“मॅडम, गरीबाच्या पोटाला द्या की काही, .... ओ मॅडम!”
“रवी, फटकाऊन काढीन हां आता. गप्पं बस जरा.”
“आयला चिन्मयी, राव, किती गप्पं बसायचं? पूरा तास झाला आपल्याला या झाडाखाली बसून. तू त्या खोडाला टेकून बसलीस कधीची ढगांत नजर लावून, तो ढग आता बरसेल, मग बरसेल डोळ्यातून, आणि मग “झाले मोकळे आकाश” म्हणत मस्त चहा पिऊ म्हटलं तर कसलं काय ...”
“रव्या............! तुला खाण्या पिण्या शिवाय दुसरं काही दिसत नाही का रे?”
“घ्या आता! त्या कॅंटीन मधे मस्त कटवडा ओरपणार होतो, तेवढ्यात हाताला धरून उठवलंस, दरादरा ओढत या झाडाखाली बसवलंस, मला वाटलं माझ्यासाठी काहीतरी पाठवलंय काकूंनी, मस्त कोथिंबीर वडी किंवा कायतरी, ते तर काही देईनास, वर पोरं परत गेल्यावर ना ना प्रश्न विचारतील, की का बुवा नक्की काय केलं, तर सांगायला निदान काही चमचमीत पदार्थ तरी....”
भडकून चिन्मयीने जवळ पडलेली काटकी भिरकावली रवीच्या दिशेने.
मग मात्र तो मस्त गवतावर लोळत होता तो उठून बसला.
“चिन्मयी, माहौल बनवणं पुरे झालं, बोला आता पोपटासारखं पटापट. काय झालय सगळ्या दुनियेची मयत झाल्यासारखं तोंड करून बसायला?”
चिन्मयीने रागाने एकदा रवीकडे पाहीलं, पण मग मात्र तिचे डोळे भरून आले. घळाघळा डोळ्यातून घन बरसू लागले. रवी शांतपणे बसून राहीला. मग जवळच पडलेला चिन्मयीचाच लेडीज रुमाल उचलून त्याने तिच्यापुढे धरला. जरा शांत झाल्यावर चिन्मयी ने रवीकडे पाहीलं.
“इर्शाद...”
“पंकज ने भक्ती ला रोज दिलं.”
“ओह, ओह, ग्रेट! अभिनंदन! तुझी खास मैत्रीण गटली होय पंक्याला? आयला, मग तू रडतीयेस का? रडायचं बिडायचं लग्नाच्या वेळी बाळा, ती काय आत्ताच तुला सोडून नाही चालली.”
“रवी..... तू ना, अशक्य माणूस आहेस. तुझ्याशी बोलण्यातच काही अर्थ नाही. शी...”
“चिन्मयी, मग तू सांग तुला का रडू येतय?”
“मला पंकज आवडतो . प्रेम आहे माझं त्याच्यावर. मी जगूच शकत नाही रे त्याच्याशिवाय. पण, .... पण...” परत तिच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या.
“हं! बरं! मग, आत्ता इथे बसून रडण्याशिवाय तू काय केलंस याविषयी?”
“म्हणजे?”
“म्हणजे, ही परिस्थिती बदलायला तू काय केलंस?”
“हॅव यू लॉस्ट इट रवी? त्याने रेडरोज दिलय भक्तीला! रोज डे ला!”
“हो मग?”
“हो मग काय?”
“अगं त्याने भक्तीला रोज दिलं आणि तुझं पंकज वर प्रेम आहे या तशा एकमेकांशी निगडीत गोष्टी असतीलही, पण म्हणून तू काहीच करणार नाहीस? रडत बसणार?”
“मग मी काय करू?”
आपले मोठमोठाले काळेभोर डोळे रवीवर रोखून चिन्मयीने विचारलं, आणि बोलता बोलता रवीला घसा खाकरायला लागला.
“हं, तू काय करावंस बरं?”
“तू पंकजला रोज दे. फिट्टम फाट.”
“मुली नसतात रे देत. आणि त्याने तिला दिलय हे माहीत असून?”
“अगं तुझ्या जीवन मरणाचा प्रश्न आहे ना?”
“हो, पण, तरी, दोघं मिळून चेष्टा करतील रे माझी.”
“काय सांगतेस काय? असं करेल पंकज?आणि इतक्या उथळ मुलावर तू प्रेम बीम करतेस? जगू न शकण्याइतकं?”
“रवी.....”
“बघ आता, तूच तर म्हणालीस चेष्टा करेल तुझ्या भावनांची? एनी वे, गृहीत धरू की चेष्टा करेल, पण ते महत्वाचं नाहीच आहे. प्रेम तुला वाटतय ना त्याच्याविषयी? मग हो मोकळी देऊन गुलाब. तुम्हा मुलींना नाही का दहा दहा फुलं मिळतात , मिरवता की मग.”
“ए, रवी, तू कोणाला दिलंस रोज?”
“येडी झाली का? दहा रुपयाचा गुलाब रोज डे ला पन्नास रुपयाला पडतो. आपली आठवड्याची चहाची सोय कोण घालवेल?”
“अच्छा, म्हणजे विचार होता तर? हं, हं, सांगच आता, कोणाला देणार होतास?”
रवीने एक हात केसातून फिरवला, शांतपणे चिन्मयी कडे पाहत म्हणाला,
“छे गं, कोणाला द्यायचं म्हणून नव्हती केली चौकशी, गुलाबांचा स्टॉल टाकून काय चार पैसे कमावता येतात का म्हणून बघत होतो.”
“बास का? तुझा लठ्ठ पॉकेटमनी मला माहित आहे रव्या. उगाच थापा मारू नकोस. खरं खरं सांग?”
“कसल्या भोचक असता गं तुम्ही पोरी! आत्ता रडत होती पंकजने भक्तीला गुलाब दिला म्हणून, आणि आता बातमी काढायची म्हटलं की कशी आली उत्साहात.”
चिन्मयीचा चेहरा पडलेला बघून गडबडीने... “बरं बरं ठीक आहे. चल मला कटवडा खिलव मग तिथंच बघू कोणी दिसते का गुलाब देण्यालायक.”
“खादाड..... सतत खाण्याबद्दल विचार ... तू काय कोणाला गुलाब देणार?”
“हे घे, ... तुझ्यासाठीच आणला होता.” रवीने हळूच गुलाब पुढे केला. अनाहुतपणे चिन्मयीने तो घेतलाही.
“रवी..तू, मला ..”
“ए, टेन्शन नाही घ्यायचं. मला माहीत आहे तुला पंकज आवडतो. आणि मला तू आवडतेस. तुझ्या हातात गुलाब बघून कदाचित पंकजचं तुझ्याकडे लक्ष जाईल, तो तुझा विचार करेल. आणि मला आवडणाऱ्या मुलीला सतत आनंदात पाहायला मला आवडेल. चलो, मिशन पंकज की ओर...”
रवी चालायला लागला बॅग पाठीवर टाकून आणि चिन्मयी प्रथमच आपल्या या पाठमोऱ्या जीवलग मित्राकडे नव्याने पाहायला लागली!