बळी - १८ Amita a. Salvi द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

बळी - १८

बळी - १८
काय खरं-- काय खोटं; हे केदारला कळत नव्हतं. तो बराच वेळ डोकं धरून बसला होता -- विचार करत होता,
"सहा महिन्यांपूर्वी मी रंजनाबरोबर सिनेमाला निघालो होतो? हे कसं शक्य आहे?" पण नंतर त्याचं मन त्याला सांगू लागलं,
"ही माझ्यावर प्रेम करणारी माणसं माझ्याशी नक्कीच खोटं बोलणार नाहीत.--- पण हा सहा महिन्याचा घोळ काय आहे? मला नक्की आठवतंय, की मी डाॅक्टर पटेलांच्या बंगल्यात रहात होतो --- हाॅस्पिटलमध्ये काम करत होतो --- निशा मला खूप आवडू लागली होती! इतकी लाघवी आणि सुस्वभावी मुलगी मला आवडली नसती, तरच नवल! पण मी रंजनाला कसा विसरलो?"
त्याला डाॅ. श्रीकांतचा सल्ला आठवला; आणि त्याने स्वतःला सावरलं,
" मला शांत राहून नक्की काय झालं हे जाणून घ्यावं लागेल! आत्मविश्वास गमावून चालणार नाही! प्रथम हे सगळे काय सांगणार आहेत, ते ऐकून घेतलं पाहिजे! ही इतकी मोठी माणसं:माझ्यासाठी स्वतःचा वेळ देतायत माझ्याकडे इतकं लक्ष देतायत हे विसरून चालणार नाही! " तो स्वतःशी म्हणाला.
त्याने डाॅक्टर श्रीकांतकडे पहात विचारलं,
"मला काहीच कळत नाही! तुम्हीच सांगा डाॅक्टर ; की नक्की काय घडलंय!"
ते हसले आणि म्हणाले,
"रजनी-- साॅरी -- केदार! इथे सगळ्यांनी तुझं नाव रजनीकांत ठेवलं होतं! तुझं नाव केदार आहे; हे काल आम्हाला कळलं! गेले सहा महिने तू स्वतःचं नावही विसरला होतास!"
"पण मला सगळ्याचा विसर पडावा, असं काय घडलं? तुम्हाला काही माहीत आहे का?" केदारने विचारलं. आता त्यालाही कुतुहल वाटू लागलं होतं.
"मलाही फारसं काही माहीत नाही; पण इतकं माहीत आहे - की सहा महिन्यांपूर्वी रात्री तू समुद्रातून पोहत येत होतास; आणि मदतीसाठी हात करत होतास--- शामने आणि संदीपने तुला पाहिलं; आणि तुझा जीव वाचवला; पण कशावर तरी डोकं आपटून तुला जखम झाली! खूप रक्तस्त्राव होत होता! डाॅक्टर पटेल त्यावेळी त्याच रस्त्याने घरी चालले होते! त्यांनी तुझी गंभीर अवस्था बघून तुला त्यांच्या हाॅस्पिटलमध्ये अॅडमिट करून घेतलं! तू बरा झालास; पण तुझी पूर्वयुष्याची स्मृती पूर्णपणे पुसली गेली! सहा महिने त्यांनीच तुला सांभाळलं! --- काही आठवतंय?"
" होय! त्यांनी मला जे प्रेम दिलं; ते मी कसं विसरेन?" केदार प्रमिलाबेनकडे बघत म्हणाला. त्याचे हात आपसूकच जोडले गेले होते. प्रमिलाबेनच्या डोळ्यात अश्रू होते. केदार आपल्याला विसरला नाही; ही त्यांच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती.
आता केदारला ब-याच गोष्टींचा उलगडा होऊ लागला होता. ती टॅक्सी-- दोघांनी केलेलं त्याचं आपहरण-- गोराई बीच --- सगळा चित्रपट त्याच्या नजरेसमोरून सरकला होता.
" डाॅक्टर श्रीकांतनी तुला गेल्या सहा महिन्यात काय घडलं हे सांगितलं; पण तू कोण -- कुठला हे आम्हाला आजही माहीत नाही! गेले कित्येक दिवस आम्ही तुझी काही माहिती मिळावी म्हणून प्रयत्न करतोय; पण पोलीसखातंही तुझ्याविषयी माहिती मिळवू शकलं नाही! त्यांनीही अनेक बाजूंनी प्रयत्न केले; पण काहीही उपयोग झाला नाही! आता तू स्वतःच तुझ्याविषयी आम्हाला सांग! महत्वाची गोष्ट म्हणजे, तू एवढ्या रात्री एकटाच समुद्रात पोहायला का गेला होतास? तुला अस्वस्थ वाटत असेल; तर थोडी विश्रांती घे; आपण नंतर बोलू!" इन्सपेक्टर म्हणाले.
"मी सांगतो तुम्हाला -- आता ठीक आहे मी!" केदार म्हणाला.
केदारने एकदा सगळ्यांकडे बघितलं! सगळ्यांच्या उत्सुक नजरा त्याच्याकडे रोखलेल्या होत्या.
"मी केदार -- गोरेगावला नवजीवन काॅलनीत आमचा लहानसा बंगला आहे!" केदारने बोलायला सुरुवात केली.
"मी काॅम्प्यूटर इंजिनियरिंगमध्ये मी एम. ई. केलं आहे. शाळेत असल्यापासून पोहण्याची विशेष आवड होती! त्यामध्येही प्रविण्य मिळवलं होतं--- अनेक बक्षिसं मिळवली होती-----! स्विमिंग चँपीयन होतो; कदाचित् त्यामुळेच मी मोठ्या संकटातून वाचलो; आणि आज तुमच्याबरोबर आहे!" केदार थांबला. तिघांच्या चेह-यावर दिसणारं आश्चर्य निरखत पुढे बोलू लागला.
" एम. ई. झाल्यावर एका मोठ्या कंपनीत मला एक्झिक्यूटिव्ह म्हणून जाॅब मिळाला; पण मला स्वतःचा बिझनेस चालू करायचा होता. मी नोकरी सोडून माझ्या एका चार्टर्ड अकाउंटंट मित्राबरोबर कन्सल्टिंगचा बिझनेस सुरू केला! आमच्या बंगल्यातच आम्ही लहानसं आॅफिस थाटलं होतं! आमचा व्यवसाय खूपच चांगला चालला होता. पैसेही चांगले मिळत होते. मी या आनंदात होतो; की मला शिक्षण घेताना त्रास सहन करावा लागला, तसा माझ्या भावंडांना सहन करावा लागणार नाही. त्या दोघांनाही उत्तम शिक्षण घेता आलं पाहिजे, हे माझं ध्येय होतं! मला आईला सुखात ठेवायचं होतं! तिने बाबांच्या मागे आमच्यासाठी खूप कष्ट घेतले होते!"
"आईवर अाणि भावंडांवर तुझा खूपच जीव आहे; असं दिसतंय! " दिवाकर त्याला बोलतं करण्यासाठी म्हणाले.
" होय! आमचं सुखी कुटुंब आहे! मधल्या काळात माझी आई एका नातेवाईकांच्या लग्नाला गेली होती; तिथे तिने रंजनाला पाहिलं! तिला ती खूप आवडली आणि तिने मनोमन माझं लग्न रंजनाशी पक्कं करून टाकलं. आम्ही रंजनाला बघायला काटेगावला गेलो; मलाही ती पसंत पडली आणि लवकरच आमचं लग्न झालं!" केदार भूतकाळात तल्लीन झाला होता. दिवाकर त्याला थांबवत मध्येच विचारू लागले,
"पण तू शहरात रहाणारा वेल एज्युकेटेड स्मार्ट मुलगा --- इतक्या आडगावात रहाणारी मुलगी कशी पसंत केलीस?" इन्स्पेक्टर दिवाकरना या केसमध्ये काही धटगेदोरे तपासायचे होते.
"माझं इतकं मोठं करिअर होतं पण आईला दूर आडगावात रहाणारी रंजना पसंत पडली! माझ्यासाठी आईच्या इच्छेला खूप जास्त महत्व होतं! मी प्रथम नाराज होतो; कारण रंजना फक्त एस.एस.सी. होती. ती फार शिकलेली नव्हती; पण सुंदरतेमध्ये य लाखात एक होती ! तिला पाहिलं; आणि मलाही आवडली!आईच्या इच्छेखातर मी लग्न केलं हे खरं आहे; पण माझ्याही मनाविरूध्द झालं नव्हतं. " रंजनाचा विषय आल्यावर केदार सगळं सविस्तर सांगू लागला.
"लग्नाला साधारण एक आठवडा झाला होता; त्या दिवशी तिच्या मोठ्या बहिणीने- नेहा दीदीने आम्हाला रात्री जेवायला बोलावलं होतं! आम्ही दुपारी सिनेमा बघायला जाऊन; तिकडून येताना रात्री नेहा दीदीकडे जायचं ठरवलं! आम्ही एकत्र प्रथमच बाहेर पडलो होतो! चार दिवसांनी कुलदेवतेचं दर्शन घ्यायला गावी जाणार होतो. त्यानंतर हनीमूनसाठी महाबळेश्वरला हाॅटेल बुक केलं होतं!" केदार लग्नानंतरचे दिवस आठवताना हरवून गेला होता.त्याला रंजनाचं अलौकिक सौदर्य आठवत होतं. चेहरा लग्नाच्या आठवणींनी उजळून गेला होता; पण त्याच वेळी त्याला काही आठवलं चेहरा लालबुंद झाला.
तो पुढे सांगू लागला,
"नेहा दीदीचं घर थिएटरच्या मार्गावरच आहे--- आम्ही सिनेमाला जाण्यापू्र्वी दीदीची पुस्तकं देण्यासाठी दीदीकडे जाऊन मग पुढे जायचं; असं ठरवलं! आमची टॅक्सी रंजनाच्या दीदीच्या बिल्डिंगसमोर थांबली आम्ही दोघंही उतरलो; आणि आमच्या लक्षात आलं, की दीदीच्या मुलांसाठी खाऊ घ्यायला आम्ही विसरलो होतो! रंजना दीदीच्या घरी गेली, आणि मी त्याच टॅक्सीत बसून मिठाई घ्यायला पुढे गेलो. टॅक्सी चालू होण्यापूर्वीच एक तरूण माझ्या बाजूला येऊन बसला. दोघेही सुरूवातीला माझ्याशी खूप चांगल्या गप्पा मारत होते पण नंतर माझ्या लक्षात आलं, की मला ते दोघे खूप दूर घेऊन आले होते!"
"म्हणजे त्यांनी तुला किडनॅप केलं! पैशाची किंवा दागिन्यांची मागणी केली असेल!" इन्सपेक्टर दिवाकरचा हा प्रश्न ऐकून केदार कसंनुसं हसला.
"मी त्यांना म्हणालो; की पैसे आणि चेन घेऊन मला सोडून द्या, पण त्यांना माझा जीव घ्यायचा होता!" घडलेल्या गोष्टींमुळे झालेला त्रास आठवून त्याचा चेहरा कठोर झाला होता.
"हे तुला कसं कळलं?" दिवाकरच्या या प्रश्नावर केदार सागू लागला,
"कारण ते मला म्हणाले, - "आम्ही एवढा आटापिटा केला, तो तुला सोडून द्यायला?" - - मला कळत नव्हतं; मी ज्यांना ओळखत नाही; कधी पाहिलं नाही, त्या माणसांचा माझ्यावर इतका राग का?"
"खरंच तू त्यांना ओळखत नव्हतास?" इन्स्पेक्टर आश्चर्याने विचारत होते.
"तशी टॅक्सीत बसल्यावर त्याने रंजनाच्या शेजारच्या गावचा असल्याची जुजबी ओळख काढली होती! तो दुसरा माणूसही त्याच्याच गावचा होता; हे मला त्यांच्या बोलण्यावरून कळलं!" केदार म्हणाला.
"मग रंजनाने तुझ्या घरची सगळी माहिती त्याला सांगितली असेलच! हे बदमाश अशीच माहिती मिळवतात!" इन्सपेक्टर चिडून बोलत होते.
"नाही साहेब! त्यांच्या गप्पा त्यांच्या गावविषयी चालल्या होत्या! आमच्या घराविषयी तिने काहीही सांगितलं नाही!" केदारला रंजनावर आरोप लावलेला आवडला नव्हता.
******* contd. -- part 19.