पुढे...
"मंजिल पानेवाला हर कोई खुशनसीब नही होता,
सफर गर प्यार का हो, तो उसका अंजाम नही होता।"
प्रेमात पडतांना कुठलेच कष्ट लागत नाही म्हणतात..खरंय की ते..!! आपण बेसावध असतो आणि प्रेम नावाचं वादळ आपल्याला येऊन धडकतं. वादळात तर कोणीही फसू शकतं, त्यातून सुखरूप बाहेर पडायला मात्र कस लागतो...पण या प्रेमाच्या वादळातून बाहेर पडताच येत नाही, उलट आपल्याला आपले पाय तिथे घट्ट रोवून आयुष्यभर त्याचा सामना करत राहावा लागतो... सतत.. अविरत...! काय बोलला होता चेतन त्यादिवशी?? अम्म्म...हं... आम्ही प्रेमाच्या समुद्रात बुडालो आहे... वेडा कुठला...!! पण काहीवेळा असा फिलॉसॉफी झाडतो की त्याचे शब्द विचार करायला भाग पाडतात... त्याचं आणि साक्षीचं प्रेम मी समजू शकत होती, कारण माझ्या आतमध्येही त्याच प्रेमाचा सुगंध पसरत होता....
समुद्र नेहमीच हवाहवासा वाटतो ना आपल्याला....दूरवर विस्तारलेला, अथांग, अफाट आणि स्थिर, त्यामुळे प्रेमही तसंच असावं... अगदी खोल... ज्यात सगळंच पचवून घेण्याची शक्ती आहे, सहनशीलता आहे... कधी कधी या समुद्राचा मोह आपल्याला इतक्या खोलवर नेतं की नाकातोंडात जेंव्हा पाणी जायला लागतं तेंव्हा कळतं की आता परतीचे मार्ग बंद आहेत...प्रेमासारखे...जिथून आपण कधीच परत येऊ शकत नाही....
पण त्यादिवशी माझे पाऊलं तर फक्त पुढेच पडत होते, माझे सगळे मार्ग फक्त अतुलकडेच जात होते, माझ्या सगळ्या वाटांवरती फक्त अतुलच्याच पाऊलखुणा दिसत होत्या... आणि त्यामुळेच आता हा दुरावा संपवुन कधी मी त्याची होते हीच आशा होती...मी माझ्या पाऊलांची गती जेवढी वाढवली होती, त्यापेक्षा हजार पटीने माझ्या हृदयाची धडधड वाढली होती... 'निळा रंग घालून येशील' अतुल आवर्जून बोलला होता आणि त्याचा तो प्रेमळ आग्रह मी पण तेवढ्याच आपुलकीने जपला होता... तशी तर कधी नटण्या सवरण्याची आवड नव्हतीच मला पण आज ब्लु अनारकली वर, छोटीशी ब्लु टिकली, एका हातात मॅचिंग बांगड्या, काजळ आणि केसांनाही वाऱ्यावरच सोडलं होतं... एवढे कष्ट घेतले होते मी...मीनल ताईच्या लग्नात शेवटची अशी तयार झाली होती, तेंव्हा अतुल तर अतुल चेतनही किती डोळे फाडून बघत होता माझ्याकडे... आजही तसच अवघडल्यासारखं वाटत आहे..अश्यावेळी कसं बोलायचं, काय रिऍक्ट करायचं काही कळत नव्हतं, आणि त्यात निखिलने हा भला मोठा बुके हातात दिला होता...
संध्याकाळचे सात वाजले असतील, सूर्य मावळतीला गेला होता, पुर्ण कॉलेज ऑडिटोरिअम मध्ये जमलेलं आणि या शांततेत मी आणि अतुल एकटेच...मी वर्कशॉपच्या पार्किंग मध्ये पोहोचली, अंधार दाटत आला होता आणि माझे डोळे अतुलला शोधत होते... तो कुठेही दिसत नाही म्हणून मी त्याला फोन करणार इतक्यात मागून येऊन कोणीतरी मला घट्ट मिठी मारली आणि माझ्या हातातला बुके खाली पडला, घाबरल्याने गळ्यातून आवाजही निघत नव्हता, इतक्यात माझ्या डाव्या खांद्यावर त्याची हनुवटी टेकत तो बोलला,
"आलीस...??? माझीच वाट बघत होतीस ना???"
आणि हा अतुलचा आवाज होता, माझा जीव भांड्यात पडला....मी त्याच्या हातातून स्वतःला सोडवून घेण्याचा प्रयत्न केला तर त्याने त्याची पकड अजून घट्ट केली....
"काय करतोयेस?? सोड ना प्लिज..."
मी शरमेने विनंती करत त्याला बोलली,
"अरे...आपण दोघेच आहोत इथे....पण घे तरीही.. सोडलं.."
आणि त्याने त्याची पकड सैल केली..मी दोन पाऊलं त्याच्यापासून मागे गेली आणि त्याच्याकडे चेहरा करून उभी झाली... मी पडलेला बुके उचलणार तेवड्यात अतुल बोलला आणि तो बुके मी तसाच सोडला खाली....
"फार सुंदर दिसत आहेस... "
त्याच्या बोलण्यावर मी स्तब्ध झाली... उगाच खांद्यावरची ओढणी सांभाळत मी अजून दोन पाऊलं मागे झाली आणि वर्कशॉप बिल्डिंग च्या भिंतीला जाऊन अडखळली...अतुल पुन्हा तेवढ्याच जवळ आला आणि बोलला,
"काय झालं घाबरलीस?? अग, मी तर फक्त हे सांगण्याचा प्रयत्न करतोय की तू आज इतकी सुंदर दिसत आहेस की सिव्हील, मेक च्या मुलांची नजरच हटली नसेल तुझ्यावरून...आधीच तिथे पोरींचा दुष्काळ असतो, त्यात तुझ्यासारखी कोणी असेल तर मग...."
अतुल भुवया उंचावत, हातवारे करत बोलत होता पण मला त्याचं बोलणं अजिबात आवडलं नाही, मी त्याला मधेच अडवल आणि त्याच्या नजरेला नजर देत बोलली,
"अतुल प्लिज...आपल्याबद्दल बोलूयात..."
त्याने कटाक्ष माझ्यावर टाकला तशीच मी माझी नजर झुकवली आणि तो माझ्या दोन्ही खांद्याना पकडत बोलला,
"ए... इकडे बघ, माझ्याकडे...."
आणि जेंव्हा मी हलकीच मान वर करून त्याच्या डोळ्यात पाहिलं तर, किंचित हसून डोळे बारीक करून कुत्सितपणे बोलला,
"लबों पे नाम हमारा, दिल मे खयाल किसी और के,
कितने रंग दिखाएगी मोहब्बत अपने बेवफाई के..।"
मी आश्चर्याने अतुलकडे पाहिलं तशी त्याची माझ्या खांद्यावरची पकड अजून मजबूत झाली, त्याचे डोळे पाणावलेले पण तेवढेच लालबुंद झालेले आणि रागाने त्याचा श्वास वरखाली होत होता...
"हं???...काय...??काय चाललंय तुझं हे अतुल...??"
मी त्याचे हात बाजूला करत बोलली,
त्याने त्याच्या मुठ्या आवळल्या, रागाने एक उसासा टाकला आणि मला बोलला,
"मला विचारतेस तू काय चाललंय?? हे तर मी तुला विचारायला पाहिजे होतं इतके दिवस...की तुला काय हवंय?? त्यादिवशी होस्टेलच्या बाहेर ही बोललो होतो की विचार करून निर्णय घे...पण नाही... तुला तर मज्जा येत असेल ना...ओहह गॉड... मी का तुझ्या ह्या भोळ्या चेहऱ्याकडे पाहून नेहमी वाहवून जातो....?"
"हे बघ, सरळ सरळ बोल काय झालंय?? आता तुझं कोडं सोडवण्याची मनस्थिती नाही माझी...."
तेंव्हा मिलनाच्या हुरहुरीने ठोके देणारं माझं काळीज आता भीतीने थरथरत होतं...
"आज आता या क्षणाला माझ्यासोबत असण्याची तरी मनस्थिती आहे का तुझी??? का अशी करतेस?? कधी तरी कोणा एका सोबत प्रामाणिक रहा..ज्याच्यावर जीव आहे त्याच्यासोबत रहा पण बाकीच्यांचा ही विचार कर जरा, त्यांना का दुखवतेस?? मला का दुखवतेस??? की अभ्यासासोबत हे पण टायलेंट आहे तुझ्यात?? किती लोकं ताटकळत ठेवलेस लाईन मध्ये..?? मी, निखिल, चेतन... अजून कोण कोण...?"
अतुलच्या शब्दांनी माझ्या पायाखालची जमीनच ओढून घेतली होती...खूप सुंदर स्वप्न बघत असाताना अचानक खाडकन डोळे उघडावे अन समोर फक्त अत्यवस्थ असलेली वास्तविकता दिसावी, असंच काहीसं झालं होतं माझं..अतुल माझ्या बद्दल बोलतोय यावर विश्वास ठेवणं कठीण जात होतं... त्याच्या तोंडून माझ्यासाठी जी शब्दसुमने बाहेर पडत होती त्यासाठी त्याच्या कानशिलात ठेवून द्यावी हा विचार आला पण आज ऐकून घ्यायचं होतं सगळंच... पण याची कारणं काय आहेत हे कळत नव्हतं..
"तुला कळतंय तू काय बोलतोयेस?? शुद्धीवर आहेस ना?? कारण तुझ्या ह्या बिनबुडाच्या गोष्टी मला तरी कळत नाहीयेत....?"
मी आहे त्या जागेवरचं भिंतीला खेटून उभी होती, माझ्या ह्या प्रश्नावर त्याने त्याचा उजवा हात भिंतीवर जोरात मारला, डोळे बंद केले आणि पुन्हा माझ्यावर दात ओठ खात बोलला,
"वा... कळत नाही तुला?? हाच प्रॉब्लेम आहे तुझा, तुला काही कळतच नाही... माझ्या फिलिंग कधीच नाही कळल्या का तुला?? जर नाही कळल्या तर प्रत्येक वेळी मला असं का भासवून दिलंस की तुझ्या आयुष्यात माझ्याशिवाय कोणीच नाही?? आणि जर कळल्या होत्या तर माझ्याशिवाय दुसऱ्याचा विचार केलाच कसा तू...??"
त्याने मला पकडून हलवत विचारलं,
"तुला खरंच वाटतं की माझ्या मनात, माझ्या आयुष्यात दुसरं कोणी असेल??"
मी गहिवरलेल्या आवाजाने बोलली..अतुलच्या शब्दांनी काळजावर सपासप वार केले होते, त्या वेदनेने डोळ्यांच्या कडाही पाणावल्या होत्या...
"माहीत नाही... खरं तर निर्णयचं होत नाहीये माझा...जेंव्हा जेंव्हा तुझ्या जवळ येण्याचा प्रयत्न केला, हेच जाणवलं की तू माझ्या सोबत खूप अवघडलेली असतेस, आपल्यात मोकळा संवाद कधीच झाला नाही, जितकी हसून मिसळून तू चेतनसोबत असते, निखिल सोबत असते, तशी माझ्याबरोबर कधीच नव्हतीस... आणि बघ ना विराधाभास.. तू चेतनला सगळ्यांसमोर मिठी मारतेस, त्याच्या इतक्या जवळ असतेस... तुझा तो निखिल, काय बोलतो तो नेहमी ऊठसूट सगळ्यांसमोर..'तेरे बिना दिल नही लगता मेरा'... ते सगळं तुला चालतं... आणि मी?? माझं काय?? तू मला जवळ ही करत नाहीस आणि तुझ्यापासून लांबही जाऊ देत नाहीस... जेंव्हा जेंव्हा असं वाटतं की आता आपल्यात कोणी तिसरं नाहीच, तेंव्हा तेव्हा तू त्या तिसऱ्या व्यक्तीला मध्ये आणून माझा भ्रम दूर करतेस..."
"हो का??? एवढंच ओळखलंस तू मला??? आणि आज सकाळ पर्यंत तर तुझा निर्णय झाला होता ना माझ्या बाबतीत, मग आता अचानक काय झालं?? एवढाच द्वेष होता माझ्या बद्दल तर तू का आलास स्वतःहुन बोलायला त्यादिवशी स्टेशन वर?? आणि आजच का तुला इतके प्रश्न पडतायेत?? जर मी तुला दुखवत होती तर तू का इतके दिवस ते सहन करत होतास?? याआधीच बोलून मोकळा का नाही झाला...."
"तेच चुकलं...आधीच बोलायला हवं होतं, पण मला वाटलं होतं की माझ्या मनात तुझ्याबद्दल ज्या भावना आहेत तश्याच तुझ्या मनातही आहेत माझ्याबद्दल, पण आज तू मला चुकीचं ठरवलंस...तुला चेतनही हवा असतो आणि तो नसतांना तो निखिल पाहिजे आसपास...म्हणजे तुला काय समजावं मी?? तुझ्या पूर्ण डिपार्टमेंट ला माहीत आहे तो किती मरतो तुझ्यावर, इन्फॅक्ट त्याने तर तुला प्रोपोज करायची सगळी तयारी ही केली होती...कदाचित केलंही असेल, तू कुठे मला ते सांगणार आहेस?? तू फक्त हाक द्यावी अन तो लगेच धावत पळत हजर असतो तुझ्यासाठी.. का?? आणि हे सगळं जेंव्हा मला आज माहीत झालं मी तर शॉक मध्ये होतो.. त्यात तू स्वतःची इतकी इमेज जपणारी, कॅन्टीनच्या बाहेर सगळ्यांसमोर चेतनच्या गळ्यात काय पडतेस हे पाहून तर कळलं मला की माझी काहीच किंमत नाही तुला...."
अतुल मला पाठमोरा उभा झाला, आणि स्वतःचे डोळे पुसत पुसत मला बोलला... त्याची अवस्था पाहून मला वाईट वाटत होतं, तेवढा रागही येत होता...त्याने फारच गुंतागुंतीचं केलं होतं सगळं, पण तरीही मी हा गुंता सोडवणार होती, त्याला जे काही गैरसमज झालेत ते दूर करणार होती, आणि म्हणूनच मी त्याला स्पष्टकरण देण्याचं ठरवलं, मी त्याच्या खांद्यावर हात ठेवत त्याला समजवण्याचा सुरात बोलली,
"हे बघ अतुल...तुला काहीतरी गैरसमज झालाय...नको ना इतका चांगला दिवस खराब करू...आपण शांततेत बोलू ना...निखिल फक्त अन फक्त माझा मित्र आहे, त्याला माझ्या बद्दल काय वाटते हे मला माहित नाही, आणि तो तसा काही करणार ही नाही, ह्याची गॅरंटी आहे मला...तूच बोलतो ना की आपल्या कॉलेजमध्ये लगेच अफवा पसरतात... कदाचित मी अन निखिल काहीना काही निमित्ताने सोबत असतो म्हणून असे गैरसमज झाले असावे... निखिल बद्दल मला काही वाटलं ही नाही अन कधी वाटणार ही नाही...."
नातं टिकविण्याचे माझे प्रयत्न मी करत होती, कारण जर समोरचा रागात असेल तर आपण शांत राहून बोलायला हवं, नाहीतर होणारी गोष्ट ही बिगडून जाते...मी असं बोलल्यावर तो माझ्याकडे वळला आणि बोलला,
"...आणि चेतन??? त्याच्याबद्दल काय वाटतं तुला?? "
तो निर्विकारपणे बोलला,
"काय??? निखिल बद्दल तुला काही माहीत नाही ते समजू शकते मी.... पण चेतन?? तू, मी, चेतन लहानाचे मोठे सोबत झालो, आमच्याबद्दल तुला असं कसं वाटू शकतं??? चेतन तुझा भाऊ आहे...माझ्यावर नाही, त्याच्यावर तरी भरोसा असू दे....."
"कसा कोणावरही भरोसा ठेवू मी?? लहानपणापासून ओळखतो ना आपण एकमेकांना, मग तू का माझ्या भावना नाही ओळखू शकली...मी कितीतरी वेळा तुला ते सांगण्याचा प्रयत्न केला पण जेव्हा कधी बोलण्यासाठी पुढाकार घेतला, तुझ्या आसपास नेहमी चेतन असायचा.. आणि तू... तुझ्या दिवसाची सुरुवात आणि रात्रीचा शेवट ही चेतनवर व्हायचा, अजूनही होतो... तुम्हा दोघांना एकत्र पाहून असं वाटतं की तुमच्या मध्ये तिसऱ्यासाठी जागाच नाही इतके जवळ आहात तुम्ही... गेले चार वर्षे मी हेच बघत आहे...तुला काय हवं असतं, काय नको असतं सगळी खबर त्याला... तुम्ही दोघे सोबत आले तर मी तुमच्यात असूनही नसल्या सारखा असतो...इतके दिवस स्वतःला हेच समजवल की हे माझ्या मनाचे खेळ आहेत, आणि शपथ सांगतो आज सकाळपर्यंत मी या गोष्टीवर ठाम होतो की आपल्या दोघांमध्ये कोणीही येऊ शकत नाही... या वाटेवर मी इतक्या पुढे येऊन आज पुन्हा तू मला चुकीचं ठरवलंस...तू चेतनची बेस्ट पार्टनर आहेस ना...हेच बोलतो ना तो... मी कुठे आहे तुझ्या आयुष्यात?? कुठेच नाही... "
अतुलच्या मनातला राग ज्वालामुखीसारखा बाहेर निघत होता आणि मी शक्य तेवढ्या सौम्य शब्दांत तो शांत करण्याचा प्रयत्न करत होती...
"असं काहीही नाहीये..प्लिज विश्वास कर...चेतनाचा स्वभाव किती बोलका आहे हे माहीत आहे ना तुला... आणि माझ्यासाठी फक्त त्याची चिंता आहे दुसरं काही नाही... माझ्यासाठी ही तो एका मित्रापेक्षा जास्त काहीही नाही.. आज तर त्याच्यासाठी ही आनंदाचा दिवस होता... तुला माहीत आहे, तो अन साक्...."
आणि मी अतुलचा गैरसमज दूर करण्यासाठी त्याला चेतन अन साक्षीबद्दल सांगायचा प्रयत्न करत होती इतक्यात, त्याने येऊन माझ्या उजव्या मनगटाला घट्ट पकडलं आणि बोलला,
"ठिक आहे...हे पण मान्य...तुझे सगळे बहाने सत्य समजणून मान्य... माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे... तुझ्या आयुष्यात माझ्याशिवाय दुसरं कोणी नाही ना.. तर मग माझ्यासाठी तू काय करू शकते???"
मी बोलता बोलता थांबली आणि अतुलच्या चेहऱ्यावरचे भाव समजण्याचा प्रयत्न करू लागली की त्याला नक्की काय वदवून घ्यायचं आहे माझ्याकडुन...त्याने अजूनही माझा हात सोडला नव्हता,
"अशी काय बघतेस??? जीव नाही मागत आहे मी तुझा... मी पाहिजे ना तुला आयुष्यात तर मग माझ्यासाठी तू निखिल, चेतनशी तुझी मैत्री तोडू शकते कायमची??? त्यांना बघायचं नाही, बोलणं तर दूरच...करू शकते हे??"
इन्फॅक्ट कोणत्याच मुलाशी मैत्री नाही ठेवायची तू...तुला आयुष्यात कोणत्याच गोष्टींची कमतरता भासू नाही देणार मी...."
अतुलचं हे रूप मी पहिल्यांदा बघत होती किंवा हे म्हणेल की त्याचं खरं रूप मी बघितलंच नव्हतं...काय खरं काय खोटं काहीही कळत नव्हतं... त्याचे शब्द ऐकून माझ्या डोळ्यांच्या कडेला जे पाणी साचलं होतं ते घळकन गालांवरती ओघळलं... तो माझ्या उत्तराच्या प्रतीक्षेत होता, मी बोलली,
"इतनी शिकायत , इतनी शर्तें , इतनी पाबन्दी …
तुम , मोहब्बत कर रहे हो या एहसान….
नको...नको करुस इतके उपकार माझ्यावर... माझ्यामुळे तुला इतका त्रास होतोय, त्यासाठी मनापासून सॉरी.. पण आता माझं या जागेवर आणि तुझ्या आयुष्यात थांबणं योग्य नाही.. निघते मी..."
आणि स्वतःचे डोळे पुसत मी माझा हात त्याच्या हातातून सोडवला आणि जायला निघाली, तो ही माझ्या मागे मागे येत बोलला,
"ए.. थांब..माझ्या प्रश्नाचं उत्तर न देता तू जाऊ शकत नाही..."
मी माझा हुंदका आवरत, डोळ्यातलं पाणी पुसत झपाझप चालायला लागली आणि बोलली,
"माझ्याकडे बोलायला काहीच नाही.….सॉरी..."
अतुल मला वारंवार थांबायला सांगत होता, पण आता त्याचा राग सहन करण्याची शक्ती माझ्यात नव्हती त्यामुळे मी माझी गती अजून वाढवली...मी थांबत नाहीये हे बघून तो आणखी चिडला, आणि त्याने येऊन माझा उजवा करकचून आवळला आणि बोलला,
"तुला मी काहीतरी बोलतोय आणि तुला कशाची घाई आहे गं??? माझ्या मनाशी इतके दिवस खेळून तुझं मन भरलं असेल ना आता, त्यामुळे तू थांबत नाहीयेस का...?"
अतुल रागाच्या भरात काय बोलत होता, काय करत होता हे त्याचं त्यालाही कळत नव्हतं, त्याने माझा हात इतका दाबून धरला होता की हातातल्या बांगड्या तुटून हातात रुतल्या होत्या, मला प्रचंड वेदना झाल्या आणि मी कळवळली
"आहह... मला दुखतंय अतुल, प्लिज सोड.."
आणि वेदनेने माझ्या डोक्यातून घळाघळ पाणी वाहत होतं, पण तरीही अतुलचं तेच सुरू होतं की 'माझ्या प्रश्नाचं उत्तर दे...चेतन, निखिल सोबत मैत्री तोडून दे..."
आणि अचानक त्याने हात सोडला जेंव्हा त्याच्या बोटांना हे जाणवलं की माझ्या हातातून रक्त निघतय...ते पाहून त्याने लगेच रुमाल काढला आणि रुमालाने माझा हात पुसत त्याने मला पार्किंग मध्ये असलेल्या कट्ट्यावर नेऊन बसवलं....
"सॉरी, सॉरी...आज पण माझ्या रागाने तुला त्रासच दिला.. मला हे करायचं नव्हतं...पण तू का नाही समजून घेत मी नाही बघू शकत तुला कोणासोबत त्यामुळेच बोलतो की जिथे फक्त तू अन मी अस..."
आणि बोलता बोलता त्याने मला मिठी मारली, आज पहिल्यांदा मी अतुलचा इतका तीव्र संताप आणि त्याला इतकं हळवं होताना बघितलं होतं, त्याला इतकं गहीवरुन आलं होतं की पुढे बोलल्याही जात नव्हतं... तरीही स्वतःला सावरत तो बोलला,
"मला माहित आहे तुला खूप राग आलाय, पण मला तुला गमवायचं नाहीये, खूप इनसेक्युर फील होतं मला जेंव्हा मी तुला दुसऱ्या कोणासोबत बघतो.. असं वाटते जर उद्या उठून तू येऊन बोलली की तू दुसऱ्या कोणाची आहेस तर मी काय करायचं??? आणि जेवढं चांगलं नातं तुझं चेतनसोबत आहे, जितकी मोकळीक तुझ्या अन निखिलच्या मध्ये आहे, मला ते आपल्यात जाणवत नाही, आणि माझी भीती अजूनच वाढते...तुला माहीत आहे ना, किती लहान होतो आपण, तेंव्हापासून माझ्या मनात जी एक जागा होती तिथे फक्त मी तुलाच बघितलं आहे... तुला दुसऱ्या कोणासोबत पाहिलं तर मला माझा राग अनावर होतो, खूप असुरक्षित वाटतं... त्यामुळेच बोलतो आपण एकमेकांसाठी असतांना काय गरज आहे आपल्याला मित्रांची..? मी अश्या असुरक्षित वातावरणात नाही जगू शकत...त्यामुळे आताच निर्णय घे, भविष्यात जर अश्या कोणत्या मित्रांमुळे तू दूर गेलीस तर मी काय करायचं मग??
कुछ नहीँ था मेरे पास खोने को,
जब से मिले हो तुम डर गया हूँ मैँ.."
मी त्याला दूर केलं आणि बोलली,
"तुला मला गमवायचं ही नाहीये आणि माझ्यावर असे संशय ही घ्यायचे आहेत, मी कशी राहू?? आणि आज जी इनसेक्युरिटी तुला आहे ती भविष्यात होणार नाही हे कशावरून??? मी पासआऊट झाल्यावर कदाचित एमटेक करेल, जॉब करेल, सतत माझा संपर्क मुलांशी येणार मग माझ्याही डोक्यावर तुझ्या संशयाच्या भुताची नेहमीच टांगती तलवार असेल...मग मी असुरक्षित नाही का अतुल?? ठीक आहे निखिल आज सोबत आहे, उद्या कॉलेज संपल्यावर तो नसेलही सोबत पण चेतन... तो फॅमिली आहे तुझी... त्याच्या पासून कसं अंतर ठेवणार तू?? आणि नातलग आहे म्हणून माझाही सतत त्याच्याशी सामना होत राहणार मग मी काय करायचं?? आज तुला माझ्यावर इतका अविश्वास आहे की तू माझ्या चरित्रावर ही संशय घेतले, उद्या असं घडणार नाही हे कशावरून?? तुला जशी चीड येते तशी मला ही येते जेंव्हा प्रिया सतत येऊन तुझ्या गळ्यात पडत असते, जेंव्हा कॉलेजच्या मुली तुझ्याविषयी बोलत असतात, पण मी अशी तुझ्यावर संशय नाही घेत...कारण एक गोष्ट मी मान्य केली आहे की माझ्याव्यतिरिक्त ही तुझ्या आयुष्यात खूप लोकं आहेत, मित्र आहेत आणि माझ्यामुळे त्यांनी तुझ्यापासून दूर व्हावं ही कामना मी कधीच केली नाही... कारण माहीत आहे का??? कारण प्रेम फक्त माणसं जोडायला शिकवते, तोडायला नाही... आणि जे प्रेम आपल्याला आपल्याच लोकांपासून दूर करत असेल तो तर स्वार्थ आहे, ते प्रेम निरंतर साथ देईल याची गॅरंटी नाही...तुझ्या बोलण्यातुन मला आज फक्त अन फक्त संशयाचा गंध येत आहे.."
माझं ऐकून त्याने माझ्या तळहातावर त्याचा हात ठेवला आणि एका हाताने स्वतःचे डोळे पुसले अन बोलला,
"तुला जे समजायचं ते समज, पण उद्याचा त्रास कमी करण्यासाठी जर आज मी तुला काही मागत आहे तर त्यात चुकीचं काय आहे?? आपलं नातं सुरक्षित ठेवण्यासाठी इतका प्रॅक्टिकल विचार तर मी करूच शकतो ना...आणि खूप विचार करून ठेवलाय ग आपल्या बद्दल... माझी जॉइनिंग मला बेंगलोर किंवा दिल्ली ला मिळेल, तू पासआऊट झाली की तू ही तिकडेच ये, मग पुन्हा काही आपण महाराष्टात परत यायचं नाही..आणि तसंही सगळे बिझी होतात नंतर, मग चेतन काय किंवा निखिल काय सगळे प्रॉब्लेम सोल्व्ह होतील..."
आता अतुलच्या बोलण्यावर मला आश्चर्य ही झालं आणि चिडही आली, मी त्याला उत्तर देत बोलली,
"हं.. आपलं नातं??? जर खरंच हे 'आपलं नातं' असतं तर तू परस्पर काहीही विचार करून मोकळा झाला नसतास.. जर हे खरंच 'आपलं नातं' आहे हे समजून तू मला तितकंच महत्त्वाचं मानलं असतं तर तू कॅन्टीनमधून निघून गेल्यावर माझ्यावर आणि चेतनवर अशी चोरून चोरून जासुसी नजर ठेवली नसतीस...जे आहे ते समोर येऊन क्लिअर केलं असतंस...बट यू नो व्हॉट?? तू मला समजून घेण्याऐवजी, माझ्या आणि चेतनचा किंवा माझं आणि निखीलच्या मैत्रीचा असा गैरअर्थ लावण्यात बिझी होता ....जर हे 'आपलं नातं' असतं तर तू आमच्या मैत्रीचा अर्थ लावण्या किंवा काढण्यापेक्षा, समजून घेतला असतास...."
मी त्याच्या हातातून माझा हात सोडवत बोलली....
"हे बघ...मला माहित आहे तू चिडली आहेस माझ्यावर... खरं तर इतके दिवस ही घुसमट मी सहन करत होतो, आज ती बोलून दाखवली...हो, कदाचित तुला माझी पद्धत चुकीची वाटत असेल पण आपल्या भविष्या बद्दल विचार करणं चुकीचं तर नाही ना...मला काळजी आहे तुझी... जाऊदे सोड सगळं, आपण आताही नवी सुरुवात करू शकतो...तू सोबत नसलीस की खूप फरक पडेल मला, बाकी हे मित्र वैगरे सगळे टेम्पररी असतात, त्यांच्यामुळे मला काही फरक पडत नाही...बोल मान्य आहे तुला??"
"तुला फरक पडत नाही पण मला पडतो... आणि कोणत्या नात्याची सुरुवात करायची आपण?? ते नातं ज्याचा पायाच संशय आहे...ह्या संशयाच्या फांद्यांमुळे प्रेमाची पानं कधी गळून पडतील याचा अंदाज नाही... जर माझ्या प्रमाणिकपणाचा तुला पुरावा द्यावा लागत असेल तर हा व्यवहार झाला ना...किती सहज बोलतो तू की सगळं सोडून जायचं आपण... का सोडायचं मी सगळ्यांना?? तुला महाराष्ट्रात परतायचं नसेल, पण माझी फॅमिली, माझे मित्र, माझे लोकं सगळे इथेच आहेत..मी एका व्यक्तीसाठी इतक्या लोकांना पाठीमागे नाही टाकू शकत...आणि त्यासगळ्यांना सोडून मी हसत हसत तुझ्याकडे आलीही असती तर तू थोडासा विश्वास दाखवला असतास माझ्यावर... तुझे शब्द किती त्रास देऊन गेले मला याची जाणीव आहे तुला??? आपल्यात कधीही मोकळा संवाद झाला नाही याची खंत मलाही आहे, दुर्दैव आहे ते आपलं, पण म्हणून त्याचं दुःख अश्याप्रकारे बाहेर पाडायचं हे मला नाही पटत...."
मी आता कट्ट्यावरून उठून उभी झाली, आता मला तिथे क्षणभर ही थांबायची ईच्छा नव्हती, मी वळून अतुलकडे पाहिलं तर तो प्रश्नार्थक नजरेने बोलला,
"म्हणजे काय म्हणायचं आहे तुला??? की आपण वेग.."
त्याला मध्येच अडवत मी बोलली,
"...वेगळं होण्यासाठी एकत्र होतोच कधी आपण?? पण माझ्या मनात तुझ्यासाठी ज्या भावना आहेत त्या किती खऱ्या आहेत हे दाखवून देण्याची, त्यासाठी पुरावा देण्याची तयारी नाही...तू ते समजून घ्यायला हवं होतंस...जर नात्याची सुरुवातच इतकी तकलादू असेल तर आज मी कितीही मित्रांना सोडलं तर उद्या संशयाच्या वाऱ्याची झुळुकही यांच्या भिंती पाडू शकते...आणि इतक्या कमजोर नात्यासाठी मी माझ्या आयुष्यातल्या सगळ्यात सच्च्या आणि मजबूत असणाऱ्या नात्यांना मी सोडून द्यावं... कधीच नाही...!! मी नाही सोडू शकत... पावसापेक्षा ही जास्त ओलावा मैत्रीत असतो, आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक नात्याचा सार म्हणजे मैत्री... कोणतेही रक्तसंबंध नसताना अडचणींच्या वेळी निस्वार्थपने धावून येणारं नातं म्हणजे मैत्री... आणि विशेष म्हणजे यात प्रमानिकपणाचे पुरावे ही द्यावे लागत नाहीत... आणि या नात्यांसाठी मी कितीतरी संशयी नाते तोडू शकते..."
आणि असं बोलून मी पुन्हा त्याच्याकडे पाठ करून उभी झाली आणि जायला निघाली....
"मी...मी खोटा वाटतो तुला, माझ्या भावना खोट्या वाटतात तुला?? हो ना?? मी फक्त तुला माझी भीती बोलून दाखवली.. तुला गमवण्याची भीती.. "
"ही भीती तुला आयुष्याभर राहणार अतुल, कारण तुझा विश्वास कमजोर आहे आणि या परिस्थितीत आपण सोबत राहिलो तर सतत संशय आणि विश्वासाच्या मध्ये हेलकावे खात राहणार, कोणीही आनंदी राहू शकणार नाही.. त्यापेक्षा तर वेगळं राहून आनंदी राहायचं...हां, थोडे दिवस त्रास होईल पण हळूहळू सवय होऊन जाईल...तुझ्या थिंकिंग प्रमाणे अगदी प्रॅक्टिकल सोल्युशन दिलंय मी.."
हे सगळं बोलताना मी माझं मन कसं सांभाळलं हे माझं मलाच माहीत होतं...न दिसणाऱ्या पण तरीही सतत सहन कराव्या लागणाऱ्या असंख्य वेदनांना मी निवडलं होतं... हे बोलत असताना माझी अतुलकडे बघण्याची हिम्मत होईना, तो माझ्या समोर येऊन उभा झाला, पाणावलेल्या डोळ्यांनी त्याने माझ्याकडे पाहिलं आणि करकचून मला मिठी मारली आणि बोलला,
"नको संपवूस असं सगळं....खूप कठीण जाईल तुझ्याविना जगणं....आयुष्य खूप छोटं आहे ग, वेळ निघून गेल्यावर न मी परत येणार न तू..."
अतुलचा रडवलेला आवाज मला कमजोर करणार याआधी मी त्याला बाजूला केलं अन बोलली,
"सुरवात तू केली होतीस...मला तर अंत करावाच लागला असता...आणि तसही प्रेमाचा आरंभ आणि अंत आपल्या मनाप्रमाणे होईल हे जरूरी तर नाही...."
खूप कठोर मनाने मी त्याला बाजूला केलं आणि
माझी पाऊलं हॉस्टेलकडे उचलली..तो बाजूला झाला होता तरी त्याने माझ्या डाव्या हाताचा दंड अजूनही पकडून ठेवला होता... मी त्याची तमा न बाळगता मागे वळली आणि चालायला लागली... जसा जसा त्याचा हात माझ्या हातावरून सरकत होता, माझे अश्रू तितकेच वाहत होते...आणि एका क्षणाला माझ्या बोटातून त्याच बोट ही सुटलं आणि अतुल त्याच्या दोन्ही गुडघ्यांवर खाली कोसळला...मी जरी पुढे चालत होती तरी मला त्याची अवस्था जाणवत होती... पण मला त्यावेळी जे योग्य वाटलं ते मी केलं...
"फासले ऐसे भी होंगे ये सोचा न था,
वो सामने बैठा था मेरे, पर मेरा न था।"
अतुलचे शब्द आठवून आठवून मला खूप वेदना होत होत्या...'कोणातरी एकासोबत प्रामाणिक रहा, मुलांच्या मनाशी खेळणारी वैगेरे वैगरे...' हे सगळे वाक्य मला तीव्र वेदना देऊन जायचे...किती किती स्वप्नं पाहिले होते मी आणि अतुलने आज माझ्या चरित्रावरच चिखलफेक केली होती.. त्या अतुलने ज्याच्यावर मी जीवापाड प्रेम केलं...आपल्या व्यक्तीने दिलेल्या जखमा खूप गहिऱ्या असतात...त्याचे व्रण तर दिसत नाहीत पण त्या सदैव भळभळत असतात...अतुलनेही असाच घाव मला दिला होता.....
कोणत्याही नात्याचा आधार विश्वास असतो, पण जर एकदा संशय नात्यात घुसला की तो किडा ते नातं उध्वस्त केल्याशिवाय बाहेर पडत नाही... मी चूक केलं की बरोबर केलं हे मला माहित नव्हतं, पण चेतन आणि साक्षिच्या नात्यातला विश्वास पाहून याची जाणीव नक्कीच झाली होती की संशयाच्या विटांनी बांधलेलं प्रेमाचं घर कोणत्याही हवामानात टिकत नाही... आणि असं झालं असतं तर मला आणि अतुलला दोघांनाही त्यातून सावरणं कठीण झालं असतं... अतुल कोणत्याही परिस्थितीत फक्त आनंदी राहावा हेच सदैव मी मागत आलेली, पण जर मी त्याच्या दुःखाचं कारण बनत असेल तर मी निघून जाण्यातच आमची भलाई होती असं मला वाटलेलं....
***********************
क्रमशः
(Dear readers,
कथा लवकरच पूर्ण होणार आहे...आजपर्यंतचे सगळे भाग, माझं लिखाण, ही कथा कशी वाटली हे मला तुमच्या समीक्षेतून, तुमच्या मॅसेज मधून नक्की कळवा ही आवर्जून विनंती करतो मी...अश्या नवनवीन कथा तुमच्या पर्यंत पोहोचवायला मला खूप आवडेल पण त्याआधी माझं लिखाण तुम्हाला रुचतंय की नाही हे मला कळायला हवं, त्यासाठी तुमच्या रेटींग्ज आणि समीक्षेच्या प्रतिक्षेत सदैव...)
तुमचीच,
अनु...🍁🍁