माहिती किंवा धीर त्यांच्याकडून मिळाला होता. पण अजूनही कोणीच तिथे मदतीला पोहोचले नव्हते. ऑफिस समोरच्या एका बिल्डिंगच्या खाली उभं राहून लोक फक्त पुराचे वाहणारे पाणी पाहत होती , हे पारदर्शक दरवाज्यातून अंधुकपणे दिसून येत होतं. कदाचित त्यांना इथे कोणीतरी अडकले आहे , याची कल्पना नसावी. आजूबाजूची सगळी ऑफिस रविवार असल्याने बंदच होती. त्यामुळे आजूबाजूला मदतीसाठी कोणी येईल याची आशा इंद्रजितने सोडली होती , पण इथून लवकरात लवकर कसेतरी सुटू याचा त्याला विश्वास होता.
" पाऊस अजून वाढतोय..अजून कोणी मदतीला आलं नाही..मी नाही अजून थांबू शकत ! माझा मुलगा माझी वाट पाहत असेल.." ती महिला रडत रडत ऑफीसच्या बाहेर जायला निघाली.
" थांबा हे काय करताय ! वाहून जाल तुम्ही ! " ती दाराजवळ जाताच ईशा मोठ्याने ओरडली.
" पण माझा मुलगा..दहा वर्षांचाच आहे ओ..घरी एकटाच आहे.." ती महिला अजूनच मोठ्याने रडायला लागली. तिचे रडणे ऐकून ईशालाही वाईट वाटले. तिला काहीवेळ तिच्या आईची आठवण झाली. तिने त्या महिलेला सावरत खुर्चीवर बसवून पाणी आणून दिले. तोपर्यंत इंद्रजित बाहेर टक लावून बघत विचारात गुंतला होता.
" हे सगळं तुमच्यामुळं झालं आहे ! तुमच्या कामासाठी मी थांबून होते ऑफिसमध्ये ! " ईशा तावातावाने इंद्रजितजवळ जात बोलली.
" तुम्हाला बोलून तरी काय फायदा आहे!..तुमच्या एकट्याच काम नव्हतं..त्या आजीबाई आणि त्या बाईंचंही काम होतं..त्यांचीही तेवढीच चुकी.." ईशा बडबडतच होती.
" पाऊस आणि पुर सांगून येत नाही मॅडम ! मी आलो तेव्हा इतका पाऊस नव्हता..आणि जर तुम्हाला एवढंच बोलायचं आहे , तर का थांबला ऑफिसमध्ये ? " इंद्रजित चिडून बोलला.
" ते काही असो , चुकी तुमचीच आहे ! तुम्ही ऑफिसमध्ये आल्यापासून पाऊस सुरू झाला." ईशा चिडून बोलली.
" ये पोरी..ही वेळ वाद घालण्याची नाही गं ! जरा संयम ठेव , येईल तो राम आपल्याला वाचवायला.." आजीबाई तिला शांत करत बोलल्या.
" ओ आजीबाई , काय चाललंय तुमचं ? कोणीही देव येणार नाही वाचवायला ! यायचा असता तर कधीच आला असता.." ईशा संतापून बोलली.
" देव नाही..पण एखादा देवदूत तरी येईल.." आजीबाई विश्वासाने बोलल्या. ईशाने नाराजीने बाजूला निघून गेली. दरवाज्याच्या डाव्या बाजूला असलेल्या डेस्कसमोर ती हताशपणे बसली. तो तिचाच डेस्क होता. इथेच ती तिचं काम सांभाळायची. तिथेच पडलेला मोबाईल तिने चालू केला. नेटवर्क अजून नव्हतेच. वैतागून तिने फोन डेस्कवर आपटला.
इथून कसं सुटता येईल हा एकच विचार सगळ्यांच्या मनात सुरू होता. पावसाचा जोर अजूनच वाढत चालला होता. पुराचे पाणी अजूनच भयानक रूप धारण करत होते.
दामू काका उठून इंद्रजित जवळ आले.
" मला तर वाटत की आजची रात्र ही इथेच काढावी लागेल. " दामू काका हताशपणे बोलले.
" काका , इतक्या लवकर धीर सोडून उपयोग नाही..कोणीतरी येईलच.." इंद्रजित आशेने म्हणाला.
" मागच्या वर्षीही असाच पूर आला होता ! इतका नव्हता पण त्या पुरामुळे शेजारच्या ऑफिसमध्ये ही चार जण अडकली होती. दोन दिवस मदतीसाठी कोणी आले नव्हते ! " काका घडलेली घटना सांगताना चिंताग्रस्त झालेले दिसत होते.
" दरवर्षी इथे पूर येतो ? " इंद्रजितने विचारले. तो कालच या शहरात आल्याने त्याला काही माहीत नव्हते.
" हो ! बाजूलाच एक नदी आहे , तिचं पाणी एकदा येतेच..आणि हा रस्ता बघा..रास्ता कमी आणि खड्डे जास्त आहेत..पाणी तर तुंबणारच.." काका बळच हसण्याचा प्रयत्न करत बोलले.
" नेहमी पाऊस जास्त पडायला लागला की सुट्टी भेटायची..पण आज इतक्या अचानकपणे पाऊस आला..कोणी काय करू शकते ?..त्यात आज रविवार असूनही ऑफिस चालू.." काका निराशेने बोलले.
" तुम्ही कधीपासून इथे आहात ? " इंद्रजितने मुद्दाम विषय बदलण्याचा प्रयत्न केला.
" पाच वर्ष..पाच वर्षांपासून काम करतोय इथं..सफसफाईच काम करत असल्याने कोणी जास्त किंमत करत नाही.." दामू काकांच्या बोलण्यात खंत जाणवत होती.
" घरची परिस्थिती तशी असल्याने करावी लागतात अशी कामं.." काका दुःखी झाले.
" त्यात वाईट काही नाही..काम कोणतंही असो , कामावर आपली श्रद्धा महत्वाची.." इंद्रजित त्यांना धीर देण्याचा प्रयत्न करत होता.
" हे माझ्या मुलाला समजल नाही !..घरची शेती विकून नशेच्या आहारी गेला..का तर म्हणे , शेतीसारखी छोटी कामं करायची नाही..सोडलं आईबापाला वाऱ्यावर." दामू काका अजूनच दुःखी झाले. इंद्रजितला त्यांची स्थिती पाहून वाईट वाटले. जास्त काही न बोलता तो बाहेर पावसाकडे पाहू लागला.

त्यांना ऑफिसमध्ये अडकून आता जवळजवळ तीन तास झाले होते. अजूनही कुठूनही आशेचा किरण दिसत नव्हता. पाऊस अजूनही सुरूच होता. पुराच्या पाण्याचा वेग अजूनच वाढला होता. ना कोणी मदत करायला आलं होतं. पाण्याचा वेग इतका वाढला होता की पाणी दार ढकलून आत शिरायला लागलं होतं.
सगळेजण एका डेस्क समोर खुर्च्या टाकून एकमेकांजवळ बसलेले होते. इंद्रजित अजूनही बाहेर पावसाकडेच बघत होता.अंधार पडायला लागल्याने सर्व जण अजूनच घाबरलेल्या अवस्थेत होते. बहुतेक दामू काकांच्या अंदाजानुसार रात्र इथेच काढावी लागणार होती.
" पाऊस थांबेल अस वाटत नाही..आता अजून थोडावेळ इथं थांबलो , तर पाणी आत आल्याशिवाय राहणार नाही.." दामू काका काळजीत बोलले.
" ओ काका , तुम्ही चांगलं काहीतरी बोला ! " ईशा चिडून बोलली.आजीबाई डोळे मिटून शांतपणे बसल्या होत्या. त्यांच्याकडे बघून ईशा अजूनच वैतागली. दुसरीकडे त्या महिला आपल्या मुलाच्या काळजीत बुडून एकटक शून्यात बघत होत्या.
" ताई..तुमचा मुलगा ठिक असेल काळजी करू नका." इशा त्या महिलेला धीर देण्याचा प्रयत्न करत म्हणाली. त्यांची अवस्था बघून फार वाईट वाटत होते. त्या महिलेने आपली नजर ईशाकडे वळवली. त्यांचे डोळे भरून आले.
" एकटाच आहे हो घरात..सकाळपासून काही खाल्लं पण नसेल त्यानी ! " त्या महिलेला पुन्हा भरून आले.
" तो घरात एकटाच असतो ? " ईशाने काळजीने विचारले.
" त्याचा बाप तर गेला सोडून कायमचा !..मी एकटी कशी कशीतरी सांभाळते त्याला. आज या ऑफिसमध्ये आले नसते , तर बरं झालं असतं.." इशाने त्यांच्या खांद्यावर हात ठेवला.
" शांत व्हा. " ईशा त्यांना धीर देत म्हणाली.
" कोणाला काही होणार नाही ! देव आहे ! " आजीबाई हळूच डोळे उघडत बोलल्या. यावेळेस मात्र ईशाचा चांगलाच संताप झाला.
" तुम्हाला देव सोडून दुसरं काही दिसत नाही का ? " यावर आजीबाई काहिश्या हसल्या.
" माझा मुलगाही तुझ्यासारखच आहे , देवावर विश्वास नाही त्याचा..पण माझा पूर्ण विश्वास आहे. " आजीबाई हळूच हसत बोलल्या. यांचा मुलगा यांना कंटाळत नसेल का ? ईशाच्या मनात विचार आला. तिला परत तिच्या आईची आठवण झाली. तिची आईसुद्धा अशीच देवावर विश्वास ठेवायची. आई आपली काळजी करत बसली असेल , ती नको ते विचार करत बसेल या काळजीने ईशाने मोबाईल चालू केला. नेटवर्क अजूनही आले नव्हते.
" तुझ्या घरचे काळजी करत असतील ना पोरी ? " आजीबाई काळजीने बोलल्या.
" हो. टीव्हीवर पावसाच्या बातम्या बघून काळजीत पडली असेल आई.." ईशा बोलली.
" मुलगी आहे मग काळजी तर वाटणारचं. "
" मुलगी जरी असले , तरी मुलांपेक्षा कमी नाही , माझा स्वभाव चांगलाच माहीत आहे आईला. " ईशा स्वतःचं कौतुक करत बोलली.
" ते तर समजलय मला.." आजीबाई हळूच हसत बोलल्या.
" मला तर माझ्या मुलाची चिंता वाटतेय , शोधायला बाहेर पडला असेल..कदाचित इथपर्यंत पोहोचेलही.." आजीबाई बोलल्या. त्यांच्या चेहऱ्यावरची चिंता , भीती जरा कमी झालेली दिसत होती.
" आपण भाग्यवान आहात , कोणीतरी काळजी करणार आहे आपली ! " दामू काका बराच वेळाने बोलले.
" माहीत आहे दामू काका , मघाशी ऐकलं मी , तुमचा मुलगा सोडून गेला आणि मला माझे बाबा.." ईशा दुःखी होत बोलली.
" तुला वडील नाहीत ? " आजीबाईंनी विचारलं.
" अपघातात गेले ! मागच्या वर्षी.." ईशा जड आवाजात बोलली. आजीबाई आणि दामू काकांना तिचे वाईट वाटले.
इशा मात्र भावुक न होता , लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करू लागली. तिने इंद्रजितकडे पाहिले. तो दरवाज्यावर आपले दोन्ही हात ठेवून बाहेर बघत होता. लांबवर काही लोक वाहून जाणाऱ्या वस्तू , वाहने काढत होती. ऑफिसच्या जवळपास कोणीही नव्हते. समोर तर एखादी नदी वाहतं असावी एवढे पाणी होते. एखाद्याने पाहिले तरी कोणालाही तिकडून ऑफिस जवळ येणं शक्य नव्हतंच. वरून अंधार पडत असल्याने मदतीची आशाही मावळत चालली होती.
" तुमच्या ऑफिसची लोकं काही कामाची नाहीत ! फोन करूनही अजून काहीच मदत नाही." ती महिला निराशेने म्हणाली.
" तरी मी म्हणत होते दामू काका , त्या बॉसला फोन लावू नका ! तो कोणाला मदत सांगेपर्यंत आपली लाकडं जळायला लागतील ! " ईशा रागाने बोलली.
" बस्स झालं मॅडम ! तुम्ही सतत नकारात्मक विचार का करता ? कधीतरी चांगलं बोला ! " इंद्रजित चिडून तिच्याजवळ येत बोलला.
" तुम्ही फक्त उपदेश न देता काहीतरी करा ! इथे फक्त तुम्हीच काहीतरी करू शकता..हिरो सारखं काहीतरी करा फक्त बडबड करण्यापेक्षा ! " ईशा ओरडून बोलली.
" मला समजतंय ते , सगळ्यांची परिस्थिती मला समजत आहे..आता आर्मी आल्याशिवाय आपलं इथून निघणं अवघड आहे , हे लक्षात घ्या ! " इंद्रजित चिडून बोलला.
इशाने रागाने त्याच्याकडे पाहत हात झिडकारला.

रात्र झाली होती. लाईट्स नसल्याने सगळ्या ऑफिसमध्ये अंधार पसरलेला होता. इंद्रजित सोडून सर्व जण खुर्चीमध्ये बसूनच झोपण्याचा प्रयत्न करत होते. एकतर काळजी , भीती आणि रिकामं पोट यामुळे कोणाला झोप लागणे अशक्य वाटत होते. इंद्रजित दारासमोरच खुर्ची टाकून बसला होता. पाणी इतके वाढले होते की , आता दारातील फटींतून आत शिरत होते. सकाळी लवकरात लवकर इथून निघालो नाही तर अनर्थ होऊ शकतो याची जाणीव इंद्रजितला होत होती. तो एकाग्र पणे कोसळणाऱ्या पावसाकडे बघत होता. काहीवेळाने बाकी सर्व झोपल्यावर ईशा तिथे आली.
" तुम्हाला झोप नाही येत का ? " ईशाचा आवाज कानावर पडताच इंद्रजितने मागे पाहिले.
" तुम्हीच तर म्हणालात , हिरोसारखं काम करा ! सध्या तरी मी इथं बसून सतर्क राहण्याशिवाय काहीच करू शकत नाही.." इंद्रजित खुर्चीतून उठत दरवाज्याजवळ जाऊन उभा राहिला.
" तुम्ही नेमके कुठून आला आहात ? " ईशा त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होती.
" टाइमपास म्हणून आता चांगलं बोलताय का ? मघाशी तर फक्त चिडूनच बोलत होतात.." इंद्रजित नाराजीने बोलला.
" मला फार भीती वाटतेय..आईची काळजी पण.." इशा चिंतेने बोलली.
" काहीही करून सकाळी आपल्याला इथून निघावं लागेल..नाहीतर अजून कितीवेळ इथं अडकून पडू माहीत नाही.." इंद्रजित बोलला.
" पण कस ? आर्मी आल्याशिवाय तरी ते शक्य नाही..कोणी साधा माणूस इतक्या पाण्यात कसा येऊ शकतो.." ईशा अजूनच काळजीत पडलेली दिसत होती.
" मी पुण्यावरून आलोय..वाटलं होतं मुंबई सगळ्या गोष्टीत पुण्यापेक्षा चांगली असेल. पण पावसामुळे माझा हा विचार बदललाय आता. एका तासात इतका पाऊस होत असेल इकडे असं वाटलंच नव्हतं.. थेट रस्त्यावरून नदीसारखं पाणी वाहायला लागलं ! " इंद्रजित तिचा घाबरलेला चेहरा बघून विषय बदलत बोलला.
" ते तर दरवर्षी होत इकडे.." ईशाला थोडा धीर आल्यासारखे वाटले. पण चिंता कायम होती.
" मला वाटत तुम्ही आराम केला तर चांगलं होईल." इंद्रजित तिच्या चिंताग्रस्त चेहऱ्याकडे बघून बोलला.
" हम्म." म्हणत ईशा पुन्हा आपल्या खुर्चीत येऊन बसली.

सकाळी आवाज कानावर पडताच ईशाचे डोळे उघडले. आजीबाई डोळे बंद करून जोडल्या हाताने मंत्र पुटपुटत होत्या. तिने हळूच आजूबाजूला पाहिले. दामू काका आणि इंद्रजित दाराजवळ काहीतरी बोलत उभे होते. ती महिला ही तिथेच उभी होती.
" काहीही करा , पण मी इथं अजून थांबू शकत नाही ! " ती महिला रडत इंद्रजित समोर हात जोडून बोलत होती.
" काका , आता काहीही करून इथून निघावं लागेल..काहीही करून. " इंद्रजित कळकळीने बोलला.
" पण कसं ? बाहेर इतकं पाणी आहे की कोणीही सहज वाहून जाईल.." दामू काका विचारात पडले.
" आता फक्त एकच पर्याय आहे !..तुम्हाला कोणाला पोहोता येतं ? " इंद्रजितच्या प्रश्नावर सगळेच हैराण झाले.
" हे काय बाळा..एवढ्या पाण्यात पोहणं शक्य आहे ? " " आजीबाई चिंतेने त्याच्या बोलण्याला विरोध दाखवत बोलल्या.
" अहो पोहोता येत असतं तर पाणी कमी होतं तेव्हाच गेलो असतो ना.." ईशा वैतागून बोलली.
" मला पोहोता येतं ! मी तुम्हा सगळ्यांना घेऊन जातो ! " इंद्रजीत बोलताच सगळे अस्वस्थपणे त्याचा चेहरा न्याहाळत होते.
" पोहोता येतं ! मग तुम्ही कालच का नाही गेला पोहत ? " ईशा रागाने बोलली.
" काल पाण्याचा वेग प्रचंड होता , पोहणं जवळपास अशक्य होतं , मॅडम , आज पाणी जरा स्थिरावलेलं आहे..फक्त एकच प्रॉब्लेम आहे की पाणी आता थेट छातीपर्यंत आलेलं आहे..पाऊसही सुरू आहे." इंद्रजित बाहेर पाहून विचार करत बोलला.
" आणि दुसरं म्हणजे , तुम्ही सगळे ज्या स्थितीत होते , त्यात मी तुमच्यासोबत असणं गरजेचं होतं.आर्मी वेळेत पोहोचली असती , तर या सगळ्याची गरज नसती , पण आता दुसरा पर्याय नाही , जर पाऊस पडत राहिला , आणि मदतीला कोणी आलं नाही , तर अजून दोन दिवस इथे अडकून राहावे लागेल. " इंद्रजीत खोलमध्ये विचार करून बोलत होता.
" मी एकेकाला इथून माझ्यासोबत घेऊन जाईल..पाठीवर बांधून ! " इंद्रजितने सगळ्यांकडे पाहिले. इशाने विचित्र नजरेने त्याच्याकडे पाहिले.
" ठीक आहे , हाच सध्या योग्य पर्याय आहे.." दामू काका तयार झाले.
" घेऊन चला ओ मला माझ्या मुलाकडे काहीही करून." ती महिला डोळे पुसत म्हणाली. ती सुद्धा तयार झालेली पाहून इंद्रजितला अजून विश्वास आला.
" आजीबाई तुम्ही तयार आहात ? " इंद्रजितने त्यांचा घाबरलेला चेहरा पाहून विचारले.
" हो..पण..तुला नक्की पोहोता येतं ? " आजीबाई घाबरल्या होत्या.
" माझ्यावर विश्वास ठेवा , तुम्हाला काहीही होणार नाही. " इंद्रजित त्यांना धीर देत बोलला.
" चालेल..तू देव बनून आज आम्हाला वाचवायला आला आहेस , अस मानून मी तुझ्यावर विश्वास ठेवते पोरा." आजीबाईंनी त्याच्या डोक्यावरून विश्वासाने हात फिरवला.
" तुमच्यावर विश्वास कसा ठेवायचा आम्ही ? म्हणजे मी ? " ईशाचा मात्र त्याच्यावर अजूनही विश्वास नव्हता.
" मॅडम , तो तुमचा प्रश्न , तुम्हाला उठून सुटायचं आहे की नाही , ते तुम्ही ठरवा ! " इंद्रजित चिडून बोलला.
" आता सर्वात पहिले आपल्याला एक दोरी लागेल.." इंद्रजितने रामू काकांकडे पाहिले.
" दोरी ? बघावी लागेल..बहुतेक जुन्या फाईल्स ठेवल्या आहेत तिकडे मिळेल.." रामू काका विचार करत बोलले.
" लवकर बघा ! "
रामू काका एका केबिनमध्ये निघून गेले. तोपर्यंत इंद्रजित पुढची तयारी करू लागला. आपल्यासोबतच्या बॅगमधून त्याने रेनकोट बाहेर काढून ते अंगावर चढवले. तोपर्यंत अजीबाईंचे देवसमरण चालू होते. ईशा बाजूला जाऊन पुन्हा पुन्हा नेटवर्क तपासत होती. आईची काय अवस्था असेल , या विचाराने तिचे मन त्रासले होते.

काहीवेळाने दामू काका एक भल्यामोठ्या दोन अश्या दोऱ्या घेऊन बाहेर आले. इंद्रजितला अशीच दोरी हवी होती. तयार होऊन इंद्रजित बोलायला लागला.
" आता सगळ्यांनी ऐकून घ्या..ह्या दोरीने मी स्वतःसोबत जो येणार असेल त्याला पाठीवर उलट्या बाजूने बांधेल , म्हणजे जो पाठीवर असेल त्याचे तोंड आकाशाकडे. दुसरं म्हणजे दोरी जरी बांधलेली असली तरी पाठवरची पकड मजबूत ठेवा. जेव्हा तुम्हाला वाटेल की पकड ढिली होती आहे , घाबरून जाऊ नका , काहीही करून मला पकडून ठेवा. पाण्यात श्वास घ्यायला त्रास झाल्यावर मी पाण्यातून बाहेर येईल..तरीही तुम्ही धीर सोडू नका !..आणि दुसऱ्या बाजूला जी बिल्डींग आहे तिकडे जास्त पाणी साचलेले नाही , अशा ठिकाणी मी तुम्हाला सुखरूपपणे सोडेल , आणि पुन्हा दुसऱ्याला वाचवायला येईल. " इंद्रजित सगळ्या सूचना सांगून बोलायचं थांबला.
" म्हणजे तू परत दुसऱ्याला घायला येणार ? " आजीबाई काळजीत पडल्या. यामुळे इंद्रजितच्या जीवाला धोका होता.
" त्याशिवाय पर्याय नाही ! " इंद्रजित बोलला.
" पर्याय नाही ? तुम्ही तिकडे जाऊन आर्मी किंवा दुसरे कोणतेतरी प्रयत्न करून बाकीच्यांना वाचवू शकणार नाही ? " इशा वैतागत मात्र काहीश्या चिंतेने म्हणाली.
" दुसरी कोणती मदत मिळेल का , ते त्या बाजूने गेल्यावरच कळेल. " इंद्रजितने दोरी हातात घेत पोटाभोवती बांधायला सुरुवात केली. तो तयार होईपर्यंत सर्व जण त्याच्याकडेच बघत होते.
" पहिले ताई , तुम्ही चला. " इंद्रजित महिलेला म्हणाला.
" मी ? " तिने घाबरत त्याच्याकडे पाहिले.
" ताई , दुसरा पर्याय नाही आहे ! " इंद्रजित तिला तयार करत बोलला. ती घाबरतच पुढे आली.
" काका , दोरी बांधा. "
ती महिला इंद्रजितच्या पाठीला पाठ लावून उभी राहिली. दामू काकांनी एका दोरीने महिलेला मजबूत पणे बांधले. दोन तीन वेळा त्यांनी गाठ पक्की आहे , याची खात्री करून घेतली.
" ताई , तयार ? " इंद्रजितने महिलेला पुन्हा एकदा विचारले.
" ह..हो " त्या महिलेने घाबरत होकार दिला.
" दामू काका , जसं मी दार उघडेल , तसं ते लगेच लावून घ्या ! बाहेरचं पाणी आत येऊ देऊ नका ! " इंद्रजितने काकांना सूचना केली. इंद्रजित दाराजवळ येऊन थांबला
दामू काका आणि आजीबाईही त्याच्यामागे येऊन उभे राहिले.
" तुम्ही लांब थांबा ! " दामू काकांनी आजीबाईला मागे केले. त्यांचा मंत्रोच्चार सुरूच होता. ईशा लांबूनच सगळं बघत होती. तिला जरी इंद्रजित जे करतोय ते बरोबर वाटत नसलं , तरी तिला त्याच्या आणि महिलेबद्दल भीती वाटत होती.
" कोणीही काळजी करू नका , घाबरू नका ! जेव्हा मी किंवा इतर कोणी मदतीला परत येईल तेव्हाच दार उघडा ! " इंद्रजितने बोलून हळूच दार हँडलला पकडून दरमागे ओढले. ती महिला भीतीने थरथर कापू लागली. दाराबाहेर येताच इंद्रजितच्या पोटापर्यंत पाणी लागले. पाण्याचा प्रवाह थोडा जास्त होता. वरून हलका पाऊस सुरू होता. त्याने समोर एक नजर टाकली. त्या बिल्डिंगच्या खाली काही लोकांनी त्यांना पाहिले होते. जराही वेळ न दडवता त्याने प्रवाहाचा आणि घेत पाठीवरील महिलेच्या वजनाचा अंदाज घेत पाण्यात झेप घेतली.
दामू काका , आजी आणि ईशा ऑफीसमधून जे दिसेल ते बघत होते. जशी इंद्रजितने झेप घेतली , तसा आजीबाईंचा मंत्रोच्चाराचा वेग वाढला. तर इशा आणि दामू काकांच्या हृदयाचे ठोके.
प्रवाहाचा वेग चिरत इंद्रजित पटापट पुढं जात होता. श्वास घ्यायला त्रास होऊ नये म्हणून त्याने डोके बाहेर काढले. महिलेच्या नाकातोंडात पाणी गेल्याने ती मोठ्याने खोकू लागली. तिचे हृदय जोरजोराने धडधडत होते. थोडावेळ तसाच प्रवाहाचा वेगाचा अंदाज घेत तो उभा राहिला. सुदैवाने प्रवाहाचा वेग कमी झाला होता. त्याने एक मोठा श्वास घेत पुन्हा पाण्यात डुबकी घेतली. जितक्या वेगाने पोहोता येईल तितक्या वेगाने पोहोत तो पाण्याला कापत होता. अजून एकदा पाण्यातून डोकं बाहेर काढत त्याने समोर पाहिले. आरा अंतर बरेच कमी होते. त्या बिल्डिंगखाली लोक उभे राहून कुतूहल आणि आश्चर्याने त्यांच्याकडे बघत उभे होते. काही जणांनी तर व्हिडीओ शूटिंग ही चालू केले. पटापट अंतर कापत असतानाच एके ठिकाणी त्याला एक बाईक पाण्यात वाहून चाललेली दिसली. इंद्रजितने लांबूनच अंदाज घेतला. ती बाईक नेमकी प्रवाहाच्या दिशेनेच पुढंपुढं सरकत चालली होती. ती बाईकला पार करणे फार मोठे आव्हान होते. जर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने गेलं तर वाहून जाण्याचा धोका , तर दुसरीकडे ती बाईकचा अडथळा !
पोहोत पोहोत बाईकजवळ येताच त्याने पाण्यातून डोकं बाहेर काढून उभा राहिला. तोंडाने श्वास घेत त्याने समोर पाहिले. समोरून एक तरुण पोहोत पोहोत त्या गाडीच्या दिशेने येत होता. तो जवळ येईपर्यंत इंद्रजित त्या महिलेला संभाळत तसाच उभा होता. प्रवाहाचा वेग मंदावल्याने त्याला उभं राहणं शक्य होत होतं. त्या पोहोत येणाऱ्या तरुणाने बाईकजवळ पोहोचत ती बाईक मोठ्या ताकदीने बाजूला करत होता. मोठ्या प्रयत्नाने त्याने ती बाईक बाजूला केली. इंद्रजितने बाईक दूर होताच पुन्हा पाण्यात डुबकी मारली. पटापट अंतर कापत तो बिल्डिंगच्या गेटजवळ आला. तिथे उंच भाग असल्याने जास्त पाणी नव्हते. इंद्रजित त्या बिल्डिंगच्या जवळ येताच तिथे उभे असणारे लोकं पुढं सरसावले. एकाने पटकन त्यांच्या दोरीची गाठ मोकळी केली. दोन तरुणांनी लगेचच त्यांना पकडून बिल्डिंमधल्या एका बाकड्यावर आणून बसवले. इंद्रजितचा श्वास जोराजोरात चालू होता. ती महिलेला अजूनही श्वास सुरळीत झाला नव्हता. आपण सुटलो याचे वेगळेच समाधान तिच्या चेहऱ्यावर दिसत होते. इंद्रजितचे काम अजूनही संपले नव्हते. ते तिघे जण अजूनही तिकडेच होते. थोडावेळ इंद्रजित शांत होईपर्यंत त्या बिल्डिंगमधल्या लोकांची बाजूला चर्चा सुरू होती.
" तुम्ही कुठे अडकला होतात ? " काहीवेळाने एका तरुणाने विचारले.
" त्या ऑफिसमध्ये.." इंद्रजितने समोर ऑफिसकडे हात केला.
" मग तुम्ही कोणाला फोनद्वारे कळवलं का नाही ? " दुसरा तरुण बोलला.
" आम्ही ऑफिसच्या बॉसला कळवले होते , पण त्यानंतर नेटवर्क नसल्यामुळे काही संपर्क झाला नाही. "
" अजून कोणी आहे का मध्ये ? आर्मीचे जवान यायला वेळ लागेल , त्याआधीच आम्ही त्यांना बाहेर काढतो. आता प्रवाहाचा वेग पण कमी आहे. " एक तरुण बाकीच्यांना वाचवण्याच्या तयारीतचं बोलला
" अजून तीन जण आहेत , एक तरुणी , एक आजीबाई , आणि एक वयस्कर काका आहेत..मी ही येतो.." इंद्रजित पुन्हा जाण्यास उठला.
" तुम्ही थांबा , आम्ही दोघे जातो." तरुण त्याला थांबवत म्हणाला.
" ऐका माझं ! तिघे जाऊन एकाच वेळी सगळ्यांना वाचवू.." इंद्रजित विश्वासाने म्हणाला.
" ठीक आहे चला लगेच.."
त्या दोन तरुणांनी त्यांच्याकडील दोऱ्या स्वतःभोवती बांधल्या. इंद्रजितही तयार झाला. यावेळी अजूनच मोठे आव्हान होते , कारण आता त्यांना पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जावे लागणार होते. इंद्रजितने स्वतःला धीर देत मनाला तयार केले. एकमेकांकडे विश्वासाने पाहून वाहणाऱ्या पाण्याचा अंदाज घेत तिघांनी पाण्यात उड्या टाकल्या.
इकडे त्या महिलेला धीर देण्यासाठी बिल्डिंग मधल्या महिला प्रयत्न करत होत्या. एका जणाने मदतीसाठी पोलिसांना फोन लावून झालेल्या प्रकारची माहिती दिली.
इकडे इंद्रजितसह ते दोघे तरुण पाण्याचा प्रवाह कापत कापत पुढं जात होते. त्या दोन तरुणांना सवय असल्याने ते दोघे पटापट अंतर कापत त्या ऑफिसजवळ पोहोचले.
त्या तरुणांना बघून दामू काकांनी लगेच दार उघडले. ते दोघे तरुण आत शिरले. इंद्रजित मागून येत तो ही लगेच आत शिरला.
" आम्ही तुम्हाला वाचवायला आलो आहोत , घाबरू नका ! " एक तरुण बोलला. इंद्रजितला पाहून आजीबाईंना हायसे वाटले.
" राम राम..माझ्या पोरा , तू तर खरंच देवदूत आहे रे.." आजीबाईंनी मायेने इंद्रजितच्या डोक्यावरून हात फिरवला. ईशालाही आता इंद्रजितबद्दल कौतुक वाटू लागले.
" आजीबाई लवकर इथून चला.." इंद्रजित घाईने बोलला. त्यातील एका तरुणाने आजीबाईंना आपल्या पाठीवर बांधून घेतले , तर एकाने दामू काकांना.
" आपण पुन्हा विचार करा , यायचं का नाही ? " इंद्रजित इशा कडे पाहून बोलला.
" म्हणजे काय ? गंमत करू नका , मला घेऊन चला इथून ! " ईशा चिडून बोलली.
इंद्रजितने पटकन तिला आपल्या पाठीवर बांधून घेतले.
तिघे जण एकेकाला पाठीवर बांधून बाहेर आले. तिघांनी एकएक करून पाण्यात उड्या मारल्या. पटापट अंतर कापत तिघे जण पुढं पुढं जात होते. बिल्डिंजवळ सर्व जण त्यांच्याकडे श्वास रोखून बघत होते.
एकएक करत तिघे पाणी पार करून बिल्डिंगजवळ पोहोचले. उभ्या असलेल्या लोकांनी पटकन पुढं होत त्यांना मोकळं केलं. आजीबाईंना श्वास घेण्यास त्रास होत होता. इतर स्त्रियांनी आजीबाईंना बाकड्यावर बसवत शांत होण्यास वेळ दिला. सगळेजण कौतुकाने इंद्रजितकडे पाहत होते. त्याच्या धाडसाने सगळेच अचंभीत झाले होते. ईशाला आपण सुटलो आहोत यापेक्षा जास्त कौतुक इंद्रजितच्या धाडसाचे वाटत होते. त्याने खरोखरचं हिरोसारखं काम केलं होतं.
" तुम्ही खूप धाडसी आहात ! खरंच तुम्ही हिरो आहात ! " ईशा इंद्रजितचं कौतुक करत बोलली.
" तुमच्यामुळे मी माझ्या मुलाला परत भेटू शकेन , कसे आभार मनू मी आपले ! " त्या महिलेने इंद्रजितचे आभार मानले.
" तुम्ही खरंच देवसारखं काम केलं आहे ! " दामू काकांनी कौतुकाने त्याच्या पाठीवर थाप दिली.
" आजीबाई बरोबर बोलल्या होत्या , देव येईल वाचवायला ! " ईशा बोलली.
" देव नाही , देवदूत ! मला पूर्ण विश्वास होता देवावर..तो कोणत्या ना कोणत्या रुपात येऊन मला वाचवणार अशी खात्री होती मला ! " आजीबाईंनी हात जोडून आकाशाकडे पाहिले.
" माझ्या इतकंच श्रेय त्या दोघांनाही जातं ! " इंद्रजित त्या दोन तरुणांचे कौतुक करत बोलला. खरंच त्यांचही त्यात तितकंच योगदान होतं.
" सॉरी , मी तुम्हाला खूप काही बोलले त्यासाठी ! " ईशाला आपली चूक कळाली होती. तिने इंद्रजितची माफी मागितली. यावर इंद्रजित फक्त हसला.
" पण आपलं नाव सांगितलं नाहीत..काय नाव आपलं ? " ईशाने विचारले.
" इंद्रजित.." इंद्रजितने आपले नाव सांगितले. ईशाला त्याच्या नावातही वेगळेपणा वाटला.
" आपल्या ऑफिसच्या बॉसचा पोलिसांची आज सकाळीच संपर्क झाला. त्यांनी कळवलं होत याबद्दल , पण इतर ठिकाणी मदतीची जास्त गरज असल्याने आर्मी किंवा कोणीही मदतीला वेळेत पोहोचू शकलं नाही. आम्ही इथं असूनही आम्हाला तुमच्याबद्दल समजले नाही , त्यामुळे आम्ही खरं तर आपली माफी मागायला हवी..आणि खरंच तुमच्या धाडसी निर्णयाचे कौतुक करायला पाहिजे. " एक जण पुढं होत म्हणाला.
" हे माझं माणूस म्हणून कर्तव्य होतं , जे मी पूर्ण केलं यातच माझा आनंद आहे. " इंद्रजित समाधानी हसला.

काहीवेळाने पोलीस तिथे आले. इतर लोकांनी झालेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. त्यांनी इंद्रजितच्या धाडसी निर्णयाचे कौतुक करत त्याला शाबासकी दिली. पोलिसांनी सर्वांना सुखरूपपणे त्यांच्या घरी पोहोचविले.
याबद्दल सगळीकडे समजताच इंद्रजितचे सगळीकडून कौतुक व्हायला लागले. वृत्तपत्र , बातम्या यांमधून त्याचे आणि त्या दोन तरुणांचे तोंडभरून कौतुक झाले.

ईशाने झालेला सगळा प्रकार आपल्या डायरीत उतरवला.एक वेगळाच अनुभव तिने अनुभवला होता. प्रत्येकाची मनावस्था कशी होती याबद्दल तिने खूप चांगल्या प्रकारे आपल्या डायरीत उतरवले. पण त्याला शीर्षक काय द्यावं तिला समजेना. शेवटी खूप विचारांनंतर तिने शीर्षक दिले - ' माणसातला देवदूत '..
***********************************