लघुकथाए - 3 - चंद्रिका Mrs. Mrinmayee Shirgaonkar द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

लघुकथाए - 3 - चंद्रिका

ती सकाळी जरा उशीरानेच उठली. दात घासत गॅलरीत आली. सगळी चाळच आळसावलेली. कोणी अजून साखरझोपेत, रात्रीच्या श्रमांनी मोडून आलेली अंग दुमडून रजईत पडलेली. हवा तशी गारच पडली आज.

गॅलरीत पत्र्याच्या खालच्या वाशाला टांगलेल्या पत्र्याच्या डब्यातल्या तुळशीला तिने पाणी घातलं आणि चहाचं आधण चढवलं.

चहाचा घोट नरड्याखाली गेल्यावर मात्र तरतरी आली तिला. चहा पोटात जाताच निसर्गाच्या हाकेला ओ देत डब्बा घेऊन खाली उतरली. नशीबाने एक दार मोकळं मिळालं . मग वर येऊन आंघोळ करून उठवलं तिने पोराला.

“चल रे, उठ, उशीर होईल.”

मग फरफऱ्या स्टोव्हला पंप मारून एकीकडे इडलीचा कुकर, वातीच्या स्टोव्हवर चपात्या, भाजी, चटणी, सांबार, बघता बघता झालं सगळं. डबे भरले, पोराचे, आपले.

इस्त्री लावून त्याचे कपडे प्रेस केले.

परत पोराला हाकारला. तसा तो उठला. त्याची झोपही अर्धवट व्हायची. लहान वयात अजून झोप हवी मिळायला. पण इलाज नव्हता.

स्वच्छ पण मळखाऊ रंगाची साडी, घट्टं आंबाडा, काचेच्या दोन दोन बांगड्या, आणि गळ्यात काळ्या मण्यांचं डोरलं. चंद्रिका तयार झाली.

त्याला गरम पाणी दिलं आंघोळीला. चहा चपाती खाऊन दोघं बाहेर पडले. दोघांच्या खांद्याला भल्या थोरल्या पिशव्या.

भराभर चालत स्टेशनवर आले. रेल्वे पोलिसाने हटकलेच. एक नोट त्याच्या मुठीत सरकवून निघाली. ८.३३ ची लोकल. लोकलला गर्दी होतीच. लेडीज डब्यात शिरली.

“आली बघ!”

“ए, इकडे दे गं आधी.” तिसऱ्या कंपार्टमेंटमधून आवाज आला तशी भराभर तिकडे गेली. पोराला दुसऱ्या कंपार्टमेंटवाल्यांनी मागितलं तसा तो तिकडे गेला.

सराईतपणे डबे उघडून प्लास्टीक कंटेनरमधे इडली सांबार, वर शेव, छोट्या बंद डब्यात चटणी, चमचा. खाली प्लास्टीक थाळी. बायका खुश असायच्या हिच्यावर. भराभर सगळ्यांना देऊन परत मागे आली. मुलगाही तयारीने देत होता. बायका कौतुकाने पाहायच्या. आवर्जून हिच्याकडूनच घ्यायच्या.

पाहता पाहता माल खपत होता.

तिने परत थैली फिरवली उष्टी भांडी गोळा करायला.

“काय गं, काय करतेस यांचं? परत तीच नाही ना वापरत? “

“नाही नाही मॅडम. खाली उतरल्याबरोबर डस्टबीनमधे टाकते. या मॅडमना विचारा ना, त्या उतरतात माझ्याच बरेबर.”

“हो गं, रोज पाहते ना मी. स्वच्छ आहे स्वत:ही. त्यामुळे घेतो आम्ही रोज. रोज वेगळा असतो पदार्थ!”

रोजचं स्टेशन येईपर्यंत पैसे गोळा करून झाले.

दोघं उतरली. परत पुढची लोकल. सगळा माल संपला. दोघं दुपारपर्यंत घरी आली.

येता येताच जमलेले पैसे बॅंकेत भरले तिने.

“अगं एकदम आठवड्याचे भर की. तुझंही आणि माझंही, काम कमी होईल.”

“मॅडम, घरी नेले की पाय फुटतात हो पैशांना. पोराच्या शिक्षणासाठी जमायला हवी ना मोठी रक्कम.” ती अजीजीने बोलली.

आल्यावर मुलाला वाढून तीही जेवायला बसली. मग त्याला अभ्यासाला बसवून ती उद्या सकाळच्या तयारीत गुंतली.

शाळेचा अभ्यास करून मुलगा तिथेच झोपून गेला. ती ही जरा आडवी झाली.

रस्त्यावरून गजरेवाल्याच्या सायकलच्या घंटेच्या आवाजाने बरोबर जाग आली.

चहाबटर खाऊन , डबा घेऊन मुलगा रात्रशाळेत जायला निघाला. तासभर लोकलचा प्रवास. शेजारपाजारची मिळून सात आठ मुलं असंत. रात्री शेवटच्या लोकलने परत येत. लोकल कारशेडमधे जायची. पोरं चढल्याबरोबर झोपून जायची नी पहाटे लोकल परत फलाटावर आली की मग उठून घरी यायची. रोजचाच शिरस्ता.

मुलगा गेल्यावर मात्र तिने मस्त परत एकदा चहा घेतला करून. जरा खाऊनही घेतलं.

खोली आवरली. गजरेवाल्याने मगाशीच नेम धरून गॅलरीत भिरकावलेली फुलपुडी आत आणली.

पाणी गरम करायला ठेवलं. गरमागरम पाण्याने सुवासिक साबण लाऊन तिने सचैल स्नान केलं.

मॅचींग पेटीकोट मॅचींग ब्लाऊज घालून आरशासमोर बसली. केसांचा लांब शेपटा घातला. अर्थातच गंगावन लावून, एक बट कळत नकळत पाण्याचं बोट लावून तिने वळवली. मग गजरे माळले. चेहऱ्याला क्रीम फाऊंडेशन, पावडर, ओठांना लिपस्टीक. आधीचेच मोठे डोळे काजल पेन्सीलने टपोरे दिसू लागले. भिवया रंगवल्या. मोठी बिंदी लावली कपाळावर. जरीवर्क ची साडी नेसून चमचमता पदर दोन्ही खांद्यांवरून ओढून घेऊन तिने अत्तर लावले.

देव्हाऱ्यातल्या शंकराच्या तसबिरीला हार चढवला. उदबत्ती लावली. दिवा लावला. हात जोडून, डोळे मिटून, या देवदासीने प्रार्थना केली. “ हे प्रभू, आजची माझी सेवा स्वीकार करा! लहानपणी आईकडून मिळालेला वारसा, तिने दिलेली श्रद्धेची शिकवण ती मनोभावे पाळत होती. फुलपुडीतली सुवासिक फुले तिने गादीवर अंथरलेल्या स्वच्छ चादरीवर पसरली.

ती सावकाश गॅलरीत आली. तिच्या नेहमीच्या खुर्चीत बसली. खालून जाणाऱ्या इच्छूक ग्राहकांना ती दिसत होती, एखाद्या नववधूसारखी. आजच्या आपल्या देवाला सर्वस्व अर्पण करायला ती तयार होती.

देव्हाऱ्याखालचा मोठा लाकडी खोका नोटांनी तुडूंब भरला होता. पण ते पैसे मुलाच्या शिक्षणासाठी वापरणं या आईला मान्य नव्हतं!

काही माणसं हे एक वेगळंच रसायन असतं हेच खरं!