Bali - 21 books and stories free download online pdf in Marathi

बळी - २१

बळी -- २१
स्वतःच्या मुलावर आपण विश्वास ठेवला नाही; हे इन्सपेक्टर साहेबांना आवडलेलं नाही; हे मीराताईंनी ओळखलं होतं. त्या त्यांच्या वागण्याचं स्पष्टीकरण देऊ लागल्या,
"केदार अभिमान वाटावा असा मुलगा आहे; माझ्यावर आणि भावंडांवर जीव लावणारा माझा केदार असं काही करेल; यावर माझा अजूनही विश्वास बसत नाही; पण कपाटाची चावी केदार आणि रंजना दोघांकडेच होती-- दुस-या कोणी कपाट उघडणं शक्यच नव्हतं! मला हे माहीत होतं; की त्याने नाइलाजास्तव - माझ्या समाधानासाठी रंजनाशी लग्न केलं होतं; त्यामुळे समोर दिसणारे पुरावे मी नाकारू शकले नाही! तो जरी चुकला होता; तरीही माझा लाडका मुलगा होता--- पोलिसांनी चोरीच्या आरोपाखाली बंदी बनवण्यासाठी त्याचा शोध घ्यावा; हे माझ्या मनाला पटत नव्हतं!"
मीराताईंनी डोळे पुसले; आणि पुढे बोलू लागल्या,
"खरोखरीचा मनाचा मोठेपण रंजनाने दाखवला! तिने केदारवर चोरीचा कलंक लागण्यापेक्षा दागिन्यांवर पाणी सोडणं पसंत केलं! "पोलीस कंप्लेट करायची नाही! पोलिसांनी केदारचा एक गुन्हेगार म्हणून शोध घ्यावा, हे मला आवडणार नाही--" असं तिने सगळ्यांना ठासून सागितलं. तिचे वडीलही आतापर्यंत आमच्याशी माणुसकीचा दृष्टिकोन ठेवून वागले आहेत! पैशांसाठी आणि दागिन्यांसाठी त्यांनी माझ्यामागे लकडा लावला नाही! जर ते पैशांसाठी मागे लागले असते; तर मी काय करणार होते? सध्या आमचं घर आणि मुलांचं शिक्षण कसंबसं चाललंय! खरंच खूप मोठ्या मनाची माणसं आहेत! --आता फक्त एक ना एक दिवस केदार घरी येईल, या आशेवर मी जगतेय! त्याच्या वाटेला डोळे लावून बसलेय! "
"एवढा ऐवज घेऊन बाहेर पडायचं म्हणजे हातात एखादी मोठी बॅग घेऊनच केदार निघाला असेल; केदार जेव्हा रंजनाला घेऊन बाहेर पडला; तेव्हा त्याच्याकडे तू अशी बॅग त्याच्या हातात पाहिलीस का? " इन्सपेक्टर कीर्तीला विचारू लागले.
" नाही! त्याच्या हातात त्या दिवशी कोणतीही मोठी बॅग नव्हती! पैशांचं पाकीट आणि मोबाइल त्याने शर्टच्या आणि पँटच्या खिशात ठेवले होते! मला चांगलं आठवतंय; त्याची ब्रीफ- केसही त्याने घेतली नव्हती! " कीर्ती आत्मविश्वासाने बोलत होती.
"असं असतानाही त्याने घरातला ऐवज पळवला; असं कोणीतरी म्हणालं; आणि तुम्ही विश्वास ठेवला! सेटल झालेला बिझनेस - घरदार सोडून एवढ्याशा पुंजीवर माणूस आयुष्य काढू शकतो का? त्या पेक्षा अनेक चांगले पर्याय त्याच्यासारख्या सुशिक्षित अाणि हुशार मुलाला उपलब्ध होते! जर कोणावर प्रेम असेल; लग्नाला नाही म्हणू शकत होता! --- तुम्हाला सोडून एकाकी आयुष्य काढण्याऐवजी तो बायकोला घटस्फोट देऊ शकत होता! तुमच्यावर त्याचं इतकं प्रेम आहे, की तो त्याच्या मनाविरुद्ध लग्नाला तयार झाला, पण गेल्या सहा महिन्यात एकदाही त्याने तुमच्याशी संपर्क साधला नाही; हे कसं शक्य आहे? तुम्हाला जराही संशय आला नाही? त्याची काळजी वाटली नाही?" दिवाकरांच्या स्वरात उपहास डोकावत होता.
"मी आणि नकुल तेव्हाही म्हणत होतो की दादा असं करणं शक्य नाही; आपण पोलीस कंप्लेट करूया! पण आई लोकापवादाला इतकी घाबरली होती; की तयार झाली नाही! आमच्या अभ्यासात व्यत्यय येईल; म्हणून आईने पोलीस कंप्लेंट केली नाही! पण खरं सांगू इन्स्पेक्टर साहेब! -- दादाची मला खूप काळजी वाटते; अभ्यासात लक्ष लागत नाही! बरं झालं; तुम्ही यात लक्ष घातलं आहे ते -- तुम्ही माझ्या दादाला शोधून काढा! मग नक्की काय घडलंय; ते समोर येईल! माझी खात्री आहे-- माझा केदार दादा निर्दोष आहे! फक्त तो सुखरूप असूदे!" कीर्ती मोठ्या अपेक्षेने दिवाकरना म्हणाली. तिच्या डोळ्यात केदारच्या आठवणीने पाणी तरळलं होतं.
आता मीराताईंनी मान खाली घातली होती. आपण निर्णय घेताना खूप मोठी चूक केली आहे; हे त्यांना आता कळत होतं.
" होय! नक्की!" दिवाकर म्हणाले. ते व्यवस्थित आणि नीटनेटक्या हाॅलचं निरीक्षण करत मीराताईंना विचारू लागले.
"तुम्ही अजूनही नोकरी करता?"
कोणी कमावणारं नसताना घर नीटनेटकं -- मुलांचं शिक्षण व्यवस्थित चाललं आहे--- हे कसं? हा प्रश्न त्यांना पडला होता.
" केदारचं शिक्षण होईपर्यंत मी नोकरी करत होते, पण नंतर केदारने मला नोकरी सोडायला लावली होती! --"तू आमच्यासाठी खूप कष्ट घेतलेस--- आता मी तुला सुखात ठेवणार--" असं तो म्हणायचा!" मीराताईंच्या डोळ्यांत केदारच्या आठवणीने पाणी तरळलं होतं. त्या पुढे सागू लागल्या,
" घरात तो एकच कमावणारा होता; धाकटी दोन्ही मुलं शिकतायत! पण केदारच्या मित्राने- सिद्धेशने नकुलला - माझ्या धाकट्या मुलाला स्वतःबरोबर घेऊन बिझनेस चालू ठेवला आहे. दर महिन्याला पैसे देतो, त्यामुळे आर्थिक दृष्ट्या ठीक चाललं आहे. या प्रकरणाची झळ केदारला आणि त्याचबरोबर या दोघा मुलांना लागू नये; म्हणून मी माझ्या डोळ्यातले अश्रू आजपर्यंत मी कोणाला दिसू दिले नाहीत. मनावर दगड ठेऊन दिवस काढतेय! आता जर घरात पोलीस आले; हे आजूबाजूला कळलं तर लोक आम्हाला काय म्हणतील? ; मुलांना टोमणे ऐकावे लागतील; ती दुखावली जातील! लोक अशा वेळी कसे वागतात; ह्याची कीर्तीला कल्पना नाही ; पण मी जग पाहिलं आहे!"
"तसं काही होणार नाही! चिंता करू नका! तुमच्या घराची बदनामी होणार नाही, तुमच्या प्रतिष्ठेला डाग लागणार नाही; याची काळजी आम्ही घेऊ! पण आम्ही चौकशी करतोय, ही गोष्ट तुम्ही बाहेर कोणाला सांगू नका!" इकडे-तिकडे बघत त्यांनी विचारलं,
"घरातले बाकी सगळे कुठे आहेत?"
" नकुल सकाळीच काॅलेजला गेला आहे! कीर्तीबरोबर तुमचं आताच बोलणं झालं; सिद्धेश त्याच्या आॅफिसमध्ये बसून काम करतोय! त्याला बोलावून घेऊ का? तो केदारचा काॅलेजपासूनचा मित्र आहे; माझ्या मुलासारखाच आहे तो! केदार बेपत्ता होण्याच्या आदल्या दिवसापर्यत दोघे एकत्र काम करत होते! मी त्याच्याकडून केदारची कोणी मैत्रीण होती का; याविषयी माहिती काढण्याचा खुप प्रयत्न केला; पण त्याला त्याविषयी काही कल्पना नाही! तुम्हाला त्याच्याकडून माहिती मिळाली तर बघा!" मीराताईनी उत्तर दिलं.
"त्याच्याशी मी नक्कीच बोलेन! पण आता नाही! त्याला पोलीस स्टेशनला बोलावून घेईन! आता तो काम करत असेल! त्याच्या कामात व्यत्यय नको! त्याचा फोन नंबर मला देऊन ठेवा! केदारची बायको--- रंजना-- ती नोकरी वगैरे करते का? घरी असेल, तर तिला काही प्रश्न विचारायचे आहेत! शेवटच्या दिवशी तीच त्याच्या बरोबर होती; तुम्ही सगळे जी माहिती देताय; ती तुम्हाला तिच्याकडूनच मिळाली आहे! तिच्याकडून आणखी काही माहिती मिळाली, तर शोध लवकर घेता येईल!" हे विचारताना दिवाकर किचनकडे पहात होते; पण किचनमध्ये कोणी दिसत नव्हतं!
"रंजना इथे रहात नाही! त्या प्रसंगानंतर जेव्हा तिच्या वडिलांना घडलेला प्रकार कळला तेव्हा त्यांनी इथे येऊन खूप त्रागा केला! पण जेव्हा मी सगळी परिस्थिती समजावून सांगितली तेव्हा शांत झाले! रंजनाला काही दिवसांसाठी म्हणून त्यांच्या घरी घेऊन गेले! पण नंतर तिने तिकडेच फॅशन डिझायनिंगचा कोर्स सुरू केला, त्यामुळे अजून तिकडेच आहे! तिच्या माणसांमध्ये राहिली, तर दुःखाचा विसर पडेल, म्हणून ती तिच्या आईकडेच राहिलेली बरी, असा विचार मी सुद्धा केला! खूप चांगली मुलगी आहे! इथे तिने स्वतःला एका खोलीत कोंडून घेतलं होतं; नीट जेवत- खात नव्हती! तिची अवस्था खूप वाईट झाली होती! मोठ्या घरची -- लाडात वाढलेली मुलगी --- लग्नानंतर एका आठवड्यात संसार उधळला होता तिचा! तिची मानसिक स्थिती यापेक्षा वेगळी काय असणार? " मीराताई माहिती देत होत्या.
"रंजना तुमची खूपच लाडकी सून आहे; हे ठीक अाहे; पण तिच्याविषयी वाटणारी अनुकंपा इतकी भारी झाली; की तुम्हाला तिच्या दुःखापुढे स्वतःच्या मुलाची काळजी वाटेनाशी झाली!"
दिवाकरांच्या स्वरात वैषम्य होतं! गेले सहा महिने केदार कोणत्या मनःस्थितीतून जातोय; हे मीराताईंना सांगून टाकावं; त्यांना जाब विचारावा असं मनापासून वाटत असूनही त्यांनी स्वतःला आवरलं! त्यांना केदारच्या अपहरणामागचं सत्य समजेपर्यंत कोणालाही विश्वासात घ्यायचं नव्हतं! त्यांना खात्री होती, की त्यांची पाठ वळताच मीराताई काटेगावला फोन करणार होत्या. अतिशय भोळ्या माणसांवर अशा मिशनमध्ये विश्वास ठेवणं धोक्याचं ठरू शकतं हा त्यांचा अनुभव होता.
"रंजनाच्या जागी माझी मुलगी असती तर-- हा विचार करते; यात माझं काही चुकतंय का?" मीराताईंनी असा प्रश्न विचारला; की दिवाकर निरुत्तर झाले.
******** contd.--- part 22.


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED