लघुकथाए - 6 - न दिली वचने Mrs. Mrinmayee Shirgaonkar द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • चाळीतले दिवस - भाग 6

    चाळीतले दिवस भाग 6   पुण्यात शिकायला येण्यापूर्वी गावाकडून म...

  • रहस्य - 2

    सकाळ होताच हरी त्याच्या सासू च्या घरी निघून गेला सोनू कडे, न...

  • नियती - भाग 27

    भाग 27️मोहित म्हणाला..."पण मालक....."त्याला बोलण्याच्या अगोद...

  • बॅडकमांड

    बॅड कमाण्ड

    कमांड-डॉसमध्ये काम करताना गोपूची नजर फिरून फिरून...

  • मुक्त व्हायचंय मला - भाग ११

    मुक्त व्हायचंय मला भाग ११वामागील भागावरून पुढे…मालतीचं बोलणं...

श्रेणी
शेयर करा

लघुकथाए - 6 - न दिली वचने

७ न दिली वचने


”तू तेव्हाही मला आवडायचास जेव्हा माझं असणं तुझ्या गावीही नव्हतं. कित्ती मुली घोळका घालायच्या तुला. कॉलेजचा हीरो होतास तू ! नाटक, गाणं, सगळीकडे तुझंच नाव. अभ्यासातही हुशार. प्रोफेसर्स पण फॅन होते तुझे. मी लांबूनच पहायची तुला. वाटायचं एक नजर तरी टाकावीस माझ्या दिशेने. नुसता लांबून दिसलास ना, तरी एक ठोका चुकायचा माझा. तुला मात्र तेव्हा माझी खबरबातही नव्हती. तू कायम त्या हायफाय मुलींच्या गराड्यात.”

“वेडी की खुळी तू? त्या ‘भावल्या’ कधीच नाही भावल्या मला. तू वेगळीच होतीस सगळ्यांपेक्षा. दिसायलाही, आणि वागायलाही. लांबसडक वेणी चालताना अशी काही तालात हलायची की कलेजा खल्लास. एक ठहराव होता तुझ्यात. तुझ्याकडे सरळ सरळ पाहण्याची हिम्मत नव्हती कोणाची. माझीही. एक प्रकारचा आब होता तुझ्यात. तुझे बोलके मोठे डोळे म्हणजे तर.. चुकून नजरेला नजर भिडली तर त्या खोल खोल निळ्या काळ्या डोहात बुडून परत वरच येऊ नये असं वाटायचं.”
“इश्श्य! काहीतरीच!”

“अहा! किती छान लाजता येतं गं तुला.”

“तरी कित्ती दिवस घालवलेस नुसतं बोलायलाही? मग एक दिवस मीच बोलले धीर करून. फोन नंबर मागितला तर तो ही देताना किती विचार केलास.”

“छे गं, मी ना पुरता बावचळूनच गेलो होतो. मनात माझ्याही होतं, तुझ्याशी बोलावं, परत भेटीसाठी काही मार्ग शोधावा. पण मी काही बोलण्या आधी तूच बोललीस आणि मी काय बोलावं न कळून गोंधळलोच.”

“मग मीच एका कागदावर माझा नंबर लिहून दिला. कसाबसा घेतलास कागद, आणि निघून गेलास. नंतर किती दिवस टाळायचास मला.”

“हो पण मग मीच फोनही केला ना काहीच दिवसांनी. घाबरट होतो गं. कमिटमेंटची भिती वाटायची मला.”

“नशीब, केलास फोन त्यादिवशी. नसता केलास तर? पुढं एवढं रामायण घडलच नसतं म्हणा!”

“पण त्यानंतरचे उरलेले काही महीने मात्र मंतरलेले होते.”

“हो ना, ते लांब सगळ्यांना चुकवून बाईकवरून भटकणं, कटींग चहा दोघात एकच कप घेऊन पिणं, पावसात भिजणं आणि खुळ्या रोमॅंटीक कविता लिहीणं, जगातली सर्वोत्कृष्ट कविता आहे ही असं वाटणं, रात्री रुमवर आल्यावर परत आपल्या गप्पा आठवून गालातल्या गालात एकटच हसणं, मैत्रिणींनी चिडवणं.”

“मित्रांनी तर मला वाळीतच टाकलं काही दिवस. ‘काय लेका गळाला लागलास’ म्हणाले. पण त्यांच्या नजरेतली सरळ सरळ असूया सुखावून जायची मला. आपण अख्ख्या जगाचे राजे आहोत असं वाटायचं तू बाईकवर मागे बसल्यावर.”

“मग परीक्षा झाल्या आणि आपण परतलो आपापल्या गावी. त्यानंतर तू गायबच झालास. ना मेल, ना पत्रं, ना फोन. माझे फोनही उचलेनास. नेहमी कोणीतरी दुसरच उचलायच, आणि मग मला ठेऊन द्यायला लागायचा. तेव्हा काही मोबाइल फोन नव्हते ना आत्तासारखे. मेललाही उत्तर नाही. मी आशाच सोडली होती. आईबाबा लग्नासाठी मागे लागले होते. तुझा काही पत्ताच नव्हता. तुझ्या मनात काय आहे ते ही कळत नव्हतं. काय सांगणार होते मी घरी? मला विसरलास असंच वाटलं मला. “पण मी तुझाच,” असं वचन दिलं होतस त्याचाच एक आधार होता मनाला.”

“अगं, आजारी नाही का पडलो गेल्या गेल्या. ताप इतका की सतत ग्लानीतच असायचो. मग वीकनेस प्रचंड. जरा बरा झाल्या झाल्या तुला फोन केला.”

“पण तरीही अडचणी काय कमी आल्या का?”

“इकडे मी तुला फोन केला, आणि तिकडे बाबा त्यांच्या मित्राला शब्द देऊन आले की तुझ्याच मुलीला सून करून घेईन. त्यांचे व्यावसायिक संबंध गुंतले होते ना! मग सुरू झाला आपला संघर्ष. तुझा तुझ्या घरच्यांशी, माझा माझ्या.”

“तुझ्या आणि माझ्या घरच्यांचं वागणं त्यांच्या दृष्टीने बरोबर होतं रे. तुझी आर्थिक सुबत्ता, आमची सर्वसाधारण परिस्थिती. मिसमॅच वाटत होतं त्यांना आपलं नातं.”

“मग आपण पळून जायचं ठरवलं घरातून. पटत नव्हतं , पण इलाजही नव्हता.”

“हं!” चहा टाकू?”

“नको. बस अशीच जवळ. बोलुया.”

“बरं”
“आपल्या दोघांजवळ मिळून अवघे २००० रुपये होते .कुठे जायचं, काय करायचं काही माहीत नव्हतं. ना नोकरी होती, ना घर. किती बालीश निर्णय होता तो.”

“हं! ह्रदयाने निर्णय घ्यायचं वयच होतं आपलं. खरच! निघून २४ तासही नव्हते झाले तर तुझे वडील पोलीस घेऊन आले. सोबत माझेही बाबा.”

“हं! क्षणात होत्याचं नव्हतं झालं. त्यानंतर घरच्यांचा विश्वास गमावला आपण.”

“मला तर घरातून बाहेर पडायचीही बंदी होती. अगदीच कुठे जायचं तर बाबा, किंवा आई बरोबर यायचे. काहीच दिवसात लांब उत्तरेत राहणाऱ्या मावशीकडे रवानगी केली माझी. तिच्या दिराच्या ओळखीने एक स्थळ आलं. मुलाला लग्न करून लगेच परदेशात जायचं होतं. त्याला घाई होती, यांना माझी अडचण होत होती. ‘चट् मंगनी पट् ब्याह’ करून मोकळे झाले.

तो खूप प्रॅक्टीकल होता. मला सर्व कल्पना दिली त्याने. परदेशात सगळी कामं हातानेच करावी लागतात. ती तयारी हवी. माझी फारशी मदत होणार नाही हे ही सांगितलं. मला विचारलं “तुला परदेशात रहायला आवडेल का?” मी नुसतीच मान हलवली. धड हो नाही धड नाही नाही. त्याने हो अर्थ घेतला. आवडले होते ना मी त्याला.”

“हं! का नाही सांगितलस, माझं दुसऱ्या मुलावर प्रेम आहे?”

“कसं सांगणार? तुझ्या वडिलांनी मला भेटून सांगितलं होतं, माझ्या मुलाचा नाद सोड. नाहीतर तुझ्या वडिलांची नोकरी नाही राहणार! माझे वरपर्यंत हात पोहोचलेले आहेत.”

“हं! वाटलंच मला! नाहीतर तू अशी हार मानणारी नव्हतीस. तुझं लग्न झाल्याचं कळलं आणि मी खचलोच! जगावसंच वाटे ना. दारूच्या आहारी गेलो. पण मग सुचेता, बाबांच्या मित्राची मुलगी, तिनं सावरलं. मग लग्न झालं तिच्याशीच. बाबांशीही दुरावा कमी झाला मग. आयुष्य जगत गेलो... रादर आयुष्य जगवत गेलं.”

“हो, आयुष्यच जगवत राहीलं. आणि तो ही. त्याच्या टिपिकल अलिप्त, पण जबाबदार व्यक्तीमत्वामुळेच सावरले मी आयुष्यात. पहिलं एक दीड वर्ष स्वत:च्या केविलवाण्या परिस्थितीवर कीव करण्यात, झालेल्या अन्यायाविषयी चरफडण्यात घालवली. मग एक दिवस अचानक लक्षात आलं , ‘चुका कोणाच्या? कोणाला शिक्षा? अन्यायच करतोय की आपणही! आणि अन्याय सहन करणारे आपणही, चूकच नाही का केली?’ डोळ्यांवरचा पडदा झर्कन नाहीसा झाला. मग मात्र अगदी मनापासून संसार केला. त्यानंतर लगेचच त्याच्याशी पहिलं भांडण झालं, भांडण मिटताना म्हणाला , ‘आज खऱ्या अर्थाने माझी बायको आहेस असं वाटलं’. मला भडभडून आलं रे! तेव्हापासून अगदी ठरवून प्रेम करत गेले. दोन सोन्यासारख्या लेकी झाल्या. भरभरून जगलो नंतर मात्र.”

“हं! खरं सांगू? आत्ताही जळलोच, तू त्याच्यावर प्रेम केलस हे ऐकून.पण सुचेतानेही मला कोरडा नाही राहू दिला. रसरसून प्रेम करायला शिकवलं मला तिने. तिचं सगळंच वागणं अगदी जीव ओतून! भांडेलही तितक्याच उत्कटतेने आणि प्रेमही तसंच. मुलगा झाला तेव्हाचा तर तिचा आनंद मी विसरूच शकत नाही कधी.”

“तू तिला सांगितलस माझ्याविषयी?”

“नाही. पण तिला माहीत असावं. कदाचित बाबांनी सांगितलं असावं. तिने कधीच विषय काढला नाहीपण.”

“हं! परिपक्व असावी मनाने.”

“तू, सांगितलस कधी माझ्याविषयी त्याला?”

“नाही. लपवायचं म्हणून नव्हे, पण नंतर गरजच उरली नाही. मी संपूर्ण समरस झाले त्याच्याशी.”

“हं!”
“चहा करतेच आता. हवेत गारवा सुटलाय किती. केव्हाचा कोसळतोय पाऊस!”

“पूर्वी चिंब भिजायला आवडायचं तुला.”

“हो. अजूनही पाऊस आवडतोच मला. तासंतास खिडकीतून पहात बसते. इथे आल्यापासून तर सारखीच. दुसरं आहे काय करायला?”

“तू, इथे का? कशी?”

“तो गेला दोन वर्षांपुर्वी. लेकी तिकडेच परदेशात, त्यांच्या संसारात रमल्यात. मग मी इकडे परत येण्याचा निर्णय घेतला. संतुष्ट, समाधानाने.एकटं राहाण्यापेक्षा ही संस्था बरी वाटली. समवयस्क लोकं भेटतात. चार गोष्टी बोलता येतात. पण मनासारखं जगता ही येतं. हा दोन रुम्सचा प्लॅटच माझं विश्व झालय.”

“तू?”
“सुचेताला स्ट्रोक झाला वर्षापुर्वी. डावी बाजू अधू झाली. मला म्हणाली, सुनेवर भार टाकून नाही जगायचय मला. आपण वेगळे राहू. मग अगदी वेगळे राहण्यापेक्षा ही संस्था बरी वाटली. म्हटलं तर स्वतंत्र, म्हटलं तर मदत मिळते असं. छान चाललय आमचं. जन्मभर तिने भरपूर केलं, आता मी करतो थोडं फार. तशी ती ही हिंडू फिरू लागलीय काठी , वॉकर घेऊन”

“मग आज नाही आली?”

“आज सकाळीच कोणता तरी जुना सिनेमा लावणार होते ऑडिटोरियम मधे, मैत्रिणीबरोबर मॅडम तिकडे गेल्या आहेत.”

“हं! हौशी दिसतेय!”

“हौशी, सुंदर, कलावान, नेटकी....”.

“पुरे की!”

“हांहां, जळलीस ना, आता हिसाब बराबर!”

“बरं बरं! मग, कधी भेटवतोस सुचेताला?”

“अं, नको!”

“का रे?”

“अगं, आधीची असती तर गोष्ट वेगळी होती. आता जरा हळवी झालीय गं! त्यातून पूर्वीसारखं सगळं एकत्र नाही करता येत आम्हाला. सकाळचं भराभर फिरणं, कधी टेकडी, कधी लांब फिरत जेवायला जाणं, ट्रीप्स ना जाणं. कधी कधी म्हणते ‘माझ्यामुळे अडकून पडलास.’ अशात तुला भेटवलं तर बारीकसा ओरखडा उमटेल मनावर, बोलायची नाहीच काही, मनापासून स्वागत करेल तुझं, पण कुठेतरी कानकोंडी होईल. तिला बारीकशी बोच पण नाही द्यायचीय मला.”

“लकी आहे रे सुचेता, माझ्यासारखीच. हं, घे, गवती चहा घातलाय.”

“आठवत होतं तुला?”

“न आठवायला काय झालं? शिवाय त्याला बिलकुल आवडायचा नाही कसलाही स्वाद चहाला. त्याला प्युअर चहाचा स्वाद हवा असायचा. म्हणून अधिकच आठवायचा गवती चहा!”

“हं! तू आता त्याच्याच आठवणी काढत बसणारेस का?”

“असू दे रे. आता आठवणीच तर आहेत माझ्याजवळ. अरे आपलं अख्खं आयुष्य या दोघांनीच तर व्यापून टाकलं. तू आणि मी फक्त रेशमी वस्त्राला बारीक जरीची किनार असते ना तसे उरलो एकमेकांसाठी. पण वस्त्राची उब, मऊसूत स्पर्श ,हे त्या दोघांनीच दिलं आपल्याला.”

“हं! खरय! चला, निघतो. आज सकाळीच अचानक समोर आलीस आणि ....”.

“(हसते.) हो ना, आजही ठोका चुकलाच माझा एक, पण मूळ ह्रदय त्याचच झालं रे कधीचं.”

“न दिलेली वचनं किती मनस्वीपणे पाळली त्या दोघांनी.”

“बरं झालं भेटलो ते, आयुष्यभर समजलं नव्हतं ते आज उमगलं , थेट आत शिरलीत ती दोघं आपल्या.

आता त्यांना न दिलेली वचनं आपण मात्र पाळूया.”

“कधीतरी भेटू असेच, त्याच्या आठवणी काढायला, तिचं कौतुक करायला.आणि एकमेकांना चिडवायला.”